तमसो मा ज्योतिर्गमय

Story Of A Street Girl


विद्या हे धन आहे रे
श्रेष्ठ साऱ्या धना हून
तिच्या साठा जया पाशी
ज्ञानी तो मानवी जन

ज्योतिबा फुले.


ही गोष्ट आहे अशाच एका ध्येयवेढ्या मुलीची, जिने शिक्षणासाठी अनंत अडचणी सहन केल्या आणि त्यावर मात करून ती स्वाभिमानाने उभी राहिली.


भर मे महिन्याच्या उन्हाळ्यात अनवाणी पायांनी ती रस्त्यावर भटकत असे. कधी तिच्या हातात फुगे असायचे, तर कधी पेन आणि कधी केवळ भिक्षासाठी समोर पसरलेले हात आणि कधी कधी केवळ रस्त्यावरुन जाणार्या लोकांकडे बघणारी आशाळभूत नजर. तसा तिचा जन्म फुटपाथवरच झाला होता आणि ती तिथेच वाढतही होती.

फुटपाथवर पाल बांधून राहणारे तिचे आईबाप. एकूण भावंडातली ती चौथी बहीण आणि कुटुंबातली एकुलती एक मुलगी. तिची आई मुख्य रस्त्याच्या बाजूला खेळणी विकते असे तर वडील रिक्षा चालवायचे. फूटपाथ वर जगणाऱ्यांच्या आयुष्याची दारिद्र्यशी काय तुलना करावी? केवळ दारिद्र्यच नाही तर वाहनांची धूळ, धूर त्यातून बाहेर पडणारा तो गरम उग्र वायू आणि त्याचा जीव नकोसा करणारा उग्रवास, ऊन-पावसाचा मारा,थंडीत कुडकुडणारे कुपोषित सापळा झालेले मळकट,कळकट शरीर. पोटाला पुरेसे अन्न नाही की, अंगावर धड कपडा नाही. आणि त्याहून वाईट म्हणजे लोकांच्या तिरस्काराने भरलेल्या नजरा. असे आयुष्य मिळालेली \"ती\" रस्त्यावर सगळ्यांसमोर हात पसरून भिक्षामागे. पण अशातच एक प्रकाश पुंज तिच्या आयुष्यात आला.


एक दिवस काही तरुण बिस्किट, खेळणी, मिठाई घेऊन तिच्या फुटपाथ वर पोहोचली. तिच्यासारख्या मुलांसाठी त्यांनी दिलेली खेळणी, मिठाया सर्वोत्तम होत्या. हे भैया पुन्हा कधी भेटतील या आशेने सूर्य मावळला आणि अनामिक अशा घेऊन ती झोपली. हे आश्चर्य दुसऱ्या दिवशी घडलं पण यावेळी मिठाई सोबत त्या भैय्यांनी आणल्या होत्या काळा पाट्या आणि पांढरे खडू आणि झाला तिच्या शिक्षणाचा श्री गणेशा.

त्या फुटपात शाळेत ते ताई दादा लोक येत राहिले. या वंचित मुलांना अक्षरांची ओळख करून देत राहिले. तिच्याप्रमाणेच इतरही सर्व मुलं मिठाईच्या आशेने, ताई दादांनी सांगितले तसे अक्षर पाटीवर गिरवत राहिले आणि एक दिवस तिने स्वतःच नाव लिहिण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रयत्नानंतर तिने स्वतःचं नाव पाठीवर लिहिलं. तिचा आनंद गगनात मावत नव्हता आणि त्या उत्साहात तिने आपल्या आईला ती काळी पाटी दाखवली, ज्यावर तिने स्वतःचं नाव लिहिलं होतं.

फुटपाथ शाळेमध्ये मूलभूत गोष्टी शिकल्यानंतर तिथे येणाऱ्या त्या ताई दादांनी तिला जवळच्याच शाळेत प्रवेश मिळवून दिला. एकेक अडचणी मागे टाकत ती पुढे जात होती. शिक्षणानं तिला एक नवीन जगण्याची आशा आणि उमेद दिली होती. ती दहावीत पोहोचली, परिस्थिती तर सगळी विपरीतच होती. कुटुंबात तिला कुठलाही आधारही नव्हता, त्यामुळे अनेकदा तिचा अभ्यासातला रसही कमी होत होता. घर सोडून जाण्याची तिची इच्छा व्हायची पण मग नवनवीन गोष्टी आजमावण्यासाठीची तिची तळमळ आणि काहीही करून गरिबीच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठीच्या ध्येयामुळे, तिने कठोर परिश्रम सुरू ठेवले आणि दहावी बोर्डाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. फुटपाथ शाळेतील दहावी झालेली ती पहिली विद्यार्थिनी ठरली.

तेवढ्याच जिद्दीनं तीन पहिल्याच प्रयत्नात बारावी उत्तीर्ण केलं. हा तिचा आणि तिला ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या, त्या तरुण ध्येयवेढ्या लोकांच्या प्रयत्नांचा मोठा विजय होता. दहावी झाल्यानंतर तीला काही गोष्टी कळायला लागल्या होत्या. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तिने एका कंपनीत अगरबत्ती बनवणे आणि पॅकेजिंग करण्याचे काम सुरू केले. ती आताही तिथे ते काम करते आहे. हे काम सांभाळूनच ती शिक्षण पण घेते आहे. तिला लवकर रोजगार मिळावा म्हणून त्या तरुणांनी तिला कम्प्युटरवर टॅलीचा कोर्सही करून दिला आहे.

ज्या फुटपाथ शाळेने तीच्या आयुष्यात परिवर्तन घडविले, त्या फुटपाथ शाळेची ती मेंन्टॉर झाली. आता या शाळेत तिच्यासारखे रस्त्यावरचे जीवन जगणाऱ्या मुलांना ती शिकवते.


दहावी, बारावी आणि आता ती समाजकार्यात पदवीचे शिक्षण घेत आहे. या नवज्योती ने आपल्या कर्तुत्वातून हे दाखवून दिले की, परिस्थिती कितीही वाईट असली तरी आयुष्य कधीच वाईट नसतं. ते कधीही बदलू शकतं. केवळ आपली इच्छा असेल आणि सीमांच्या पलीकडे जाण्याची जिद्द असेल तर आपण आपले ध्येय कधीही गाठू शकतो.


अंधेरी गुफा मे किरण खोजता हूं ,
भटकती लहरो मे चरण खोजता हुं ,
कि इन्सान हुं इसलिये
जिंदगी के नयन मे
सपना की धरन खोजता हुं



©® राखी भावसार भांडेकर.

फोटो साभार गूगल.