Login

तिचं जग - भाग चौथा अंतिम (स्वाती बालूरकर)

The story of a painter n model


स्पर्धा- अष्टपैलू लेखक  महासंग्राम

फेरी - दुसरी

विषय -  तिचं जग 

(कथा शीर्षक - अनाहिता )

लेखिका - ©® स्वाती  बालूरकर, सखी

( भाग -४) अंतिम भाग

दिग्विजयलाही तिचं हे मॉडर्न रूप खटकलं होतं.
तिला ते रूप कॅरी करणं जमत नव्हतं . शेवटी अश्या वातावरणात अनोळखी लोकांसमोर दडपण तर येणारच.
तिला घाबरलेली पाहून दिग्विजय तिच्यासोबत पुन्हा मेकअप रूमधे गेला.

तिला तोंड धुवून यायला सांगितलं व तिचीच पारंपारिक वेशभूषा करायला सांगितली. तिच्याच मण्यांच्या त्या माळा व दागिणे तोच एक एक करून तिच्या गळ्यात घालत होता. ती खूपच सुखावत होती.

तो तिला एक मॉडेल म्हणून निरखत होता हे तिला कळालं नाही व ती त्याला सर्वस्व मानून लाजत होती.

प्रदर्शनातली तिची उपस्थिती व सगळ्यांचं तिला इतका मान देणं , तिचे फोटो काढणं सगळं सगळं स्वर्गीय सुखासारखं जाणवत होतं.

त्याचं सतत तिच्यासोबर असणं, तिला जपणं हे सगळं खूप भावत होतं. ती पुन्हा पुन्हा त्याच्यात भावनिकरित्या गुंतत होती.

मग रोजचं ते भाषा शिकणं , चालणं बोलणं शिकणं आणि दिग्विजय च्या सोयीने त्याची मॉडेल बनून समोर बसणे या सगळ्यात वर्ष कुणीकडे गेलं कळालं नाही.

ती बर्‍यापैकी या सगळ्यात रुळली होती.

तिचं नाव अगदीच प्रसिद्ध झालं होतं.

अनाहिता या नावानेच ती एका हँडलूम साडीची ब्रॅण्ड अम्बॅसेडर झाली होती.

सिन्हाच्या टेराकोटा ज्वेलरीला ती ट्रायबल कलेक्शन म्हणून प्रोमोट करत होती.

तिच्या फोटोचे अप्रतिम कलेक्शन गुगल वर उपलब्ध होते.
तिच्याच नावाने शिरीन तिचं इंस्टाग्राम हँडल करत होती. सगळ्या सोशल साईटस् वर दिग्विजय सोबत तिचं प्रमोशन होत होतं.

दोघीत छान मैत्री पण झाली होती.

पण शिरीन खूप प्रोफेशनल व प्रॅक्टिकल स्वभावाची होती.

दोघी सतत सोबतच रहायच्या.


अनाहिताच्या मनात ओढ होती की तो कधीतरी लग्नाचं बोलेल आणि ती त्याची बायको म्हणून मिरवेल. पण तसं काहीच होत नव्हतं.

एकदा न राहवून ती म्हणाली होती , " जय . . . मला तुझी बनायचं आहे. सांग ना लग्न करशील?"

"अना, हे काय आता नवीनच! हे लग्न शब्दाचं इतकं काय वेड असतं कळत नाही ? मी आहे ना सोबत . तू माझीच आहेस किनई ? कुणी आणलंय तुला इथे? या चंदेरी दुनियेत ? तू मेरी खोज है अना. . . बात को समझ! आता कामावर फोकस कर . . . . राईट.\"

एकदा दिग्विजय चे शिल्पकार गुरू सोमनाथ आर्ट स्टुडिओत आले होते.

त्यांनी त्याच्या चित्रांची खूपच स्तुती केली व त्या मॉडेल बद्दल विचारलं.

तिची ओळख करून दिली तर ती पटकन पाया पडली. त्यांनी आशीर्वाद दिला.

ती मुर्तिकाराची नजर! त्यांनी तिचं सौंदर्य बघून हेरलं की ही मूर्तींसाठी देखील उत्कृष्ट मॉडेल आहे.

त्यांनी दिग्विजय ला सुचवलं "इतकी सुंदर जिवंत मूर्ती समोर आहे तरीही तुला शिल्पकलेत कसं उतरावं वाटलं नाही. चित्र शेवटी एकांगी कला आहे. मूर्ती तर चहूबाजूंनी दर्शनीय कला आहे , बहुअंगी कौशल आहे. प्रयत्न कर पण तुझ्या अनाहिताला मात्र जप!"

या सल्ल्याने दिग्विजय भारावून गेला.

त्याने जोमाने मूर्तिकामाला सुरूवात केली. सोमनाथांकडे ही विद्या शिकली होती पण शिकताना बनवलेले तेवढेच नमूने होते.

पुन्हा प्रयत्नच केला नाही व एका संध्याकाळी हिला पाहिल्यासूनचा प्रवास नजरे समोरून गेला.

तिची पारंपारिक वेशातली मूर्ती दिग्विजय ने काही दिवसांत बनवली.

दिवस रात्र भान हरपून काम केलं होतं.

ती मूर्ती उत्कृष्ट कलेचा अद्भुत नमूना बनली होती.

तो जे करतोय ते ती मान्य करत होती.

त्याला विरोध करतच नव्हती कारण तिने मनाने त्याला वरलं होतं. . . तिच्यासाठी तो तिचा पतीच होता.

३-४ महिने उलटले असतील . दिग्विजय द्वारे अनाहिताची दुसरी मूर्ति पूर्ण होत आली होती.

सोशल मेडिया व दुसर्‍या माध्यमांमधून हे सगळं खूप वायरल होत होतं, नावारूपाला येत होतं.

अचानक एक दिवस परदेशातल्या काही मूर्त्या पाहून दिग्विजय च्या मनात न्यूड मूर्ति बनविण्याची कल्पना घर करून गेली.

अनाहिताला त्याने गृहित धरलंच होतं. मॉडेल तर आहे शिवाय देवाने इतका सुंदर बांधा दिलाय तिला. कुठल्याही पुरुषाची नियत ढळेल असा कमनीय बांधा!

त्याने तिला हे सगळं समजावलं पण. . . ती ऐकेचना , पुन्हा प्रेमाने समजावलं, पण तिने यावेळी नकार दिला.

"मला सगळे नेहमीसाठी तसंच पाहतील . तू मला कसा असा सगळ्यांसमोर कपड्यांशिवाय दाखवू शकतोस?. . .तू माझा आहेस ना मग?"

"अना, मी तुझाच आहे राणी. पण कला क्षेत्र वेगळं असतं. हे कलेचे नमूने वर्षानुवर्ष राहतात. उद्या तू व मी नसलो तरीही आपली ही कला अशीच जिवंत राहील. " असं बराच वेळा समजावल्यावर प्रेमाने जवळ घेतल्यावर ती त्याच्या इच्छेखातर तयार झाली.

पण तिने काही अटीही ठेवल्या.

हे काम स्टुडिओ मधे करायचं नाही , दिग्विजय च्या घरी करायचं ठरलं. शिवाय बंद खोलीत जिथे केवळ ती व तो असतील, तिथेच त्याच्या बेडरूम मधे !

तो दिवस आला. सगळी व्यवस्था झाली.

परंतु तिला हळूहळू विवस्त्र करताना त्याचं भान हरपलं.

तिने मात्र स्त्री सुलभ लज्जेने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला .

पण मुर्तीसाठी ठरलेल्या पोजमधे ती बसली व तो बेसिक आकाराचा अंदाज घेवू लागला.

पण प्रत्येक क्षणी त्याचं मन चाळवू लागलं.

तिच्या कमरेचा तो कमनीय बाक व नाजूक वळवलेली मान याचा अंदाज घेण्यासाठी त्याने कमरेभोवती स्पर्श केला अन ती लोण्यासारखी विरघळली.

तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याक्षणी दिग्विजय मधला कलाकार शांत झाला व प्रियकर उफाळून आला.

दोघांच्या संमतीने नको ते घडलं होतं.

तिने त्याला स्वतःचं सौभाग्य किंवा पतीप्रेम समजून स्वतःला समर्पित केलं होतं.

ती न्यूड मूर्ती तयार होईपर्यंत असं बरेचदा घडलं पण त्या सगळ्याने तृप्त होत होती तर दिग्विजय खूप बेचैन होत होता.

त्याला हे सगळं नको असूनही तिच्या संपर्कात आला की संमोहित झाल्याप्रमाणे दैहिक मोहात पडायचाच.

मूर्ती पूर्ण झाली आणि स्टुडिओ मधे आणली गेली.
आता मात्र अनाहिताला स्टुडिओत यायला नको वाटत होतं. पाहणारा मूर्तीला पाहून तिच्याकडे पाहील तेव्हां?

दिग्विजय ची या क्षेत्रातही खूप प्रशंसा व्हायला लागली.

एकदा कसल्याशा कामासाठी सिन्हा दिग्विजय च्या घरी आला.

दिग्विजय पुढच्या एक्झीबिशन च्या असाईनमेंट ची तयारी करीत होता.

सिन्हा नवीन बीडस -ट्रायबल ज्वेलरीत उतरू इच्छित होता. कारण त्याच्या मते वेगळ्या विचारधारेच्या महिला, बुद्धिजीवी महिला आणि समाजसेविका वगैरे हँडलूम , खादी व कॉटन साडयांवर कधीच सोनं -चांदी वगैरे वापरत नाहीत. तर अशी ट्रेंडी ज्वेलरी वापरतात.

अनाहिताशी चर्चा केली तर ट्रायबल ज्वेलरीत नवीन कल्पना मिळतील म्हणून तो बोलण्यासाठी आला होता.

ती निरोप मिळाला म्हणून बाहेर आली तर सिन्हाची नजर तिच्या सर्व देहावरून फिरायला लागली. त्याने स्टिडिौत तिची न्यूड मूर्ति पाहिली होती.

त्याने दागिन्यांचे नमूने आणले होते.

त्यांच्या बोलण्याने दिग्विजय ला डिस्टर्ब व्हायला लागलं म्हणून त्याने दोघांना आत बसून बोला असा सल्ला दिला.

खोलीत बोलत असताना मात्र सिन्हाला सतत ती न्यूड मूर्ति आठवायला लागली आणि समोर तीच अनाहिता अंगभर कॉटनची साडी नेसून बसलेली.

तिच्या कपड्यातूनही त्याची नजर तिचं शरीर शोधत होती.

हे लक्षात येताच ती सावरली.

सिन्हाने पटकन तिला मिठीत घेतले.

"जय" अशी हाक मारेपर्यंत त्याने ओठांनी तिचे तोंड बंद केले. त्याच्या त्या चुंबनाची तिला शिसारी आली व तिने जोर लावून त्याला ढकलले.

इतक्यात दिग्विजय दाराजवळ आलाच होता-

सिन्हा दोघांकडे बघून म्हणाला," काहे सती सावित्री बनी फिरती हो? वो जो न्यूड रखा है ना स्टुडिओ में. . वो क्या केवल देखके बनाया है क्या दिग्विजय ने? भई आप उनकी मॉडेल हैं तो हमारी भी हैं? हमे भी थोडा खुश कर देती?"


" सिन्हा स्टॉप दिस. प्लीज लीव्ह हर!" दिग्विजय फक्त एवढंच म्हणाला. तिला मात्र त्याच्याकडून भांडण्याची चिडण्याची अपेक्षा होती पण

" बी कूल दिग्विजय , वो मॉडेल है , तुम्हारी लुगाई नही हैं . . . समझे ! हक तो हमारा भी बनता है!"

" सिन्हा वो नही चाहती ये सब ! प्लीज लीव्ह हर फॉर नाऊ , प्लीज !"

त्याच्या या विनंतीने अनाहिताला नखशिखांत न्याहाळत तो बाहेर गेला .

दिग्विजय ने फक्त शांत रहा असा इशारा केला आणि पुन्हा आपल्या कामात लागला.

तो क्षण तिच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट क्षण आहे असं तिला वाटलं.

दुपारी शिरीन आली आणि अनाहिताचा तो अवतार व रडलेले डोळे पाहून बेचैन झाली.

तासभर अनाहिता सगळं सांगत होती. . . . शिरीन जवळ मन मोकळं करत होती.

शिरीनला नक्की कळालं की ती कशा वातावरणातून आलीय व इतकं सगळं करूनही शेवटी हेच मिळणार असेल तर ?

" माझा छोटा जय आता माझ्यात आहे. . .त्याच्यासोबत जगीन मी." असं म्हणून अनाहिताने डोळे पुसत स्वतःच्या पोटावर हळूवार हात फिरवला.

शिरीन सर्व समजून चुकली.

तिने दिग्विजय ला सांगितलं की ती अपसेट आहे.

तो म्हणाला , \" तिला सांग या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायला. सौंदर्याचे रसिक आहेत या क्षेत्रात तर मग असे अनुभव येतच राहणार."

शिरीनला त्याची ही प्रतिक्रिया पटली नाही.

शेवटी तिने अनाहिताचं मत घेतलं , पुढच्या आयुष्याचे प्लान विचारले.

तर ती म्हणाली की \"मला असं जगायचंच नाही जिथे ती नवर्‍यासमोरही सुरक्षित नाही. तिच्या आईच्या कुशीत जगेल. मग आईने जिवे मारलं तरीही चालेल. मी चुकले.\"

बस्स! शिरीनच्या स्मार्ट डोक्यात प्लान बनला.

******************************

\"अनाहिता म्हणजे आमदा\" चेहरेबंद वेशभूषेत सुरक्षित तिच्या घरी पोहोचली होती.

शहरात मात्र एका बातमीने खळबळ माजली होती.

सोशल मेडियावर अनाहिताची चित्रे व फोटो टाकून लोक आर आय पी व श्रद्धांजली वहात होते.

इंस्टाग्राम वर व फेसबुकवर स्टोरी होती थ्री अवर्स बिफोर.

"गोईंग फॉर अ लाँग ड्राईव्ह , अनाहिता ऑन सोलो ट्रिप"

तिचा ओपन जीप मधे बसलेला फोटो होता.

दोन तासांपूर्वी त्या जीपचा घाटात अॅक्सिडेंट झाला. गाडी दरीत कोसळली व तिने पेट घेतला. बॉडी सापडली नाही. घनदाट दरीत शोधणंही शज्य नव्हतं .
पण अनाहिताच्या काही वस्तू तिथे कठड्यावर व जंगलात शोध घेताना सापडल्या. पोलिसांनी मृत्यूची बातमी कनफर्म केली.

" प्रसिद्ध मॉडेल अनाहिता हिचा दरीत वाहन कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू!" बातमी सगळी कडे झळकली.

दिग्विजय खूपच कोलमडला.

पण शो मस्ट गो ऑन , पुन्हा एखादी नवी मॉडेल शोधावी लागेल इतकंच !

असा विचार करून त्याने दीर्घ श्वास घेतला.
*********************
इकडे घरी झोपडीत उशीरा केव्हातरी अनाहिताला झोप लागली.

तिच्या निरागस पण थकलेल्या चेहर्‍याला पाहून आई विचार करू लागली-

\"जे झालं ते झालं, पण आपलीच पोर , हूड वयाचा दोष, कुणाच्या तरी प्रेमात पडली असेल. रंगीत दुनियेला भूलली असेल . . . पण परत आसर्‍याला आईच्या कुशीतच आलीय. आता या दोन जिवाच्या मुलीला आधाराची गरज आहे. मीच तिचा आधार बनेल अन हे मूल तिच्या जगण्याचा अाधार बनेल . . . हे मूल तिचं जग बनेल. \"

आमदाच्या आईने हळूवार तिच्या डोक्यावरून हात फिरवला व थापटायला लागली.

*****************

समाप्त

©® स्वाती बालूरकर, सखी