तिचं जग - भाग तिसरा (स्वाती बालूरकर)

The story of a paiter n model.
(भाग -३)

स्पर्धा- अष्टपैलू लेखक  महासंग्राम

फेरी - द्वितीय
विषय -  तिचं जग 

(कथा शीर्षक - अनाहिता )

लेखिका - ©® स्वाती  बालूरकर, सखी
( भाग -३)

कथा पुढे-

तो तिच्यामध्ये एक मॉडेल म्हणून सुंदर  चित्र शोधत होता, चेहर्‍यांवरचे  भाव शोधत होता पण तिच्या त्या भोळ्या मनाला त्याचे येणे, त्याचे चित्र काढताना सतत पाहणे, हे काहीतरी वेगळेच वाटायला लागलं .


आणि भावनिक रित्या ती त्याच्यात गुंतत  गेली. तिलाही असेच वाटत राहिले की तो तिच्यावर प्रेम करतो.


त्यादरम्यान एका संध्याकाळी तो परत जात होता आणि ही वळून पाहत होती  त्यावेळी  आवाज आला


 "आमदा आमदाऽ"  कोणीतरी जंगलातून  आवाज देताना तिला पाहिलं . त्यालाही जाताना पाहिलं व हिला लाजतानाही पाहिलं.


 ही खबर त्याच्या घरी गेली आणि त्या रात्री  तिच्या आईने तिला  खूप मारलं.


 ती काहीच सांगू शकली नाही.


 फक्त "मा , असं काही नाही, असं काही नाही!" एवढंच  म्हणत राहिली.


असंही त्यांच्या आदिवासीं जमातीमध्ये लवकरच चौदाव्या -सोळाव्या वर्षी लग्न करायची पद्धत होती पण  फक्त ही दिसायला खूप सुंदर असल्याने तिच्या आईला त्यांच्या वस्तीला कोणीच मुलगा तिच्यासाठी योग्य वाटत नव्हता. म्हणून लग्न झालं नव्हतं. 


तिचा साथीदार निवडण्याचं स्वातंत्र्य  तिला होतं म्हणजे त्यांच्या जमातीत मुलं व मुली स्वतःचा साथीदार निवडण्याची मुभा होती. 


घरात ती तिची आई व लहान भाऊ तिघेच होते कारण दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांवरती जंगली श्वापदांनी हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.


 तिची आई,  ती आणि तिचा एक लहान भाऊ इतक्याच  त्यांच्या  कुटुंबाला वस्तीतल्या लोकांचा खूप आधार होता. सगळं कळत होतं तिला की त्या चित्रकाराचं पुढे काही होणार नाही. 

घरात  ते  सगळं जमणार नाही. कुणीच वस्तीत समजून घेणार नाही पण. . . मन गुंतलं होतं.


ती त्या  चित्रकाराची वाट पाहत होती. कामातही दिवसभर  आणि झोपताना रात्रभर ती त्याच्या आठवणीत तळमळत होती.


दिवसभराचं काम कसं तरी आटपायचं पण  संध्याकाळ झाली की  मात्र तिचा पाय घरी टिकायचा नाही.


 इकडे शहरात  जाहिरात व संपर्क माध्यमाच्या  जगात दिग्विजयच्या लेटेस्ट दोन पेंटिंगची चर्चा सुरू झाली व त्याचं   खूप नाव झालं.

आता जांभेकरांनी त्याच्या चित्रांचं नवीन  प्रदर्शन  भरवण्याची योजना बनवली. या थीमला एक साजेसं नाव देण्याची कल्पना सुचवली.


दिग्विजय  घरी आला व त्या चित्राला पुन्हा पुन्हा पाहू लागला.  तिचं त्याने काढलेलं पहिलं चित्र ज्यात ती हाताने लाट थांबवत होती किंवा झेलत होती. त्याखाली त्याने पेंसिलने लिहून ठेवलं होतं "अनाहिता!"  एक अतिसुंदर स्त्री!


दिग्विजय चं चित्र प्रदर्शन भरलं.  \"अनाहिता  द ट्रायबल ब्यूटी\"  याच नावाने!


  यावेळी तिची प्रत्येक पेंटिंग  कलात्मकतेने लावताना  त्याला तिची कमी जाणवत होती. पण ती खूप वेगळी आहे निष्पाप , निरागस , भोळी . . . या फसव्या व बेगडी रंगीत दुनियेपासून अनभिज्ञच. ती इथे असू शकत नाही. 


या क्षणी त्याला का कुणास ठाऊक तिची खूप आठवण येत होती.


प्रदर्शनात सगळ्या चित्र रसिकांची हीच प्रतिक्रिया  होती की  चित्रकाराने कमाल डिटेलिंग केलंय, एकाच चेहर्‍यांच्या वेगवेगळया  शैलीतल्या व वेगळ्या भावाभिव्यक्ती असणार्‍या  पेंटिंग  होत्या सगळ्या! चित्रकाराने कमाल केली होती. ती  नायिका जणु जिवंत चित्रित झाली होती.


प्रत्येक  जण त्याच्या चित्रांच्या प्रेमात पडला.


प्रश्न हा होता की "ही अशी कोण मॉडेल आहे जी अगदी  नैसर्गिक आदिवासी वाटते आहे ?"


त्याच्याकडे उत्तर नव्हतं .


तिचं नाव गाव तो काहीच सांगू शकला नाही.


कितीतरी जण तिला इथे आणाच असा अाग्रह करू लागले.


ती तर फक्त  त्याच्या मनातच आहे हे  कसं सांगणार होता सर्वांना. 


त्यात खादी साड्यांच्या नवीन ब्रॅण्ड साडी  सुजीत निकम एक नव्या व अनोख्या चेहर्‍यांच्या शोधात होते.  जोश सिन्हा नवी हँडीक्राफ्ट व टेराकोटा ज्वेलरीचं अॅप लाँच करणार होते.  त्या दोघांनी जेव्हा हा चेहरा चित्रात पाहिला , ते त्या सौंदर्यावर फिदा झाले. 


त्यांना ती एकत्रच मॉडेलिंग  साठी मिळाली तर हवी होती. 


"शी इज सो फोटोजेनिक दिग्स, फेस ऑफ द इयर राईट!"  सिन्हा म्हणाला.


" दिग्ज , काय रियलिस्टीक लुक आहे, तिला कॅमेरासमोर आण यार. . . असा पेंटिंग  मधे नको अडकवू!" निकम म्हणाला.


प्रदर्शनाला इतकी प्रसिद्धी मिळतेय बघून जांभेकर दिग्विजय ला म्हणाले . . . " पेंटिंग  बनवलंस तोपर्यंतच  तुझी वैयक्तिक  मॉडेल  वगैरे ठीक होतं पण आता एक्जीबिशन भरवल्यावर तर . . . तुला रिवील करावंच लागेल. बघ मग सिन्हाचा प्रोफेशनल  फोटोग्राफर  घेवून जा व तिचे क्लिक्स घेऊन ये . . . हंगामा होवूदे अॅडवर्टाइजिंग इंडस्ट्री मधे!"


तिला समोर आण अशी मागणी होऊ लागली.


दिग्विजय  एकीकडे यशाने व कौतुकाने भारावून गेला होता तर दुसरीकडे तिला हे सगळं कसं सांगावं या चिंतेत पडला होता.


 तिची पहिली पेंटिंग केवळ प्रदर्शनासाठी होती,  विक्रीसाठी नाही. ती  सोडून त्याने काही पेंटिंग्ज विकण्यासाठी ठेवल्या होत्या. त्याला खूप पैसा व स्पॉंन्सर शिप पण मिळाली होती. 


हिच्याच काही पेंटिंगची, पोट्रेटस ची ऑर्डरही मिळाली होती. खूप काम आलं होतं. 


दिग्विजय चं विचारचक्र  सुरू झालं.


\"खरंच तिला इकडे आणावं का? म्हणजे 

ती यायला तयार होईल का ? तिच्याशी संवाद कसा साधणार ? असे एक ना अनेक प्रश्न होते.  मुळात  तिला ह्या क्षेत्रातली काहीच माहिती नव्हती.  त्यामुळे तिला सगळ्या लाईम लाईट किंवा रंगीन दुनियेची सवय नाही.  त्यात ती अशिक्षित आहे आणि तिला इथली भाषा ही कळणार नाही.  या भीतीपोटी  यापूर्वी  तो हे सगळं  बोलू शकला नाही.\"


त्यादरम्यान  तो एक दिवस संध्याकाळी तिकडे गेला. 


ती  तिथेच होती, समुद्रकाठी!


त्याला पाहून आनंदली.  तिची चित्र सर्वांना आवडली हे  त्याने तिला सांगितलं. ती खुश झाली. एक्झीबिशनमधले फोटो तिला दाखवले. तो फोटोकडे बघून बोलत होता व ती त्याच्या चेहर्‍यांवरचा आनंद एकटक पहात होती.


त्याने तिला खूप सारे पैसे देवू केले.  यशाचा वाटा म्हणून. तिला पैशाचंही मोल नव्हतं . म्हणजे इतके पैसे घेवून काय करायचं? हे देखील कळत नव्हतं .


पुढच्याच दहा दिवसात नागपूरला आणखी एक चित्रप्रदर्शन  आयोजित करण्यासाठी स्पॉन्सर मिळाले तेव्हा जांभेकर गंभीर होऊन दिग्विजय  शी बोलले. 

" शांत डोक्याने विचार कर , तीन दिवस प्रदर्शन  आहे. एका दिवशी तरी तिला घेवून ये!"


 जेव्हा चित्र प्रदर्शनात सगळ्या त्याने काढलेल्या  तिच्याच चित्रांना खूप मागणी येऊ लागली त्यावेळी मात्र त्याला रसिक लोकांनी आग्रह केला.


"तिला समोर आण.  तुला पार्टी द्यायची आहे, या मॉडेलला  लोकांसमोर व मेडिया समोर घेऊन ये." आता  जांभेकर साहेबांनी विशेष जोर टाकला.


 पण हे जाऊन तिला कसं सांगणार? या विचाराने ग्रस्त होता. त्याने मनात काहीतरी ठरवलं आणि संध्याकाळी तो तिच्याकडे  निघाला.


तो  आता जे करणार होता त्याने त्याचं आयुष्य  कलाटणी घेणार होतं. नाव, यश , प्रसिद्धी  आणि पैसा! सगळं पायाशी लोळण घेणार होतं. 


पण ती येईल का? 


जर ती आलीच तर पुढचं सगळं  काय व कसं  करायचं हे शिरीनला सांगितलं होतं. 


शिरीन त्याची नवीन पी. ए. व इवेंट मॅनेजर होती. खूप स्मार्ट! 

तो गाडी घेवून तिला बोलावण्यासाठी निघाला होता. खूप उत्साहात होता. तिच्यासाठी सुंदरसा ड्रेस व काही ज्वेलरी घेवून निघाला होता.


   **************************


आज ती   संध्याकाळ  होण्याअगोदर पासून समुद्रकिनार्‍यालगतच  त्या खडकावर बसून आजही त्याचाच विचार करत होती.


तोच दिग्विजय  ज्याच्या प्रेमात ती बुडालेली होती. त्याचं येणं , तिला पाहणं व त्याचं पेंटिंग  बनवणं सगळं कसं स्वप्नवत आठवत होतं.

एखाद्या दुसर्‍याच जगातला प्राणी आपल्यासाठी इतकं करतोय याने ती भारावली होती.  वस्तीतल्या पाड्यावरच्या जंगली मुलांपेक्षा हा वेगळा होता. त्याच्या चेहर्‍यांवरची चमक तिला आकर्षित करत होती. 

तिलाच कळालं नाही की संमोहिनी घातल्याप्रमाणे ती कशी त्याच्यात गुंतत गेली. त्यांच्या जमातीच्या देवातही तिला त्याचाच चेहरा दिसायला लागला होता. 

आईचा मार खाल्ला होता, वस्तीतल्या बायकांची बोलणी ऐकली होती व वस्तीतल्या सुरमा शी वितुष्ट  घेतलं होतं. हे सगळं कशा साठी तर तिच्या जय साठी!


तिला दिग्विजय  म्हणताच यायचं नाही म्हणून तो म्हणायला लावायचा "जय."


तो मात्र तिला \"अना\" असं म्हणायचा कधी अनाहिता अशी हाक मारायचा. 


पण त्याचं माझ्यावर इतकं प्रेम होतं तर त्याने असं का करावं?  हे ही तिला कळत नव्हतं. 


आज दीड वर्षांनंतर ती पुन्हा इथे खडकावर बसून त्याच समुद्राला न्याहाळत होती.  आता वस्तीतले लोक तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. तिचं राहणीमान बदलंलं होतं. तिची भाषा शुद्ध झाली होती पण . . . ती हतबल होवून परतली होती. 


मनात वाईट आठवणी तिलाच नको होत्या त्यामुळे ती केवळ चांगल्या घटनाच आठवत होती. 


इतक्यात तिची कुणीतरी पाठीवर हात ठेवल्याचा भास झाला.  तिची आई तिला शोधत आली होती.  आईला तिची तगमग जाणवत होती पण नेमकं काय झालंय हे कळत नव्हतं. 

"आमदाऽ" 

तिने आईला मिठी मारली व रडायला लागली. मनसोक्त रडल्यावर ती व आई घरी परतल्या . संध्याकाळ उलटून गेली होती.  तिचं दीड वर्षांनंतर परतणं भावाला आवडलं नव्हतं  त्यामुळे तो बोलत नव्हता.


इतके दिवस सुख सुविधांमधे राहिल्यानंतर आता झोपडीत विणलेल्या चटईवर पडूनही छान वाटत होतं.

मन पुन्हा तोच दिवस आठवू लागलं ज्या दिवशी संध्याकाळी तो सुंदरशा ड्रेस घेवून काही दागिने घेवून आला व तिला सोबत चल म्हणाला होता.

तिला त्याचं बोलणं व समजावणं कळत होतं पण तिने एक दिवसाचा वेळ मागितला होता.

तो दुसर्‍या दिवशी पुन्हा येवून उभा होता तिथेच त्या समुद्र किनारी. तिच्या आयुष्यात त्या वस्तीत असंही वेगळं काही घडणार नव्हतं. . . सरदारचा मुलगा सुरमा तिच्यावर नजर ठेवून होता त्यामुळे फारतर आईने दबावात त्याच्याशी लग्न लावून दिलं असतं, इतकंच!

विचारा अंती घरच्या व वस्तीच्या नजरा चुकवून त्याने दिलेला तो पोशाख परिधान करून ती एक कपड्यांचं गाठोडं घेवून पळतच आली होती. तिने त्याला प्रेमाने मिठी मारली होती व त्याने आनंदाने तिला जवळ घेतले होते.

गेल्यावर तिचं जंगी स्वागत झालं होतं. त्याने तिला शिरीनला सोपवलं होतं. तिने तिला बेसिक गोष्टींपासून शिकवायला सुरूवात केली होती.

काही दिवसात जेव्हा सीरीन ने तिला मेकओवर करुन पार्टीसाठी तयार करून आणलं होतं तेव्हा तिला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. हे मेकप हेअरस्टाइल काहीच तर तिला माहित नव्हतं. पण तिचं ते रूप तिला आवडलं होतं.

तिला पाहताच जांभेकर , दिग्विजय व सिन्हा तिघेही शॉक झाले होते. ती कुठल्या अप्सरे पेक्षा कमी दिसत नव्हती.

पण मग आयोजकांनी विचारलं की

"पहिल्यांदाच तुम्ही हिला असं का प्रेजेंट करताय? लेट हर कम इन हर नॅचरल वे!"

"आय नो व्हाट यू मीन?" दिग्विजय ने मान हलवली. ती फक्त त्यालाच पहात होती.


क्रमशः

लेखिका - ©® स्वाती  बालूरकर, सखी

दिनांक - १३ .०२ .२०२३


🎭 Series Post

View all