तिचं जग - भाग दोन ( स्वाती बालूरकर)

The painter and model's story


स्पर्धा- अष्टपैलू लेखक  महासंग्राम


फेरी - द्वितीय


विषय - तिचं जग


(कथा शीर्षक - अनाहिता )


लेखिका - ©® स्वाती  बालूरकर, सखी


( भाग -२)

कथा पुढे -


त्याच क्षणी कालच्या प्रमाणे खूप मोठी लाट तिच्या अंगावर आली  व तिने हाताने तिला थांबवलं ! 

हेच तर हवं होतं!


 यावेळी तिचे पूर्ण भाव त्याने टिपले होते आणि एक मादक छटाही तिच्या चेहर्‍यांवर झलकली होती.

 त्याच्या हातातली कुंचला भराभर चालत होती.


 यावेळी मात्र तिने त्याला वळून पाहिलं.


 तो तिला पहातच काहीतरी करतो आहे हे लक्षात आल्यावर ती  आपल्या जागेवरून उठली आणि त्याच्या समोर येऊन थांबली.


चेहरा रागात होता पण हा आता तर तिच्या चेहऱ्याची रूप रेखा, तिचे नाक  डोळे त्याने जवळून पाहिले व नजरेने टिपून घेतले.


सौंदर्य काय असतं ते हिला पाहून परिभाषित करावं असं मनोमन वाटत  होतं.


 ही मुलगी जर मॉडेल झाली असती तर पैशात खेळली असती पण इतक्या जातीवंत सौंदर्याची तर  जगाला माहितीही नाही.  


कदाचित जाहिरात जगताला नसेल पण बाकीच्या मॉडेल्स तर तोंडाला मेकअप फासून व्हिडिओ बनवतात. . .  आपले  तोकडे कपडे घालून नाव कमवतात पण  ही तर साध्या वेशातली मुलगी पण काय सुंदरता आहे, चेहरा शरीर सगळच कसं आवर्जुन घडवल्यासारखं!


ती इतका वेळ मूकपणे त्याला व त्याच्या सामानाला पहात होती.

 त्याने तिला येशील का असं  विचारलं  आणि बोलावलं.

आश्चर्य  म्हणजे ती  आली. त्याने तिला तिचंच  पेंटिंग दाखवलं ,  ती पण  थक्क झाली. तिने असं कधीच काही पाहिलं नव्हतं . तिने कधीच कुणाला चित्र काढलेलं पाहिलं नव्हतं, तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून दिग्विजय ही मनोमन आनंदी झाला होता.


ती इशार्‍याने विचारू लागली की "ही मीच आहे का ?"


 त्याने खुणेनेच स्वीकृती  दिली.


ती पुन्हा पुन्हा चित्राला पहात होती व स्वतःला पहात होती.


दिग्विजय  सांगण्याचा प्रयत्न करू लागला की

" रोज इथे मी येत होतो. . .  तुझं  चित्र काढण्यासाठी.  यापुढे रोज येईन ." 

या बोलण्याचा काय बोध झाला कोण जाणे पण  ती पुन्हा लाजली.


जंगलातून काहीतरी विचित्र आरोळी ऐकू आली आणि ती घाबरली. बेचैन झाली.


हाताने चित्राकडे दाखवून "मी नाही, मी नाही असा इशारा केला आणि हरीणी सारखी पळत सुटली.


पळता पळता एक क्षण थांबली आणि त्याला वळून  पाहून पुन्हा पुढे गेली.


आजही तिची तीच मुद्रा लक्षात ठेवून तो परत आला .


पण आज मनावर तिच्या रूपाचं  कसलंसं गारूड होतं! 


मनाला एक समाधान होतं की ती इतक्या जवळून त्याला पहायला मिळाली होती  आणि त्याचे पेंटिंग आज  पूर्ण झालंहोतं. 


 दुसऱ्या दिवशी रात्री त्यांने त्याच्या स्टुडिओमध्ये समोरच्या वॉल वरती ते पेंटिंग लावलं. सतत  येता जाता ते दिसावं हाच उद्देश्य होता.  


पुढच्या दिवशी दुपारी कुठल्यातरी एका पेंटिंग एक्झिबिशनचं आमंत्रण देण्यासाठी  आयोजक जांभेकर  आले होते  आणि  त्या पेंटिंग  वर त्यांचं लक्ष खिळून राहिलं.


त्यांनी दिग्विजयला विचारलं,"  मला हे पेंटिंग  विकत घ्यायचं  आहे , किंमत सांगा ?"


 तो म्हणाला, " सॉरी सर,  बाकी कुठल्याही पेंटिंग बद्दल  विचारा पण हे पेंटिंग  मला विकायचं नाही."


"कारण?"


" हे माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे. . . म्हणजे वैयक्तिक  आहे असं समजा?"


" अरे पण असं बोलून कसं चालेल?  कमर्शियल चित्रकार आहेस तू? विक आणि पैसे कमव ना !"


"दुसरं  कुठलंही सांगा , नवीन ,आणखी सांगा ना , बनवून देईन पण हे ?"


"या मॉडेल चं एकच आहे का ?"


"तसं नाही  पण . . हो म्हणजे . . नाही पण हिचं अजून एक आहे, ते दुसरं तुम्हाला हवं तर मी विकेन . . . !"


"आणि तुला ?"


" दुसरं  बनवून देतो मी तुम्हाला पण  मी. . .हे  पेंटिंग मी विकू शकत नाही!"


जांभेकर थक्क झाले. हवे  तेवढे पैसे द्यायला ते तयार असताना त्याने  विकण्यासाठी नकार दिला.


  मग त्यांनी विचारलं ,"किमान या मॉडेलचा आणखी एखादं  पेंटिंग आहे का ? आहे म्हणालास ना ते पाहू ?"


 तेव्हा त्यांने  तिचं  जंगलातलं  पळत जाताना वळून पाहिलेल्या मुद्रेतलं पेंटिंग  दाखवलं.


 अादिवासी वेशातली, विखुरलेल्या केसांचा बांधलेला विचित्र अंबाडा, गळ्यात त्या मोठ मोठ्या  मण्यांच्या माळा,  त्या पोशाखाली वळून बघताना ती खरच अप्रतिम दिसत होती.


 त्यात तिची चेहरे पट्टी स्पष्ट दिसत नसली तरीही पेंटिंग मात्र अप्रतिम झालं होतं.


जांभेकर  साहेबांनी एका नजरेत ओळखलं की दिग्विजय चं वैयक्तिक  काहीतरी असावं  आणि मग त्यांनी ती  दुसरी पेंटिंग विकत घेतली.


खरंतर  त्याला तीही विकायची नव्हती पण  इतका मोठा रसिक माणूस ग्राहक त्याला जाऊ द्यायचा नव्हता. त्यांचे संबंध चांगले होते.


शिवाय  तिची पळतानाची मुद्रा त्याच्या नजरेत इतकी सुंदर कैद झाली होती की  तो लगेच दुसरं पेंटिंगही  बनवू शकला असता.


 त्यांना बनवलेली पेंटिंग त्याने विकली तेव्हा ते हसून म्हणाले ," न्यू मॉडेल? गुड वन! कॅरी ऑन!"


त्याने मनाशी ठरवलं ,आता बाकीच्या मॉडेल कडे सध्या दुर्लक्ष करायचं आणि फक्त हिचेच  पेंटिंग बनवायचे . 


परंतु एक्झीबिशन च्या कामात व्यस्त असल्यामुळे त्याला दोन दिवस तिकडे जाणं झालं नाही. मनात मात्र तिचाच विचार घोळत होता. काय नाव असेल तिचं ?


 ती मात्र तिकडे  ठरलेल्या वेळी तिथे येऊन बसली होती. 


 तिच्या मनाची शांतता आता भंग झाली होती.


 पूर्वी समुद्राच्या किनारी येऊन  बसायची तेव्हा तिला शांत वाटायचं पण  आता बेचैन वाटत होतं. कारण ती पूर्वीप्रमाणे शांतपणे समुद्राला बघू शकत नव्हती. 


तिचं मन सतत त्याच्यासाठी भिरभिरत होतं व मनात एक चलबिचल  होती.


 तिसऱ्या दिवशी तो आला.


 तो कितीतरी वेळ तिची वाट पाहत होता. त्या दिवशी  पोस्टर बनवताना पाहून ती कदाचित घाबरली असावी आणि तिने येणंच बंद केलं की काय अशी शंका  त्याला आली.


तो निराश होऊन परत निघणार होता पण ती आली, थोडी उशिरा आली.


 आल्या आल्या अनोळखी असूनही  त्याला पाहून तिच्या चेहऱ्या वर एक ओळखीचं स्मित आलं.


 दोघांमध्ये तसं संभाषणही झालं नव्हतं पण एक अनामिक ओढ मात्र निर्माण झाली होती.


 त्याच्या मनात ती ओढ निर्माण होणं साहजिक होतं. कारण तो एक चित्रकार होता  आणि म्हणून तो नव्या नव्या सुंदर मुलींच्या चेहऱ्यांच्या शोधात राहत होता. 


त्याच्या या पेशासाठी फोटोजनिक व शार्प रेखीव नाकी डोळी असणार्‍या  किंवा वेगळ्या लुकच्या मुली हव्या असायच्या. त्याची चित्रकार नजर अशा मुलींना बरोबर हेरायची.


  पण तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. अगदी त्याच्या वस्ती मधल्या कुठल्याच मुलाकडे ही ती लक्ष देत नव्हती.  


घरची काम, जंगलातली काम करून  संध्याकाळी थोडा वेळ  समुद्रावर घालवायची आणि घरी जाऊन पुन्हा त्यांच्या झोपडीमध्ये स्वयंपाकाला लागायची. एवढेच काय तिला ठाऊक होते. 


 परंतु  का कुणास ठाऊक , आज त्याला पाहून तिला खूप आनंद झाला होता.


 तिची वेशभूषा ही आज काहीशी वेगळी होती आणि ती रोजच्यापेक्षा खूपच छान दिसत होती.


 त्याने इशार्‍याने तिला सांगितलं की \"ती खूप छान दिसतीय\"


 त्याच्यात या इशार्‍याने ती खूप लाजली आणि ती तिच्या भाषेत काहीतरी सांगायला गेली.


याला थोडं कळालं  की त्यांच्या वस्तीत कसलासा कार्यक्रम होता, त्याच्यासाठी ती तशी कपडे दागिने घालून आलीय.

 आणि त्या अंबाड्यात घातलेल्या काड्या वगैरे अगदी सिनेमात पाहतो तशा एखाद्या आदिवासी मुली सारखी ती दिसत होती   अगदी कुणातरी  जणु हीरोइन जशी!


 त्याने तिला इशार्‍याने कसं उभं राहायचं ते सांगितलं.


 एक-दोन पोजही दाखवल्या.


 तिला हसू येत होतं पण एवढं कळालं की तो चित्र बनवतो आहे.


 मग  तीही उभी राहिली. तासभराच्या मेहनती नंतर चित्राने आकार घेतला.


 अंधार पडायला लागला  होता आणि  चित्राची रूप रेखा बनल्यामुळे त्याने साहित्य गाडीत टाकलं .  तो  तिला काही सांगणार  इतक्यात हाका ऐकू यायला लागल्या .


"आमदा, आमदाऽ " अशा . . ती पळतच निघून गेली.


 तो मात्र कितीतरी वेळ तिला पाठमोरी पाहत राहिला आणि परत निघाला.


तिच्या त्या चित्रावर काम करण्यात त्याचे पुढचे दोन चार दिवस गेले .


त्या दोन चार दिवसात ती खूप अस्वस्थ झाली. ती रोज संध्याकाळी त्याची वाट पहायची व  येऊन समुद्रकिनार्‍यालगतच बसायची.


ती मनात कुठेतरी त्याची वाट पाहत असायची.


 यावेळी चार दिवसानंतर जेव्हा तो आला तर तिचे डोळे तिची विरह कथा सांगत होते.


 त्याचं येणं, त्याचं  तिला पहात पहात चित्र रेखाटणं, बेफिक्रीने तो ब्रश घेवून रंग भरणं. . . सगळं सगळं तिला  मनापासून आवडत होतं.


तो त्याला जे वाटेल ते तिच्याशी स्पष्ट बोलत होता  अगदी तिला कळतंय असं पण त्यातला तिला किती व  काय कळत होतं याची कल्पना त्यालाही नव्हती.


 ती मात्र काहीतरी शब्द व त्याच्या चेहर्‍यांवरच्या भावांमुळे काही समजून घ्यायची. ती मात्र त्याच्याशी इशार्‍यानेच बोलायची.


हो किंवा नाही किंवा लाजणं त्यांची एक मूक व वेगळीच भाषा तयार झाली होती.


आठवडा गेला.

त्याच्या प्रतिक्षेत ती खडकावर बसलेली, पांढरी साडी नेसलेली. स्वतःच्याच विचारात गुंग!
त्याने त्याची ती पाठमोरी मुद्रा टिपली. किती शांत व सुंदर !

यावेळी तो येताना  तिच्यासाठी वेगळा पोशाख घेऊन आला होता.  तो तिला घालायला सांगितला आणि तिला झाडाजवळ सुंदर  पोजमधे उभी राहायला सांगून त्यांने अप्रतिम पेंटिंग बनवली.


सुदैवाने काहीही अडचण न येता त्यांची ही दिनचर्या  अशीच जवळजवळ महिनाभर चालत राहिली.

क्रमशः 

लेखिका - ©® स्वाती  बालूरकर, सखी

दिनांक ११.०२ .२०२३



🎭 Series Post

View all