Feb 24, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफी

वांझोटं मातृत्व

Read Later
वांझोटं मातृत्व
                  तीच पावसाळी काळीकुट्ट अमावस्येची भयाण रात्र , विजांचा कडकडाट , ढगांचा गडगडाट , रोंरों बरसणारा पाऊस , सुंसूं करणारा सोसाट्याचा वारा , कुत्र्या-मांजरांचे ते भयाण आणि भेसूर रडणे- ओरडणे पण तरीही राजा विक्रमादित्य आपला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी , त्या अंधाऱ्या काळ्याकुट्ट रात्री स्मशानाकडे जाण्यासाठी , झपाझप पावले टाकत होता. सुर्यासम तेजस्वी देह , राजस राजबिंडे रूप असलेल्या विक्रमादित्याला मौन धारण करून ते पिंपळाच्या झाडावरचे प्रेत आज येन-केन प्रकारे त्या अघोरीला नेऊन द्यायचे होते.
         
             राजा स्मशानाजवळ पोहोचला आणि स्मशानातील त्या पिंपळाच्या झाडाकडे चालू लागला. तेवढ्यात परत एकदा जोरदार वीज कडाडली, ढगांचा गडगडाट झाला पण तरीही राजा डगमगला नाही. त्याने झाडावर चढून ते प्रेत खांद्यावर घेतले आणि खाली उतरून राजमहालाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झपाझप पावले टाकू लागला.

" राजा विक्रम , खरंच तुझ्या निडर वृत्तीचे कौतुक वाटतं मला. गेल्या दहा अमावस्या तू असाच निर्भीडपणे येतो आणि मला खांद्यावर टाकून घेऊन जातो. चल तर आज मी तुला अजुन एक गोष्ट सांगतो. 

        ही गोष्ट आहे सईची. सई एक सॉफ्टवेअर इंजिनियर. एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर ऍनालिस्ट म्हणून कार्यरत होती. तिच्याच कंपनीत यशही काम करत होता. तो त्या कंपनीचा प्रोजेक्ट हेड. सुंदर, हुशार आणि कामात तत्पर असलेली सई आणि उत्तम नेतृत्व गुणांसह सर्व टीमला सोबत घेऊन, कधी प्रेमाने तर कधी फटकारून, दिलेल्या वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करणारा यश यांच्यात प्रेमाचा अंकुर रुजायला आणि बहरायला वेळ लागला नाही. आपल्या नात्याला अधिक घट्ट करण्यासाठी, एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देता यावा आणि एकमेकांना एकमेकांचा अधिकाधिक सहवास मिळावा म्हणून दोघांनी एकाच फ्लॅटमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली.

           बघता बघता दोन वर्ष कशी सरली ते त्या प्रेमीयुगुलांना कळलेच नाही. एकमेकांना साथ देत कंपनीची अनेक प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण करण्याचा जणू धडाकाच लावला होता. पण अचानक महामारी आली. लॉक डाऊन लागलं आणि वडिलांना हार्ट अटॅक यायचं निमित्त होऊन यश त्याच्या शहरात परत गेला. इकडे सईच्या आजीलाही देवाज्ञा झाली. सईलाही आपल्या शहरात परत जावं लागलं. आणि कडक टाळेबंदीमध्ये दोघेही आपापल्या शहरात अडकून पडले.

               त्यातच कंपनीने वर्क फ्रॉम होम सुरू केल्याने यश आणि सई ऑनलाईन भेटू लागले. पण वर्क फ्रॉम होम असल्याने दोघे खुलेपणाने बोलू शकत नव्हते. सईला यशची फारच ओढ लागली होती परंतू यश मात्र आता सईला टाळत होता. सहा-आठ महिन्यानंतर ,सई परत त्या महानगरात, तिच्या त्या प्रेमाच्या घरात परत आली. पण यश मात्र त्या महानगरात यायचं टाळत होता. कंपनीच्या वरिष्ठ मंडळाकडून अजून काही महिने वर्क फ्रॉम होमची परवानगी यशने मंजूर करून घेतली.

           सई जेव्हा-केव्हा यशला फोन किंवा मेसेज करे, तिच्या जवळ परत येण्याबाबत विचार असे , तेव्हा यश तिला उडवाउडवीची उत्तरे देत होता. एकेदिवशी सईने यशला फोन केला.

" यश , अरे कुठे आहेस ?" सईने विचारले.

" काय झालं सई ? काही अडचण आली का तुला?" यश उद्धटपणे म्हणाला. 

" यश , तू माझ्याजवळ राहायला येत नाही हीच माझी सगळ्यात मोठी अडचण आहे. तू केव्हा परत येणार आहेस ? मला एकटीला या फ्लॅटमध्ये राहावत नाही आता. हे घर.....मी.....आपले ते मोरपंखी दिवस.......आम्ही तुझी वाट पाहतोय रे ! शोना.....प्लीज लवकर ये ना. " सई शांतपणे म्हणाली.

" कसं शक्य आहे मला परत येणं ? अगं बाबांची तब्येत अजूनही ठीक झाली नाही. घरी एकटी आई सर्व कसं मॅनेज करेल ? मला एवढ्यात तरी तिकडे येणं शक्य नाही. अजून तीन-चार महिने मी घरूनच काम करणार आहे. " यश म्हणाला.

" यश , अरे पण मग मी काय करू आता ? या फ्लॅटचे भाडे, फर्निचरचे हफ्ते , माझ्या बजेटच्या बाहेरचं आहे सगळं. " सई म्हणाली.

" हे बघ सई, तो फ्लॅट आणि इतर सगळा लवाजमा याची हौस तुलाच होती. मला नाही. एक काम कर तू परत वर्किंग वुमन्स हॉस्टेलला राहायला जा. " यश रागात म्हणाला.

" याचा अर्थ काय समजायचा मी यश ?" पाणावलेल्या डोळ्यांनी सईने विचारले.

" अगं तू वेडीबिडी आहेस का ? याचा सरळ अर्थ असा की, आता आपलं नातं संपलं. आणि हो अजून एक, पंधरा दिवसांनी माझं लग्न आहे. तसही तुझ्यासारखी अतिमॉडर्न मुलगी मला आणि माझ्या घरच्यांना नकोच होती. तुझे राहणीमान, अतिआधुनिक विचार, खरं तर मला कधीच पटणारे नव्हते पण जाऊ दे.... मी नवीन आयुष्य सुरू करत आहे. आपल्या नात्यातून निदान मी तरी आता बाहेर पडतोय. मला भेटण्याचा, फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस ! बाय. " यश चढत्या स्वरात म्हणाला.

          यशच्या या बोलण्याने सई पूर्णपणे बधीर झाली. यशने त्याच्याकडून नातं तोडलं पण सईला मात्र या नात्यातून बाहेरच पडता येत नव्हतं. आपल्याला फसवलं गेलं आहे, समोरच्याने आपला प्रेमभंग केला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सईने कॉन्सिलरची मदत घेतली. ती कंपनी सोडून सईने दुसरी कंपनी जॉईन केली.
            यशने त्याच्या आई वडिलांनी पसंत केलेल्या, दिसायला ठीकठाक आणि जेमतेम पदवी घेतलेल्या मुलीशी लग्न केलं. यशच्या बायकोचं नाव "आशा" होतं. पण यश आशासोबत खुश नव्हता. तिचं (आशाचं) गबाळं राहणीमान, गावंढळ भाषा, काकूबाईंसारखे विचार, चारचौघात वावरताना जाणवणारी आत्मविश्वासाची कमतरता यामुळे यशला सईची खूप उणीव जाणवायची पण आता खूप उशीर झाला होता.

          सईच्या घरीपण तिच्या आईवडिलांनी एका उच्चशिक्षित, अतिश्रीमंत व्यावसायिकाशी सईचे लग्न लावून दिलं. सईने मनात ठरवलं की, मागचं जुनं सगळं विसरून आता एक नवं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचं. पण दुर्दैव सईची पाठ सोडत नव्हतं. सईच्या नवर्‍याला सईपेक्षा त्याच्या घरातल्या एका तरुण नोकरातच जास्त इंटरेस्ट होता. पहिल्या रात्री सईच्या नवर्‍यांनं थकण्याचा नाटक करून सईला टाळलं ते नेहमीसाठीच. सईच्या नवऱ्याच्या सगळ्या रात्री पार्ट्या आणि उरलेला वेळ त्या नोकरासोबत जात होता.                            एकेदिवशी सईने पतीला नोकरासोबत नको त्या अवस्थेत पकडले. तिचे हृदय पुन्हा पिळवटून निघाले . प्रेम दूरच पतीकडून पत्नी म्हणून शारीरिक सुखही भेटणार नाही याची तिला खात्री पटली. सईच्या पतीला मात्र आपल्या कृत्याचा पश्चाताप नव्हता. उलट सईने त्याची श्रीमंती उपभोगावी आणि मूग गिळून गप्प बसावे या मताचा तो होता.

       सईला या सगळ्याची चिड आली आणि तिने न्यायालयात धाव घेतली. परंतु सईच्या नवर्‍यांनं तिलाच \"वांझ\" आणि \"अ-स्त्री\" ठरवलं. त्याच्याजवळ असलेल्या पैशाने सईच्या नवर्‍यांनं वकीलच नव्हे तर, खोटे पुरावे ही विकत घेतले होते.


        सई परत एकदा उद्ध्वस्त झाली. पण या वेळी मात्र तिने मनाशी ठाम निर्धार केला आणि ती परत नोकरी करू लागली. दैवयोगाने त्या नव्या कंपनीत परत एकदा सईची आणि यशची गाठ पडली.

         आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट प्रसंगातून सईचा आत्मविश्वास आणखीनच वाढला होता. तिच्या आत्मविश्‍वासानं, चिकाटीनं आणि जिद्दीनं तिच्या चेहऱ्यावर आणखीनच तेज आलं होतं.

          तिकडे यश स्वतःच्या केबिनच्या पडद्याच्या पट्ट्या मागेपुढे करून सतत सईला बघत राहायचा. तसाही तो बायकोत कधी गुंतलाच नव्हताच पण आता सईच्या अशा अचानक भेटीने , त्यांनं कुटुंबाकडे साफ दुर्लक्ष केलं. आधी यश आपल्या मुलांबरोबर वेळ घालवायचा, कधी त्यांना आईस्क्रीम तर कधी मॉल मध्ये घेऊन जायचा. पण आता त्याला हे करणं फार कंटाळवाणं वाटू लागलं. घरी उशिरा परतुन सकाळी लवकरच तो ऑफिसमध्ये जात होता. एकेदिवशी असाच ऑफिसमधून काम करून थकून तो घरी आला.

" आज काल कामाचा ताण खूप वाढला आहे का ?" आशाने विचारले. 

" तसं काही नाही. " यश म्हणाला.

" तुम्ही सकाळी लवकर ऑफिसमध्ये जाता. रात्री घरी उशीरा येता. मुलांशी ही नीट बोलत नाही. त्यांना आधीसारखा वेळही देत नाही. " आशा तक्रारीच्या सुरात म्हणाली.

" तुला माझ्याशी भांडायचे आहे का ? इतकी मरमर करून पैसा कमवा आणि ह्यांच्या तक्रारीच संपतच नाहीत. " यश रागात म्हणाला.

" अहो , मी भांडत नाही आहे. काळजी वाटली म्हणून बोलते आहे. " आशा म्हणाली.

" तुला जर माझी खरंच काळजी वाटत असेल आणि तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर मला थोडावेळ एकटं सोड. हात जोडून विनंती करतो मी तुला. " यश चिडून म्हणाला.

      आशा चुपचाप मुलांचा अभ्यास घ्यायला निघून गेली. पण यशचं तासन्तास फोनवर बोलणं, तिला आणि मुलांना दुर्लक्षित करणं , विनाकारण तिच्यावर आणि मुलांवर चिडणं यापैकी आशाच्या नजरेतून काहीच सुटत नव्हतं. काय प्रकार सुरू आहे ते लक्षात यायला आशाला वेळही लागला नाही.
     
काही दिवसानंतर…….

" तुमचं प्रेम आहे तिच्यावर ?" आशाने मूळ विषयाला हात घातला.

" कोणाबद्दल बोलते आहेस तू? तुझं डोकं तर फिरलं नाही ना?" यश रागात म्हणाला.

" तुमच्या ऑफिसमधल्या त्या मुलीबद्दल बोलते आहे, जिच्याशी तुम्ही तासन्तास फोनवर गप्पा मारता, चॅटिंग करता आणि दर शनिवार-रविवार तिच्या सोबत बाहेर फिरायला जाता. ज्या वेळेवर माझा आणि आपल्या मुलांचा हक्क आहे तो तुम्ही तिला देता. " आशा रडत म्हणाली.

" अग तसं काहीच नाहीये. आम्ही एका ऑफिसमध्ये काम करतो म्हणून ऑफिसच्या वतीने सर्वजण एकत्र फिल्म बघायला गेले होते. तू सिरीयल जरा कमी बघत जा. " यश तिला समजवत म्हणाला.

" तुमची ती सई गर्भवती आहे असं मी ऐकलं. " आशा अजून रडत म्हणाली.

नक्कीच ऑफिसमधल्या प्युनने पैसे घेऊन खबर पोहोचवली असणार हे यशने जाणले.

" मला काय माहित? मला तिच्याशी काहीही घेणं देणं नाही. " यश आशाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

" पण मी तर ऐकलं आहे ती विधवा आहे. एक विधवा गर्भवती कशी होऊ शकते ?" आशा यशचा हात झटकत म्हणाली.

" अगं किती प्रश्न विचारते? जा मुलांचा अभ्यास घे. मला थोड्यावेळ एकटं राहू दे. आपण संध्याकाळी हॉटेलला जाऊ. रडू नको प्लिज. मुले बघतील तर काय विचार करतील ? तू जे समजत आहेस तसे काहीच नाही झाले. " यश  तिचे अश्रू पुसत म्हणाला.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आशा डोळे पुसून लगेच दार उघडायला गेली. समोर एक तरुणी उभी होती.

" आपण कोण? मी ओळखत नाही आपल्याला." आशाने प्रश्नार्थक सुरात विचारले.

" माझं नाव सई. मी यशच्या ऑफिसमध्ये काम करते. " सई म्हणाली.

" अच्छा तर तूच सई आहेस! माझ्या घरापर्यंत यायची तुझी हिम्मत तरी कशी झाली?" आशा चिडून म्हणाली.

" हे बघ आशा , एक अतिशय महत्त्वाचं काम असल्यामुळे मी तुझ्या दारापर्यंत आली आहे. माझं म्हणणं तू ऐकून घे आणि नंतर तुला काय बोल लावायचा आहे तो तू लावू शकतेस. " सई शांतपणे म्हणाली.

" माझ्या संसाराची राखरांगोळी केलीस आणि वरून म्हणते की मला काही बोलू नका. तुला स्वतःची जराही लाज नाही वाटत का ग ?" आशा रागात म्हणाली.

" आशा , इथे दरवाज्यात उभा राहून भांडण्यात काहीही अर्थ नाही. मी माझं म्हणणं तुला आणि यशला सांगितल्याशिवाय इथून जाणार नाही. " सई अजूनही शांतपणे बोलत होती.

" आता तू असं बोलल्यानंतर मी तुला मारू तर शकत नाही. तसे संस्कार माझ्यावर नाहीत आता आलीच आहेस तर ये घरात. " आशाला आज पुर्ण सोक्षमोक्ष लावायचा होता.

" मागल्या आठवड्यापासून यश ऑफिसमध्ये येत नाहीत म्हणून त्यांना.." सई म्हणाली.

" चार-पाच दिवसांचा विरह ही सहन होत नाही वाटतं. " आशाने टोमणा मारला.

" आशा कोण आहे ? कोणाशी बोलते आहेस?" यश हॉलमध्ये आला.

" यश , मी आहे. " सई म्हणाली.

" सई , तू इथं ? " यश म्हणाला.

  यशचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला.

" यश , मीही नोकरी, हे ऑफिस आणि हे शहर सोडून जात आहे. " सई म्हणाली.

" असा अचानक निर्णय का घेतला तुम्ही? " आशाने विचारले.

" आशा , मी यशच्या बाळाची आई होणार आहे. " सई म्हणाली.

कानात कुणीतरी गरम तेल ओतावे तसे आशाला झाले. आशाच्या नेत्रांतून आपसूकच आसवे गळू लागली. तिचा संशय खरा ठरला होता.

" पण मी तुझ्यापासून तुझा नवरा आणि तुझ्या मुलांपासून त्यांचा बाप कधीच हीरावणार नाही. " सई म्हणाली.

" या बोलण्याला काही अर्थ आहे का? माझ्या नवऱ्याच्या मुलाची तू आई होणार ? आणि कुठलाही हक्क नाही मागणार ? माझ्या सुखी संसारात माती कालवून तुला काय मिळालं ? यश , किती विश्वासाने माझ्या वडिलांनी माझा हात तुमच्या हातात दिला होता. मला धोका देताना जरासाही अपराधीपण वाटले नाही तुम्हाला. " आशा रडू लागली. 

" आशा ऐक. शांत हो. तुझं लग्न होण्याआधी यश आणि मी एकत्र राहायचो- नवरा बायकोसारखं -लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. पण यशने तुझ्याशी लग्न केलं आणि माझं दुसरीकडे लग्न झालं. पण माझा नवरा नपुंसक होता. त्याचे त्याच्या नोकराशी संबंध होते. मी विरोध केला, कोर्टात फर्याद केली ,तर माझ्या नवऱ्याने मलाच वांझोटी ठरवलं. 
     

               आशा, यश परत माझ्या आयुष्यात आला. पण आता माझ्या पाषाणहृदयात प्रेमासाठी जागा नव्हती. पण माझ्या मनाला मात्र मातृत्वाची ओढ लागली होती. माझ्या मनात लग्न करून संसार थाटायची इच्छा उरली नव्हती. पण सिंगल मदर बनून मातृत्व अनुभवायचे होते. मूल दत्तक घ्यायचा प्रयत्न केला पण त्यातही अनेक अडचणी आल्या. मग मी टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय निवडला. मला कुणीच स्पर्म डोनर भेटत नव्हता. तेव्हा हेतूपुरस्पर मी यशला त्याचे स्पर्म मागितले आणि टेस्ट ट्यूब बेबीच्या मदतीने मला दिवस गेले. कदाचित लिव्ह इन मध्ये राहत असताना यशने माझ्याशी प्रतारणा केली होती,  म्हणूनच त्याने त्याचे स्पर्म मला दिले. यशचे स्पर्म घेऊन मला आता आई होता येईल आणि साऱ्या जगाला सांगाता येईल की , मी वांझोटी नाही. " सई म्हणाली.

" आशा , बाबांनी खूप दबाव टाकला म्हणून मला तुझ्यासोबत लग्न करावे लागले. सुरुवातीला तू मला आवडत नव्हती पण नंतर माझे तुझ्यावर प्रेम जडले. सईने ऑफिस जॉईन केले तेव्हा भूतकाळातील आठवणी मला छळू लागल्या. अपराधीपणाची भावना जागृत होऊ लागली. म्हणून मी चिडचिड करत होतो. पण सईला स्पर्म डोनेट करून माझ्या मनावरचं ओझं थोडे का होईना कमी झाले. तुला या स्पर्म डोनेटसारख्या गोष्टी पटतील की नाही म्हणून मी तुला त्या बद्दल काही सांगीतले नाही. आशा , मी आता केवळ तुझ्यावरच प्रेम करतो, मी  तुझाच आहे ,  तू फक्त टीव्ही सिरीयलस कमी बघत जा. " यश खट्याळ पणे म्हणाला.

" माफ करा. मी उगाच तुमच्यावर संशय घेतला. " आशा , सई आणि यशला म्हणाली.

" काही हरकत नाही आशा.तुझ्या जागी जगातली इतर कोणतीही बायको अशीच वागली असती. असो. माझं होणार बाळ केवळ माझंच असणार आहे. मीच त्याचा बाप आणि आई होणार आहे. कारण यशसारखा पळपुटा नामर्द आणि माझ्या मेलेल्या नवऱ्या सारख्या नपुंसक पुरुषांचं नाव मला माझ्या बाळाला द्यायचचं नाही. " सई यशकडे बघत म्हणाली.

      एवढे बोलून सई दुसऱ्या शहरात निघून गेली. ती कुठे आहे ? काय करत आहे ? हे आता कोणालाच माहीत नाही

" राजा सांग सईचा निर्णय योग्य होता की चूक ? तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलं नाहीस तर मी तुझ्या डोक्याची शंभर शकलं करीन. " वेताळ हसत म्हणाला.

" सईचा निर्णय अतिशय योग्य होता. तिच्याशी प्रतारणा करणारा यश आणि स्वतःची चूक असूनही बायकोला वांझ ठरवणारा नवरा हे आजच्या आधुनिक समाजातील षंढ पुरुष आहेत. अशांना योग्य तो धडा शिकवलाच पाहिजे. " राजा विक्रमादित्य म्हणाला.

" राजा , तू मौन तोडलस बघ मी निघालोय. " वेताळ म्हणाला आणि वेताळ परत स्मशानातल्या पिंपळाच्या झाडावर उलटा लटकला.

समाप्त
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//