प्रायश्चित्त भाग पाच

The Love Story Of Aasavari Devdutt And Aangad


प्रायश्चित्त भाग पाच

सदर कथा ही 2002 सालच्या दशकातली आहे आणि वाचकांनी कथा वाचताना त्या अनुषंगाने विचार करावा ही विनंती.

ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.


*********************************************

पात्र

देवदत्त - कथेचा नायक.

आसावरी - नायिका.

अंगद - कथेचा सहनायक आणि देवदत्तचा वर्गमित्र.

निनाद - देवदत्तच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा.

विशाखा - अंगदची बहिण आणि निनादची बायको.

स्वीटी - देवदत्तची मैत्रीण.

***************************************************************


मागच्या भागात आपण पाहिलं की निनाद, विशाखा, देवदत्त आणि आसावरी भावे सरांना भेटायला अकोल्याला जायला निघतात आणि अकोल्याकडे जाताना विशाखाला जुने दिवस आठवतात………….



विशाखाचे साक्षगंध छान पार पडले. त्या साक्षगंधात निनाद सोबत - विशाखाच्या नवऱ्यासोबत देवदत्त ही अकोल्याला आला होता. विशाखा सोबत आसावरीला पाहून त्याचं काळीज तिथेच घायाळ झालं. आसावरीशी ओळख वाढवण्यासाठी तो आसावरीची सगळी माहिती अंगदकडून मिळवत होता. कारण सहा महिन्यांपूर्वी आसावरीनं त्याच्या प्रयत्नांना कुठलीच भीक घातली नव्हती. पण अंगद देवदत्तला वारंवार पटवून सांगत होता की,आसावरी इतर मुलींप्रमाणे नाही. तिला पैशाची गुर्मी,श्रीमंतीचा माज अजिबात आवडत नाही. दिखावा करणाऱ्यांशी ती बोलत सुद्धा नाही. पण हार मानेल तो देवदत्त कसला?


देवदत्त भावे सरांना भेटायला गेला. त्यांना रामानुजन यांचे चरित्र भेट म्हणून दिलं. तर आसावरीच्या आईला बनारसी सिल्कची साडी. आसावरीकरिता त्याने बशीर बद्र यांचे गझलांचे पुस्तक नेलं. एकंदरीतच भावे सरांकडे पहिल्या भेटीतच देवदत्तने सगळ्यांवर चांगलीच छाप पाडली होती, आणि सगळ्यांची मनही जिंकली होती. त्यानंतर तो नित्यनियमान भावे सरांकडे जात होता. सरांशी गणितावर बोलायचा, काकूंकडे वेगवेगळ्या पदार्थांची फर्माईश करायचा आणि आसावरीशी कविता चारोळ्या आणि गझलांवर किस पाडायचा. अंगदने देवदत्तला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला, पण देवदत्त इरेला पेटला होता. शेवटी त्या दोघांमध्ये एक पैज लागली. अकोल्याच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये देवदत्तची त्याच महिन्यात कॉन्फरन्स होती. त्यादिवशी संध्याकाळी देवदत्तने आसावरीला कॉफी पिण्यासाठी त्या हॉटेलवर बोलावलं. जर आसावरी तिथे गेली तर, देवदत्त जिंकणार होता आणि ती नाही गेली तर देवदत्त निमुटपणे मुंबईला परतणार होता.


पैजेच्या दिवशी देवदत्तने आसावरीला संध्याकाळच्या कॉफीची आठवण करून दिली. आसावरीने हॉटेलमध्ये येण्याचं कबूल केलं. नेहमीप्रमाणे अंगद दुपारी चारला भावे सरांकडे आला. कोचिंग क्लासची डिटेल्स तो भावे सरांना देत होता, पण आज त्याला घरात आसावरीचा अजिबात मागमूस जाणवला नाही. काकूंना विचारल्यावर त्याला कळलं की, आसावरी वासंतीकडे गेली आहे. पण त्याला हे पक्क माहिती होतं की, आसावरी वासंतीकडे न जाता त्या हॉटेलात देवदत्तला भेटायला गेली आहे. अंगदने भावे सरांना सोबत घेतलं आणि तडक ते हॉटेल गाठलं.


पण ते हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आसावरी नव्हतीच. अंगदच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला एकीकडे देवदत्तचा खूप राग येत होता आणि दुसरीकडे आसावरीची काळजी पण वाटत होती.


अंगद आणि भावे सर हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्या हॉटलात झालं असं की, काही उनाड मुलं-मुली त्या हॉटेलच्या हॉलमध्ये दंगा करत होते आणि त्या गोंधळात एका मुलाच्या हातातलं कोल्ड्रिंक आसावरीच्या ड्रेसवर आणि चेहऱ्यावर उडालं. आसावरीचा ड्रेस आणि ओढणी खराब झाली. आसावरीला तो ड्रेस खूप आवडायचा कारण, भावे सरांनी आसावरीच्या वाढदिवसाला तो गिफ्ट दिला होता.


तेवढ्यात कॉन्फरन्स आटपून देवदत्त तिथे आला. झाला प्रकार त्याच्या लक्षात आला आणि त्यांन आसावरीला हॉटेलच्या रूममध्ये नेलं. तिथे तिने चेहरा धुतला आणि नेमकं त्याचवेळी भावे सर आणि अंगद तिथे पोहोचले.


हॉटेलची ती रूम, देवदत्त ने काढून ठेवलेला कोट,शर्टाची वरची दोन उघडी असलेली बटन आणि वॉशरूम मधून आसावरीच चेहरा पुसत बाहेर येण! भावे सरांनी गैरसमज करून घेतला. त्यांना इतका राग आला होता की, त्यांनी देवदत्तच काय पण आसावरीच म्हणणं देखील ऐकलं नाही. झाल्या प्रकाराने सर्वच गोंधळले होते. पण भावे सरांना मात्र फार जास्त धक्का बसला होता. त्यांना समजावण्यासाठी देवदत्त सरांच्या मागे गेला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.


देवदत्त हॉटेलवर परत आला तेव्हा आसावरी तिथे नव्हती. त्याने आसावरीचा खूप शोध घेतला, तेव्हा आसावरी एका मंदिरात त्याला अश्रु ढाळत बसलेली दिसली. देवदत्तन आसावरीला घरी चलण्याविषयी सुचवले.


देवदत्त -"आसावरी रात्रीचे नऊ वाजलेत चल, घरी चल."

आसावरी -"का केलं देवदत्त तुम्ही असं? माझं प्रेम, माझा विश्वास, माझे चरित्र सगळ्यांच्या चिंध्या केल्या तुम्ही!


(आसावरी रडायला लागली.)

देवदत्त -"आसावरी माझंही तुझ्यावर प्रेम आहे, म्हणूनच म्हणतो इथे अशी एकटी बसू नको. चल मी तुला तुझ्या घरी सोडवतो."


आसावरी -"घर! माझं घर!! नाही आता बाबा मला घरात घेणार नाहीत. मला आता घर नाही. काय केलं देवदत्त तुम्ही? का केलं? मी तुमचा काय अपराध केला होता? का केलं? का केलं?"

(देवदत्त बळजबरीने आसावरीला भावे सरांकडे घेऊन गेला अंगद तिथेच होता.)

भावे सर -"काय इथे आलीस तू? तुझ्यासारख्या मुलीला जन्म देण्यापेक्षा मी निपुत्रीक राहिलो असतो तर बरं झालं असतं! देवदत्त फार चांगलं केलं बेटा. खूप छान गुरुदक्षिणा दिलीस."

(भावे सरांचा राग बघून आसावरी आल्या पावली मागे फिरली. इकडे दुःख आणि अति रागांन भावे सर जमिनीवर कोसळले. देवदत्त आणि अंगद त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. या सगळ्या गडबडीत आसावरी कुठे गेली याचा विचार करायला कुणालाच वेळ मिळाला नाही.)


दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातील बातमीने अंगद,देवदत्त आणि भावे सर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आणि भावे सरांना स्मृतिभ्रंश झाला. पण देवदत्त मात्र हे मान्य करायला अजिबात तयार नव्हता की, नागपूरकडे जाणाऱ्या गाडीच्या अपघातात आसावरीला मरण आलं. अगदी तिची पर्स, आय कार्ड आणि इतर वस्तू बघून सुद्धा. त्यानंतर कितीतरी दिवस देवदत्तने आसावरीचा शोध सुरू ठेवला होता, पण आसावरीचा त्याला कुठेही पत्ता लागत नव्हता.

तेवढ्यात देवदत्त विशाखाला म्हणत होता….

देवदत्त -"विशाखा चला खाली उतरा, माझा बंगला आला आहे."


पण देवदत्तच्या बंगल्यावर जायला आसावरी तयार नव्हती. रात्रीचे साडेदहा अकरा वाजले होते त्यामुळे, एवढ्या रात्री विशाखाच्या घरी जाणंही आसावरीला पटत नव्हतं. शिवाय तिथे अंगदही असणार होता. त्यामुळे शेवटी नाईलाजाने का होईना आसावरीला देवदत्तच्या बंगल्यावरच जावं लागलं. विशाखाने आसावरीला वचन दिलं कि ती रात्रभर तिच्यासोबतच राहील.

देवदत्तच्या प्रशस्त बंगल्यासमोर छान लॉन होतं. तिथल्या नोकराने हॉलचा दरवाजा उघडला. हॉलच्या अगदी दर्शनीय भागात आसावरीच एक मोठं पोर्ट्रेट लावलेलं बघून आसावरीला खूप राग आला तर, विशाखाला आश्चर्याचा धक्का बसला. सगळेजण सोफ्यावर बसले. फ्रेश झाल्यावर, चहा-पाणी घेऊन देवदत्तने झोपण्याकरिता विशाखा आणि आसावरीला वरच्या माळ्यावरची खोली दिली. त्या खोलीतही आसावरीचे अनेक फोटो लावलेले होते. त्याच खोलीत काय एकंदरीत देवदत्तच्या त्या अकोल्याच्या बंगल्यात सगळीकडेच प्रत्येक खोलीत आसावरीचे फोटो लावलेले होते. तो बंगला नसून देवदत्तने आसावरीवरील आपल्या प्रेमाचं ते एक स्मृती मंदिर बनवलं होतं. देवदत्त आणि निनाद खालच्या बेडरूममध्ये झोपले तर विशाखा आणि आसावरी वरच्या.


रात्री झोपताना विशाखा आसावरीला म्हणत होती…

विशाखा -"आसावरी देवदत्त खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे ग!"


आसावरी -"म्हणजे त्याने असे सगळीकडे माझे फोटो लावले यावरून तुला असं म्हणायचं आहे का? तुला माहिती आहे विशाखा, मला दिखावा, बडेजाव, श्रीमंतीचे प्रदर्शन अजिबात आवडत नाही."


विशाखा -"अगं पण हे श्रीमंतीचे प्रदर्शन नसून प्रेमाचं आहे."

आसावरी -"अरे वा म्हणजे निनादजींनी पण त्यांच्या घरी तुझे असेच फोटो लावले आहेत का सगळीकडे?"

विशाखा -"काय हे आसावरी? किती आडमुठेपणाने वागते आहेस तू? अग देवदत्त तुझ्यासाठी किती काय करतो आहे!"

आसावरी -"त्याने माझ्या पूर्वआयुष्यात किती काय करून ठेवलं आहे हे तुला माहिती असूनही तू असं म्हणतेस? परत त्याचीच बाजू घेतेस?"


विशाखा -"हे बघ आसावरी तू ना सध्या फार चिडलेली आहेस, रागावलेली आहेस,त्यामुळे तुला देवदत्तच प्रेम दिसत नाही आहे."


आसावरी -"विशाखा तू बरी आहेस ना? मागे तू म्हणत होती की तू अंगद जवळ प्रेमाची कबुली दे आणि आता तुला असं वाटतंय की, देवदत्तच माझ्यावर प्रेम आहे. तू स्वतःच किती कन्फ्युज आहेस! तुला प्रेम म्हणजे नक्की काय वाटतं?"

विशाखा -"हे बघ रात्र खूप झाली आहे आणि उद्या सकाळी आपल्याला भावे सरांकडे जायचं आहे त्यामुळे, जास्त वाद न घालता आता आपण झोपूया! कोणाच कोणावर प्रेम आहे हे, मी,तू ,देवदत्त आणि अंगद दादाने ठरवण्यापेक्षा येणाऱ्या भविष्यालाच ठरवू दे."

असं म्हणून विशाखाने मान फिरवली आणि आसावरीकडे पाठ करून, तोंडावर पांघरून घेऊन ती झोपली.

*********************************************

आसावरी भावे सरांना भेटल्यावर काय होईल? आसावरी अंगदला माफ करेल का? ते बघूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा आणि खूप सारे लाईक आणि कमेंट करा.

🎭 Series Post

View all