सदर कथा ही 2002 सालच्या दशकातली आहे आणि वाचकांनी कथा वाचताना त्या अनुषंगाने विचार करावा ही विनंती.
ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.
*********************************************
पात्र
देवदत्त - कथेचा नायक.
आसावरी - नायिका.
अंगद - कथेचा सहनायक आणि देवदत्तचा वर्गमित्र.
आसावरी - नायिका.
अंगद - कथेचा सहनायक आणि देवदत्तचा वर्गमित्र.
निनाद - देवदत्तच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा.
विशाखा - अंगदची बहिण आणि निनादची बायको.
स्वीटी - देवदत्तची मैत्रीण.
***************************************************************
मागच्या भागात आपण पाहिलं की देवदत्त स्वरालीला ती आसावरीच आहे आणि त्याने तिला ओळखलं आहे हे स्पष्टपणे सांगतो शिवाय तिला हेही सांगतो की, हॉटेलमधल्या घटनेनंतर आसावरीच्या वडिलांची म्हणजेच भावे सरांची स्मृती गेली आहे आता पुढे……………..
अंगद नेहमीप्रमाणे न चुकता चारच्या ठोक्याला भावे सरांकडे पोहोचला. नित्यनियमाप्रमाणे भावे सरांनी आजही अंगदला ओळखले नाही. मग अंगदने स्वतःची ओळख भावी सरांना करून दिली.
अंगद -"सर मी अंगद. तुमचा बी.एस.सी. चा विद्यार्थी. तुम्ही आम्हाला मॅथ शिकवायचे."
सर -"हो का? बरं मग तू आता माझ्याकडे कशासाठी आला आहेस? काय काम आहे तुझं माझ्याकडे?"
अंगद - "सर मी दररोज तुमच्याकडे याच वेळेला येतो. तुम्ही मला तुमच्या काही स्मृती, नोकरीतले काही बरे वाईट अनुभव आणि काही हुशार विद्यार्थ्यांविषयी सांगता."
सर -"अच्छा! बर मग तू काय करतोस? म्हणजे मी सांगितलेलं सगळं फक्त ऐकायलाच येतोस का?"
अंगद -"अं हो तसेच काहीतरी समजा. त्याशिवाय तुमच्या भावे कोचिंग क्लासेसचं सगळं मीच बघतो."
अंगद -"अं हो तसेच काहीतरी समजा. त्याशिवाय तुमच्या भावे कोचिंग क्लासेसचं सगळं मीच बघतो."
सर -"बर बर! ठीक आहे. आलाच आहेस तर चहा घेऊनच जा. आज मला जरा बरं वाटत नाहीये आपण उद्या बोलू."
(भावे सर आतल्या खोलीत निघून गेले.)
अंगद -(स्वगत) "त्या दिवशी मी असं वागायला नको होतं. मी किती आताताईपणा केला. माझ्या त्या एका कृतीने सगळंच विस्कटून गेलं आहे. पण माझी तरी काय चूक होती? खरंतर चूक नसून स्वार्थच होता म्हणा ना! मी आसावरीवर मनापासून प्रेम करत होतो आणि आहे. पण कधी ते व्यक्त करू शकलो नाही. विशाखा मला नेहमी म्हणायची -\"दादा प्रेम असं मनात ठेवू नये रे! एकदाच सांगून टाक, जास्तीत जास्त काय होईल? आसावरी नाही म्हणेन एवढेच ना!\" पण तरीही माझा भिडस्त स्वभाव मधे आला. शिवाय मला माझ्या इमेजची अतिजास्त काळजी आणि आसावरीचा निरागस, साधा-भोळा स्वभाव मला माझं प्रेम कधीच व्यक्त करू देत नव्हता.
(आसावरी ची आई अंगदसाठी चहा घेऊन आली.)
आई -"अंगद चहा."
अंगद -"अहो काकू कशाला रोज रोज त्रास करून घेता?"
आई -"अरे बाबा तू पण नाही का रोज ऊन्हा-पावसात वर्षाचे 365 दिवस आमच्यासाठी एवढ सारं करतो. तुझ्या सरांचा क्लास, त्यांचं औषध-पाणी, डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या,शिवाय घरात काय हवं नको अगदी माझ्या मुलासारखाच करतो ना! त्या बदल्यात मी तुला एक कप चहाशिवाय काहीच देऊ शकत नाही."
(उसासा टाकून काकू निघून गेल्या.)
अंगद -(मनातल्या मनात) "काकू मी तुमच्यासाठी किंवा सरांसाठी हे सगळं करत नाहीये, खरंतर त्या दिवशी मी तुम्हा दोघांना हॉटेलात न्यायलाच नको होतं, पण तरीही नेलं आणि आसावरीला हॉटेलच्या त्या रूममध्ये सरांनी स्वतःचा चेहरा पुसताना बघितलं आणि त्यांच्या रागाचा पारा फुटला. त्या संध्याकाळी आसावरी घरी परतलीच नाही. रात्री दहाच्या सुमारास ती घरी आली तेव्हा सरांनी तिच्यावर खूप आग-पाखड केली. पण सरांचं शेवटचं वाक्य तिच्या जिव्हारी लागलं -\"तुझ्यासारख्या मुलीचा बाप होण्यापेक्षा देवाने मला निपुत्रिक ठेवलं असतं तर बरं झालं असतं.\" त्या एका वाक्यांना आसावरी पूर्णपणे कोलमडली आणि रागाच्या भरात घर सोडून निघून गेली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली की, नागपूरकडे जाणाऱ्या बसला अपघात होऊन वीसजण ठार झाले. त्या अपघातात आसावरीची पर्स आणि कॉलेजच आय कार्ड मिळालं आणि हे सगळं ऐकून - बघून सरांची स्मृति गेली. या सगळ्या वाईट गोष्टींना कुठेतरी मी स्वतःलाच कारणीभूत मानतो. सरांची सेवा आणि तुम्हाला थोडासा आर्थिक हातभार लावून मी माझ्या पापाचं प्रायश्चित्त घेण्याचा असफल प्रयत्न करतो आहे. सर आणि तुमच्यासाठी माझं अख्खं आयुष्य जरी खर्ची घातलं तरी माझा गुन्हा माफ करण्यासारखा नाही.
निनाद आसावरीला सांत्वन देण्यासाठी तिच्या जवळ गेला.
निनाद -"आसावरीजी तुम्ही ठीक आहात ना?"
आसावरी -"हं होय ठीक आहे मी."
(पण रडून आसावरीचे डोळे सुजले होते. नाकाचा शेंडा लाल झाला होता.)
आसावरी -"निनादजी तुम्ही मला बाबांकडे घेऊन चलाल का? विशाखाला पण सोबत घ्या. मला सध्या तिची फार गरज आहे."
निनाद -"हो मी घेऊन चालतो तुम्हाला भावे सरांकडे."
देवदत्त -"आसावरी मला तुला आणखी एक सांगायचं आहे."
(आसावरीने आता आणखीन काय! अशा प्रश्नार्थक नजरेने देवदत्तकडे पाहिले.)
देवदत्त -"आसावरी डॉक्टरांनी सांगितले आहे की, भावे सरांना यानंतर कुठलाही धक्का मग तो आनंदाचा असो अथवा दुःखाचा सहन होणार नाही. त्यामुळे तू भावे सरांसमोर आसावरी म्हणून न जाता-"
आसावरी -"स्वराली म्हणून जावे."
निनाद -"विशाखाची मैत्रीण बनून."
आसावरी -"ठीक आहे."
त्याच दिवशी संध्याकाळी देवदत्त, आसावरी, विशाखा आणि निनाद अकोल्याला जाण्यासाठी देवदत्तच्या कारमध्ये बसले.
प्रवासादरम्यान आसावरीला आपल्या वडिलांची तब्येत कशी असेल? ते आपल्याला ओळखतील का? असे अनेक प्रश्न सतावत होते आणि नकळत तिच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते. विशाखा तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला सांत्वना देत होती. आसावरीची ही विकल अवस्था बघून विशाखालाही गलबलून आलं पण तिने स्वतःचे अश्रू आवरले.
कारच्या खिडकीच्या काचेतून सहजच बाहेर बघताना, समोर धावणारी कार आणि मागे पडणारी झाड, हिरवी मैदान, उघड्या-बोडक्यात टेकड्या बघून विशाखाला जुने दिवस आठवले……
आसावरी आणि विशाखा बाल मैत्रिणी. शाळा-कॉलेजमध्ये ही सोबतच जाणाऱ्या, दिवसभर दंगा करणाऱ्या, विशाखा तर सतत आसावरीकडेच असायची. आसावरीची आई पण दोघींचा खूप लाड करायची, त्यांच्यासाठी विशाखा जणू त्यांची दुसरी मुलगीच! खरंतर आसावरीच्या आईला आसावरी लग्नाच्या दहा-बारा वर्षानंतर झालेली, त्यामुळे तिला त्या फार जपायच्या. भावे सरपण आसावरीचे खूप लाड करायचे, पण तरीही आसावरीला त्यांचा आदरयुक्त धाक वाटायचा. लहानपणी अंगद-आसावरी-विशाखा सोबत खेळायचे. पण मोठे झाल्यावर मात्र त्यांचे विश्व बदललं. अंगदला आसावरी खूप आवडते हे विशाखाला माहिती होतं, ती नेहमी अंगदला आसावरी जवळ प्रेम व्यक्त करण्यासाठी मागे लागायची, पण मुळातच भिडस्त स्वभाव असलेला अंगद भावे सरांची शिस्त आणि नोकरीसाठीची धडपड यात कधी स्वतःच मन आसावरीजवळ मोकळं करूच शकला नाही. शेवटी एकदा न रहावून विशाखानेच आसावरीजवळ विषय काढला…
विशाखा -"आशु अजून किती दिवस अशा चारोळ्या, कविता करणार आहेस? तू स्पष्टपणे सांगून टाक ना त्याला तुझ्या मनात काय आहे?"
आसावरी -"कोणाला काय सांगू? आणि माझ्या मनात काय आहे?"
विशाखा -"हे बघ जास्त आढेवेढे घेऊ नकोस. अंगद दादाला सांग तो तुला आवडतो ते."
आसावरी -"तुला कोणी सांगितलं तो मला आवडतो?"
विशाखा -"मग रोज, वर्षाचे ३६५ दिवस दुपारी चारला अंगद दादा तुमच्याकडे का येतो?"
असावरी -"तो तर बाबांकडे येतो. कोचिंग क्लासचं सगळं तोच बघतो ना!"
विशाखा -"अग वेडाबाई कोचिंग क्लास एक बहाना आहे तुला रोज बघण्याचा. मला माहिती आहे दादा कधीही समोर होऊन तुझ्याजवळ स्वतःच्या प्रेमाची कबुली देणार नाही."
आसावरी -"आणि म्हणून मग मी आसूसल्याप्रमाणे माझ्या प्रेमाची कबुली त्याला देऊ? किती तुझी जबरदस्ती ग!"
विशाखा -"अरे देवा तुम्ही दोघं कधीही एकमेकांशी बोलणारच नाहीत का? हे बघ पुढल्या महिन्यात माझे साक्षगंध आहे आणि पंधरा दिवसात लग्न, तोपर्यंत तरी तुम्ही दोघे एकमेकांशी काहीतरी बोला."
आसावरी -"हे मला सांगण्याऐवजी तुझ्या अंगद दादाला जास्त पटवून सांग."
आसावरीच्या घरून परत आल्यावर, विशाखाने अंगदजवळ विषय काढला….
विशाखा -"दादा पुढल्या महिन्यात माझं साक्षगंध आहे."
अंगद -"बर मग?"
विशाखा -"तू आसावरीशी बोलत का नाहीस?"
अंगद -"काय बोलू?"
विशाखा -"तुझ्या प्रेमाची कबुली दे तिला."
अंगद -"त्याने काय होईल?"
विशाखा -"मग लग्न करा. सुखी व्हा."
अंगद -"पहिली गोष्ट प्रेमाची कबुली दिल्यानंतर लगेच लग्न होत नसतं. दुसरी गोष्ट तिच्या मनात काय आहे हे मला माहिती नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मला नोकरी नाही. भावे सरांच्याच कोचिंग क्लासवर मी गणित शिकवतो आणि माझ्यासारख्या बेरोजगार युवकाला ते त्यांची एकुलती एक, सुंदर, गुणी मुलगी का देतील? बोलताना जरा विचार करत जा. मोठी झाली तू आता. तुला,मला किंवा आसावरीला काय वाटते या गोष्टींना काहीच महत्त्व नाही. मुळात मला नोकरी नाही ही बाब खूप मोठी आहे. कळलं का मिसेस निनाद भिडे?"
विशाखा -"हो हो अंगद जोशी कळले हो कळले!"
*********************************************
आसावरी अकोल्याला पोहोचल्यानंतर काय होते ते बघूया पुढल्या भागात तोपर्यंत कथा कशी वाटली त्याबद्दल तुमची मतं आणि अभिप्राय नक्की सांगा.
तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत.......