Feb 24, 2024
प्रेम

प्रायश्चित्त भाग तीन

Read Later
प्रायश्चित्त भाग तीन


प्रायश्चित्त भाग तीन


सदर कथा ही 2002 सालच्या दशकातली आहे आणि वाचकांनी कथा वाचताना त्या अनुषंगाने विचार करावा ही विनंती.

ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.


*********************************************

पात्र

देवदत्त - कथेचा नायक.

आसावरी - नायिका.

अंगद - कथेचा सहनायक आणि देवदत्तचा वर्गमित्र.

निनाद - देवदत्तच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा.

विशाखा - अंगदची बहिण आणि निनादची बायको.

स्वीटी - देवदत्तची मैत्रीण.

*****************************************************

आतापर्यंतच्या कथेत आपण पाहिलं की देवदत्त \"मराठी माणसाचा आवाज\" हे रेडिओ चॅनल विकत घेतो आणि स्वराली भावेचा पत्ता शोधत तिच्या गुरुजींकडे पोहोचला पण, स्वराली घरी नव्हती. त्यामुळे देवदत्त आणि स्वरालीची भेट होऊ शकली नाही आता पुढे….रेडिओ स्टेशनकडे जाताना आपल्या कारच्या खिडकीतून स्वराली बाहेरच्या रस्त्याकडे बघत होती. खरंतर ती कार स्वरालीची नसून तिच्या गुरुजींनी तिला वापरण्यासाठी दिली होती. स्वराली गेल्या दोन अडीच वर्षांपासून गुरुजींकडेच राहत होती. गुरुजीच्या घरापासून रेडिओ चॅनलचं ऑफिस फारच लांब असल्याने तिलाही येण्या-जाण्याकरता त्या कारचा उपयोगच होत होता. रस्त्याने अनेक वाहन,गाड्या, मोटारी, स्कूटरवाले आपापल्या कामाकरता जात होते. सगळ्यांनाच घाई,कामाच्या ठिकाणी पोहोचण्याची लगबग. स्वराली मनाशी विचार करत होती, \"आपल्या आयुष्यातही अशी अनेक माणसे, व्यक्ती येतात. खरंतर त्यांची आणि आपली कुठलीही पूर्व ओळख नसते पण, काही नेहमीसाठी मनावर ओरखडा उमटवून जातात तर काही केवळ स्मृतींचा न संपणारा दरवळ देऊन जातात.

या आठवणी म्हणजे जणू एखाद्या तलावात भर ग्रीष्मात झालेली पिवळ्या पानांची गर्दी तशी या आठवणींची काळजात झालेली गर्दी आणि भावनांचा अखंड गलबला.

भावनांच्या जंगलातल्या रानफुलांच्या वेली म्हणजे आठवणी, सागराच्या लाटा म्हणजे आठवणी, वारंवार दाटून येणाऱ्या, डोळ्यातून झरणाऱ्या, एकट जगण्याची बोच घेऊन येणाऱ्या आठवणी.\" मनाशीच असा विचार स्वराली करत होती.


तेवढ्यात कारच्या ड्रायव्हरन तिला रेडिओ स्टेशन आल्याचे सांगितलं. स्वराली कारमधून उतरून रेकॉर्डिंग स्टुडिओकडे निघाली, पण त्यादिवशी बुधवार असल्याने रेकॉर्डिंग बंद होतं आणि तिला लाईव्ह गाणं म्हणावं लागलं.

स्वरालीने माइक समोर उभे राहून गाणं सुरू केलं-

"जिवलगाss राहिले रे दूर घर माझे

पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे."स्वरालीचं गाणं संपलं आणि ती ड्युटी रूमकडे गेली. तिथे निनाद तिची वाट पाहत होता.


ज्या क्षणी स्वरालीने लाईव्ह गाणं सुरू केलं त्याचवेळी देवदत्तने  कारच स्टार्ट बटन दाबलं. संपूर्ण रस्ताभर देवदत्त स्वरालीचं गाणं ऐकत होता आणि मनाशी काहीतरी निश्चय करत होता. त्याला आज कसंही करून, काहीही करून स्वरालीला भेटायचं होतं आणि बोलायचंही होतं.

स्वराली - "सर काही विशेष! म्हणजे लाईव्ह सादरीकरण झालं की, मी सरळ घरी जाते पण,आज तुम्ही मला बोलावलंत?"

निनाद - "स्वरालीजी तुम्हाला माहीतच असेल आता हे रेडिओ चॅनल देवदत्त देशमुख यांच्या मालकीचे होणार आहे. येत्या महिन्याभरात सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल."

स्वराली -"आणि मग देवदत्त देशमुख या रेडिओ चॅनलचे सर्वेसर्वा होतील आणि ते जे म्हणतील त्याप्रमाणे आपल्या रेडिओ चॅनलवरून कार्यक्रम प्रसारित होतील. कदाचित मला माझी नोकरीही सोडावी लागेल असंच ना!"

निनाद - "हो! त्याला तुम्हाला भेटायचं आहे. त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. गेले दोन अडीच वर्ष तो सारखा तुम्हाला शोधत आहे. अनेक प्रयत्न करूनही तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. मग त्याला कुठून तरी कळलं की, तुम्ही या रेडिओ चॅनलवर नोकरी करता म्हणूनच त्यांना हे रेडिओ चॅनल विकत घेतलं आहे. तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो अगदी आटोकाट प्रयत्न करतो आहे. देवदत्तला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे."

स्वराली -"निनादजी सगळं माहिती असूनही, मी देवदत्तची भेट घ्यावी असं तुम्हालाही वाटतं?"


निनाद -"अजून किती पळणार? कुठपर्यंत धावणार? कधी ना कधी तर तुम्हाला ह्या सगळ्याला सामोरे जावंच लागेल ना!"

स्वराली -"पण मला त्याची गरज वाटत नाही. मला माझ्या भूतकाळात परत डोकंवायचं नाहीये."

निनाद -"काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जे समोर येईल त्याला आपण धीराने तोंड दिलंच पाहिजे. जे वास्तव आहे त्याचा स्वीकार करण्यातच शहाणपणा आहे."


स्वराली -"आतापर्यंत धीरानेच तर जगते आहे. माझ्या जागी दुसरी कुणी असती तर केव्हाच उन्मळून पडली असती. मीही माणूस आहे, दगड नाही, मलाही भावना आहेत, मलाही त्रास होतो, मनाविरुद्ध गोष्टी घडताना माझंही मन पिळवटत, माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत."

देवदत्त -"आसावरी तुला कोण म्हणतंय निमुटपणे सर्व सहन करायला!"


( देवदत्त ड्युटी रूममध्ये येत बोलला.)


देवदत्तच्या अशा अनपेक्षित येण्यानं स्वराली आणि निनाद दोघेही दचकले आणि आश्चर्याने देवदत्तकडे बघायला लागले.

देवदत्त -"आसावरी मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे."


स्वराली -"मी आसावरी नाही. स्वराली आहे."


देवदत्त -"नाव बदलल्याने व्यक्ती बदलत नाही ना!"

स्वराली -"आसावरी त्याचदिवशी मेली ज्या दिवशी तुमच्या म्हणण्याखातर ती त्या हॉटेलमध्ये आली आणि अंगद हेतू पुरस्सर आसावरीच्या आई-वडिलांना तेथे घेऊन आला."

देवदत्त -"आसावरी त्यादिवशी जे झालं ते मलाही फारच अनअपेक्षित होतं पण, त्या एका घटनेने तुझ्या - माझ्या आणि भावे सरांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाला आहे. आपल्या सगळ्यांचच आयुष्य विस्कळीत झालं आहे."

स्वराली - "आणि आता मी तुमचं म्हणणं ऐकलं तर सगळं सुरळीत होईल असं वाटतं का तुम्हाला?"

देवदत्त -"सगळं सुरळीत होईल की नाही, माहित नाही. पण निदान माझ्या मनावरचं ओझं थोडं तरी कमी होईल."

निनाद -"आसावरी तुम्हा दोघांच्यामध्ये मी बोलणं बरं दिसणार नाही आणि ती योग्यही नाही. पण मला देखील असं वाटतं की, तुम्ही एकदातरी देवदत्तच म्हणणं ऐकून घ्यावं."


स्वराली -"आता तुम्ही सुद्धा यांची बाजू घेणार का निनादजी? शेवटी तुम्हीही मला एकट पाडलंत."

निनाद -" गैरसमज होतोय आसावरीजी तुमचा, मी फक्त एवढेच म्हटलं आहे की ,तुम्ही फक्त एकदा देवदत्तचं म्हणणं ऐकून घ्या."


देवदत्त -"आसावरी हे काय सुरू आहे तुझं? केव्हापासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुझं आपलं तेच पालूपद. "

(देवदत्त एकदम आसावरी समोर उभा राहिला आणि तिचे दोन्ही दंड घट्ट पकडले. आसावरीकडे बघताना देवदत्तला परत जुने दिवस आठवले - तीच गौरकांती, तेच धारधार नाक, तोच सोज्वळ चेहरा, कानातले मोत्याचे छोटे डुल,गळ्यातला मोत्याचा कंठा आणि गुलाबी रंगाचा लखनवी कुर्ता. स्वरालीचं राहणीमान अजूनही तसंच साधं होतं पण अजूनही ती तितकीच मोहक दिसत होती की, एक क्षण देवदत्त स्वतःलाही विसरला.)

"आता तुझी इच्छा असो अगर नसो, मी तुला एक महत्त्वाचं सांगणार आहे आणि तुला ते ऐकावंच लागणार आहे."

( देवदत्त अचानक आला आणि आसावरीचे दंड धरल्याने आसावरी खूप घाबरली निनादलाही एक क्षण कळलेच नाही की नेमकं काय सुरू आहे!)


देवदत्त -"आसावरी त्यादिवशी हॉटेलमध्ये मी तुला भेटायला बोलावलं आणि अंगद तुझ्या आई बाबांना तिथे घेऊन आला. तू फक्त चेहरा धुऊन बाहेर येत होती पण भावे सरांचा तुझ्याविषयी गैरसमज झाला आणि त्या धक्क्यांने त्यांची स्मृती गेली. आता ते कोणालाच साधं ओळखत देखील नाही."


हे ऐकून स्वराली मटकन खालीच बसली.


क्रमशः

*********************************************************

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//