Feb 24, 2024
प्रेम

प्रायश्चित्त भाग दोन

Read Later
प्रायश्चित्त भाग दोन


प्रायश्चित्त भाग 2


*********************************************

पात्र

देवदत्त - कथेचा नायक.

आसावरी - नायिका.

अंगद - कथेचा सहनायक आणि देवदत्त चा वर्गमित्र.

निनाद - देवदत्त च्या वडिलांच्या मित्राचा मुलगा.

विशाखा - अंगद ची बहिण आणि निनाद ची बायको.

स्वीटी - देवदत्तची मैत्रीण.

*********************************************

पहिल्या भागात आपण पाहिलं की देवदत्त ला स्वराली भावेचा पूर्ण पत्ता आणि इतर काही माहिती हवी असते पण निनाद ती माहिती देण्यास नकार देतो आता पुढे……….


\"मराठी माणसाचा आवाज\" या रेडिओ चॅनलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये निनाद आणि इतर दोन डायरेक्टर देवदत्त ची वाट पाहत होते. दहा वाजून पाच मिनिटाला देवदत्त कॉन्फरन्स हॉलमध्ये आला.

निनाद -" हा माझा मित्र देवदत्त देशमुख! देशमुख इंडस्ट्रीचा सर्वेसर्वा. देवदत्त हे मिस्टर सबनीस आणि हे मिस्टर आगाशे."

सबनीस - "देवदत्त आम्हाला भेटण्याचं कारण कळू शकेल का?"

देवदत्त - "उगीच आढेवेढे न घेता मी सरळ मुद्द्यालाच हात घालतो, मी तुम्हा सगळ्यांना विचारतो आहे मला तुमचं रेडिओ चॅनल विकत घ्यायचं आहे!"

आगाशे - (आश्चर्याने) काय?"

देवदत्त -"हो मला तुमचं रेडिओ चॅनल विकत घ्यायचं आहे."

सबनीस -"देवदत्त मला तुम्हाला एक सांगायचं आहे की, आमच्या रेडिओ चैनलला 30 टक्के आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून केली जाते. त्यामुळे, वी आर सॉरी

देवदत्त -" हे बघा,सबमिस तुम्ही ती 30 टक्के मदत घेणं बंद करा! मी तुमच्या चॅनलला शंभर टक्के मदत करायला तयार आहे."

आगाशे-"पण आम्ही शासनासोबत तसा करार केलेला आहे, आणि जर तो करार मोडायचा असेल तर आम्हाला आत्ता या क्षणी शासनाला दहा कोटी रुपये द्यावे लागतील."

देवदत्त -"आणि तेवढे पैसे तुमच्याकडे सध्या नाही आहेत."

सबनीस - (चाचरत) म्हणजे ह ह हो."

देवदत्त -"ओके, हे घ्या 15 कोटी. दहा कोटी शासनाला द्या आणि उरलेले पाच कोटी चॅनल साठी ठेवा. फक्त आता कायदेशीर बाबी लवकर पूर्ण करा. मला लवकरात लवकर कागदपत्र हवी आहेत, आणि हो तुम्ही तिघेही या चॅनलचे डायरेक्टर याच पदावर राहणार पण मालकी मात्र माझी असेल. यानंतर हे रेडिओ चॅनल माझ्या म्हणण्यानुसार आणि निर्णयानुसारच चालेल. निनाद तू हवे ते कार्यक्रमांमध्ये बदल करू शकतोस पण अंतिम निर्णय मात्र माझाच असेल."

एवढ बोलून देवदत्त वाऱ्याच्या वेगाने नाहीसा झाला. मिस्टर सबनीस आणि आगाशे मात्र हतबुद्ध होऊन एकमेकांकडे बघत राहिले.

निनाद -" सबनीस आपणही ऑफर नाकारू या!"

आगाशे -"का काय प्रॉब्लेम आहे?"

सबनीस -"हो ना! नाही तरी शासनाचे हे करू नका, ते गाणं लावा, जाहिराती मिळवा,श्रोते वाढवा या कटकटी पासून सुटका तरी मिळेल."


आगाशे -"शिवाय आपण डायरेक्टर या पदावर कायम असू."

सबमिस आणि आगाशे यांचे हे बदललेले स्वभाव बघून निनादला फारच आश्चर्य वाटलं. पण त्याच्या एकट्याच्या मताला आता फारसं काही महत्त्व नसल्याने तो शांत राहिला.


इकडे स्वराली सकाळी लवकर उठून रियाज करत होती पण का कोण जाणे त्या पहाटेला तिचा आवाज आणि गळा तिला काही केल्या साथ देईनात. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या पहाटे पाच साडेपाचच्या सुमारास स्वराली अंगावर एक शाल लपेटून त्या रो हाऊसेसच्या रस्त्यावर सहजच चालू लागली होती.

पहाटेच्या ललनेने धुक्याची चंदेरी तलम झिरझिरीत ओढणी अंगभर लपेटली होती. घरांच्या कुंपणांच्या आत बाहेर लावलेली चाफा, तगर,चमेली, जाई-जुई, रातराणी आणि प्राजक्ताची झाड आणि फुलं किलकिल्या नजरेने आपल्याकडे पाहत आहेत असा एक क्षण स्वरालीला भास झाला.

स्वराली मनाशीच विचार करत होती- पारिजात………. \"केवढं नाजूक फुल आणि सुगंधाचा दरवळ मात्र अंगणभर.

कुणीतरी अगदी फाटकाजवळ पारिजात लावला होता.आत बाहेर येण्या-जाण्याच्या रस्त्यात सगळीकडे या फुलांचा सडा पडलेला होता. स्वरालीला हा सडा फार आवडायचा. या झाडाला फुलही भरपूर येतात बागेतली फुल वेचून इतरांना देऊन ही भरपूर फुल असतात.मग कोणीतरी लाखोळी वाहण्यासाठी सगळी फुल नेतात त्या वेळी मनाला आनंद तर होतो पण, ते उघडं-बोडक रिकामं झालेलं अंगण बघवत नाही.\" स्वराली मनातच हा विचार करत होती.

सूर्य थोडा जरी वर आला ना तरीही फुलं लगेच झाडावरून खाली उड्या मारतात. आपला सुगंध अंगणभर पसरवतात. झाड थोडं जरी हलवलं ना तरी टपटप पडणारी फुलं आनंद उधळतात.लहानपणी आपल्याही अंगणात एक प्राजक्त होता. बाबांना प्राजक्त किती आवडायचा! कदाचित म्हणूनच आपल्याला ही तो आवडत असेल! पहाटेला प्राजक्तांचा सडा त्या झाडाभोवती पडलेला बघून असं वाटायचं जणू कोणी मोत्या-पोवळ्यांचा गालिचाच अंथरलेला आहे झाडाभोवती…. स्वरालीला तिचं बालपण आठवलं…………. कॉलनीच्या मध्यभागी असणाऱ्या बगीच्यात एक भलं मोठं प्राजक्ताचे झाड होतं. ती आणि तिच्या इतर बालमित्रिणी हातात हात घालून त्या प्राजक्ता भोवती फेर धरून नाचत आणि तिसरीच्या पुस्तकातली कविता म्हणत…

टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

भिरभिरभिरत्या तालावर गाणे आमचे जुळे

किती सुंदर, मोरपंखी दिवस होते ते बालपणीचे! अगदी फुलपाखराप्रमाणे उडायचे, हसण्याचे, बागडण्याचे, खेळण्याचे, हट्टाचे, लाडाचे आवडीच्या खाऊचे, आईच्या मायेचे, बाबांच्या शिस्तीचे! कुठे हरवले कळलच नाही!! का कोणी चोरून नेले? कधी कधी वाटतं मोठ व्हायच्या नादात, कुठेतरी पुढे जायच्या नादात ते सुंदर दिवस मागेच विसरून आलो की काय? तेवढ्यात एक मंद झुळूक स्वरालीला स्पर्शून गेली. बस स्टॉपवर शाळेच्या बसची वाट पाहणारी मायलेक बघून स्वरालीच्या डोळ्यात चटकन दोन थेंब पाणी आलं. अंगावरची शाल,अंगावर अधिकच जास्त घट्ट गुंडाळत तिने परतीची वाट धरली…..

घरी परतल्यावर गुरुजी इतर मैत्रिणींना रियाजाचं महत्त्व सांगत होते. स्वराली पण तिथे गुरुजीं जवळ जाऊन बसली.

गुरुजी - "स्वराली कुठे गेली होतीस? दार उघडच ठेवले निघताना?"

स्वराली -"गुरुजी सकाळी गळा साथ देईना! का कोण जाणे आज स्वरही रुसले होते म्हणून, जरा फेरफटका मारायला गेले होते."

निमा - "ताई कुणी तरी देवदत्त देशमुख आले होते तुला भेटायला."( स्वरालीचे वाक्य संपायच्या आधीच निमा बोलली).

देवदत्त देशमुख हे नाव ऐकून एक क्षण स्वराली दचकली, मग एक तीव्र वेदना तिच्या चेहऱ्यावर उमटली आणि शेवटी डोळ्यात राग मावेनासा झाला.

स्वराली -"मग?"

मेधा - "मग काय गुरुजींनी सांगितले तू घरी नाही म्हणून."

स्वराली - " बर मग?"

ऋता -" निघून गेले. पण त्यांना तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं,तसं ते म्हणाले सुद्धा!"

पूजा -"फार चौकश्या करत होते. तू केव्हा येणार? रेडिओ स्टेशनला केव्हा जाणार? संध्याकाळी तुझा काय नित्यक्रम असतो?"


स्वराली (गहन विचारात पडल्याप्रमाणे) -"अच्छा!"

स्वरालीला आता हे कळून चुकलं होतं की, तिने तिची ओळख लपवण्याचा कितीही प्रयत्न केला, स्व:ताच्या भूतकाळापासून दुर पळण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही, तिचा भूतकाळ तिची पाठ सोडणार नाही आणि ती जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी देवदत्त तीला तिथूनही हुडकून काढेल.


गुरुजी -"अगं पोरींनो आता करायचा का आपण रियाज सुरू?"

जवळपास एक दीड तास रियाज झाल्यावर, स्वरालीने थोडासा नाश्ता केला आणि ती रेडिओ स्टेशन कडे निघाली.

खरं सांगायचं तर स्वरालीचे गुरुजी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक. त्यांनी अनेकांना आपल्या तालमीत तयार केले होते. अनेक शिष्य, चाहते आणि खूप मोठा रसिक परिवार गुरुजींचा होता. शास्त्रीय संगीतातील पद्मश्रीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. स्वराली त्यांची पट्ट शिष्या होती पण, गुरुजींकडे संगीत शिकण्याकरिता येण्यापूर्वी स्वरालीचा इतिहास तिची वैयक्तिक माहिती गुरुजी आणि निनाद शिवाय कुणालाच माहिती नव्हती.

*********************************************


सदर कथानक हे साल 2002 च्या दशकातले असून वाचकांनी वाचताना त्या अनुषंगाने विचार करावा ही विनंती.


फोटो  - साभार गुगल.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//