आधुनिक सावित्री भाग एक

A Tell Of A Wife Who Save Her Husband's Life








जलद कथा मालिका लेखन



आधुनिक सावित्री







ही कथा आहे एका प्रेयसीची, पत्नीची, सूक्ष्म जीवशास्त्र विज्ञानाचा अभ्यास करून स्वतःच्या पतीचे प्राण वाचवणाऱ्या आधुनिक सावित्रीची...



...

 







रमा-"प्रिय समर तुझीही काय अवस्था झाली आहे? मी तुला या अवस्थेत पाहू शकत नाही. तुझ्याशिवाय मी कशी जगू शकेन? पण तू तर असा वागतोयस जणू काही तुझ्यात जगण्याची इच्छाच राहिलेली नाही. तू तर कशालाच प्रतिसादही देत नाहीयेस. जणू काही तू आत्ताच सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेला आहेस. मी तुझ्याशी काय बोलते आहे ते तुला आत्ता ऐकू येते की नाही, तुला कळतंय की नाही, हे मला माहित नाही. पण एक गोष्ट फक्त कर, तुला जर खरोखरच जगायची इच्छा असेल तर माझा हात जोरात दाब." असं म्हणून नवऱ्याचा हात हातात घेऊन बराच वेळ रमा बसली होती. तिचा नवरा दवाखान्यात होता. एका असह्य आजारांना तो त्रस्त होता. त्याच्या सगळ्या संवेदना गेल्या होत्या. तो जगेल याची कोणालाच, अगदी जगातल्या निष्णात डॉक्टरांनाही खात्री नव्हती. किंबहुना तो जगणार नाहीच याची शाश्वती तिला सगळ्यांनी दिली होती. पण तिने हिम्मत हरली नव्हती. आत्ताही ती गलितगात्र आणि मरणाच्या दारात असलेल्या आपल्या नवऱ्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती. तेवढ्यात तिला जाणवलं तिच्या नवऱ्याने तिच्या हात दाबला आहे तिला फारच आनंद झाला. तिच्या मनाला मोठी उभारी मिळाली.



ही कथा आहे समर आणि रमाची. समर एक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ. तर रमा रोगपरिस्थिती विज्ञान किंवा महामारी विज्ञानाची तज्ञ. दोघेही एम.बी.बी.एस. कॉलेजमध्ये सोबत होते. दोघांचेही विचार जुळले. घरच्यांची संमती मिळाली आणि मग दोघेही सात जन्माच्या, विवाहाच्या बंधनात आयुष्यभरासाठी एकत्र आले.


समर एक सधन कुटुंबातला थोरला. तर रमा एका मध्यमवर्गीय कुटुंबातली धाकटी. एखादी गोष्ट जर मनात ठरवली तर, ती जिद्दीने आणि चिकाटीने पूर्ण करणारी रमा नेहमीच अभ्यासात पुढे होती. खूप शिकून एक मोठं डॉक्टर व्हायचं आणि गरीब रुग्णांची सेवा करायची अस तिने शालेय जीवनातच ठरवलेलं होतं.


एम.डी.गायनॅकला ऍडमिशन मिळाल्यानंतर समर, रमाला नेहमीच चिडवायचा की, मी एक पुरुष असून स्त्रीरोग तज्ञ होतो आहे आणि तू एक स्त्री असून महामारी विज्ञानात मास्टर्स करते आहे.




समर -" रमा मला न्यूरोलॉजिस्ट व्हायचं होतं, पण मी आता तुम्हा बायकांचे रोग ठीक करणार आहे आणि सगळी गर्हाणी ऐकणार आहे."


रमा -" अरे मग चांगलंच आहे की! एरवी तुम्ही पुरुष आम्हा स्त्रियांचं काही ऐकून घेत नाही. निदान यानिमित्ताने तरी मी तुझ्याकडे तपासणी करिता आली म्हणजे माझं म्हणणं तुला सांगू शकेल."


एवढ बोलून दोघेही हसायला लागले.



खरंतर समरला न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदू विकार तज्ञ व्हायचं होतं, पण एम.डी. करता थोडे गुण कमी पडल्याने त्याला स्त्रीरोग तज्ञ व्हावं लागलं. पण रमाचं आधीच ठरलेलं होतं- इपिडेमिओलॉजिस्ट व्हायचं. भारतात अनेक शतकांपासून येणाऱ्या महामार्या आणि त्यामुळे जाणाऱ्या हजारो लोकांचा बळी यामुळे रमा नेहमीच व्यथीत व्हायची. म्हणूनच तिने एम.बी.बी.एस. करतानाच ठरवलं होतं की, ती एपीडेमायोलॉजिस्ट म्हणजेच "रोगपरिस्थिती विज्ञान" किंवा "महामारीविज्ञानाची" तज्ञ होईल.



पुढच्या भागात बघूया की समरला असा कुठला आजार झाला आहे? ज्यामुळे समर अगदी गतप्राण झालेला आहे आणि रमा त्याला वाचवण्यासाठी अगदी जीवाचा आटोकाट प्रयत्न करते आहे.







©® राखी भावसार भांडेकर.

 











🎭 Series Post

View all