Feb 28, 2024
रहस्य

दि लूप होल पर्व २(भाग ५)

Read Later
दि लूप होल पर्व २(भाग ५)

    अगम्य संध्याकाळी घरी आला. अभीज्ञाने आज त्याच्या आवडीचा स्वयंपाकाचा बेत ठरवला होता. तसा तिने सखू बाईंच्या मदतीने करून घेतला कारण अहिल्याबाईनी तिला स्वयंपाक करायचा नाही  आजच प्लास्टर काढले आहे म्हणून लगेच हाताची हालचाल करायची नाही अशी सक्त दम आणि सखू बाईंना ताकीद की तिला काहीच करू द्यायचे नाही. मग काय अभीज्ञाने सखुला फक्त इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या आणि त्या प्रमाणे सखू बाई कडून सगळं तयार करून घेतले होते.अगम्यच्या आवडीचे पदार्थ पनीर चिंगारी, दाल तडका, जीरा राईस,परोठे आणि त्याच्या आवडीचे स्वीट रसगुल्ले!

                  आणि ती छान साडी नेसून तयार झाली आणि अगम्यची वाट पाहू लागली.अगम्य आज काल जरा उशिराच ऑफिस मधून येत होता.कारण  अभीज्ञा ऑफिसमध्ये जात नसल्याने त्याला फॅक्टरी आणि ऑफिस या दोन्ही मध्ये कसरत करावी लागत होती. तरी बरं आज्ञांकला ड्रायव्हर शाळेतून घेऊन येत होता. अगम्य सात वाजता घरी आला. तर अज्ञांक पळत जाऊन त्याला बिलगला. 

 

अज्ञांक,“ बाबा तुला माहीत आहे आज स्कुलमध्ये खूप मजा आली आज ना पि.टी क्लास  होता आणि पी.टी  करताना तो मयूर आहे ना तो पडला. आम्ही खूप हसलो!” तो उत्साहाने त्याला सांगत होता आणि अगम्य त्याला कडेवर घेऊन  बॅग टी पॉयवर ठेवत ऐकत होता.

 

अगम्य,“ अदू असं कोणी पडल्यावर हसायचं नाही बच्चा it's a  bad thing! तू good boy आहेस ना! मग कोणी पडलं तर त्याला हेल्प करायची!” तो  अज्ञांकला मांडीवर घेऊन सोफ्यावर बसून त्याला समजावत होता.

 

     तो पर्यंत तिथे पाणी घेऊन अभीज्ञा आली आणि अगम्यकडे पाहत म्हणाली 

 

अभीज्ञा,“ झालं का तुमच्या बाप-लोकाच गुलपीठ सुरू! अदु बाबा आत्ताच आला आहे ना मग त्याला पाणी तरी पिऊ दे राजा!” ती म्हणाली.

 

अहिल्याबाई,“ अग अभी बोलू दे की अदुला! त्याच्या बाबाला! बरं अदु  राहिलेलं रात्री सांग हो तुझ्या बाबाला आता जा तू खेळ बाहेर!” त्या तिथे येत म्हणाल्या.

 

    हे ऐकून अज्ञांक खेळायला निघून घेला. आता अहिल्याबाई खुर्चीवर बसत अगम्यशी बोलू लागल्या.

 

अहिल्याबाई,“अमू जा फ्रेश होऊन ये!  मग निवांत चहा घेत बोलू!” त्या म्हणाल्या.

 

अगम्य,“ बरं मी आलोच” असं म्हणून तो गेला.

 

अभीज्ञा,“ आऊ अमू आज काल खूप थकल्या सारखा वाटतो! माझ्या अपघातामुळे त्याच्यावर खूप जास्त वर्क लोड पडत आहे. मी विचार करत होते की मी उद्या पासून ऑफिसला जावे!” ती काळजीने बोलत होती.

 

अहिल्याबाई,“हो त्याच्यावर वर्क लोड खूप पडत आहे म्हणूनच मी त्याला मदत करणार आहे थोडे दिवस तेच बोलणार होते मी आज! पण तू महिना भर तरी काही काम करणार नाहीस समजलं का?”त्या तिला ताकीद देत म्हणाल्या.

 

अभीज्ञा,“ अहो पण आऊ!”ती पुढे बोलणार तर अभीज्ञाचे आई वडील आणि वरून अगम्य बरोबरच चहासाठी आले.

 

अहिल्याबाई,“ पण नाही आणि बिन नाही अभी!” त्या पुन्हा जरा जरबेने म्हणाल्या.

 

अगम्य,“ काय झालंय आऊ?”त्याने विचारले.

 

अहिल्याबाई,“ हिला म्हणे उद्या पासून ऑफिसला यायचे आहे!” त्या म्हणाल्या.

 

आई,“ काय?”आश्चर्याने म्हणाल्या.

 

अगम्य,“वेड लागले आहे का अभी तुला? आजच प्लास्टर काढले आहे  तुझ्या हाताचे आणि अजून पाठीचा दुखणं आहेच! आणि तुला ऑफिसला जायचे आहे! गप्प घरात बस अजून थोडे दिवस काही गरज नाही!” तो जरा चिडून म्हणाला.

 

अभीज्ञा,“ तुम्ही समजता तसे मला इतके की काही झालेले नाही I am fine now!” ती समजावत म्हणाली.

 

अगम्य,“ ते तू नाही डॉक्टर ठरवतील आणि हो इथून पुढे तू कार ड्राइव्ह करणार नाहीस!झाला तेव्हढा पराक्रम बास झाला इथून पुढे तुझ्या कारला ड्रायव्हर असेल तो कुठं जायचं तिथे घेऊन जाईल तुला!” तो म्हणाला.

 

बाबा,“ हे मात्र बरोबर बोललास अगम्य तू! ही ड्रायव्हिंग खूप हार्षं करते!” त्यांनी दुजोरा दिला.

 

अभीज्ञा,“ झालात तुम्ही सगळे एक ठीक आहे! मी ऑफिसला ही जात नाही आणि काहीच करत नाही!” ती चिडून म्हणाली आणि  वर निघून गेली.

 

     अहिल्याबाईंनी अगम्यला खुणावले आणि अगम्य वर अभीज्ञाला मनवायला गेला. तो रुम मध्ये गेला तर अभीज्ञा त्याला गॅलरीत तोंड फुगवून उभी असलेली दिसली. तो तिच्या जवळ गेला व तिला म्हणाला.

 

अगम्य,“ इतकं चिडायला काय झालं अभी! अग तुझ्या काळजी पोटीच बोलत आहेत सगळे! ऐकत जा ना जरा!” तो समजावत म्हणाला. 

 

          त्याच्या बोलण्याने अभीज्ञा थोडी वरमली आणि म्हणाली.

 

अभीज्ञा,“ ठीक आहे! मी नाही चिडत!” 

 

अगम्य,“ हुंम पण आज काही विशेष आहे का? साडी वगैरे किती दिवसांनी! By the way you are looking gorgeous!” तो तिला निरखुन पाहत म्हणाला.

 

अभीज्ञा,“ असंच आज मी खुश आहे माझ्या हातच प्लास्टर काढलं ना म्हणून!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ म्हणजे माझी ड्युटी संपली तर!”तो नाराज होऊन तिच्या जवळ जात म्हणाला.

 

अभीज्ञा,“ तुला तर आनंद व्हायला हवा ना!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ अरे असली गोड  ड्युटी संपल्यावर दुःखच होणार ना!” तो तिला जवळ ओढत म्हणाला.

 

अभीज्ञा, how cheap you are! म्हणजे इतके दिवस चान्स मारत होतास काय माझ्यावर?” ती थोडी लाजून म्हणाली.

 

अगम्य,“ अगदी तसच काही नाही!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

 

       तो पर्यंत खालून अभीज्ञाच्या आईने हाक मारली आणि दोघे ही भानावर आले. अभीज्ञाने अगम्य ढकलले आणि ती दार उघडून खाली निघून गेली. अगम्य मात्र तिच्याकडे हसत पाहत राहिला आणि तो ही थोड्यावेळाने खाली गेला. सगळ्यांचा चहा नाष्टा हसत-खेळत गप्पा मारत झाला. अगम्य अज्ञांकशी खेळत बसला. अभीज्ञा राहिलेला स्वयंपाकाच पाहत होती. अहिल्याबाई आणि अभीज्ञाचे आई-वडील देवळात गेले. जेवायच्या वेळी सगळे जमले. अगम्य त्याच्या आवडीचा मेन्यू पाहून खुश झाला. सगळे जेवले.अगम्य काम करण्यासाठी म्हणून रूममध्ये निघून गेला.अभीज्ञा अहिल्याबाईंच्या रूममध्ये अज्ञांकला झोपवून रूममध्ये गेली तर अगम्य अजून ही लॅपटॉपवर काही तरी काम करत बसला होता. हे पाहून अभीज्ञा त्याला म्हणाली.

 

अभीज्ञा,“ अगम्य किती वाजले बघ जरा किती काम करशील बास कर की आज काल किती थकल्या सारखा दिसतोस! तुझ्यावर खूपच वर्क  लोड होत आहे म्हणून मी म्हणत होते की मी ऑफिस जॉईन करते. पण तुम्ही सगळे मिळून मला गप्प बसवले. आऊ म्हणत होत्या की त्या काही दिवस ऑफिस जॉईन करतील!” ती सांगत होती.

 

अगम्य,“ काही गरज नाही ना आऊने ऑफिस जॉईन करायची ना तू! मी एकटा सांभाळू शकतो आणि हो गोखले वकील आहेच की  मदतीला! तू महिन्या भराने कर जॉईन ऑफिस!” तो लॅपटॉप ठेवत म्हणाला.

 

अभीज्ञा,“ ठीक आहे काय करायचं ते कर बाबा तुला!” ती मोबाईल घेऊन बेडवर बसत म्हणाली.

 

अगम्य,“ पण आज काय विशेष होत सगळा मेन्यू माझ्या आवडीचा! तूच केलास ना? कोणी सांगितलं होतं तुला! हात आजच प्लास्टर मधून निघाला आहे ना!”तो काळजीने म्हणाला.

 

अभीज्ञा,“ झालं का तुझं सुरू परत? अरे मी नाही बनवले काही तर सखुबाई कडून करवून घेतले आहे सगळे आणि तुला थँक्स म्हणायला बनवलं  होतं आज तुझ्या आवडीचा जेवण! Thank you so much!” ती त्याचा हात धरून म्हणाली.

 

अगम्य,“ thanks for what?” त्याने विचारले.

 

अभीज्ञा,“ thanks for everything! माझी काळजी घेतल्या बद्दल!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ अजून काय? नाही म्हणजे आपण आभार प्रदर्शनाचा समारंभ ठेऊ या का? मी  जी काही तुझी काळजी घेतली ना ती तू माझ्या मुलाची आई आहेस आणि माझ्या आऊची लाडकी सून आहेस म्हणून घेतली!” तो स्वतःचा हात तिच्या हातातून सोडवून घेत नाराजीने म्हणाला.

 

अभीज्ञा,“ अच्छा बच्चू!मीच काही वर्षां पूर्वी तुला बोललेले शब्द मला बोलतोस काय? खूप हुशार रे तू!” असं म्हणून ती हसली.

 

अगम्य,“मग आहेच मी हुशार!” असं म्हणून त्याने तिला जवळ ओढले. अभीज्ञा ही त्याच्या मिठीत अलगद शिरली.बराच वेळ अगम्य आणि ती एकमेकांना तृप्त करत राहिले.

                   तब्बल दोन वर्षांच्या दुराव्या नंतर अगम्य आणि ती असे एकत्र आले होते.खरं तर अभीज्ञाला त्याच्याशी त्याला पडणारे स्वप्न आणि त्या दिवशी अगम्य जे काही कसल्या तरी सावटा आणि संकटा बद्दल बोलला होता त्याबद्दल बोलायचे होते  पण अगम्यचा मूड खूप चांगला होता बऱ्याच दिवसांनी तो तिच्या जवळ आला होता म्हणून तिने त्याच्याशी आत्ता तरी हे बोलणे टाळायचे ठरवले होते. अभीज्ञाला विचारात पाहून अगम्यने तिला विचारले.

 

अगम्य,“ कसल्या विचारात पडलीस अभी?” तो तिचे चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत म्हणाला.

 

अभीज्ञा,“ काही नाही रे!” असं म्हणून ती पुन्हा अगम्यच्या मिठीत शिरली.

 

              अभीज्ञा सकाळी जागी झाली तेंव्हा ती अगम्यच्या मिठीत होती.आज बऱ्याच दिवसांनी तिला अशी त्याच्या मिठीत जाग आली होती.गेल्या दोन वर्षात ती पुण्यात आणि अगम्य इथे राहत होते. तिला वाटत होते की अगम्यने तिला माफ केले नाही म्हणून तिने ही घरी परत येण्यासाठी पुढाकार घेतला नव्हता पण हा तिचा गैर समज होता कारण अगम्यने तर वेगळ्याच कारणासाठी तिला दूर केले होते. अभीज्ञा झोपलेल्या त्याला पाहत होती आणि अचानक अगम्यने डोळे उघडले. अभीज्ञाने मात्र लाजून तिची नजर खाली केली. अगम्य मात्र तिला एकटक पाहत होता. अभीज्ञा मात्र तिला असं पाहता ना पाहून उठून जाऊ लागली तर अगम्यने तिला पुन्हा जवळ ओढले हे पाहून अभीज्ञा म्हणाली.

 

अभीज्ञा,“ सोड बरं अमू मला! सात वाजून गेले आहेत! खूप झालं आता!” ती लटक्या रागाने म्हणाली.

 

अगम्य,“हो का? पण मला तर खूप झालं असं वाटत नाही!” असं  म्हणून त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले. बराच वेळाने त्याने अभीज्ञा सोडले अभीज्ञा उठत त्याला म्हणाली.

 

अभीज्ञा,“ नालायक आहेस तू!”

 

अगम्य,“ अच्छा! विसरलीस का लग्नानंतर आपल्यात काय ठरलं होतं की रोज माझी मॉर्निंग गोड करणार तू! आता झाली ना माझी मॉर्निंग गोड!” तो तिला पुन्हा जवळ ओढून डोळे मिचकावत म्हणाला.

 

अभीज्ञा,“ झाली ना आता मग गोड मॉर्निंग मग उठ आता!” असं म्हणून तिने स्वतःला त्याच्या मिठीतुन सोडवून घेत म्हणाली आणि बाथरूममध्ये निघून गेली.

 

       अभीज्ञा तीच आवरून खाली जाताना अगम्यला म्हणाली.

 

अभीज्ञा,“ उठा देशमुख साहेब ऑफिस आहे आज! तुमचा बेड टी पाठवून देते!” असं हसत म्हणाली.

 

अगम्य,“ हो मॅडम उठतो आणि आवरतो आता!” तो हसून म्हणाला.

 

      अभीज्ञा  खाली जाऊन किचनमध्ये  गेली व सखूबाई कडून नाष्टा आणि चहा करवून घेतले.अगम्यसाठी चहा रामू करवी पाठवून दिला.   अहिल्याबाई आधीच उठून देव पूजा करत होत्या.तर अभीज्ञाची आई आणि बाबा प्राणायाम आणि योगा! अज्ञांक अजून उठला नव्हता.अभीज्ञाने सखुबाईला अगम्य आणि अज्ञांकच्या टिफीनला काय करायचे त्याच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या.ती अज्ञांकला उठवून तयार करायला निघून गेली. तिने अज्ञांकला उठवले अभीज्ञा त्याला तयार करणार म्हणल्यावर तो ही भलताच खुश झाला.अगम्य आणि बाकी सगळे तयार होऊन आले.अभीज्ञा ही अज्ञांकला तयार करून घेऊन आली. 

 

         अभीज्ञा आणि अगम्यच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तेज अहिल्याबाई आणि अभीज्ञाच्या आई-वडिलांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी तिघांनी ही मनोमन देवाचे आभार मानले आणि हे सुख असेच राहू दे म्हणून प्रार्थना केली.

★★★

 

           असेच दोन तीन दिवस गेले. अधून मधून अगम्य मात्र रात्रीचे घाबरून उठणे सुरूच होते.अभीज्ञाची मात्र अगम्यशी त्याला पडणारी स्वप्न आणि त्या दिवशीच्या त्याच्या बोलण्या विषयी त्याला बोलण्यासाठी संधी शोधत होती आणि ती संधी तिला अपचुकच मिळाली होती. अहिल्याबाई, अभीज्ञाचे आई-बाबा अज्ञांकला घेऊन आज सकाळीच कोणा नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते.ते रात्री उशिरा घरी येणार होते. तीच संधी अभीज्ञाला योग्य वाटली आणि तिने  अगम्यशी आजच बोलूयात अस मनोमन ठरवले. अगम्य ऑफिस मधून आला. अभीज्ञाने वरतीच चहा आणि नाष्टा मागवून घेतले. ते तिने गॅलरीत ठेवून घेतले.अगम्य फ्रेश  होऊन आला आणि तिला गॅलरीच्या दारात उभी बघून हसून म्हणाला.

 

अगम्य,“ आज मॅडमचा मूड भलताच रोमँटिक दिसतोय!” तो म्हणाला.

 

अभीज्ञा,“ असच काही नाही पण बरेच दिवस झालं आपण दोघांनीच चहा घेतला नाही म्हणून म्हणले की आज घरात कोणी नाही तर….” ती पुढे बोलणार तर अगम्य तिच्या जवळ जाऊन तिला जवळ ओढत म्हणाला.

 

अगम्य,“ चान्स मारून घ्यावा!” 

 

अभीज्ञा,“ तुला दुसरं काही सुचत नाही का रे?” ती स्वतःला सोडवून घेत लटक्या रागाने म्हणाली.

 

अगम्य,“ तू अशी समोर असल्यावर दुसरं काय सुचनार ना?” तो तिला डोळे मिचकावत म्हणाला.

 

अभीज्ञा,“  तुझा फाजीलपणा झाला असेल तर चहा घेतोस? मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे!” ती त्याला डोळे वटारून पाहत म्हणाली.

 

अगम्य,“ बोला घेतो चहा! काय करणार आता माझ्या रोमान्सचे तुम्ही चहापाणी केलात की!” असं हसून म्हणत तो खुर्चीवर बसला.

 

       अभीज्ञाने त्याला चहा दिला आणि स्वतः ही घेतला. ती अगम्यशी बोलण्यासाठी मनातल्या मनात शब्दाची जुळवाजुळव करत होती. दुसरी गोष्ट ती मनातून घाबरली ही होती की अगम्य हा विषय काढल्यावर कसा रियाक्ट होईल कारण अगम्य  स्वभावाने शांत असला तरी तो चिडला की जमदग्नीचा अवतार धारण करत असे आणि मग त्याला शांत करणे खूप अवघड होते.या सगळ्या विचारात अभीज्ञा होती. अगम्यने मात्र तिला अशी शांत पाहून तिच्या हाताला धरून हलवले आणि तो म्हणाला.

 

अगम्य,“ मॅडम मला इथे बसवून कुठे गेलात फिरायला!” तो म्हणाला आणि अभीज्ञा भानावर आली.

 

अभीज्ञा,“ इथेच आहे की!” ती उसने हसू आणत म्हणाली.

 

अगम्य,“ अग काय बोलायचे आहे तुला?” त्याने विचारले.

 

अभीज्ञा,“ माला काही प्रश्न विचारायचे आहेत तुला आणि त्याची मला खरी खरी उत्तर हवीत!” ती त्याला पाहत म्हणाली.

 

अगम्य,“ हा विचार ना!” तो सावरून बसत म्हणाला कारण अभीज्ञा त्याला स्वप्ना बद्दल विचारेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याने तिला पटतील अशी उत्तरे तयार ठेवली होती कारण अभीज्ञा त्या दिवशी जागी होती हे त्याच्या खिजगणतीतही नव्हते.

 

अभीज्ञा,“ तुला  इतक्या वर्षांनी ही त्या घटणेचा अजून ही त्रास होतो अमू! कदाचित पहिल्या पेक्षा जास्त मी महिना भरा पासून पाहते आहे. तू ही गोष्ट आमच्या सगळ्या पासून लपवली आहे.काय स्वप्न पडत तुला अमू खरं खरं सांग मला?” ती गंभीर होत बोलत होती.

 

अगम्य,“ अग तुला सांगितलं ना त्या पेंटिंग मधून बाहेर आल्या पासून मला रात्री कधी कधी स्वप्न पडतात आणि मी घाबरतो त्यात आता लापावण्या सारख काय ग!” तो शक्य तितके सहज बोलत म्हणाला.

 

अभीज्ञा,“ अच्छा! आणि दोन वर्षां पूर्वी मी चूक केली त्यासाठी मला माफ करायला तुला दोन वर्षे काय तर माझा एक्सिडंट व्हावा लागला खरंच मला स्वतः पासून दूर लोटण्याचे कारण माझ्या वरचा राग होता की अजून काही?” तिने त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत विचारले.

 

      अगम्यला मात्र अभीज्ञाचा हा प्रश्न अनपेक्षित होता तो जरा गोंधळणा आणि थोडा वेळ शांत बसून बोलू लागला.

 

अगम्य,“ हा काय प्रश्न आहे अभीज्ञा त्या वेळी मला तुझा खूप राग आला होता. पण तो हळूहळू निवळत गेला!दुसरे काय कारण  असणार ग आपल्यातल्या दुराव्याचे ” तो नजर चोरून बोलत होता.अभीज्ञा उठली आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसत त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाली.

 

अभीज्ञा,“ हे तू खरं बोलत आहेस? माझ्या वर इतकं प्रेम करणारा माणूस! जो मला अपघात झाला हे कळल्यावर सैरभैर झाला.गेल्या दोन वर्षां पासून जो माझ्या पासून लांब राहून ही माझ्या बारीक सारीक गरजा पासून आता एक महिन्यापासून माझी सगळी सेवा करू करतो! मी दिवसातून एकदा दिसावी म्हणून रोज काही तरी काम काढून गरज नसताना पुण्याला येतो! तो माणूस मी खूप वेळा माफी मागून ही दोन वर्षे माझ्या विषयी मनात राग धरून ठेवू शकतो!हे मला पटत नाही! खरं सांग अगम्य काय कारण आहे तुझ्या अशा वागण्याचे? तू आमच्या सर्वां पासून  काय लपवत आहेस?” ती  त्याला बिलगत पण जाब विचारण्याच्या सुरात बोलत होती.

 

      अगम्य मात्र आता पूर्ण गांगरून गेला होता.जणू काही त्याची चोरी पकडली गेली आहे अशी त्याची अवस्था झाली. 

   जेव्हा माणसाची एखादी चोरी पडली गेली असेल आणि विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक खोटी  उत्तरे त्याच्या जवळ नसतात आणि सत्य समोर येईल अशी त्याला भीती वाटते तेंव्हा तो रागाचा मुखवट्या आड ते सत्य लपवू पाहतो. अगम्यने ही आता तेच हत्यार उपसले होते. तो चिडला आणि अभीज्ञाला स्वतःच्या मांडीवरून अलगद उठवत उभा राहत म्हणाला.

 

अगम्य,“ अजून काय कारण असणार ग अभी? आणि मी तुला दूर लोटले नाही तर तू स्वतः माझ्या पासून दूर गेलीस. मी तुला कधी तरी घरातून जा असं म्हणालो का ग? तूच निघून गेलीस मग मी काय करणार होतो सांग ना?” तो चुडून बोलत होता.

 

अभीज्ञा,“ अच्छा! तू मला दूर लोटले नाहीस तर! अरे तू काय म्हणालास आठव जरा तुला माझ्या बरोबर एका रूममध्ये राहायचं नव्हतं. ही रूम सोडून तू दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होत होतास! मग एकाच छता खाली विभक्त राहण्या पेक्षा मी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. मला वाटले होते की तू एकदा तरी मला थांबवशील पण तू तसे काहीच केले नाहीस आणि गेले दोन वर्षे झाली मी वाट पाहतेय अगम्य तू मला घरी बोलवण्याची! पण तू एकदा ही मला बोलावलं नाहीस घरी!

 

      मी तुला चांगलं ओळखते अगम्य तू स्वतःचा इगो कुरवाळत बसणाऱ्यातला नक्कीच नाहीस! वेळ आली तर नात्यात थोडं पडत नमत घेतोस तू! म्हणजेच काही तरी आहे जे तू लपवतो आहेस! बघ ना आता ही तू रागाच्या मुखवट्या खाली सत्य लपवण्याचा  केविलवाना प्रयत्न करत आहेस! जर तुला खरच माझा  राग आला असता  ना तर तू मला तुझ्या मांडिवरून ढकलून दिलं असतस पण तू तसं न करता मला अलगद उठवलस! काय आहे सत्य अगम्य? कोणती अशी कोणती गोष्ट तुला माझ्या पासून आपल्या अदु पासून दूर राहायला मजबूर करत आहे? सांग ना आपण मिळुन त्यातून मार्ग काढू! काय त्रास देत आहे अगम्य तुला?” ती त्याला काळजीने विचारत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

 

अगम्य,“ हो माला तुझा राग आला होता अभी म्हणूनच मी असं वागलो आणि स्वतःच्याच घरी येण्यासाठी तुला मी बोलवायची काय गरज ग? जितका माझा अधिकार आहे या घरावर रादर माझ्या पेक्षा जास्त तुझा अधिकार आहे या घरावर!दूर मी नाही तू लोटल मला! आणि कसले सत्य ऐकायचे आहे तुला मला कसलीच गोष्ट सतावत नाही आणि त्रास ही देत नाही गैरसमज आहे तुझा तो! मी काही मजबूत वगैरे नाही आहे!” तो रेलिंगला धरून समोर पाहत बोलत होता जेणे करून अभीज्ञाशी त्याची नजरा नजर होणार नाही.

 

अभीज्ञा,“ ठीक आहे अगम्य तुला माझ्याच तोंडून ऐकायचे आहे ना तर ऐक त्या दिवशी मी हॉस्पिटलमधून आल्या नंतर ज्या दिवशी साखर कारखान्याच्या डायरेक्टर्स बरोबर मिटिंग होती. त्या दिवशी तू मी झोपली आहे असं समजून  काय-काय म्हणालास ना ते आठव जरा! तू म्हणालास की  तुला कसले तरी सावट माझ्यावर आणि अदुवर पडू द्यायचे नाही. जे व्हायचे ते तुझे होऊ दे! मला आणि अदुला दूर ठेवलेस स्वतः पासून याचे कारण हेच होते! सांग ना अगम्य कसले सावट आणि कसला धोका आहे जो फक्त तुला जाणवतो. म्हणजे नक्कीच त्या पेंटिंगचा काही तरी संबंध आहे या सगळ्यांशी आणि तुझ्या स्वप्नांशी ही सांग ना अगम्य प्लिज बोल ना! I can't lose you! even I can't live without you! सांग ना अगम्य कोणतं  आहे ते सावट आपण लढूया त्याच्या विरुद्ध आधी लढलो तसे!” ती आता रडत बोलत होती.

 

     हे सगळं ऐकून अगम्यच्या चेहऱ्याचा मात्र रंग उडाला होता.त्याने गेल्या दोन वर्षापासून अभीज्ञावरच्या रागाच्या  आड जी गोष्ट लपवली होती. ती एका भावनिक क्षणी अभीज्ञा झोपली आहे असे समजून तोच बोलून बसला होता.आता अभीज्ञा गप्प बसणार नाही हे त्याला माहित होते. त्याला अभीज्ञाला या सगळ्यात ओढायचे नव्हते म्हणून त्याने आता मनावर दगड ठेवून वेगळाच पवित्रा घेण्याचे ठरवले आणि तो बोलू लागला.

 

अगम्य,“ या सगळ्यांशी तुझे काहीच घेणे-देणे नाही. तुझा अपघात झाला म्हणून तू आली होतीस ना! आता तू ठीक आहेस तर उद्या सकाळीच पुण्यासाठी निघ!” तो कठोरपणे तिच्याकडे न पाहता म्हणाला.

      

      अगम्य असा काही पवित्रा घेईल आणि असं काही बोलेल असे अभीज्ञाला स्वप्नात ही वाटले नव्हते. ती अगम्यचे बोलणे ऐकून शॉक होती आणि तिला कळून चुकले होते की ज्या अर्थी अगम्य असा वागतोय त्या अर्थी नक्कीच काही तरी गंभीर आणि धोकादायक गोष्ट आहे ज्यामुळे अगम्य त्यांचे नाते ही पणाला लावतो आहे. अभीज्ञा काही क्षण स्तब्ध उभी होती.त्या नंतर तिने काही तरी निर्णय घेतला आणि तिने डोळे पुसत रूममध्ये आली.तिने हाताला लागतील ते तिचे कपडे जवळ-जवळ बॅगेत कोंबले आणि बॅग घेऊन निघाली. हे पाहून अगम्य तिला थांबवत म्हणाला.

 

अगम्य,“ अभी नऊ वाजून गेले आहेत आत्ता कुठे निघालीस? मी सकाळी सोडतो तुला!” तो तिचा हात धरून म्हणाला.

 

अभीज्ञा,“ एकदा जा म्हणून सांगितलंस ना मग माझी काळजी करण्याची तुला काहीच गरज नाही! मी माझं माझं पाहून घेईन! आज तुझी गाडी घेऊन जात आहे आणि हो माझ्या आई-बाबांना इथे आजची रात्र राहू दे! ते असते तर घेऊन गेले असते त्यांना पण ते कधी येणार आहेत ते माहीत नाही मला आणि अज्ञांक तुझा मुलगा आहे तुला वाटले तर तू त्याला ठेवून घेऊ शकतोस!” असं म्हणून तिने तिचा हात झटकला आणि ती तरातरा चालत बाहेर आली.अगम्य तिच्या मागे जात तिला थांबवण्याचा प्रयत्न करत बोलत होता.

 

अगम्य,“ हे काय बोलते आहेस तू अभी! तुझे आई-बाबा काय? माझा मुलगा काय? अग अज्ञांक वर माझ्या पेक्षा तुझा अधिकार जास्त आहे आणि आई-बाबांचा माझ्यावर या घरावर अधिकार आहे. हे बघ तुला जायचेच आहे ना तर तू जा पण सकाळी!” तो तिला गयावया करत बोलत होता.

 

अभीज्ञा,“ ज्या क्षणी तू मला जा असे सांगितले त्याच क्षणी माझे आणि माझ्या आई-बाबांचे सगळे अधिकार संपले आणि अज्ञांक वरचा ही मी माझा अधिकार सोडत आहे. आता मी इथे एक क्षण ही थांबणार नाही!” ती ठामपणे म्हणाली आणि  तिने बॅग गाडीत जवळ-जवळ फेकलीच!

         अगम्यला मात्र आता कळून चुकले की अभीज्ञा इथे थांबणार नाही. म्हणून तो गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसला. ते अभीज्ञाने पाहिले आणि तिने बॅग गाडीतून काढून घेतली आणि ती चालत गेटच्या बाहेर निघाली. हे पाहून अगम्य तिचा हात धरत तिला म्हणाला.

 

अगम्य,“जायचे आहे ना तुला पुण्याला मग बस मी सोडतो.तुला डॉक्टरने गाडी चालवू नकोस असं सांगितले आहे अभी! आणि ड्रायव्हर ही आऊ बरोबर गेला आहे! ” तो काळजीने बोलत होता.

 

अभीज्ञा,“तू जर मला सोडायला येणार असशील तर मी माझी माझी जाईन! तुझी गाडी तुला लखलाभ!” ती जणू आता हट्टालाच पेटली होती.

 

अगम्य,“ जरा घड्याळात पहा की  दहा वाजत आले आहेत इथून तुला वाहन मिळेल का? आणि हे दिवस नाहीत अभी बाईने एकट फिरण्याचे हे पुणे नाही श्रीरंगपूर आहे! इथे नऊ वाजताच सगळं सामसूम होत. हा कसला हट्ट आहे तुझा! ठीक आहे मी माझे शब्द माघारी घेतो! माफ कर मला! तुला जायचं तर सकाळी जा!” तो हात जोडून म्हणाला.

 

अभीज्ञा,“एकदा धनुष्यातुन सुटलेला बाण आणि एकदा बोललेले शब्द माघारी घेता येत नाहीत अगम्य! तू काही जरी केलंस तरी मी इथे थांबणार नाही आणि तुझ्या बरोबर पुण्याला ही येणार नाही! तुला जर वाटत असेल की मी तुझ्या कार मधून पुण्याला जावे तर माझी मी ड्राइव्ह करून जाईन आणि हो तुझी गाडी आणि तुझ्या फ्लॅटच्या चव्या आणि M. D. पदाचा राजीनामा तसेच डिव्होर्स पेपर ही तुला उद्या संध्याकाळ पर्यंत मिळतील!” ती ठामपणे म्हणाली.

        हे ऐकून अगम्य मात्र पुरता गारद झाला त्याला कळतच नव्हते की अभीज्ञाची समजून कशी काढावी. त्याला कळून चुकले होते की तो अभीज्ञाला खूप चुकीचं बोलून बसला होता पण आता ती त्याच्या समजावण्याच्या पलीकडे गेली होती आणि तिची  समजूत काढेल असं कोणीच आत्ता तरी घरात नव्हतं.जर तिच्याशी जास्त हुज्जत घातली तर ती अशीच रागाच्या भरात निघून जाण्याची दाट शक्यता होती. म्हणून अगम्यने  विचार केला की ती कार घेऊन गेली तर आपल्याला निदान तिच्या मागे बाईकवर तरी जाऊन तिला सुरक्षित घरी पोहोचवता येईल आणि नाही ती चालवू शकली गाडी हाताच्या दुखण्यामुळे तर आपण करू ड्राइव्ह बाईक रस्त्यातच सोडून! आणि उद्या आऊ आणि आई-बाबांना तिला समजवायला सांगू.रात्रीतुन होईल तिचा राग शांत जरा तरी!असा विचार करून तो अभीज्ञाला बोलणार तर अभीज्ञा बॅग ओढत गेटच्या बाहेर निघाली होती. अगम्यने तिला पळत जाऊन थांबवले आणि तो म्हणाला.

 

अगम्य,“ ठीक आहे.या घे चव्या आणि जा कार घेऊन तू! बाकी आपण उद्या काय ते पाहू!” असं म्हणून त्याने तिच्या हातातली बॅग घेतली आणि तिचा हात धरून तिला गाडीत बसवले.

 

      अभीज्ञा कार घेऊन निघाली आणि अगम्यने बाईक काढली तो तिच्या मागे बाईकवर होता. साईट मिरर मधून अभीज्ञाला अगम्य दिसत होता पण अभीज्ञाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ती पुण्यात घरी पोहोचली.अगम्य मात्र तिला सोसायटीच्या गेट मधून लिफ्टकडे जाऊ पर्यंत पाहत होता.

 

    अभीज्ञानी अशी कोणती चूक केली होती? अगम्यला असं काय अभीज्ञा पासून  लपवायचे  होते की त्याने त्याचे आणि अभीज्ञाचे नाते देखील पणाला लावले होते? अभीज्ञाचे पुढचे पाऊल काय असणार होते? ती बोलली तसं खरंच अगम्यला डिव्होर्स देऊन  सगळं सोडून निघून जाणार का?

 

 या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule 

 

 

 


 

 
 

  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Swamini Chaughule

Author

I am Crazy Read & Passionate Writer

//