प्रायश्चित्त भाग एक

The Love Story Of Asavari, Devdutt And Angad


प्रायश्चित्त


सदर कथा ही 2002 सालच्या दशकातली आहे आणि वाचकांनी कथा वाचताना त्या अनुषंगाने विचार करावा ही विनंती.

ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.


*********************************************

पात्र

देवदत्त - कथेचा नायक.

आसावरी - नायिका.

अंगद - कथेचा सहनायक आणि देवदत्त चा वर्गमित्र.

निनाद - देवदत्त च्या वडिलांच्या मित्राचा मुलगा.

विशाखा - अंगद ची बहिण आणि निनाद ची बायको.

स्वीटी - देवदत्तची मैत्रीण.

*******************************************

मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं

जाईच्या पाकळ्यांस दवं अजून सलते गं


स्विटी ने एफ. एम. सुरू केला आणि ती स्वयंपाक घरात गेली. देवला चहा हवा होता. चेहऱ्यावरचं पाणी हातातल्या छोट्या नॅपकिनने पुसत देव स्वीटीच्या बेडरूम मधून बाहेर येत असताना, त्याच्या कानावर रेडिओ तील गाण्याचे आर्त स्वर पडले.क्षण दोन क्षण तो तिथेच थबकला.

मेंदीच्या पानावर मन अजुन झुलते गं

एका क्षणासाठी देवदत्तला कळलेच नाही की, आवाज कुठून येत आहे पण, दुसऱ्या मिनिटाला त्याची नजर सुरू असलेल्या छोट्या एफ. एम. वर गेली. त्याने रेडिओ चैनल बदलून पाहिले आणि क्षणात आधीच्या चैनल वर परत आला आणि गाणं संपण्याची अधीरतेने वाट पाहू लागला. गाणं संपल्यावर उद्धघोषिकेने रेडिओ चैनल चे नाव आणि फ्रिक्वेन्सी सांगितली.देवदत्तने ती पटकन टिपून घेतली.


स्वीटीच्या बेडरुम मधुन आपले कपडे घालून, हातानेच आपले केस नीट करत देवदत्त अगदी वाऱ्याच्या वेगाने गाडी पळवत, धापा टाकत त्या रेडिओ चैनल च्या ऑफिस मध्ये पोहोचला.



गाडी चालवताना त्याला डोळ्यासमोर सतत आसावरी दिसत होती…… कविता करणारी, लोभस, गुबऱ्या गालांची, साधेपणातलं तिचं मोहक सौंदर्य पाहणाऱ्याला मोहवून टाके.


तो तेव्हा अकोल्याला त्याच्या बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने गेला होता. रस्त्याने वेगात गाडी चालवत होता तेव्हाच रस्त्याच्या कडेने आपली ओढणी आवरत,हातातलं सामान सावरत, भर उन्हात आसावरी पायीच चालली होती.उन्हा मुळे तिला चांगलाच घाम आला होता. देवदत्तने सवयीप्रमाणे तिला लिफ्ट साठी विचारलं… पण स्वाभिमानी आसावरी ने तिकडे लक्षही दिलं नाही आणि तिने स्वतःची वाट धरली.


पण शांत बसेल तो देवदत्त कसला? दैवदत्तला आसावरी आवडली होती आणि ती त्याला हवी होती, त्यासाठी तो काहीही करु शकत होता आणि त्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तो तसं करायचाही! कदाचित म्हणूनच आसावरी ने त्याच्याकडे केलेलं दुर्लक्ष त्याला खूप टोचून गेलं होतं आणि येनकेन प्रकारे त्याला आसावरी हवी होती.त्याच शहरात देवदत्तचा कॉलेजचा मित्र राहत होता- अंगद. अंगद आणि देवदत्त दोघांनी एकत्रच बी.एस.सी. कंप्यूटर पास केलं होतं.त्यामुळे देवदत्तने लगेच अंगादला शोधून काढलं…त्याच्या बंगल्याच्या थोड्याच अंतरावर अंगदचं घर होतं… अंगदच्या दारावरची बेल वाजवून देवदत्त दार उघडण्याची आतुरतेने वाट पाहत होता

दार विशाखानं उघडलं. विशाखा- अंगद ची लहान बहीण.

देव - "अंगद आहे का?"

विशाखा- "आपण कोण?"

देव-" मी अंगदचा मित्र देवदत्त."

विशाखा तिथूनच ओरडली- "दादा तुझा मित्र आला आहे, देवदत्त."

देवदत्त हे नाव ऐकून अंगदला एक क्षण खूपच आश्चर्य वाटलं कारण कॉलेजच्या दिवसात देवदत्त नेहमीच स्वताच्याच विश्वात गुंग असायचा. त्याला अंगद सारख्या सर्वसामान्य वर्ग मित्राकडे बघायला वेळच नव्हता. तो सतत त्याच्याच सारख्या श्रीमंत, बिनधास्त, गर्विष्ठ मुलांमध्ये रंगलेला असायचा. एक तर दिसायला टॉल, डार्क, हँडसम शिवाय श्रीमंत त्यामुळे कॉलेजमधल्या अनेक तरुणी त्याच्यावर अगदी फिदा झाल्या होत्या. पण प्रेम, एकनिष्ठता, समर्पण हे शब्द देवदत्तच्या  शब्दकोषात कधीच नव्हते. त्याचे एकच धोरण होतं युज अँड थ्रो.


पण अंगद मात्र त्याच्या अगदी विपरीत. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातला थोरला. आपण भलं- आपला अभ्यास- आपलं काम भलं असा. दिसायलाही अगदी सर्वसामान्य, मध्यम उंची आणि सर्वसामान्य चेहरेपट्टी. घरची आर्थिक स्थिती जेमतेम त्यामुळे,खूप अभ्यास करुन चांगले मार्क्स मिळवून नोकरी मिळवणे हेच अंगदचे स्वप्न आणि उद्दिष्ट होते. कॉलेजच्या दिवसात देवदत्त आणि अंगद फारसे कधी बोलले, भेटले नव्हते. म्हणूनच कदाचित आता पाच वर्षानंतर स्वतःच्या दारावर देवदत्तला बघून अंगदला आश्चर्य वाटत होते…..


विचारांच्या तंद्रित देव रेडिओ चॅनेल च्या ऑफिस मध्ये पोहोचला.त्या रेडिओ चैनल च्या ऑफिस मध्ये गेल्यावर ड्युटी ऑफिसर ला देवदत्तने आत्ता जे गाणं वाजलं त्याची गायिका कोण असा प्रश्न केला. पण ड्युटी ऑफिसरला ते काहीच माहिती नव्हते. ड्युटी ऑफिसर ने एक क्षण निवेदिकेला बाहेर बोलावले, पण तीलाही त्या गायिकेचे नाव माहिती नव्हते. केवळ तिच्या ड्युटी चार्ट मध्ये \"स्वराली\" एवढाच त्या गायिकेच्या नावाचा उल्लेख होता. देवदत्तचा खूपच हिरमोड झाला. पण तरीही त्या रेडिओ चैनलच्या एका डायरेक्टर तो ओळखत होता. देवदत्तने त्या डायरेक्टरलाच फोन लावला.

देवदत्त-"हॅलो निनाद देवदत्त बोलतोय."

निनाद -"बोल रे! काय म्हणतोयस?आज माझी आठवण कशी काय आली?"

देवदत्त-"माझे एक महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे."

निनाद - "अरे मग सांग ना काय काम आहे?"

देवदत्त - "अरे ते तुझं रेडिओ चैनल आहे, ना \"मराठी माणसाचा आवाज\". त्या चैनल चा तू डायरेक्टर आहेस ना?"

निनाद- "हो बरं मग."

देवदत्त -"काही नाही रे मला एक छोटीशी माहिती हवी होती. मी येतो तुला भेटायला."

निनाद - "अरे आत्ता रात्रीचे अकरा वाजलेत.एवढ्या रात्री कशाला तुला दगदग. उद्या सकाळी भेटू या ना!"

देवदत्त- "नंद्या अरे फक्त अकरा म्हण मित्रा."

देवदत्तच्या या वाक्यावर दोन्ही मित्र अगदी खळखळून हसले. तीसाव्या मिनिटाला देवदत्त निनादच्या फ्लॅटची बेल वाजवत होता. निनादने दरवाजा उघडून देवदत्तचं स्वागत केलं.

देवदत्त - "सॉरी पण खूपच महत्त्वाचं काम होतं म्हणून एवढ्या रात्री………"

निनाद- "ते तर दिसतच आहे. बरं सांग काय घेणार चहा की कॉफी?"

देवदत्त - "मित्रा ही वेळ माझ्या सारख्यासाठी ड्रिंक्स ची असते पण असो आज काहीच नको फक्त एक मदत कर."

निनाद- "बोल कसली मदत हवी आहे?"

देव- "तुझ्या त्या रेडिओ चैनल वर एक गायिका गाणं म्हणते- स्वराली. "

निनाद-" चैनल वर रोज वीस पंचवीस जणी गाणं म्हणतात. "

देव- "पण मी तुला आत्ताच नाव सांगितलं ना- स्वराली."

निनाद -"बर मग तिचं काय? "

देव -"आहे काही तरी वैयक्तिक आणि महत्वाचं!"

निनादने एक भूवई उंचावली.

देव-" दोस्त समजून घे! काहीतरी महत्त्वाचं असल्याशिवाय मी तुझ्याकडे असा अपरात्री येईल का? "

निनाद -"हो ते तर माझ्या लक्षात आलंच आहे पण आमच्या कलाकारांचे वैयक्तिक डिटेल्स आम्ही लीक करत नाही. शिवाय स्वरालीने कॉन्ट्रॅक्ट साईन करताना तशी अटच घातली आहे,त्यामुळे मला तुला तिचे डिटेल्स देता येणार नाही. "

देवदत्त -" अरे इथे कुणाच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे आणि तू काय अटी आणि शर्तींचा मागे लागला आहेस? "

निनाद -"मित्रा माझ्या चॅनलचा मी एकटाच मालक नाही ना! आणखी दोघे आहेत. आय एम सॉरी,पण मी तुझी कुठलीच मदत करू शकत नाही. "

देवदत्त -" तू तुझ्या ईतर दोन पार्टनर ची आणि माझी उद्या मीटिंग फिक्स कर. "

निनाद -"अरे पण काय सांगू त्यांना?

देव- "सांग त्यांना देवदत्त देशमुख- देशमुख इंडस्ट्रीजचा सर्वेसर्वा, आसावरी इंटरप्राईजेस- 500 करोडच्या कंपनीच्या  मालकाला त्यांना भेटायचे आहे."

एवढे बोलून देव त्याच्या स्टाईल मध्ये सिगरेटचा धूर उडवत निघून गेला. निनाद मात्र देवदतच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला. त्याच्या मनात एकच विचार सुरू होता 500 करोडच्या इंडस्ट्रीजच्या मालकाला स्वराली भावेशी काय काम असेल? काय आहे स्वराली आणि देवदत्तचं खरं नातं?


*********************************************


फोटो - साभार गूगल 



🎭 Series Post

View all