ते झपाटलेलं बेट : भाग २५ अंतिम

A Person Faces Paranormal Activities In His Life


ते झपाटलेलं बेट

भाग २५ ( अंतिम )

कसला पायरव आहे, हे बघायला म्हणून विवेक डेकवर आला. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. बाहेर हृषीकेश होता. पण अगदी दीन अवस्थेत. तो रडत होता. त्याच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा होत्या, त्यातून रक्त गळत होतं. तो जिवाच्या आकांताने विवेकला आणि अजयला हाक मारत होता.ते ऐकून अजय आणि निशा पण बाहेर आले.

त्यांना पण त्याला अशा अवस्थेत बघून धक्का बसला. त्याची ही अवस्था बघून मंदारच्या सगळ्या सूचना तिघेही विसरले आणि बोटीतून खाली उतरले. त्या क्षणी एक अतिशय भयानक, अक्राळविक्राळ काळी आकृती त्यांच्या समोर आली. ते बघून निशा किंचाळली. आणि अजयच्या मागे लपली. ते बघून एक क्षण विवेक आणि अजय देखील घाबरले. पण एकाच वेळी दोघांच्या हातात त्यांची रिव्हॉल्व्हर्स आली होती. आणि त्या आकृतीच्या दिशेने त्यांनी निर्भयपणे दोन पावलं टाकली.

पण ती आकृती साधी नव्हतीच, अमानवी होती. हे त्यांना ठाऊक नव्हतं. ज्या आकृतीने सायलीचा अंत केला होता, तीच ही आकृती होती. काहिही समजायच्या आत, त्या आकृतीने तिघांना लीलया उचलले. निशा भीतीने बेशुद्ध झाली होती. अतिशय केसाळ, काळी कभिन्न, कसलाही ठराविक आकार नसलेली, पण तरीही लालबुंद डोळे असणारी, आणि खदाखदा हसणारी ही आकृती म्हणजे सैतानाचं प्रतीक होती. ही आकृती तीच होती, जी विवेक आणि अजयच्या मागे लागली होती.

त्या आकृतीने त्यांना वाऱ्याच्या वेगाने त्या गुहेत आणलं.

आपण मंदारचं न ऐकून मोठी चूक केल्याचं ह्या मंडळींच्या लक्षात आलं. पण आता उपयोग नव्हता. आता फक्त मरण बघायचं होतं. त्या गुहेत त्यांना त्या आकृतीने आणून तांदुळाच्या रिंगणाच्या मध्ये फेकलं. आणि ती आकृती बघता बघता हवेत विरघळली. त्या गुहेत निद्रेच्या अधीन असलेले आधीच बरेच जण होते. अजय आणि विवेकने त्यांना चटकन ओळखलं. त्यात रंगा, सुख्या, इतर गुंड, त्या मुली आणि अजयची माणसं असे सगळेच होते.

पण त्यात अवनी कुठेच दिसेना. विवेक वेड्यासारखा तिला हाक मारत होता, अजयने त्याला सावरलं. विवेक संतापला होता. अजयनेही संतापाने मुठी आवळल्या.

विवेक काही न सुचून खाली बसला. निशा तर आधीच बेशुद्ध होती. त्याने इकडे तिकडे पाहिले. ती संपूर्ण गुहा म्हणजे क्रौर्याची परिसीमा होती. त्या ठिकाणी सगळीकडे वाळके रक्त दिसत होते. ठिकठिकाणी रक्ताच्या चिळकांड्या उडालेल्या दिसत होत्या. हाडांचे ढीग पडले होते. घाणेरडा वास सगळीकडे भरून राहिला होता. निद्रेत असलेल्या माणसांना बांधून ठेवलं होतं. समोर त्यांची कुठलीतरी देवता, बहुधा वेताळ असावा, दिसत होता. त्याला कदाचित रक्ताचा अभिषेक सुद्धा घालत असावेत. ती देवता वाळल्या रक्ताने माखलेली दिसत होती. तिच्या गळ्यात कवट्यांच्या माळा होत्या. कवटीला छिद्र करून त्यात जंगली वेल ओवलेली दिसत होती. हातात विचित्र शस्त्र होतं. दांडा, चंद्रकोरीच्या आकाराचं पातं, खिट्टी, त्याला हातोडा, सगळंच विचित्र. त्याला संताप, किळस, घृणा एकाच वेळी आली होती.

तो हे सगळं बघत असतानाच विवेक उठला. आणि म्हणाला, " मी अवनीला शोधून आणतो. जर त्यांनी तिला काही केलं असेल ना, तर नुसत्या हाताने त्या दुष्ट माणसांची आतडी बाहेर काढेन मी".

अजय म्हणाला, " थांब, एव्हाना मंदारच्या लक्षात आपला मूर्खपणा नक्की आला असेल. एक अविचार आपण केलाय, आता दुसरा नको. थोडं सबुरीने घे. शांतपणे विचार केला तरच मार्ग निघेल. अवनी नक्की सुरक्षित असेल. काळजी करू नकोस. कदाचित ती इथून सुटली देखील असेल. त्यामुळे थांब. बाहेर जाता येतंय का, ते मी बघतो". तो गुहेच्या दाराशी आला, तितक्यात एक मांत्रिक आत आला.

त्याने अतिशय तुच्छतेने ह्या मंडळींकडे बघितलं. अजयने थेट त्याची मानगूट पकडली. चार कानाखाली लावल्या.

विवेक म्हणाला, " बोल, हे सगळं काय आहे? कसला माज आहे हा? माणसं मारायची परवानगी दिली कोणी तुम्हांला? कोण आहेस तू"?

मांत्रिक काही बोलायच्या ऐवजी मंत्र म्हणू लागला. अजय आणि विवेकच्या लक्षात आलं की, तो काहीतरी अघोरी करणार. कदाचित मगाशी आलेल्या आकृतीला बोलावणं करणार. अजयने एका क्षणात त्याच्या भुवयांच्या मध्ये पिस्तुलाची गोळी घातली. रक्ताची एकच चिळकांडी उडाली. आणि तो दुसरा मांत्रिक ठार झाला.

एव्हाना निशा शुद्धीवर आली होती. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही.

" कुठे असेल रे माझी अवनी? काय झालं असेल तिचं"? कातर आवाजात आलेला विवेकचा हा प्रश्न अजयचं काळीज चिरून गेला. तो म्हणाला, " तू आणि निशा इथंच थांबा. ह्यांना मोकळं करा. मी शोधायला जातो तिला".

त्याही स्थितीत विवेक म्हणाला," अवनी पेक्षा तू महत्वाचा आहेस. अवनी आहे की नाही, ठाऊक नाही. पण बाहेर जाऊन तुझा जीव धोक्यात आला, तर मग मी काय करू सांग? त्यापेक्षा मी जातो".

अजय काही बोलणार, इतक्यात अवनीच आत आली. काही क्षण तिची आणि विवेकची नजरानजर झाली. मनाचे भाव मनाला कळले. नजरेने बोलायचे काम केले. एखाद्या घायाळ हरिणीसारखी ती त्याच्याकडे धावली. आपले बाहू पसरून त्याने तिला मिठीत घेतले. दोघेही मनसोक्त रडत होते. थोड्या वेळाने आवेग ओसरल्यावर मिठी सैल झाली. संकोचून अवनी दूर झाली.

अजय मोठ्याने हसला. आणि त्याने स्वतःची, निशाची ओळख करून दिली.

विवेकने विचारले, " तू होतीस कुठे? आणि परत इथे कशाला आलीस"?

तितक्यात एक मंदपणे तरंगत पांढरी, धूसर अशी सायलीची आकृती आली. हलकेच हसत तिने अवनीच्या सुटकेची आणि तिने तिच्या केलेल्या रक्षणाची कथा सांगितली. आणि हे दोघं परत आल्याबद्दल तिने त्या दोघांचे आभार मानले.

तिच्या मागोमाग असंख्य काळ्या छोट्या छोट्या आकृत्या आत आल्या होत्या. त्या आकृत्या नाचत होत्या. सायलीने त्यांना अक्षरशः तिच्या शक्तीने खेचत आणलं होतं.

विवेकने विचारलं, " पण आम्ही इथे आहोत, हे तुला कळलं कसं"?

सायली म्हणाली, " विसरतोस तू. मी माणूस नाही. मला सगळं जाणवतं. तुम्ही आल्याची जाणीव मला झाली होती. म्हणून तर माझ्या संरक्षणात असलेली तुझी अवनी मी तुला आणून दिली". जमिनीवर मरून पडलेल्या त्या मंत्रिकाकडे बघत सायली परत मंद हसली. " हाच तो, ज्याने माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. बरं झालं, मेला. पण फार हाल हाल होऊन मरायला हवा होता. असो, मेला हे महत्त्वाचं. आता दुसरा मेला की, माझा बदला पूर्ण होईल. मी मुक्त होईन. पण .... पण.... माझा आदित्य..."

ती एकदम गप्प झालेली पाहून अजय म्हणाला, " ह्या आकृत्या इथे का आल्या आहेत? धोका नाही ना ह्यांच्यापासून"?

ती म्हणाली, " नाही, कारण मी त्यांच्या पेक्षा जास्त प्रभावी आहे, तुम्ही चिंता करू नका. तिकडे बघा त्या काय करतायत"!

सगळ्यांनी तिकडे बघितलं. आणि शहारा येऊन मुली किंचाळल्या. त्या आकृत्या त्या मांत्रिकाच्या प्रेतावर नाचत होत्या. गात होत्या. थयथयाट करत होत्या. त्या मृतदेहाचे लचके तोडून सगळीकडे फेकत होत्या.

सगळ्यांना एकदम किळस आली. सायली म्हणाली, " मी त्यांना ते दोन्ही मांत्रिक त्यांच्या हवाली करेन असं वचन दिलंय. म्ह्णून त्या तुम्हांला काही करणार नाहीत. चला इथून बाहेर. ह्या माणसांनाही मोकळं करा. इथेच राहू द्या.

तिचं ऐकून तिथल्या सगळ्या माणसांना मोकळं करून निघणार इतक्यात विवेकने विचारलं, " अगं पण बाहेर ते हिडीस ध्यान"?

सायली म्हणाली, " ती आकृती ह्याचा गुलाम होती. हाच गेला तर ती काय करणार? चला. मी आहे ना! तुमचा अजून एक मित्र बेशुद्ध होऊन बाहेरच्या एका झाडात पडलाय. त्यालाही उचला. चला निघा आता".

सगळे चटकन बाहेर आले. सायलीने त्यांना त्यांच्या लॉन्चकडे न्यायला सुरुवात केली. हृषीकेश ला देखील अजयने उचलून घेतलं होतं.

इकडे त्या झोपडीतले दृष्य....

" मी चोऱ्या करत असताना माझी गाठ निराबाबा ह्या माणसाशी पडली. त्यांचा आश्रम होता. मी तिथेच चोरी करायला गेलो होतो. पण त्यांनी मला पकडलं. प्रेमाने माझी कहाणी विचारली. मी सांगितली. त्यांनी मला दारिद्र्य दूर करायचा उपाय सांगितला. काळी जादू करून, नरबळी देऊन कशी मोठी चोरी करायची ते शिकवलं. मी तिथे राहून काही वर्षे साधना केली. अत्यंत कठोर अशी साधना करून मी ह्या पद्धतीने चोऱ्या करायला लागलो. ह्या बेटावर त्यावेळी फार लोकवस्ती नव्हती. जेमतेम दोनशे आदिवासी असतील. मी इथे येऊन राहिलो. हळूहळू इथले सगळे लोक मी मारून, नरबळी देऊन संपवले. मी त्यातून खूप चोऱ्या करून खूप संपत्ती मिळवली. ती सगळी संपत्ती मी माझ्या गुहेच्या वेताळाच्या मूर्तीत लपवली आहे. मला एक असाच चोर सापडला, जो माझा वारसा चालवेल"

" तुला सोडत नाही मी आता. तुझ्या सगळ्या पापांची शिक्षा मी तुला देणार. सगळे आत्मे मुक्त करणार. चल त्या गुहेत".

" भसाड्या आवाजात तो मांत्रिक म्हणाला, " मी येणार नाही. आणि तुला सोडणार तर मुळीच नाही. तुझ्या रक्ताने अंघोळ करेन मी, अंघोळ. तुझ्या आतड्यांची माळ घालेन मी गळ्यात. तुझ्या शरीराचे लचके तोडणार, तुझ्या डोळ्यांत माझी नखं खुपसणार. बघच तू....", असं म्हणून तो मांत्रिक विकृत हसू लागला.

मंदारने झोळीतून एक पुडी काढली आणि त्या मांत्रिकाच्या अंगावर टाकली. त्या सरशी तो मांत्रिक एकदम तळमळला. आणि एका क्षणात दोघंही त्या गुहेत होते. आता खरी लढाई सुरू झाली होती.

तितक्यात त्यांना मागे गुहेत मंदार असल्याचा भास झाला. विवेक म्हणाला, " थांब, मी बघून येतो".

त्याने बघितले तर खरेच तिथे मंदार आणि दुसरा मांत्रिक होता. सगळे परत आत धावले. आतलं दृष्य मोठं भयानक होतं. मंदारने त्या वेताळाच्या मूर्तीला त्या मांत्रिकाला मंत्र शक्तीने बांधून घातलं होतं.

तो तडफडत होता. शिव्या देत होता. मंदारने त्याच्या झोळीतून एक मूठ तांदूळ घेतले आणि त्याला त्याच मंत्रिकाचं रक्त लावलं. आणि ते तांदूळ उधळले. त्या छोट्या छोट्या आकृत्या त्या तांदुळावर तुटून पडल्या. एकेक तांदूळ त्या आकृत्या जशा जशा खात होत्या, तसं तसं त्या मांत्रिकाचा जोर कमी होत होता. त्याच्या शरीराचे तुकडे आपोआप खाली पडत होते. त्याच्या शरीरातून गळणारं रक्त त्या छोट्या आकृत्या पीत होत्या. अखेर मंदारने तिथेच एक धुनी पेटवली. त्यात त्याने त्या मांत्रिकाला टाकून दिले. तो आरडाओरडा करत जळत होता. अखेर काही क्षण सगळी गुहा फिरत होती. सगळ्या अमानवी शक्ती विरोध करत होत्या.उसळून उसळून रडत होत्या. पण अखेर त्यांची हार झाली. सगळं अचानक शांत झालं. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तो गेल्यासारशी सगळे आत्मे एका क्षणात नाहीसे झाले. त्यांना मुक्ती देण्यासाठी तुला गुहेत मंदारने आग लावली. सगळी हाडं त्यात जळून गेली. नंतर सगळे त्या जहाजाच्या अवशेषापाशी गेले. तिथे जाऊन देखील त्याने तिथले सगळे सांगाडे जाळले. आता सगळे आत्मे मुक्त झाले होते. फक्त राहिला होता सायलीचा सांगाडा आणि आदित्यची लाकडी मूर्ती.

सायलीने सगळ्यांना धन्यवाद दिले. आणि मंदारला तिला असंच राहू देण्याची विनंती केली. निदान तिचा आत्मा आणि आदित्यची मूर्ती तरी एकत्र राहावेत हीच तिची अंतिम इच्छा समजून सगळे परत लॉंचवर आले.

एक अतिशय मोठं दु:स्वप्न संपलं होतं. सायली तिच्या आदित्य बरोबर होती. आत्मे मुक्त झाले होते. पळवलेल्या मुली सुखरूप घरी पोहोचल्या होत्या. आणि दोन जोडपी सुखी संसाराची स्वप्न बघत होती. सगळ्या गुंड मंडळींना शिक्षा झाली होती. आणि देवपुढचे विडे तसेच छान ताजे होते.

समाप्त.

🎭 Series Post

View all