ते झपाटलेलं बेट : भाग २३

A Person Faces Paranormal Activities In His Life


ते झपाटलेलं बेट

भाग २३

ती आकृती तिच्या जवळ आली. तिच्यावर वाकली आणि तिने लहान मूल असावे तसे तिला अलगद उचलले. ती आकृती दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच होती. तिचा आत्मा आता प्रत्येक जीवाला वाचवायला बघत होता. तिची शक्ती अगदीच तोकडी असल्याने, ती त्या दुष्ट माणसांना मारू शकत नव्हती. पण निदान माणसं वाचावीत इतकं तर ती करू शकत होती.

सायलीने तिला तिच्या झाडावर नेले. तेच झाड जिथे ती मृत्युमुखी पडली होती. तिने अलगद तिला एका मोठ्या फांदीवर झोपवले. काही वेळाने अवनी शुद्धीवर आली. बघतेय तर ती एका झाडावर होती. आणि समोर ती आकृती. अवनी घाबरली, आता तर ती इतक्या उंचावर होती की, पळूनही जाऊ शकत नव्हती. तितक्यात ती आकृती अवनीला म्हणाली, " घाबरू नकोस मुली. मी तुला काहीही त्रास देणार नाही. उलट त्या भयानक मांत्रिकापासून तुला वाचवायचा प्रयत्न नक्की करेन. काळजी करू नकोस मुली".

अवनी हे ऐकून थोडी सावरली. तिने विचारले, " तू कोण? आणि अशी धूसर का दिसतेयस"?

त्यावर सायलीने तिला तिची सगळी दुःखद कहाणी सांगितली. अवनीला ते ऐकून अश्रू आवरेनात. अवनी म्हणाली, " आम्हांलाही त्या गुहेत तसंच बांधून ठेवलं होतं. पण मी हुशारीने तिथून निसटले".

सायलीने तिला विचारले, " तू कोण आणि ह्यांच्या तावडीत कशी सापडलीस"?

त्यावर अवनीने तिची सगळी कथा तिला सांगितली. ते ऐकून सायलीचा संताप झाला. पण दोघीही हतबल होत्या. एक सामान्य मुलगी आणि एक आत्मा. ज्याला फार शक्ती नव्हती. थोडा वेळ असाच गेला आणि अवनीने तिला काही खायला मिळेल का म्हणून विचारले. त्यावर सायलीने तिला सांगितले की, इथे जवळच थोडी फळझाडं आहेत. तिला झाडावरून न हलण्याबद्दल बजावून सायली चटकन फळं घेऊन आली. ती खाऊन अवनी जरा तरतरीत झाली.

सायली म्हणाली, " ह्या झाडावर माझ्या शापाने त्यांच्यापैकी कोणीही येऊ शकत नाही. तू इथेच थांब. काही मदत मिळेल नक्की. असं म्हणून सायलीने विवेक आणि अजयबद्दल तिला सांगितले. ते ऐकून अवनीला अतिशय आनंद झाला. तिने चटकन विवेकबद्दल तिला सांगितले. आणि त्याचं नाव घेताना, त्याच्याबद्दल बोलत असताना तिच्या गालावर त्याही परिस्थितीत चढलेली लाली बघून सायली मंद हसली.

अवनी स्वतःच्याच विचारात हरवत असताना, सायली म्हणाली, " त्या दोघांनी मला बहीण मानले आहे. ते नक्की येतील. तू काळजी करू नकोस. फक्त ह्या झाडावरून हलू नकोस. ते जेव्हा येतील, तेव्हा मीच तुला त्यांच्याकडे पोहोचवेन. तू आणि विवेक नक्की एक व्हाल. माझं संसाराचं स्वप्न ह्या लोकांनी पूर्ण होऊ दिलं नाही. पण मी तुझं स्वप्न नक्की पूर्ण करणार".

अवनी ते ऐकून छान गोड हसली. पण परत दुःखी होत तिने विचारलं, " ते गुहेत अडकले आहेत, त्यांचं काय करायचं? त्यांना कसं सोडवायचं? ते सगळे गाढ झोपेत होते. त्यांना सोडवणं माझ्या शक्तीबाहेरचं होतं. मी फक्त निसटले. मला फार वाईट वाटतंय".

सायली म्हणाली, " सुटतील ते ही. विवेक आणि अजय नक्की येतील. तू काळजी करू नकोस. पौर्णिमा अजून लांब आहे. आपण तिथे जाऊ शकत नाही. पण तू सुटलीस, हे त्या मंत्रिकांना एव्हाना कळलं असेल. त्या दोऱ्या बघून ते नक्की तुला शोधतील. पण काहीही झालं तरी ह्या झाडावर ते किंवा त्यांची शक्ती काहीही करू शकणार नाही. त्यामुळे तू निर्धास्त रहा".

अवनी म्हणाली, " मी तू असताना कशाला चिंता करू"?

इकडे आजच्या रात्री....

मंदार आणि हृषीकेश थोडं अंतर गेले तोच समोर त्यांना काहीतरी दिसलं. एखाद्या मोठ्या घरासारखं . हृषीकेश म्हणाला, " चल मंदार, ते बघ तिकडे घर दिसतंय. जाऊ तिकडे आपण".

मंदार म्हणाला, " ते घर नाही. फसवा आभास आहे. तू तिथे गेलास तर तुझ्या जीवाची शाश्वती नाही. माझं ऐक, मी सांगतो तेच कर. तू म्हणतोस की, तू पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट आहेस, पण तुला त्यातलं फार काही ज्ञान आहे, असं मला वाटत नाही. तुझ्या व्यवसायात असणारी माणसं इतकी उतावळी, आणि प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणारी नसतात. उलट प्रत्येक गोष्ट ही अनुभवाच्या कसोटीवर तपासून बघणारी असतात. तुला अजिबात अनुभव नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. तेव्हा जर जीव वाचवायचा असेल, तर माझं ऐक. शेवटचं सांगतोय".

ते ऐकून हहृषीकेश चांगलाच चिडला. पण वरवर तसं न दाखवता तो हो म्ह्णून शांत बसला. दोघांनी त्या घरात अर्थातच न जाण्याचा निर्णय घेतला. ज्या क्षणी त्या बेटावर मंदारने पाय ठेवला, त्या क्षणी त्याला त्या शक्तीच्या अफाट क्रौर्याची ताकद कळली होती. त्याला कशाही लढायचं आहे, हे त्याला ठाऊक होतं. पण त्याची तीव्रता किती आहे, हे त्याला आत्ता जाणवलं.

त्याने पूर्वेकडे तोंड केलं आणि हात जोडून काही क्षण कसलीशी प्रार्थना केली. झोळीतून एक लाल रंगाचं कापड काढलं. त्यात त्याने एक सुपारी, काही तांदूळ आणि त्या बेटावरची एक मूठ माती बांधली. ते कापड त्याने तिथल्या जमिनीत पुरलं. त्याच्यावर एक काठी उभी केली. त्या काठीला अजून एक लाल कापड बांधलं.

हृषीकेश म्हणाला, " हे काय"?

मंदार म्हणाला, " हे ह्या जमिनीत असलेल्या सगळ्या नकारात्मक शक्तींना एकत्र करणारं आणि त्यांना गोठवणारं संरक्षक कवच.ह्यामुळे आपल्या मार्गात निदान ह्या जमिनीत अडकलेले आत्मे येणार नाहीत. जमिनीच्या खाली असणाऱ्या सगळ्या अदृष्य आणि नकारात्मक शक्ती इथे ओढल्या जातील. आणि गोठतील. नंतर त्या नष्ट करून ही जमीन पवित्र आणि चांगली होईल".

मंदारचं हे उत्तर ऐकून हृषीकेश फक्त हसला. त्याच्या हसण्याकडे दुर्लक्ष करून दोघे पुढे निघाले. पश्चिम दिशेला त्यांचं प्रयाण चालू होतं. थोडं पुढे गेल्यावर त्यांना दोन माणसं दिसली. ती त्यांच्याकडेच बघत होती. त्यांच्या बघण्यातला वेगळेपणा मंदारच्या लक्षात आला. आपल्याला हवी असलेली हीच ती माणसं आहेत, हे त्याच्या काही क्षणात ध्यानात आलं. पण तरीही अतिशय शांतपणे मंदार त्यांच्या जवळ गेला. हसला, आणि अगदी नम्रपणे विचारलं, " आपण इथे आमची रहायची सोय करू शकता का? वादळाने आम्ही भरकटून इथे आलो आहोत. आम्ही फक्त रात्री राहू आणि सकाळी जाऊ. तुम्हांला काही त्रास होऊ देणार नाही".

खरं तर त्या दोन दुष्ट मांत्रिकांना समोरच्या माणसाची ताकद बघूनच कळली होती. हा कोणी सामान्य माणूस नाही, कोणीतरी वेगळा आहे, हे त्या दोघांना बघताक्षणी कळलं होतं. पण समोरचा माणूस नाटक करतोय, तर आपणही करू म्हणून तेही तितकंच गोड बोलले.

त्यातला एक म्हणाला, " हो नक्की, करू ना सोय. नका काळजी करू. इथे जवळच आमचं घर आहे. चला तिकडे जाऊ".

मंदार आणि हृषीकेश त्यांच्या मागे निघाले. काही अंतर गेल्यावर त्यांना एक घर दिसलं. त्याच्या बाहेर एक .....

काय होतं त्याच्या बाहेर? जर मांत्रिकाने त्यांना ओळखलं होतं, आणि मंदारने त्यांना ओळखलं होतं, तर त्यांचा सामना कसा रंगणार? अवनी सापडणार का? गुहेतले बाकीचे वाचणार का? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all