ते झपाटलेलं बेट : भाग २२

A Person Faces Paranormal Activities In His Life


ते झपाटलेलं बेट

भाग २२

त्या राक्षसी लाटा बघून निशा घाबरली. अजयला घट्ट बिलगली. त्या ही स्थितीत त्याला तो क्षण सुखावून गेला. बाकी सगळे ते बघून घाबरून गेले होते. एकटा मंदार शांत होता. त्याला ठाऊक होतं की, काहीही झालं तरी लॉंच बुडणार नाही, फुटणार नाही. त्याने सगळयांना हातानेच खाली जायला सांगितले. सगळे धडपडत खाली गेले. त्याबरोबर त्याने दोन्ही हात जोडून त्याच्या गुरूंची प्रार्थना आरंभली. अत्यंत मनापासून तो प्रार्थना करत होता. काही क्षण असेच गेले. त्याच्यात ते चैतन्य संचारले. त्याने शांतपणे त्या परमेश्वराचे आभार मानले. आणि तो खाली गेला.

खाली सगळे अतिशय हेलकावे घेणाऱ्या त्या लॉंचमध्ये कसेतरी सगळे बसले होते. मंदार अतिशय शांत होता. त्याने सगळ्यांना शांत केले. तो म्हणाला, " तुमचा माझ्यावर विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे. तर आता ऐका. रिलॅक्स व्हा. काहीही अगदी काहीही होऊ दे, ही नाव बुडणार नाही, फुटणार नाही. त्यामुळे घाबरू नका. आणि अजून एक, आपण काही वेळात त्या किनाऱ्यावर पोहोचणार आहोत. पण मी आणि हृषीकेश आम्ही दोघंच खाली उतरणार. बाकी जग इकडचं तिकडं झालं तरी कोणीही खाली उतरणार नाही. मी ह्या आधीच सांगितलं आहे की, माझ्या सूचना पाळल्या गेल्याच पाहिजेत. तुम्हांला कसलेही आवाज आले, कोणी हाक मारली, कोणाची किंचाळी ऐकू आली, अगदी सायलीचा आत्मा बोलावतोय, असं वाटलं तरीही खाली उतरायचं नाही. जोपर्यंत मी येत नाही, तोपर्यंत कोणीही झोपू नका. आणि महत्वाचं म्हणजे आमची दोघांची चिंता करू नका. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. चल हृषीकेश".

हृषीकेश म्हणाला," मी येणं गरजेचं आहे का? नाही म... म.... म्हणजे मी इथेच थांबतो. ह्यांची काळजी घेतो".

मंदार जोरात हसला. " का? आता का? भीती वाटतेय ना? सकाळी तर ऐट आणली होतीस मोठी! आता चल निमूट. मी मुळीच तुझं ऐकणार नाही. टॉर्च उचल, तुझी सॅक अडकव आणि चल", मंदार म्हणाला.

नाईलाज होऊन हृषीकेश त्याच्या मागे मागे निघाला.

दोघं किनाऱ्यावर जाण्यासाठी खाली आले. लॉंचवर असलेल्या प्रखर टॉर्च आणि लाईट्स मुळे किनारा दिसत होता. हळूहळू लॉंच किनाऱ्यावर आली. देवाचं नाव घेऊन आणि गुरूंची आठवण करून तो आणि हृषीकेश खाली उतरले. गुढघाभर पाण्यातून टॉर्चच्या मदतीने दोघं वाळूत पोहोचले. थोडं अंतर गेले तोच ....

इकडे दोन दिवसांपूर्वी...

ते मांत्रिक गुहेतून बाहेर पडले. त्या सगळ्यांना झोपेच्या अधीन करण्यासाठी त्यांनी त्यांचीच ती अभद्र आकृती एका माणसाच्या वेषात पाठवली. सगळ्यांना तो रस देऊन ती आकृती निघून गेली. इकडे अवनीने परत एकदा हुशारी केली होती. तिने तो रस गिळलाच नाही. खरं तर अवनी एका शहीद सैनिकाची बहीण होती. त्यामुळे त्याला येत असलेल्या सगळ्या गोष्टी तो तिला शिकवत असे. काही बाबतीत ती अगदी तरबेज झाली होती.

तो माणूस म्हणजे ते अभद्र ध्यान जाताच तिने तो रस थुंकला. पण तो काही काळ तोंडात असल्याने काही वेळ ती गुंगीत होती. जवळजवळ अर्ध्या तासाने ती चांगली जागी झाली. काही क्षण असेच गेल्यावर कोणी नाही ह्याची खात्री करून ती उठून बसली. तिनं इकडं तिकडं बघितलं. तिला एक सुरा दिसला. महत्प्रयासाने तिने तो अगदी सरपटत जाऊन मिळवला. त्या तांदुळाच्या रक्तमाखल्या रिंगणावरून सरपटत जाताना तिच्या अंगाला ते रक्त लागलं. ती शहारली. पण तरी तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.

तिने तिच्या भावाने शिकवल्याप्रमाणे चाकू उलटा धरला आणि हाताच्या दोऱ्या तोडल्या. काही काळ लागलाच ह्याला. पण तिने हार मानली नाही. हात मोकळे होताच तिने पटकन तोंडातला बोळा काढला, पाय मोकळे केले. आणि प्रथम त्या गुहेच्या बाहेर आली. त्या मांत्रिकाने बाहेरील कोणी आत येऊ नये, अशी व्यवस्था केली होती. आतील कोणी बाहेर जाऊ नये, अशी काही व्यवस्था त्याने नव्हतीच केली. कदाचित कोणी सुटेल, असं त्यांना वाटलंच नसेल.

तिने बाहेर येऊन आधी कोणी नसल्याची खात्री केली आणि पटकन एका मोठया झाडामागे जाऊन ती आधी फ्रेश झाली. तिला भयंकर तहान लागली होती, भूक लागली होती. सगळं अंग दुखत होतं. तिने देखील त्याच मोठया झाडावर चढायचं ठरवलं. वर अगदी वर जाऊन तिने सभोवार नजर टाकली. नुसतं घनदाट जंगलच होतं सगळीकडे.

एके ठिकाणी तिला एक झरा दिसला. त्या झाडापासून जवळच होता. ती पटकन खाली उतरली. तिथे जाऊन तिने भरपूर पाणी प्यालं. आता तिला अजून बरं वाटत होतं. तिने एक क्षण विचार केला आणि निर्णय घेतला. तिला सुटायचं होतं. आणि त्या गुहेत असलेल्या सगळ्यांचे जीव देखील वाचवायचे होते. तिने त्या झऱ्यातून पुढे जात रहायचा निर्णय घेतला. तिने असा निर्णय घेण्यामागे अनेक कारणं होती. पहिलं कारण म्हणजे, ती पाण्यात असताना कोणतंही जंगली जनावर तिच्यावर हल्ला करू शकलं नसतं. अर्थात, तिला हे ठाऊक नव्हतं की, एकही जिवंत प्राणी, पक्षी, कीटक त्या संपूर्ण बेटावरच नव्हते.

दुसरं कारण म्हणजे, वाहतं पाणी नेहमी मोठया पाण्याच्या साठ्याकडे जातंच. असं करून कदाचित तिला एखादा मार्ग, किंवा सुरक्षित स्थान मिळू शकलं असतं.

तिसरं कारण म्हणजे, तिला खायला अन्न कधी मिळेल, हे ठाऊक नव्हतं. निदान पाणी तरी होतं. काही दिवस अन्न नसताना माणूस काढू शकतो, पण पाणी नाही मिळालं, तर माणूस तीन दिवसांपेक्षा जास्त जगू शकत नाही, हे तिला ठाऊक होतं.

ती पुढे पुढे जात राहिली. बरंच पुढे गेल्यावर तिला दम लागला. ती थांबली. तिच्या बऱ्याच काळ ओल्या राहिलेल्या अंगात आता हुडहुडी भरली होती. काय करावे हे आता तिला सुचत नव्हते. काही क्षण असेच गेले, आणि तिला तिच्या समोर एक धूसर पांढरी मुलीची आकृती दिसली. ती इतकी घाबरली की, त्या पाण्यातच बेशुद्ध पडली. ती आकृती तिच्या जवळ आली. तिच्यावर वाकली आणि....

काय झालं पुढे? सायलीची होती का ती आकृती? की त्या मांत्रिकाची काही नवी चाल होती? वाचणार का अवनी? की येणार त्या मांत्रिकांच्या लक्षात? मंदार आणि हृषीकेश ह्या दोघांना काय दिसलं समोर? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all