ते झपाटलेलं बेट : भाग १९

A Person Faces Paranormal Activities In His Life.


ते झपाटलेलं बेट

भाग १९

आतून पूर्ण रिकामं घर बघून मंदारने त्याची झोळी उघडली आणि तितक्यात पाठीमागून एक भसाडा आवाज आला.

" खबरदार कोणी जागचं हललं तर. डोक्याच्या चिंध्या करेन एकेकाच्या. इकडे तोंड करा आणि गुडघ्यावर खाली बसा" , तो माणूस म्हणाला.

त्याच्या आवाजात अशी जरब आणि धाक होता की, सगळे निमूट मागे वळले. मागे सहा माणसं उभी होती. अतिशय गलिच्छ अवतारात असणाऱ्या त्या माणसांच्या हातात पिस्तुलं होती. त्यांच्या डोळ्यांत खुनशीपणा पुरेपूर दिसत होता. तोंडात तंबाखूचा तोबरा होता. एका नजरेत विवेक आणि अजयने त्यांना पाहून घेतलं. त्यातल्या पक्याभाऊला अजयने चटकन ओळखलं. आत्तापर्यंत अजयने त्याला किमान वीस वेळा पकडलं होतं. तो तितक्या वेळेला सुटून बाहेर आला होता. कोणाच्यातरी जबरदस्त वशिल्याचं तट्टू होतं ते.

अजयला पाहून तो पचकन थुंकला .आणि दात विचकून हसायला लागला. " बरा सापडलास. आता तुला इथून काही मी जिवंत जाऊ देत नाही. जितक्या वेळेला तू मला आत अडकवलंस, तितक्या गोळ्या तुझ्या टाळक्यात घातल्याशिवाय मला चैन पडायचं नाही", तो म्हणाला.

त्यावर अजय फक्त हसला. कारण त्याला ठाऊक होतं की विवेकचं डोकं भडकलं असणार. आणि विवेक देखील पोलीस ऑफिसर आहे, ते त्या पक्याभाऊला ठाऊक नव्हतं.

अजयने वळून विवेककडे पाहिलं आणि त्यांच्यात नेत्रपल्लवी झाली. जणू काही सराव केल्याप्रमाणे त्या दोघांची हालचाल झाली. पक्याभाऊचं सगळं लक्ष अजयवर असल्याने विवेकला संधीच मिळाली. कोणालाही काहीही समजायच्या आत पक्याभाऊ वेगाने जमिनीवर आदळला. विवेकने वेगाने जोरात उडी मारून त्याच्या जबड्यावर जबरदस्त लाथ घातली होती. त्याचे पुढचे सगळे दात तुटून बाहेर पडले होते. आणि दोन्ही हातांनी जबडा आवळून तो विव्हळत होता. त्या मागच्या गुंडांना भानावर यायला काही क्षण लागले. तोपर्यंत अजयने आणि विवेकने अक्षरशः धुलाई चालू केली होती. विजेच्या वेगाने दोघांचे हातपाय चालत होते. डावीकडे असलेल्या दोघांच्या गळ्याला अजयने धरून भिंतीला दाबून धरलं. काही क्षणातच ते बधिर झाल्यावर त्यांची डोकी धरून त्याने अतिशय जोराने एकमेकांवर आपटवली होती. अकस्मात झालेल्या ह्या टकरीने दोघंही सुन्न होऊन वेडेवाकडे खाली कोसळले होते.

तिकडे विवेकने दोघांना असंच लाथा बुक्क्या मारून हैराण केलं होतं. विवेकला मारणं तर सोडाच, पण ते त्याला स्पर्श देखील करू शकत नव्हते. इतका तो चपळ होता. वाऱ्याच्या वेगाने त्याचे हातपाय चालत होते. उरलेला एक जण मात्र हे बघून कधीच परागंदा झाला होता. गंमत म्हणजे हे सगळं काही क्षणात घडलं होतं. आत्ता त्यांच्या हातात पिस्तुल होतं आणि आत्ता ते विव्हळत जमीनीवर पडले होते.

मंदार आणि हृषीकेश फक्त बघत होते. मंदारला हे नवीन नसलं तरी हृषीकेशला मात्र नक्कीच होतं. त्याचा आश्चर्य वाटून आ केलेला जबडा तसाच उघडा होता. तो बंद करायचं भान देखील त्याला नव्हतं.

कोणी काही बोलणार इतक्यात त्या दोघांच्या मागे त्यांना चार मुली दिसल्या. हात मागे बांधलेल्या, तोंडात बोळा कोंबलेल्या अवस्थेत असलेल्या ह्या मुली आधीच घाबरल्या होत्या, रडत होत्या. त्यात ही अशी सिनेमा सारखी मारामारी बघून अजूनच केविलवाणा चेहरा करून उभ्या होत्या. पण त्यातली एक मात्र अतिशय खुश झाली होती. कारण तिला तिथे अजय दिसला होता. पटकन हे दोघं धावले. त्या मुलींना मोकळं केलं. आणि अतीव आश्चर्याने अजय त्या मुलीकडे बघू लागला. ती दुसरी तिसरी कोणी नसून चक्क निशा होती. म्हणजे हिंदी सिनेमात जेवढा योगायोग नसतो, तेवढा इथे घडला होता.

निशाने सरळ त्याला करकचून मिठी मारली. तिला ह्या क्षणी तरी दुसरं कोणीच दिसत नव्हतं. भीती, शरम ह्याच्या पलीकडे आता ती गेली होती.

अजय पटकन सावरला. तिला हळूच बाजूला करून त्याने तिच्या डोक्यावर हलकेच थोपटलं. तिला आश्वस्त केलं. थरथरणारी ती एकदम शांत झाली. बाकीच्या मुली देखील आता शांत झाल्या होत्या. विवेकने त्यांना चटकन पाणी दिलं. त्यांना बसवलं. आणि ते दोघं परत त्या गुंडांकडे वळले. त्याच घरातल्या दोऱ्या आणून त्यांना त्या आतल्या हॉलमध्ये दोघांनी बांधून ठेवलं. त्यांच्या तोंडात बोळा कोंबायला देखील दोघं विसरले नाहीत. त्यांचे मोबाईल देखील काढून घेतले. विवेकने ती भिंत सरकवली.

मंदार म्हणाला, " काय आहे हा प्रकार, विवेक"?

विवेक म्हणाला, " मी सांगितलं होतं बघ, की हे गुंड मुलींना पळवून विकतात. अंदमानच्या बेटांवर ह्यांचा बॉस आहे. रंगा आणि सुख्या ह्या अशाच पंचवीस मुलींना घेऊन निघाला होता. मी पण त्यांच्याबरोबर होतो. त्याचवेळी ते वादळ आलं आणि आम्ही त्या बेटावर अडकलो", क्षणभर अवनीची आठवण येऊन त्याच्या डोळ्यांची कड ओलावली. बोलता बोलता तो स्वतःशीच विचार करत होता. जिवंत असेल अवनी की, त्या नराधम लोकांनी विकलं असेल तिला? तिच्या देहाचे लचके तोडले असतील त्या हरामखोरांनी की, सुटली असेल ती त्यांच्या तावडीतून? काहीच क्षण ते दोघं बरोबर होते, पण विवेक पुरता अडकला होता तिच्यात. तिला धरून नेताना, तिला उचलून घेताना झालेला तो तिचा नाजूक, धुंदावणारा स्पर्श!

स्वतःच स्वतःत हरवलेल्या त्याच्या पाठीवर एक हलकीशी थाप पडली. वळून बघतो तर अजय होता. " साल्या, तुझ्यासाठी मी तिला कुठूनही शोधून आणेन. अगदी कुठेही असली माझी वहिनी तरी मी आणेन. त्यासाठी मला जीव गमवावा लागला तरी बेहत्तर. पण तोपर्यंत मला एक वचन दे! डोळ्यांत काहीही झालं तरी पाणी आणायचं नाही. मी सगळं बघू शकतो, हे नाही". हे ऐकून विवेकने अजयला घट्ट मिठी मारली.

काही क्षण भावुक अवस्थेत गेल्यावर हृषीकेश म्हणाला, " काय सॉल्लिड भारी आहात यार तुम्ही! एकदम हॉलिवूडच्या ऍक्शन हिरोची आठवण आली. मी प्रथम लाईव्ह अशी फायटिंग पाहिली. मी तर फॅन झालो यार तुमचे. ऑसम".

दोघंही मंद हसले. हसताना अजयचं लक्ष निशाकडे गेलं. कोणाचं लक्ष नाही असं बघून निशाने त्याला चक्क डोळा मारला. अजय दचकला. ती बोल्ड आहे हे, त्याला कळलं होतं. पण इतकी असेल असं नव्हतं वाटलं.

तेवढ्यात विवेक पटकन जोरात हसला आणि निशाने लाजायच्या ऐवजी तोच लाजला.

मंदार म्हणाला, " ह्या गडबडीत चांगला अर्धा तास वाया गेलाय. मला इथे आधी माझं काम करू द्या. बाकी बडबड बंद करा, नाहीतर जरावेळ बाहेर थांबा. मी साधारण पाऊण तासात बाहेर येतो".

हृषीकेश म्हणाला, " मंदार, दोस्ता, निदान हे घर तरी जाळू नकोस".

मंदारने त्याच्याकडे एकच असा कटाक्ष टाकला की, त्याची बोलतीच बंद झाली. आणि सगळे बाहेर आले.

बाहेर आल्यावर अजयने निशाला विचारलं, " तू कशी सापडलीस ह्यांच्या जाळ्यात? तुला तर चालता पण येत नव्हतं. मग बाहेर कशी आलीस? की त्या माणसांनी घरून उचललं तुला"?

तिनं लटक्या रागाचा एक कटाक्ष टाकला. ती म्हणाली, " पहाटे फिरायला बाहेर पडले होते. रस्त्यावर दिवे नव्हते. रस्ता चुकले आणि ह्या मंडळींच्या तावडीत सापडले. पाय रात्री शेकला आणि बरा झाला. कळलं ना? मी काही मुद्दाम नाही पडले बरं का काल रात्री".

अशाच गप्पा चालू असताना एक जोरदार किंकाळी ऐकू आली. आवाज त्या घरातून येत होता. पण तो आवाज मंदारचा नव्हता.

मग कोणाचा असेल तो आवाज? कोण किंचाळत होतं? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all