ते झपाटलेलं बेट : भाग १८

A Person Faces Paranormal Activities On His Life


ते झपाटलेलं बेट

भाग १८

वळून तो म्हणाला, " हे विडे आपल्या प्राणांशी मी दैवी आशिर्वादाने बांधून ठेवले आहेत. आपल्याला काहीही झालं तरच हे विडे वाळतील. अन्यथा आपल्याला कितीही दिवस, महिने, वर्षे लागली, तरीही हे विडे असेच राहतील. इथे असलेल्या माझ्या माणसांना जर हे विडे वाळलेले दिसले, तर ते समजून जातील. आणि माझी वाट न बघता, माझ्या वारसदाराला इथे बोलावतील". त्याच्या चेहऱ्यावर असलेलं मंद स्मित त्याचा आत्मविश्वास, त्याच्या विद्येचं त्याला असलेलं ज्ञान हे सगळं दाखवत होतं. त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते. मुख्य म्हणजे त्यात कुठेही जीवाची पर्वा, मरणाची भीती, अमानवी शक्तींची घृणा, अथवा त्यांची दहशत दिसत नव्हती. त्याचे डोळे शांतपणा आणि तेज ह्यांचा अद्भुत मिलाफ होते.

विवेक म्हणाला, " तुझ्या शक्तीचा परिचय मी घेतलाय अनेकदा. पण लांबून. म्हणजे अजित कुलकर्णी सरांबरोबर. तेव्हा मी प्रत्यक्ष काम कधीच केलं नव्हतं तुझ्याबरोबर. आज ती वेळ आली आहे".

मंदारने तेच स्मित ओठांवर खेळवत देवापाशी ठेवलेले तीन काळे धागे उचलले आणि तिघांना गळ्यात घालायला दिले. ते गळ्याशी अगदी फिट बसत होते.

तो म्हणाला, " इकडचं जग तिकडं झालं तरीही हे धागे काढायचे नाहीत. काहीही होऊ देत, पण हे लक्षात ठेवा".

एव्हाना साडेपाच झाले होते. पक्षी किलबिल करत होते. पहाटेचा गार वारा अंगाला रोमांचित करत होता. फुलांचा सुगंध मन उल्हसित करत होता.

मंदार, विवेक, अजय आणि हृषीकेश चौघंही मंदारच्या गाडीतून निघाले. त्याच्याकडे कसलीशी झोळी होती. आणि बाकी मंडळींकडे त्यांची त्यांची सॅक.

पहाटेचा गार वारा अंगाला चांगलाच झोंबत होता. पौर्णिमा अगदी दोन दिवसांवर आली होती. म्हणून ह्यांना घाई करणं फार आवश्यक होतं.

गाडी दक्षिणपेठ ह्या वस्तीत शिरली आणि मंदारमध्ये लक्षणीय बदल दिसून आला. तो काहीतरी वास घेत असल्याचे त्याच्या नाकपुड्यांच्या हालचालीवरून वाटत होते. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे मंद स्मित आले होते. ज्यात काहीतरी भयानक दडलंय असं वाटत होतं. जशी गाडी त्या झोपडीच्या अगदी नजीक आली, तशी त्याने गाडी थांबवली. त्याने बाकीच्यांना गाडीतून न उतरण्याची सक्त ताकीद केली. बाहेर उतरून त्याने झोळीतून एक डबी काढली. ती उघडून त्यातले काहीतरी त्या गाडीवर फुंकले. त्या वेळी तो काहीतरी पुटपुटत होता.

तो सरळ त्या झोपडीत चालत गेला. बराच वेळ झाला. जवळपास सकाळचे साडेसात वाजायला आले. तरीही तो बाहेर आला नाही. ते तिथे सहा वाजताच पोहोचले होते. दीड तास झाला तो आत होता. बाकीच्यांची चुळबूळ वाढू लागली.

हृषीकेश म्हणाला, " मी बघून येऊ का? इतका का वेळ लागतोय"?

विवेक म्हणाला, " अजिबात नाही. मान्य आहे की, त्याला वेळ लागतोय. आपली पण चुळबूळ चालली आहे. पण आत्ताच काय, पुढे पण त्याच्या एकाही आदेशाची पायमल्ली करायची नाही. नाहीतर जीव गमवायला वेळ लागणार नाही".

हृषीकेश काहीच बोलला नाही. पण त्याला ते पटलेलं दिसलं नाही. तो काहीच उत्तर न देता बाहेर बघू लागला.

अजून पंधरा मिनिटं गेली. आतून मंदार बाहेर आला. त्याच्या बाहेर येण्याने तिन्ही मंडळींनी सुटकेचा निश्वास टाकला. पण एकच क्षण! पुढच्या क्षणी त्या झोपडीला आग लागली. कापरासारखी ती झोपडी जळू लागली. मंदारच्या चेहऱ्यावर तेच मंद स्मित होतं. ती झोपडी मागे जळतेय, ह्याचं काहीही विशेष त्याला वाटलेलं दिसलं नाही. तो शांतपणे गाडीत बसला आणि त्याने गाडी सुरू केली. मागे वस्तीतली माणसं त्या झोपडीकडे बघत बसली होती. पण कोणीच पुढे आलं नाही. ती झोपडी जळत होती, तरी लोकांना तिची दहशत वाटत होती.

गाडी पुढे आली, तरी एकाचंही त्याला काय झालं, हे विचारायचं डेअरिंग नव्हतं. गाडीत पूर्ण शांतता पसरली होती. जसा समुद्रकिनारा जवळ आला, तसा मंदारने गाडीचा वेग कमी केला.

अजयने विचारलं, " आता इथून आपण कसं जायचं? बोट किंवा नाव लागेल आपल्याला! पण आत्ता इथे कुठे मिळेल असं वाटत नाही. इथे तर कोणीच दिसत नाहीये".

मंदार म्हणाला, " आता एकदा सोपवलं ना माझ्यावर? मग कशाचाही विचार करायचा नाही. फक्त माझ्या सूचना पाळायच्या, बस. अजून बरोबर दोन तासांनी इथे एक लॉंच येईल. मला इथे थोडं काम आहे. आधी आपण खाऊन घेऊ. खाताना तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मी देईन".

सगळ्यांनी माना डोलावल्या. नाहीतरी सगळ्यांना भूक लागलीच होती. येताना आणलेलं वडापावचं पार्सल त्यांनी काढलं. आणि मनसोक्त खाऊन घेतलं. त्यानंतर सगळेच झाडामागे जाऊन फ्रेश होऊन आले.

नंतर त्याने सगळ्यांना एके ठिकाणी सावलीत बसवलं आणि मगाशी घडलेली गोष्ट तो सांगू लागला. ते सगळे जेव्हा त्या वस्तीत शिरले, तेव्हाच त्याला त्या झोपडीच्या आत असलेल्या अमानवी शक्तीची जाणीव झाली होती. अनेक नरबळी तिथे अतृप्त अवस्थेत होते. त्यांची मुंडकी तिथे झोपडीच्या भिंतींना माळा करून लटकवून ठेवली होती. दुष्ट आणि क्रूर शक्तीचं प्रतीक होती ही झोपडी म्हणजे. आत ते आत्मे, त्यांचे सांगाडे सगळंच त्रासदायक होतं. त्याने आत जाऊन तिथल्या धुनीला चेतवलं. काही मंत्र म्हणून, काही इतर विधी करून त्याने ते सगळे सांगाडे, मुंडकी त्या धुनीच्या अग्नीत जाळून टाकले. त्याचबरोबर एका मांजराचं शव पण होतं. तेही त्याने जाळून टाकलं. सगळे सांगाडे आणि इतर घाणेरड्या गोष्टी जाळून टाकल्याने त्या झोपडीत असलेली दुष्ट शक्ती निघून गेली. ते आत्मे मुक्त झाले. आणि क्रौर्याचं प्रतीक असलेली ती झोपडी देखील जळून खाक झाली.

त्यावर हृषीकेश म्हणाला, " मंदार, अरे तू मला बोलवायला हवं होतंस. मी का आलोय तुझ्याबरोबर? मला हे सगळं अभ्यासायचं आहे. मला हा अनुभव हवा होता. सगळी मजाच गेली यार! छे"!

मंदार प्रथमच खूप मोकळं हसला. आणि त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाला, " वेड्या, सोपं वाटलं का हे तुला? जीव गमावशील तुझा. हे काही साधे आत्मे नव्हेत. अत्यंत खुनशी, क्रूर, अमानवी, अभद्र अशा शक्तींशी टक्कर आहे आपली. तू कर अभ्यास की! घे अनुभव! पण इथे नाही. त्या बेटावर . आता मला थोडं काम करू दे. विवेक, मला ते घर दाखव, जिथे त्या मुलींना ठेवलं होतं".

विवेकने ते घर दाखवलं. सगळे आत गेले. आतून पूर्ण रिकामं घर बघून मंदारने त्याची झोळी उघडली आणि तितक्यात ....

काय घडलं तितक्यात? काय काम होतं तिथे मंदारचं? कसे जाणार ते त्या बेटावर? सफल होणार का त्यांचा हेतू? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all