ते झपाटलेलं बेट : भाग १३

A Person Faces Paranormal Activities In His Life


ते झपाटलेलं बेट

भाग १३

कशीबशी सायली त्या झाडावर चढली आणि काही मदत मिळतेय का बघत होती. तडफडत होती ती अक्षरश:. खाली असलेला लाकडात परिवर्तन झालेला तिचा लाडका आदित्य, तिला दिसत होता. हळूहळू तिचा श्वास बंद पडत चालला होता. अखेर एक क्षण आला आणि तिने अश्रूभरल्या डोळ्यांनी एकदाच ती आदित्यची लाकडी मूर्ती बघितली आणि प्राण सोडले.

ते दोन मांत्रिक आणि त्यांनी निर्माण केलेलं ते अमानवी हिडीस रूप त्या क्षणी तरी तिथून निघून गेलं होतं. पण मागे ठेवून गेलं होतं एक नृशंस हत्याकांड. काळ्या जादूने घडवलेलं वादळ, पाऊस, वीज आणि अनेक जीवांच्या अपुऱ्या इच्छा, स्वप्न, आकांक्षा, हसू, आसू सगळंच!

त्या अखेरच्या क्षणी उद्भवलेला प्राणासाठीचा आकांत काहीतरी अमानवी असं त्या बेटावर जागवून गेला होता. तो शेवटचा क्षण त्या मंडळींच्या शरीराला मुक्त करून गेला होता. पण आत्मा? तो तर त्या शेवटच्या क्षणाच्या भयानक आकांतात अडकून पडला होता.

त्याला आता अमानवी रूप प्राप्त झालं होतं. त्या रात्री वीज पडल्यावर इकडे तिकडे पळालेले सगळे असेच जीव वाचवण्यासाठी आसरा शोधत होते. पण त्यांचीही तीच गत झाली होती. कोणीही वाचले नव्हते. त्या मांत्रिकाच्या हातातल्या त्या अभद्र, अमानवी आकृतीने त्यांचाही असाच बळी घेतला होता. पाचशे सत्तर माणसं त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मिळून बळी पडली होती. एक लालसा, एक हाव, त्या रत्नहाराची हाव त्या जीवांना मारून सुद्धा शमली नव्हती. कारण त्या मांत्रिकांना ती रत्नहाराची जोडी मिळाली नव्हती. सगळ्यासकट ती जोडी देखील तळाशी गेली होती. आता त्या मंत्रिकांना पाण्यात उतरून त्या जहाजावर असलेली तिजोरी वर आणावी लागणार होती. पण हे काम सोपं नव्हतं. कारण एव्हाना एंजल क्रूझ बुडल्याची बातमी सगळीकडे झाली असणार होती. म्हणजे आता नेव्ही वाले त्या शिपचा शोध घेण्यासाठी तिथे येणार होते. त्यामुळेच खरं तर ह्या दोन मांत्रिक म्हणजेच चोरांची पंचाईत झाली होती. नेव्हीच्या बोटी तिथे पोहोचायच्या आत हे काम कसे करता येईल, ह्याचा आता ते मांत्रिक विचार करत होते.

त्यांनी निर्माण केलेलं ती हिडीस आकृती पाण्यात जाऊन ती तिजोरी आणू शकणार नव्हती. कारण मुळात तो एक अतिशय दुष्ट असा आत्मा होता. जो पाण्याला घाबरत होता. त्याचा मृत्यू पाण्यात बुडूनच झाला होता. त्या मुळे ते बुडलेलं शरीर गेलं, तरी ती भयानक श्वास कोंडून मारणारी जाणीव त्या आत्म्यावर खोल उमटली होती. म्हणजे आता त्यांनाच लगेच जायला हवं होतं.

ते दोघं सायलीला तिथेच ठेवून ताबडतोब त्या किनाऱ्यावर गेले आणि त्यांनी बिनदिक्कत आत समुद्रात खोल शिरायला सुरुवात केली. पाण्यात त्यांची कोणतीही जादू, कोणताही आत्मा, काहीही प्रभावी नव्हतं.

ते भराभर पोहत पोहत, मध्येमध्ये पाण्यावर येऊन श्वास घेत, ते जहाज शोधत चालले होते. अखेर एकाला ते जहाज दिसलंच. त्याने पटकन दुसऱ्याला सांगितलं आणि दोघंही तिथे पोहोचले. पाण्यावर येऊन श्वास घेऊन ते परत तिथे गेले. आत शिरून आतले थोडे बघून परत वर आले. ऑक्सिजन शिवाय हे काम शक्य नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. एकजण जो जास्त तरुण होता, तो दीर्घ श्वास घेऊन परत खाली गेला. आणि आत शिरून त्याने ऑक्सिजन सिलिंडर शोधायचा प्रयत्न केला. तीन चार फेऱ्यांत त्याला यश आलं. ऑक्सिजन सिलिंडर, आणि त्याचा मास्क, नळी, रेग्युलेटर असं सगळंच एकत्र त्याला मिळालं. ते घेऊन तो वर आला. थोडा दम घेऊन त्याने ते सगळं चढवून परत आत गेला. दुसरा सेट घेऊन तो पुन्हा वर आला. आता दुसऱ्याने पण तो सेट चढवून आत उडी मारली. दोघांनी मिळून सगळं शिप धुंडाळून तिजोरी शोधलीच. पण ती तिजोरी साधी सुधी नाही, तर एका अतिशय जाड पोलादी पत्र्याला वेल्डिंग करून अटॅच केली होती. परत त्यांनी तिथे तो गॅस कटर शोधला. आणि ती तिजोरी असलेला पत्रा मोठ्या मेहनतीने कट करून मोकळा केला. एकाने वर जाऊन मजबूत जंगली वेलींची दोरी आणली. तिला हा कापलेला पत्रा जोडून तो वर ओढून घेतला.

अर्थात ह्यातलं काहीही त्यांना सहज शक्य नव्हतं. त्यांच्या नशिबाने तो गॅस कटर पाण्यात चालणारा होता. त्यामुळे त्यांना तो पत्रा जरी मोकळा करता आला होता, तरी तो वर ओढताना त्यांची अतिशय दमछाक झाली. कसाबसा त्यांनी तो मोठा पत्रा ओढत किनाऱ्यावर आणला. त्यानंतर अतिश्रम झाल्याने दोघं थोडावेळ तिथेच वाळूत पडून राहिले. पुढचं काम सोपं होतं. दोघांनी चटकन गुहेत जाऊन त्यांची नेहमीची साधना करून त्या अभद्र आकृतीला बोलावलं. तिला सांगून, तो पत्रा दूर जंगलात नेला.

ती आकृती त्यांचा अक्षरशः गुलाम होती. त्या आकृतीने सायली मृत झालेल्या झाडापाशी जवळच तो पत्रा टाकला. त्यानंतर त्यातल्या एका मांत्रिकाने त्या आकृतीला त्यावर माती झाकून टाकायला सांगितलं. म्हणजे कोणीही शोध घेतला तरी, तिथे एक जाड पत्रा आणि त्याला वेल्ड केलेली तिजोरी आहे, हे समजलं नसतं. कारण त्या बेटावर माणसांचा शोध घेण्यात येणार होताच. त्याची कल्पना त्यांना होती. त्यामुळे त्यांनी आत्ता तात्पुरती ही सोय केली होती. हे सगळं प्रकरण, ही सगळी शोधमोहीम काही काळाने थंडावली, की मगच हे दोघं ती तिजोरी मोकळी करून आतला ऐवज बाहेर काढणार होते.

त्यांची अटकळ खरी ठरली. काही वेळातच हेलिकॉप्टर्स त्या समुद्रावर आणि बेटावर घिरट्या घालू लागली. पण त्यांना काहीही सुगावा लागण्याची चिन्ह दिसेना. थोड्या वेळाने अजून काही हेलिकॉप्टर्स तिथे आली. पण त्या घनदाट अरण्यात काय दिसणार? काही बोटी देखील आल्या. त्यांना मात्र त्या समुद्रात त्यांना बुडलेलं शिप दिसलं. अनेक पाणबुडे आले. त्यांनी त्या जहाजाचा शोध घेतला. मोठ्या क्रेनने त्यांनी ते शिप दुसऱ्या प्रचंड मोठ्या जहाजावर ओढून घेतलं.

पण त्यांना त्यावर तो खजिना मिळणार नव्हता. त्यामुळे अजूनच शोध घेतला जाणार होता. कारण तो खजिना! अतिशय अमूल्य! भारत सरकार आणि नेव्ही नक्कीच गप्प बसणार नव्हते. घातपात झाला असा संशय त्यांना येणारच होता.

म्हणूनच त्यांनी त्या आकृतीला त्या पत्र्यावर माती, दगड टाकून झाकायला लावलं होतं. हेतू हाच की, वरून ती टेकडी वाटावी.

पण मग त्या आकृतीला त्यांनी लगेच तिजोरी फोडून रत्नहार काढायला का नाही सांगितलं? ते त्या आकृतीला अशक्य नव्हतं. मग असं का? त्या दोन दुष्ट माणसांना रत्नहाराची जोडी मिळाली का? आणि अजयच्या अंगावर पडलेला सांगाडा हा सायलीचाच होता का? कसल्या खड्ड्यात हे दोघं पडले होते? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all