ते झपाटलेलं बेट : भाग ९

A Person Faces Paranormal Activities On His Life


ते झपाटलेलं बेट

भाग ९

चिरका आवाज ऐकून दोघेही दचकले. " कसला आवाज आला रे? शहारे आले अंगावर", अजय म्हणाला.

" धातू असावा खाली, असा आवाज होता तो", विवेक म्हणाला. " खात्री कर बरं परत एकदा".

अजयने परत ती काडी घासली आणि तसाच आवाज आला. मग विवेकने हाताने ठोकून बघितलं, तर बद्द आवाज आला. आता दोघांची खात्रीच झाली की, खाली धातू आहे. दोघांनी चटकन हातानेच वरची माती दूर करायला सुरुवात केली. फार श्रम पडले नाहीत त्यांना. वरची माती दूर झाली आणि आत त्यांना गंजलेला पत्रा दिसू लागला. खूपच गंजला होता तो. त्यांनी आजूबाजूला अजून बरंच साफसूफ करून बघितलं. एक मोठाच्या मोठा पत्रा वाटत होता तो. त्यावर काहीतरी लिहिलेलं दिसत होतं. बऱ्याच प्रयत्नाने त्यांना ते वाचता आलं. एंजल नावाचं जहाज होतं ते.

एंजल क्रूझ असं नाव वाचून विवेक म्हणाला, " कुठेतरी ऐकलंय रे हे नाव. आत्ता काही आठवत नाहीये, पण खूप ऐकल्यासारखं वाटतंय.

जोरात वीज चमकली आणि दोघंही दचकले. पाऊस आता ओतल्यासारखा पडत होता. आत पाणी घुसायला लागलं होतं. दोघंही अजून आत सरकले. समोरच मोठा दगड होता. त्या मागचं ते आता राक्षसी हसू हसत होतं. ते मागचं म्हणजे छोट्या छोट्या वीतभर उंचीच्या असंख्य काळ्या आकृत्या होत्या. त्या हलत होत्या, डुलत होत्या. अभद्र, विकृत हसत होत्या. त्यांना आसुरी आनंद झाला होता. त्यांना काहीच जिवंत गोष्टी आवडत नव्हत्या. आता हे दोघेही त्यांच्या तावडीत सापडले होते.

त्यांना आता ते जिवंत सोडणार नव्हते. त्यांच्या जगात ह्या दोघांचा प्रवेश निश्चित होता. फक्त विशिष्ट वेळेची वाट त्या आकृत्या बघत होत्या. पाच दिवसांनी पौर्णिमा होती. त्या दिवशी चंद्रग्रहण देखील होते. रात्री ग्रहणाच्या वेळेस समुद्राला भेरतीचं उधाण येणार होतं. त्या वेळेस ह्या दोघांच्या आयुष्याचा क्रूर अंत होणार होता. त्यांना ते ठाऊक नव्हतं..... पाणी वाढत चाललं होतं. अजून आत शिरत होतं. तसेहे दोघं ते अजून आत आत शिरत होते. पाऊस, वादळ वाढत चाललं होतं....

हे सगळं चालू असताना लांबवर एका गुहेत एक मोठी धुनी पेटली होती. त्या गुहेत सगळीकडे ओलसर शेवाळ माजलं होतं. अतिशय भारलेलं वातावरण होतं तिथे. ज्वाला उसळत होत्या. त्यात कसल्याशा आहुती पडत होत्या. बाजूला बसलेले दोन मांत्रिक एका गंभीर सुरात मंत्र म्हणत होते. एका कोपऱ्यात वेताळाची एक मोठी दगडी मूर्ती होती. त्या मूर्तीचे डोळे लाल गुंजाप्रमाणे दिसत होते. तिच्या तोंडावर असलेलं भेसूर हास्य त्या मूर्तीच्या भयाण अस्तित्वात भर घालत होतं. वाळल्या रक्ताने माखलेली ती मूर्ती साधारण दहा फूट उंचीची होती. त्या मूर्तीच्या गळ्यात मानवी कवट्यांची माळ होती. त्या कवट्यांना डोक्याच्या हाडाला बरोबर मधोमध छिद्र होती. त्यातून एक जंगली मजबूत वेल ओवली होती. त्या मूर्तीच्या हातात एक विचित्र शस्त्र होते. त्या शास्त्राला हातात धरायला एक दांडा होता. त्याच्या एका टोकाला चंद्रकोर होती. ती अतिशय धारदार होती. त्यावर वाळलेलं रक्त दिसत होतं.

ती चंद्रकोर जिथे त्या दांड्याला जोडली होती, तिथे एक छोटं छिद्र होतं. त्यात एक खिट्टी अडकवली होती आणि त्याला एक दगडी हातोडा जोडलेला होता. ती खिट्टी ओढल्यावर तो हातोडा एकशेवीस डिग्रीत वाकत असे. म्हणजे ती चंद्रकोर जेव्हा व्यक्तीच्या गळ्यावर असे, तेव्हा तो हातोडा त्या माणसाच्या डोक्यात मारता येत असे. अतिशय वेदनादायक असं मरण माणसाला येत असे. त्या हातोड्याने त्याच्या कवटीला छिद्र पडत असे. त्या वेताळाला हे मांत्रिक दर अमावास्या आणि पौर्णिमेला नरबळी देत असत. त्यांच्या पुढ्यात आत्ता अठरा पुरुष आणि पंचवीस मुली बांधून पडल्या होत्या. ते सगळे टक्क जागे होते. आणि अतिशय भयभीत होते. दुपारचे बारा वाजले होते. बरोबर बारा वाजता त्यांच्यातला एक जण उठला आणि कसलेसे पाणी त्या सगळ्यांच्या अंगावर शिंपडले.

त्या बरोबर ते सगळे शहारले. त्यांच्या तोंडात बोळा असल्याने सगळे मुसमुसुन रडत होते. त्यांच्याकडे बघत आता दुसरा मांत्रिक उठला. त्याने त्यांच्याभोवती तांदुळाचे एक रिंगण काढले. धुनीसमोर ठेवलेली एक उलटी ठेवलेली कवटी उचलली. त्यातले रक्त त्याने त्या तांदुळाच्या रिंगणावर शिंपडले. आणि कसलेसे भस्म त्या गुहेच्या दारावर फुंकरले. त्या बरोबर त्या गुहेच्या दारावर अदृष्य असा एक पडदा तयार झाला. इतर कोणी जीवजंतू आत शिरू नये, म्हणून भस्म रक्षाकवचाने त्या मांत्रिकाने त्या गुहेचे रक्षण केले होते. त्यानंतर ते दोघे बाहेर निघून गेले. धुनी तशीच पेटलेली होती. गुहेत प्रचंड उकडत होते.

सगळ्यांना खूप तहान, भूक लागली होती. नैसर्गिक विधींची भावना झाली होती. पण काही इलाज नव्हता. मुलींची अवस्था तर फार बिकट झाली होती. तितक्यात एक अतिशय विचित्र दिसणारा माणूस आत आला आणि त्याने एक रस त्यांच्या सगळ्यांच्या तोंडात ओतला. त्या क्षणी सगळे निद्रेच्या आधीन झाले.

दोन्ही मांत्रिक बाहेर पडले आणि चालत चालत त्या गुहेच्या पाठीमागे गेले. तिथे झाडावर एक मचाण होतं. त्यावर छप्पर होतं. दोघं त्या झाडावर चढले आणि आत शिरून त्यांनी मडक्यात तयार असलेला भात त्यांनी खाऊन चटईवर अंग टाकले आणि निवांत घोरू लागले.

इकडे विवेक आणि अजय आत आत सरकत होते. आत सरकताना अजयचा तोल गेला आणि तो खाली पडला. जमिनीवर आपटायच्या ऐवजी तो एका खोल खड्ड्यात फेकला गेला. आणि हाक मारत असलेला विवेक त्याला अंधुकसा दिसला. तो जोरात खाली पडला. त्याच्या पाठीला आणि पायाला लागलं. त्याने खालूनच विवेकला हाक मारली. पण उत्तर यायच्या ऐवजी विवेकच त्याच्या पुढ्यात धप्पदिशी पडला.

अजय म्हणाला, " अरे हो हो मित्रा! लागलं ना? कशाला उडी मारायची? मला काही होत नाही, तुझ्यासारखा मित्र असताना".

विवेकने पाय चोळत उत्तर दिले, " गाढवा अरे, तेरे बिना क्या जीना? मी घाबरलो ना लेका"!

त्या खड्ड्यातून बाहेर कसं पडायचं, हा मोठा प्रश्न आता ह्या दोघांना पडला. विवेकने मोबाईलची टॉर्च पेटवली. त्या प्रकाशात त्यांना जे दिसलं त्याने त्यांची विचारशक्ती नष्ट झाली.


बरोबर दहा वर्षांपूर्वी.......

एंजल क्रूझ चेन्नईवरून अंदमानला जायला निघालं होतं. पहाटे साडेपाचची वेळ होती. तसं बऱ्यापैकी मोठं क्रूझ शिप होतं ते.

त्या जहाजाचा कॅप्टन होता, आदित्य. अतिशय हरहुन्नरी, हुशार आणि धाडसी व्यक्तिमत्त्व. कोणत्याही कठीण प्रसंगात चटकन योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता आणि स्टाफ सांभाळून घेण्याचं अतिशय उत्तम कौशल्य, ह्यामुळे तो वरिष्ठांना प्रिय होता. त्या दिवशी हवा अगदी चांगली होती, वादळाची मुळीच शक्यता नव्हती. त्यामुळे ठरल्या वेळी शिप निघालं.

आदित्य जाम आनंदात होता, कारण त्याची प्रेयसी त्याच्या बरोबर होती. ते शिपवरच साखरपुडा करणार होते. त्यामुळे त्या दोघांचे नातेवाईक, मित्रमंडळी सगळेच त्या शिपवर होते. एकूण पाचशे पॅसेंजर्स त्यावर होते. क्रू मिळून पाचशे सत्तर. शिवाय त्यावर एक अतिशय महत्वाची गोष्ट होती.

कोणती गोष्ट होती त्या शिपवर? काय झालं पुढे त्या शिपचं? त्याचा पत्रा त्या गुहेत कसा गेला? त्या वीतभर आकृत्या कसल्या होत्या? वाचणार का आता सगळे? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all