ते झपाटलेलं बेट : भाग ८

A Person Faces Paranormal Activities In His Life.


ते झपाटलेलं बेट

भाग ८

त्याला जाणवलं की, ती गुहा नाहीच. ते काहीतरी वेगळंच होतं. त्याने आत जायचं ठरवलं. कारण बाहेर पावसाचा जोर वाढत होता. जरी बाहेरून ती मातीची टेकडी दिसत असली, तरी ती आतून मातीची वाटत नव्हती. काय ते त्याच्या लक्षात येत नव्हतं, पण आतून ती माती वाटत नव्हती. सगळीकडे माती, धूळ, होतीच, पण दगड दिसत नव्हते. कसलातरी कुबट, सडका वास भरून राहिला होता. एकदम उलटी आली त्याला.....

इकडे विवेकच्या लक्षात आलं होतं की, तो रस्ता चुकला होता. बहुतेक पेरू तोडताना त्याची दिशेची काहीतरी गल्लत झाली होती. त्याने आता डिव्हाईस परत ऑन केलं आणि पुन्हा समुद्रकिनारा सर्च केला. त्याच्या दक्षिणेकडे त्याला कसलातरी सिग्नल मिळत होता. पण कशाचा ते त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याने परत एका उंच झाडावर जायचा प्लॅन केला आणि तो एका जवळच्या झाडावर चढला. वर अगदी गेल्यावर लांबवर त्याला काहीतरी चमकताना दिसलं.

त्याला तो समुद्र वाटला. त्याला ही भानगड कळेना. जमिनीवर वेगळा सिग्नल आणि उंचावर वेगळा सिग्नल! शेवटी त्याने त्या डिव्हाईसचा नाद सोडला आणि खाली उतरून त्या चमकत्या गोष्टींच्या दिशेने निघाला. बरंच चालल्यावर परत त्याने एका झाडाचा शेंडा गाठला आणि परत बघितलं, तर त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तो समुद्रच होता.

तो खाली उतरला आणि त्या दिशेने भराभरा चालू लागला. अचानक वातावरण बदलू लागलं. अंधारून आलं, जोरदार वारा सुटला. तो तसाच पुढे गेला तर पाऊस लागलाच त्याला. पण तो परवा न करता पुढे तसाच निघाला. पण एका क्षणी त्याला जाणवलं की, आता पाऊस इतका आहे की, पुढे जाणं त्याला कठीण वाटू लागलं. त्याने आश्रय घ्यायला म्हणून इकडे तिकडे बघू लागला. त्याला त्याच्या डाव्या बाजूला एक टेकडी दिसली आणि हायसं वाटून तिथे दिसणाऱ्या एका गुहेकडे तो चालू लागला. तिथे आल्यावर त्याला फार नवल वाटलं. ती गुहा वाटत नव्हती. पण तो एकदम सावध झाला कारण तिथल्या चिखलात बुटांचे ठसे उमटले होते. कोणीतरी आत गेलेलं दिसत होतं. तो सावधपणे आत शिरला. आत गेल्यावर त्याला जाणवलं की बाहेरून ती मातीची टेकडी वाटत असली तरी आतून नव्हती. आत काहीतरी वेगळं असलं तरी ते काय आहे, हे काही त्याच्या लक्षात येईना. आत कसला तरी कुबट, सडका वास भरून राहिला होता.

इतक्यात त्याला अतिशय चिरपरिचित आवाज ऐकू आला. अजयचा! त्याच्या जिवलग मित्राचा! त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसेना. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. अजय त्याच्याकडे येत होता. विवेक देखील धावला आणि दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. एकमेकांच्या कहाण्या एकमेकांना सांगून झाल्यावर दोघंही ह्या परिस्थितीत काय करता येईल, ह्याचा विचार करू लागले.

अजय म्हणाला, " बहुतेक त्या गुंडांनी आपल्याला इथे टाकून दिलं असावं. आणि त्या मुलींना घेऊन ते निघून गेले असावेत. आणि आपली माणसं कुठे आहेत, तेही कोडंच आहे".

विवेक म्हणाला, " मलाही हेच वाटतंय. ह्याच बेटावर असतील आपली माणसं. पण आपल्याला असं वेगवेगळं का टाकलं असेल? आणि तो बंगला कुठे असेल? निदान तिथे पोहोचलो तर आश्रय मिळेल आणि नक्की काय झालं, ह्याचा उलगडा देखील होईल. आणि त्या मुलीला देखील ह्या नालायकांनी नक्की पळवलं असेल. एकदा फक्त ही माणसं माझ्या हातात सापडू दे. तुला सांगतो अज्जू, ह्या ह्या माझ्या हाताने त्यांची मुंडी मुरगाळून ठेवणार आहे बघ! मला वाटतं, पाऊस कमी झाला की, आपण इथून बाहेर पडू आणि आधी किनारा गाठू. नक्की काहीतरी मार्ग दिसेल".

पाऊस कमी व्हायचं नाव घेत नव्हता. पण त्यांना माहिती नव्हतं. कळलं असतं तर ते नक्की हादरले असते. ते ज्या भागात होते, पाऊस, वादळ फक्त तिथेच होतं. तेवढ्याच भागात.

आज दसरा होता. खरं तर अत्यंत शुभ दिवस. पण ह्याच दिवशी अशुभाचं सावट त्यांच्यावर पडलं होतं.

त्यांच्यावर तिथे कोणीतरी लक्ष ठेवून होतं. दगडाच्या आडून बघणारं ते स्वतःशीच विकृत हसत होतं. ह्या दोघांना वाटत होतं, तितकं आता त्या गुहेतून बाहेर जाणं सहज शक्य नव्हतं. ते आता सावज झाले होते, त्या अभद्राचे. त्यांची सुटका होणं अवघड होतं.

त्यांना माहिती नव्हतं, ते ज्या बंगल्यात उतरले होते, तो केवळ मायावी भास होता. ह्या सगळ्यांना जाळ्यात पकडणारा. ना ती मुलगी खरी होती, ना तिचं ते अप्रतिम लावण्य, ना तो फुलांचा सुगंध, ना तो बंगला.

विवेक म्हणाला, " काय रे हा पाऊस, वादळ! काय ठरवलं होतं, आणि काय झालं! वैताग साला. पण काय रे, ते गुंड अंदमानच्या दिशेने केव्हाच गेले असतील. आता त्यांना धरायचं कसं, हाच मोठा प्रश्न आहे. आणि अजय मला तुला एक सांगायचं आहे रे. मला त्यातली एक मुलगी सॉल्लिड आवडली होती रे. अवनी नाव तिचं! एक तर देखणी, हुशार, आणि चाणाक्ष. होईल का रे तिची भेट? यार, मला फार आठवण येतेय तिची. अगदी काही क्षणच ती आणि मी एकमेकांशी बोललो होतो. पण तितक्यात देखील तिनं माझं मन चोरलं रे. फिल्मी वाटेल माझं वाक्य, पण दिल जीत लिया यार! पण आता काय उपयोग? मला भेटेल का रे ती परत? जायला हवं ना आपण लवकरात लवकर अंदमानला? मला तिला काहीही करून सोडवायचं आहे". उदास स्वरात तो हे बोलत खाली बसला.

" अच्छा, तो ये बात है जानेमन! साल्या, लेका शेवटी फसलास ना पोरीच्या तावडीत. तू काळजी करू नकोस. तुझा हा दोस्त तुझ्यासाठी काहीही करू शकतो. त्या लोकांनी माझ्या होणाऱ्या वहिनीला चंद्रावर जरी नेलं ना, तरी तुझ्यासाठी मी तिला तिथून आणेन". हसत हसत अजय म्हणाला.

आणि तो ही खाली बसला. बाहेर पावसाने तुफान माजवलं होतं. दोघांना आता जाम भूक लागली होती. विवेकने स्वतःजवळ असलेले पेरू काढले आणि दोघांनी त्यावर ताव मारला. पाणी प्यायला मात्र त्यांना काहीच नव्हतं. तसेही दोघं आधीच भिजले होते, त्यात बाहेर जाऊन, झऱ्यावरचं पाणी प्यायची इच्छा दोघांनाही होईना.

तेवढ्यात अजयला त्या स्त्रीचा सांगाडा आठवला. त्याने विवेकला ते सांगितले. विवेक म्हणाला, " असेल अशीच कोणीतरी बिचारी दुर्दैवी! कदाचित आपल्यासारखीच वादळात सापडून इथे अडकली असेल. भूक, थंडी किंवा अन्य कारणाने तिचा मृत्य झाला असेल".

अजय म्हणाला, " पण अरे तो मृतदेह झाडावर कसा जाईल? सांगाडा वरून पडला रे".

विवेक म्हणाला, " अरे एखाद्या प्राण्याने नेला असेल. पण खरं सांगू का? मला इथे जरा विचित्रच वाटतंय. कारण इतकं घनदाट जंगल, पण एकाही प्राण्याचा अथवा पक्ष्याचा साधा आवाज देखील नाही. कसली चाहूल देखील नाही. नवल आहे हे".

अजय म्हणाला, " माझ्या नाही बाबा आलं हे लक्षात". असं म्हणत असताना बसल्या बसल्या हाताला चाळा म्हणून अजय खालच्या चिखलात काडीने रेघोट्या मारत होता. अचानक एकदम त्यातून चिरका आवाज आला. काडी एखाद्या धातूवर घासावी तसा आवाज आला.

कसला आवाज होता तो? कोण होतं ते अभद्र हसणारं? ती बाहुली तर नसेल? अनेक प्रश्न तसेच होते. पण त्याची उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all