ते झपाटलेलं बेट : भाग ६

A Person Faces Paranormal Activities In His Life.


ते झपाटलेलं बेट

भाग ६

सगळे त्या घराच्या फाटकापाशी आले, आणि ते घर बघून अचंबित झाले. अतिशय सुंदर अशी ती बंगली होती. एवढ्या अंधारात सुद्धा ती नीट दिसत होती, कारण तिथे दिव्यांचा लखलखाट होता. म्हणूनच कदाचित किनाऱ्यावरून टॉर्च मारल्यावर हे घर दिसले होते.

फुलांचा सुगंध येत होता. बागेत लाईट्स दिसत होते. इतके वादळ, वारा, पाऊस होता की, बाकीचं बघत बसायच्या ऐवजी ही मंडळी पटकन आत शिरली आणि विवेकने बेल वाजवली. आत कुठेतरी सुंदर संगीत वाजले. आणि पैंजणाचा आवाज आला. सुख्याने कान टवकारले. ह्याही परिस्थितीत तो घाणेरडं हसला.

विवेकला शिसारी आली, पण प्राप्त परिस्थितीत तो काहीच करू शकत नव्हता. हळूच ते दार उघडले गेले आणि सगळ्यांचे श्वास क्षणभर रोखले गेले. समोर वीस बावीस वर्षांची अत्यंत देखणी अशी मुलगी होती. कमालीचा नाजूक आणि अत्यंत आकर्षक बांधा, गोरा रंग, गोल चेहरा, चाफेकळी नाक, टप्पोरे डोळे, कपाळावर आलेली कुरळी एकच बट!

सुख्याच्या तोंडून आता फक्त लाळ टपकायची राहिली होती. तो विकृत हसत होता. विवेक चटकन म्हणाला, " आम्हांला जागा हवी होती. आम्ही लॉंचमधून चाललो होतो. पण वादळ झालं आणि आमची लॉंच भरकटली, इथल्याच एका खडकावर आपटली. कृपा करून आम्हांला इथे आजची रात्र जागा मिळेल का? ह्या मुलींचा पण प्रश्न आहे. आम्ही उद्या नक्की काहीतरी व्यवस्था करू". त्याच्या स्वरात अजीजी होती. त्याला फक्त त्या मुलींचा जीव सुरक्षित ठेवायचा होता. त्या गुंडांना काहीही झालं असतं तरी, त्याला फिकीर नव्हती.

ती मुलगी मंजुळ स्वरात हसली. हसताना तिच्या गालावर गोड खळी पडली. बाकीचे पुरुष पुन्हा पाघळले. त्या खळीत तिच्या गालावरचा तीळ लपला.

ती नाजूक आवाजात म्हणाली, " या ना, घर तुमचंच समजा. अडकलेल्या माणसांना मदत करणं हे तर पुण्याचं काम. तुम्ही हवं तेवढं राहू शकता. नाहीतरी मी एकटीच आहे एवढ्या मोठ्या बंगल्यात. तुमची खायची सोय पण होईल आणि आरामाची पण. काळजी करू नका. आणि ह्या मुली अशा का दिसतायत? बेशुद्ध आहेत का ह्या? काय झालं त्यांना"?

रंगा म्हणाला, " ते लॉंच फुटली म्हणून घाबरून गेल्या बिचाऱ्या. आम्ही ह्यांची सहल नेत होतो अंदमान बेटावर. अजून पण मुली आहेत, आम्ही आणतो त्यांना. पण ह्यांना आधी कुठे ठेवू"? सगळ्यांचे हात अवघडले होते, मुलींना उचलून.

त्या मुलीने त्यांना एक मोठा हॉल दाखवला, सगळ्यांनी त्या मुलींना तिथल्या गालिच्यावर ठेवलं आणि इतर मुलींना आणायला ते परत बाहेर पडले.

खरं तर सुख्याच्या मनात फारच पाप आलं होतं. एक तर सगळ्या मुली भिजल्या होत्या, त्याने आधीच तो चेकाळला होता, त्यात त्या बंगल्यात एकटी इतकी सुंदर मुलगी. त्याची नियत फारच खराब झाली होती. रंगाने त्याच्या मनातले पापी विचार कधीच ओळखले होते. म्हणून त्या बंगल्यापासून थोडं दूर आल्यावर तो त्याला म्हणाला, " हे बघ सुख्या, मला माहिती आहे, तुझ्या मनात काय आहे, पण बॉसला काय उत्तर देणार तू? त्या मुली पण सुरक्षित पोहोचवणं हे महत्वाचं आहे आणि वाटेत काहीही गुन्हा अंगावर घेऊ नकोस. आणि आपल्याला माहिती नाही, ही मुलगी कोण? तिच्या मागे कोण आहे? हे कोणतं ठिकाण आहे? उगीच काहीतरी घोळ नको आहे आपल्याला".

सुख्याने मान डोलावली. कारण बॉसचं नाव ऐकून त्याला भीती वाटली होती. त्याच्यासारखा उलट्या काळजाचा बदमाष देखील घाबरत होता, म्हणजे तो बॉस काहीतरी भयानक असणार अशी अटकळ हे संभाषण ऐकणाऱ्या विवेकच्या लक्षात आलं.

बोलत बोलत त्या मुलींना जिथे ठेवलं होतं, तिथे सगळे आले. त्या मुली तशाच पावसात पडून होत्या. विवेकला फार वाईट वाटलं. पण त्याचा काही इलाज चालणार नव्हता. समोर लॉंच दिसत नव्हती.

"बहुतेक बुडाली असावी", रंगा म्हणाला.

तितक्यात अजून एक बोट तिथे थांबलेली दिसली. वादळाचा जोर अचानक आश्चर्यकारक रित्या कमी झाला होता.

त्या बोटीतून काही माणसं बाहेर पडली होती आणि ती त्या मुलींपाशी थांबली होती. विवेकने ताबडतोब अजयला आणि त्याच्या माणसांना ओळखलं. आणि मनातून परमेश्वराचे आभार मानत डोळ्यांत जमलेले आनंदाश्रू पुसले. त्याचा जिगरी यार आता त्याच्या बरोबर होता. आता त्याला कशाचीच भीती नव्हती. कोणत्याही संकटाला तोंड द्यायला ते दोघे समर्थ होते.

अर्थातच ते एकमेकांना ओळख दाखवणार नव्हते. हे सगळे इथे परत आल्यावर त्या माणसांना पाहून सुख्याचा हात त्याच्या खिशातल्या पिस्तुलावर गेला.

तितक्यात त्यांच्यातला एकजण म्हणाला, " वादळाने आमची बोट भरकटून इथे आली. आम्हांला तात्पुरता निवारा हवा आहे. मिळेल का? आणि ह्या मुली कोण? इथे अशा का पडल्या आहेत"?

विचारणारा अजय होता. तो हे रंगाकडे पाहून विचारत होता. रंगा गडबडला. त्याने विवेककडे पाहिलं. त्याच्या बघण्याचा अर्थ समजून विवेक पटकन म्हणाला, " आम्ही ह्या मुलींची सहल घेऊन अंदमान ला निघालो होतो. पण वादळात आमची लॉंच भरकटली, इथल्या खडकावर आपटून फुटली. आणि आम्ही इथे ह्यांना घेऊन उतरलो. मुली घाबरून बेशुद्ध झाल्या आहेत". विवेकने ह्यांना तेच सांगितलं जे त्या बंगल्यातल्या मुलीला रंगाने सांगितलं होतं. त्यावर अजयने देखील ते पटल्याचं दाखवलं.

" आम्ही आत्ताच एक बंगला बघितला. तिथे राहायची सोय झाली आहे. तुम्ही पण चला हवं तर". विवेक पटकन म्हणाला आणि रंगाची जळजळीत नजर त्याच्यावर पडली. मुली असताना बाहेरचं कोणी खरं तर रंगाला तिथे नको होतं. कदाचित त्यांचं भांडं, त्यांचा गुन्हा उघडकीस आला असता. पण आता विवेक बोलून बसला होता. आता चिडून उपयोग नव्हता. तसंही त्या मुली नशेतच होत्या, त्यामुळे त्या गडबड करणार नाहीत, असं रंगाला वाटत होतं.

त्याने माणसं मोजली. ते अकराजण होते. ते अकरा आणि हे दहा. आता पंधरा मुलींना उचलून नेणं देखील सहज शक्य होतं. ज्या मोठ्या टॉर्चच्या प्रकाशात हे सगळं चाललं होतं, ती टॉर्च आता क्षीण झाली होती. ती बंद व्हायच्या आत तो बंगला गाठणं आवश्यक होतं. कारण मोबाईल टॉर्चचा असा किती उपयोग होणार?

विवेकने त्या माणसांना मुली त्या बंगल्यात नेण्यासाठी मदत करायची विनंती केली. आणि त्या मुली आणि लॉंचमधले सगळे किनाऱ्यावर उतरवलेले साहित्य घेऊन हे सगळे परत त्या बंगल्यात आले. त्या मुलीने खोल्या दाखवल्या. एकटी मुलगी असून ती सगळं छान मॅनेज करत होती. सगळे मुलींना ठेवून खोल्यांमध्ये गेले आणि कपडे बदलून परत बाहेरच्या हॉलमध्ये आले. ती मुलगी तितक्यात गरम गरम चहा आणि खायला घेऊन तिथे आली. सगळ्यांना भूक लागलीच होती. पण विवेकला मात्र खायची इच्छा नव्हती. त्या मुली आत तशाच उपाशी होत्या. अवनी देखील उपाशी होती. विवेकने हळूच एक बिस्किटचा पुडा खिशात घातला आणि बाथरूमला जायचं निमित्त करून अवनीला तो पुडा देऊन आला.

सगळे खाण्यावर ताव मारत होते. अजय आणि विवेक मात्र चहा घेऊन गप्प बसले होते. रंगाने विचारलं, " काय नाव ह्या जागेचं? कुठे आलो आहोत आम्ही"?

ती मुलगी म्हणाली," हे एक सुंदर बेट आहे. निवती नाव ह्याचं".

" ओह, छान", रंगा म्हणाला. " इथून अंदमान किती दूर आहे"?

" इथून अंदमान पूर्ण विरुद्ध दिशेला आहे. तुम्ही खूप वेगळीकडे आला आहात. काळजी करू नका. सकाळी विचार करू आपण. आता झोपा सगळे". ती म्हणाली.

सगळे आपल्या आपल्या खोल्यांत गेले आणि अचानक त्यांची डोकी जड होऊ लागली, चक्कर येऊ लागली. डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली. काहीतरी गडबड आहे, हे लक्षात येण्यापूर्वीच विवेक आणि अजय सकट सगळे गाढ झोपले.

का झोपले अचानक सगळे? अशी का अवस्था झाली त्यांची? ते खरंच त्या गूढ आणि भयानक निवती बेटावर होते का? ती मुलगी कोण होती? जर त्या बेटावर कोणी रहात नव्हते, तर तो बंगला कुठून आला? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all