ते झपाटलेलं बेट : भाग ४

A Person Faces Paranormal Activities In His Life.


ते झपाटलेलं बेट

भाग ४

त्याने हातातली कुऱ्हाड वेगाने खाली आणली आणि मांजराचं धड आणि मस्तक दोन्ही वेगवेगळं झालं. रक्ताची चिळकांडी उडाली. ती बाहुली खदाखदा हसत, जिभल्या चाटत तिच्या दोन लाकडी पायांवर उभी राहिली. इकडे तिकडे गोल गिरक्या घेत, ते उसळून सांडलेलं रक्त पिऊ लागली. तिचे डोळे गरागरा फिरत होते. मांत्रिकाने मंत्र अजूनच जोरात म्हणायला सुरुवात केली. ती भारलेली बाहुली शेवटी आखलेल्या एका काळ्या भुकटीच्या रिंगणात येऊन बसली. मांत्रिकाने तिला नमस्कार केला आणि कसलेसे तांदूळ सम्पूर्ण झोपडीत फेकले. त्यासरशी ती बाहुली एकदम शांत झाली. तिच्यातलं ते अमानवी, अभद्र अस्तित्व त्या क्षणी शांत झालं.

अष्टमीला मांजराचा बळी दिल्याने त्या मांत्रिकाची शक्ती वाढणार असं त्या मांत्रिकाच्या गुरूने त्याला सांगितल्यापासून तो मांत्रिक हेही अघोरी कृत्य करण्यास तयार झाला होता.

त्याचा अघोरी विद्येचा गुरु हा निवती नावाच्या एका बेटावर रहात असे. दक्षिणपेठ नावाच्या ह्या गावापासून पाच किलोमीटर लांब असलेल्या समुद्राच्या आत शंभर नॉटिकल मैल अंतरावर हे एकांडे, छोटेसे पण प्रचंड जंगलाने भरलेले असे हे बेट होते. ते बेट समुद्रातल्या ज्वालामुखी पासून तयार झाल्याने त्यात अनेक छोट्या छोट्या टेकड्या होत्या. त्या बेटाचा विस्तार साधारणपणे तीनशे चौरस मैल इतकाच होता. पण तरीही निसर्गाने सौंदर्य अगदी मुक्त हस्ताने ह्या बेटावर उधळून दिलं होतं. ह्या बेटाची नोंद अर्थातच भारत सरकारच्या दरबारी होती. पण ह्या बेटावर वस्ती नव्हती. त्याला कारण ह्या बेटावर असलेले घनदाट जंगल. अगदी दिवसा देखील सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचणार नाही इतकं घनदाट. सतत वहाणाऱ्या नद्या, पाऊस, भयंकर वारं, टेकड्यांवर असलेल्या प्राचीन गुहा, त्यात रहाणारे प्राणी, ह्यामुळे भारत सरकारने त्या बेटावर माणसांना जायला बंदी घातली होती. निसर्गाची हानी होऊ नये, आणि प्राणी असल्याने काही दुर्घटना घडू नये म्हणून त्या बेटावर जायलाही बंदी होती.

पण त्या मांत्रिकाचा गुरू मात्र त्या बेटावर एका गुहेत रहात असे. सतत अघोरी साधना करत असे. अती दाट जंगल असल्याने तो नेव्हीच्या गस्तीच्या बोटींच्या कधीच लक्षात आला नाही.

त्याच गुरूला भेटायला हा मांत्रिक नेहमी जात असे. अघोरी शक्तीच्या बळावर तो तिथे पोहोचत असे. त्याच्या गुरूला भेटून तो परत येत असे. त्या अघोरी शक्तीमुळे त्याला तिकडे जाणं आणि येणं अगदी सहज होत असे. नेव्हीच्या लक्षात कधीही ही बाब त्यामुळेच आली नाही. अमानवीय अशी शक्ती साध्या मानवी डोळ्यांना दिसणार कशी?

मांजराचा बळी दिल्याने मांजरात असलेली रात्रीचं बघण्याची, तीव्र दृष्टीची शक्ती मांत्रिकाला प्राप्त होणार होती. नरबळी देऊन त्या मंत्रिकाचं आयुष्य वाढत होतं. त्याच्या रक्ताच्या नैवेद्याने त्या बाहुलीतली आसुरी शक्ती वाढत होती. त्या मांत्रिकाला ह्या शक्तीचा उपयोग एका अत्यंत वेगळ्या कारणाकरिता करायचा होता.

मांत्रिकाने हा सगळा विचार करत करत पेटलेल्या धुनीत ते मांजर टाकून दिले आणि शांतपणे तिथेच तो झोपी गेला. थोड्या वेळाने पहाट झाली आणि तो मांत्रिक घाईघाईने ती धुनी विझवून तिथून निघून गेला.

इकडे विवेकने शांतपणे खाणं संपवलं आणि तो त्या मुलींचा विचार करत तिथेच आडवा झाला. त्याला मुली देखील सुरक्षित ठेवायच्या होत्या, आणि त्यांच्या बॉसला देखील पकडायचे होते. कोण असेल त्यांचा बॉस? हा विचार काही त्याचा पाठलाग सोडत नव्हता. काहीही झालं तरी आता ही टोळी पकडायचीच हा चंगच पोलीस खात्याने बांधला होता. त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी होती.

थोडा वेळ गेला आणि विवेकला झोप लागली. सकाळ झाली तशी समुद्रकिनारी असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याने जाग आली. त्याने घड्याळात पाहिले. सात वाजायला आले होते. त्याने बाजूला पाहिले तर ते पाचजण अजूनही तसेच पडले होते. रात्री भरपूर दारू ढोसल्याने त्यांना लवकर जाग येणं शक्यच नव्हतं. विवेक उठला आणि तिथल्या बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाला. बाहेर येऊन समुद्रावर फिरायला म्हणून निघाला. त्या किनाऱ्यावर आल्यावर त्याला थोड्या अंतरावर एक मासेमारी करणारी बोट दिसली आणि हळूच हसून त्याने खुणेचा लाल रुमाल हलवला. समोरच्या बोटीवरून तसाच प्रतिसाद मिळाला.

पुढचा विचार करायची फार घाई त्याला आता नव्हतीच. दिवसा त्या मुलींना हलवायचा धोका रंगा पत्करेल असं त्याला वाटत नव्हतं. म्हणजे आता जे काही होणार ते अंधार झाल्यावरच होणार होतं. तोपर्यंत त्याच्याकडे निवांत वेळ होता. थोडं फिरून तो परत त्या घरात आला. त्या घराची नीट तपासणी करू लागला. ते सगळेजण असलेल्या त्या रूममध्ये एक भिंत पूर्ण सरकते हे त्याने कालच पाहिले होते. आत असलेल्या मुलींच्या आठवणीने तो दुःखी झाला. न जाणे त्यांना कधी खायला दिलं होतं, पाणी दिलं होतं! आणि ती मुलगी! परत परत तिचा विचार करूनही ती कोण ते त्याला आठवत मात्र नव्हतं. शेवटी तो नाद सोडून त्याने तपासणी परत सुरू केली. एका कोपऱ्यात बाथरूम आणि टॉयलेट होतं. एका भिंतीला लागून एक मोठं लाकडी कपाट होतं. ते उघडायचं असं ठरवून तो त्या कपाटाकडे आला. आणि त्याने हलकेच ते कपाट उघडलं.

आत जुने कपडे, जुन्या बॅग्स असं काय काय होतं. पण विवेकचं समाधान झालं नाही. त्याने त्या कपाटाच्या मागच्या लाकडी फळीला धक्का दिला, हलवायचा प्रयत्न केला. कारण त्याला ठाऊक होतं की, एक लपवलेला हॉल फक्त इथे नसणार. अजूनही काही असणार. बन्याने अनेक वर्षे ही जागा त्या गुन्हेगारी कामांसाठी वापरली होती. म्हणजे अजून एखादी गुप्त रूम नक्कीच तिथे असणार होती.

त्याच्या कामाचा त्याला असलेला दांडगा अनुभव त्याला सांगत होता की, अजून इथे नक्की काहीतरी असणार आहे. विवेकसारख्या नवख्या माणसाला त्या बदमाशांनी सगळं नक्कीच दाखवलं नसणार. म्हणूनच त्याला ते सगळे जागे होण्यापूर्वी सगळं तपासायचं होतं. त्याने त्या लाकडी फळीला धक्का देऊनही काहीच झालं नाही. सुमारे तासभर कसून तपासणी करूनही त्या रुममधून त्याच्या हाती काहीच लागलं नाही.

अचानक एक विचार झरकन त्याच्या डोक्यात आला. त्या हॉलमधून असेल का एखादा गुप्त रस्ता किंवा रूम? हा विचार डोक्यात येताच तो त्या हॉलमध्ये जायला निघाला.

तितक्यात त्याला त्या पाच जणांपैकी दोघं हलताना दिसले आणि तो सावध झाला. ते सगळे जागे झाले असते तर गोंधळ झाला असता. त्याने चटकन एका कोपऱ्यात बसून घेतले. आणि तो थोडक्यात वाचला असं त्याच्या लक्षात आलं. दहाच मिनिटात रंगा पूर्ण जागा झाला. त्याने इकडे तिकडे बघितलं. सगळे झोपेच्या आधीन झाले होते. दोघं गुंड मात्र जागे होत असल्याचे दिसल्यावर त्याला विवेकची आठवण झाली. इकडे तिकडे बघताना त्याला एका कोपऱ्यात विवेक सतरंजी घालून झोपल्याचं दिसलं.

कसाबसा तो उठला आणि बाथरूम मध्ये गेला. विवेकने अगदी हलकेच डोळे उघडून बघितले.

आणि तसाच पडून राहिला. हळूहळू सगळे जागे झाले. आवरणं झालं आणि मग रंग्या आणि सुख्याने त्यांना आणि मुलींना खायला आणायला बाक्या आणि विवेकला पाठवलं. खाणं आणि पाणी घेऊन दोघं आले. एव्हाना दहा वाजत आले होते. मुलींना उठवायला म्हणून सुख्याने रूमची भिंत सरकवली. आत रडत बसलेल्या मुली एकदम गप्प झाल्या. सुख्याच्या हातात पेट्रोलचा कॅन आणि लायटर होता. मागोमाग रंग्या हातात सुरा घेऊन आत घुसला. त्याने मुलींना त्या हॉलमधल्या बाथरूममध्ये फ्रेश होऊन खायला सांगितलं. आणि जर कोणी विरोध केला तर जिवंत जाळून टाकायची धमकी पण दिली.

पुढे काय होणार? मुलींची सुटका होणार का? त्या मांत्रिकाचा ह्या सगळ्यांशी काय संबंध येणार होता? विवेकच्या आयुष्यात त्या रात्री काय घडणार होतं? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all