ते झपाटलेलं बेट : भाग ३

A Person Faces Paranormal Activities In His Life


ते झपाटलेलं बेट

भाग ३

विवेकने बाहेर येऊन ते छोटं डिव्हाईस काढलं आणि त्यात काही डेटा फीड केला. तो आत्ता जिथे होता, त्या जागेचं लोकेशन आणि सुख्याच्या अड्ड्याचं लोकेशन त्याने त्यात फीड केलं होतं.

खरं तर विवेक एक पोलीस ऑफिसर होता. कोणी साधा बिचारा उपाशी पापभिरू माणूस नव्हताच तो. पोलीस अनेक दिवस ह्या रंगा, सुख्या, बन्या आणि त्यांच्या माणसांच्या मागे होते. पण ठोस पुराव्याअभावी त्यांना काहीच करता येत नव्हतं.

योगायोगाने बन्या वादळात गायब झाल्याची बातमी खबऱ्याने दिली आणि पोलिसांनी हा प्लॅन रचला. विवेक अतिशय प्रामाणिक, धाडसी आणि अत्यंत शूर असा ऑफिसर होता. वेष बदलणं, शत्रूच्या गोटात शिरण्यासाठी तसा अभिनय करणं, मुळात अत्यंत अचूक प्लॅन आखून तो यशस्वी करून दाखवणं हा त्याच्या डाव्या हातचा मळ होता.

म्हणूनच त्या दिवशी पोलीस वस्तीत मुद्दामच घुसले. त्या धांदलीत विवेक कधी तिथे शिरला आणि त्या विहिरीत लपला, हे कोणालाच कळलं नाही. त्याने मुद्दामच स्वतःला थोडं जखमी करून घेतलं होतं. जेणेकरून त्याचा बनाव त्या गुंडांना खरा वाटेल. आणि ते बरोबर त्याच्या ह्या फासात अडकले.

विवेकने अगदी साधेपणाचं जे सोंग घेतलं ते बेमालूमपणे वठलं. इकडे तिकडे भटकायच्या नावाखाली त्याने त्या वस्तीची बरीच माहिती सांकेतिक भाषेत त्याच्या डिपार्टमेंटला कळवली होती. त्या विशिष्ट झोपडीचं रहस्य मात्र तसंच राहिलं होतं. अचानकच रंगाने त्याला हे काम दिल्याने ती झोपडी बघायला मिळालीच नव्हती.

त्या झोपडीच्या विचारात असतानाच त्याला मागे हालचाल जाणवली. त्याने चटकन ते डिव्हाईस खिशात ठेवून मागे बघितलं. मागे अजय उभा होता. अजय म्हणजे त्याचा अगदी उजवा हात. विवेकने मुद्दाम त्याला स्वतःच्या आसपास राहायला सांगितले होते. जर कोणाला काही संशय आलाच, तर मदतीला एक माणूस असावा हा हेतू त्या मागे होता.

पण खरं तर तो आणि अजय अतिशय जिवलग मित्र होते. अजयने खुणेनेच त्या जागेकडे बोट करून मानेनेच काय झालं ते विचारलं. त्यावर विवेकने त्याला खुणेनेच आत मुली असल्याचं सांगितलं आणि पाच जण आत पिऊन पडल्याचं देखील सांगितलं.

कोणाची जाग नसल्याचं पाहून दोघं तिथून हळूच दूर झाले. आणि विवेक अजयला म्हणाला, " पंचवीस मुली आहेत रे! किती हलकट, नीच, नराधम आहेत ही माणसं. तो साला सुख्या तर मरणार माझ्या हातून. किती तरी निष्पाप जीवांची माती केली हारामखोराने".

अजयने त्याच्या खांद्यावर थाप मारली आणि त्याने विचारलं , " उचलू का आत्ता ह्यांना? भक्कम पुरावे आहेत आता आपल्याकडे".

त्यावर विवेक म्हणाला, " नाही, आत्ता नाही. आपल्याला ह्यांच्या बॉसला पकडायचं आहे. ह्या मुलींना कुठे नेणार आहेत, ते अजून मला कळलं नाही. आपल्या दहा माणसांना मच्छीमार लोकांचा वेष घेऊन, एक बोट घेऊन साधारण इथेच थांबायला सांग. माझ्या अंदाजाने ह्या मुलींना उद्याच हलवण्यात येईल. त्यामुळे सावध रहा, आणि लक्ष ठेवा".

त्यावर अजयने नुसतीच मान डोलवली आणि तो तिथून निघाला.

विवेक परत त्या घरात आला आणि शांतपणे त्या वेड्यावाकड्या पडलेल्या पाच जणांकडे बघत एक सतरंजी घालून तिथेच आडवा झाला. तो आत्ता त्या मुलींबद्दल विचार करत होता. त्यातल्या एका मुलीचा चेहरा त्याला खूप ओळखीचा वाटत होता. तिला नक्कीच कुठेतरी त्याने पाहिलं होतं, पण नेमकं आठवत नव्हतं. फार गोड होती ती मुलगी दिसायला. मध्यम उंची, नाजूक बांधा, लांब केस, निमगोरा रंग, चाफेकळी नाक. बराच वेळ विचार करून देखील ती कोण हे त्याला नाहीच आठवले. शेवटी तो विचार सोडून देऊन त्याने काहीतरी खायला आहे का ते बघायला सुरुवात केली. त्याला जाम भूक लागली होती.तंदुरी चिकनचं एक पाकीट तसंच पडून होतं. त्याला कोणी हात देखील लावला नव्हता. त्याने ते उघडलं आणि निवांतपणे खाऊ लागला.

त्याच्या डोक्यात आता फक्त पुढचे प्लॅन्स शिजत होते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. त्याला ठाऊक नव्हतं, पण उजाडणारा उद्याचा दिवस त्याला कायम लक्षात राहणार होता. एक वेगळं, अभद्र, अशुभ असं त्याच्या आयुष्यात प्रवेश करणार होतं.....

त्या मांत्रिकाने मांजर बांधल्यावर तिच्यापुढे वाटीत दूध ठेवलं. तिच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. आज त्या मुक्या जीवाचा शेवटचा दिवस होता. आज अष्टमी होती. ठिकठिकाणी नवरात्र बसलं होतं. अष्टमीचे कार्यक्रम बाहेर जोरात चालू होते. त्या वस्तीत मात्र कोणत्याही देवाला न जुमानता एक अभद्र छाया त्या मांत्रिकाच्या रूपाने आली होती. रात्री साडेअकरा वाजता त्याने एक धुनी पेटवली आणि कसलेसे अघोरी मंत्र तो उच्चारू लागला.

हळूहळू त्या मंत्रांचा आवाज झोपडीच्या बाहेर जाऊ लागला. मंत्रांची गती देखील वाढू लागली. नेहमी अमावास्येला येणारा मांत्रिक आज अष्टमीलाच कसा आला ह्याचा विचार करत वस्तीतली मंडळी एकदम गुपचूप घरात जाऊन दार लावून बसली होती.

तो मांत्रिक म्हणजे एक अघोरी बाबा होता. त्याला अनेक काळ्या जादू, काळी विद्या, वशीकरण, जारण मारण अशा गोष्टी अवगत होत्या. त्याला त्याची शक्ती वाढवायची होती. त्यासाठी तो काही वर्षे अघोरी तपस्या करत होता. दर अमावास्येला तो नरबळी देत होता. वस्तीतली माणसं जी किंकाळी ऐकत ती त्या बळीची असे. तो अभद्र मांत्रिक त्या बळीच्या रक्ताचा त्याच्याकडे असलेल्या एका विशिष्ट बाहुलीला अभिषेक करत असे. ती बाहुली साधी नव्हती. भारलेली होती.

साध्या लाकडाची असलेली ती बाहुली बघताक्षणी भारलेली आहे, हे समजून येत नसे. ते लहान मुलाचं खेळणं वाटे.दोन फूट उंचीची ही बाहुली काळी कभिन्न होती. सरळ अगदी अंगाला चिकटलेले हातपाय, निमुळती मान, चेहऱ्याला चिकटलेले कान असा तिचा अवतार होता.

पण ती बाहुली अतिशय विनाशकारी होती. अनेक नरबळींचं रक्त पिऊन पिऊन ती क्रूर झाली होती.

आत्ताही ती बाहुली त्या धुनीच्या डाव्या बाजूला बसली होती. तिचे बाहेर आलेले डोळे त्या मांजरीकडे आसुसून बघत होते. त्या बाहुलीच्या तोंडातून जीभ बाहेर आली होती. लाकडी बाहुलीच्या तोंडातून वळवळणारी ती जीभ बघून कोणीही किंचाळून बेशुद्ध पडलं असतं. तो मांत्रिक आता अगदी भरात आला होता. बरोबर बाराच्या ठोक्याला ते बिचारं मांजर बळी जाणार होतं. हळूहळू ती झोपडी एका विशिष्ट आवरणात बंदिस्त झाल्यासारखी झाली. ती मांजर आता नजरबंदी केल्यासारखी त्या बाहुलीकडे बघत होती. धुनीचा जाळ पेटला होता. ज्वाला जिभल्या चाटीत वर उसळत होत्या. मांत्रिकाच्या मंत्रोच्चाराला आता कमालीची लय आणि गती प्राप्त झाली होती.

त्या धुनीतून आता धुराची वलयं वर वर जात होती. गोल गोल फिरत होती. त्यांना जणू काही कोणी हाताला धरून फिरवत होतं. त्यांची गती प्रचंड होती. बाराला दोन मिनिटे कमी असताना मांत्रिक उठला. त्याने त्या मांजराला हातात घेतलं. त्याच्या डोळ्यात बघत त्या मांत्रिकाने काहीतरी पुटपुटत हातातली कसलीशी पावडर त्याच्या डोळ्यांत फुंकली. त्या सरशी ते मांजर जणू भारलं गेलं, आणि त्याने हालचाल बंद केली. त्याने त्याला धुनिपाशी ठेवलेल्या अस्थी भस्माच्या रिंगणात ठेवलं. त्याच्यावर हातातले मंतरलेले तांदूळ फेकून बरोबर बाराला त्याने समोरची कुऱ्हाड उचलली. त्यासरशी ती बाहुली खदाखदा हसू लागली. तिचं भीषण, बीभत्स हसू त्या झोपडीत भरून गेलं. त्याने हातातली कुऱ्हाड वेगाने खाली आणली आणि.....

काय झालं पुढे त्या मांजराचं? अष्टमीच्या दिवशी अगदी नवरात्रात असले अशुभ विधी तो मांत्रिक का करत होता? मांजराचा ह्याच्याशी काय संबंध? विवेकच्या आयुष्यात काय भयानक घडणार होतं? त्याचा आणि ह्या मांत्रिकाचा काय संबंध? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all