Login

तो बंगला भाग ३

A story about paranormal activity.

हा उपक्रम सलग पंधरा दिवस असाच चालत राहिला. जुई कधी त्या खिडकी कडे तर कधी त्या बागेतल्या मुर्ती कडे टक लाऊन पाहत बसायची. तिला ती मुर्ती फारच उदास वाटायची.
               सोळाव्या दिवशी, शाळेत जाताना जेव्हा जुई त्या खिडकी कडे पाहत होती,तिला तिथे एक हालचाल जाणवली, कोणी तरी हात हलवतय असं वाटलं तिला.आणि हा भास तर नक्कीच नव्हता हे जुईला माहीत होतं कारण एक दोनदा काही पुसटश्या सावल्या तिला जाणवल्या होत्या तिथे,आज मात्र सगळं स्पष्ट दिसलं होतं.

कोण असेल तिथे, काय असेल सगळा हा प्रकार, विचार करुन करुन जुईची अवस्था खूप खराब झाली होती.आईशी काही बोलू शकत न्हवती आणि तिला समजून घेईल अशी कोणी मैत्रिण पण न्हवती. कोणाला सांगू,कोणाची मदत घेऊ हा विचार करुन करुन तिचं डोकं फुटायची वेळ आली होती. कितीदा तिनं स्वत:ला त्या बंगल्यापासुन दूर ठेवायचा प्रयत्न केला होता, शाळेत जाण्या येण्याचा रस्ता पण बदलून पाहिला होता,पण तो बंगला आणि बागेतली त्या मुलीची मुर्ती तिला जणू एखाद्या चुंबका सारखी आपल्या कडे ओढायची आणि ती त्या चुंबकीय शक्तीच्या प्रभावाने पुन्हा तिथेच जाऊन पोहोचायची.

            कोणाला सांगू हे सगळं, एक दिवस हा विचार करताना तिला दिलीप मामा आठवले. दिलीप मामा म्हणजे तिच्या बाबांचे अगदी जवळचे मित्र आणि कॉलेज मध्ये इतिहासाचे प्रोफेसर.

             जुई सध्या अकरावी मध्ये शिकत होती. अभ्यासात फार हुशार,अॉलराउंडर आणि समंजस अशी जुई ची ओळख होती. जुई चे बाबा ती तीन वर्षांची होती तेव्हाच वारले होते, आणि ती तिच्या आई सोबत आजी कडे रहायची.आईचं माहेर आणि सासर एकाच शहरात होतं. रमाबाई एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर काम करत होत्या. त्या जुईच्या बाबतीत मात्र अगदी सजग होत्या,ती मोठी होत गेली तसं त्या वर्क फ्राम होम जास्त करुन तिच्यावर लक्ष देऊ लागल्या. कारण आता त्यांच्या आई पण थकल्या होत्या. अधे मधे जायच्या पण ऑफिसला. दिलीप  पाटील, त्यांच्या मिस्टरांचे अगदी जवळचे मित्र होते आणि जुई वर त्यांचं विशेष प्रेम होतं, त्यांना मूलं न्हवती,ते जुईलाच आपली मुलगी मानायचे.  जुईला आणि रमाबाईंना त्यांचा फार आधार होता, रमाबाईंनी तर त्यांना भाऊच मानलं होतं, म्हणून जुई  त्यांना मामाच म्हणायची.  जुई त्यांश्याशी फार गप्पा मारायची आणि प्रत्येक विषयावर त्यांश्याशी  मोकळे पणाने बोलायची. तिला विश्वास होता कि दिलीप मामा तिला नक्की समजून घेतील आणि तिची मदत सुद्धा करतील.

                  संध्याकाळी आईशी परवानगी घेऊन ती मामांकडे गेली. दिलीपजींनी नेहमी प्रमाणे खुप प्रेमाने तिचं स्वागत केलं. थोडं फार जुजबी बोलून,जुईनं त्यांच्या पुढे मुख्य मुद्दा मांडला.त्यांना तिनं सगळं सांगून टाकलं.

" मामा,मी खुप प्रयत्न करुन सुद्धा त्या बंगल्याला डोक्यातून काढू नाही शकत आहे, मला सतत असं वाटतं की कोणी तरी तिथे आहे ज्याला माझी गरज आहे, मला कधीच त्या बंगल्याकडे पाहाताना भिती वाटत नाही किंवा भयाण पण वाटत नाही. ती बागेतली मुर्ती पण माझ्याशी बोलायचा प्रयत्न करते असं वाटतं. तुम्ही प्लीज माझी मदत करा मामा."

"जुई,हे बघ बाळा, मी तुला हा सल्ला देणार नाही कि तू विसरुन जा,लक्ष नको देऊ त्या घरा कडे, फालतू गोष्टी आहे ह्या सगळ्या इत्यादी,कारण कदाचित तुला कोणी तरी एका चांगल्या उद्देशाने निवडलं आहे, तुझ्या गोष्टीं वरुन हे माझ्या लक्षात आलंय.मला माहीत आहे त्या बंगल्या बद्दल.पण सध्या तू अभ्यासा कडे दुर्लक्ष नको करू बाळा, परीक्षा अगदी जवळ आली आहे,तू निवांत पणाने परीक्षा दे,मग माझं प्रॉमिस आहे तुला कि मी तूझी जमेल तितकी मदत करीन आणि आपण दोघे मिळून एक चांगला मार्ग काढू ह्यात्नं.पण सध्या पूर्ण पणे अभ्यासावर लक्षं केंद्रीत कर .तू छान परीक्षा दे तो पर्यंत मी त्या बंगल्या बद्दल आणखी माहिती काढतो आणिले हो तो पर्यंत कोणाही समोर ह्या गोष्टीचा उल्लेख करु नको".

"मामा तुम्ही खरं बोलताय न,का मला टाळायचा प्रयत्न करताय, माझ्या गोष्टींवर तुम्हाला विश्वास तर आहे ना". जुईला मामांकडून अपेक्षा होती पण मामा इतकं तीला सपोर्ट करतील असं वाटलं नव्हतं.

"हे बघ जुई, तू जे काही मला सांगितलं आहे त्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे,तू एक हुशार आणि शहाणी मुलगी आहे. देवाला मी कधीच पाहिले नाही पण माझी जशी देवावर मनापासून  श्रद्धा आहे, तसंच ह्या गोष्टींचं पण जगात अस्तित्त्व आहे हे माझं ठाम मत आहे. कोणत्या तरी अपूर्ण इच्छे मुळे काही लोक असे भटकत राहतात आणि तुझ्या सारख्या काही लोकांना शोधत असतात जे त्यांची मदत करु शकतात,पण बेटा माणसाने ह्या गोष्टींना फारच विभत्सं आणि भयानक रूप देऊन टाकलं आहे. आपण करुया काही तरी तू काळजी नको करू,पण सध्या फक्त अभ्यास एके अभ्यास."

आता जुई थोडीशी निश्चिंत झाली होती. अभ्यासावरच लक्षं देणारं असं मामांना प्रॉमिस करून ती घराकडे निघाली. आणि खरोखरच तीनं स्वताला अभ्यासात झोकून टाकलं. प्रिपरेशन लिव मुळे शाळेत पण येणं जाणं बंद होतं तर त्या बंगल्याकडे जाण्याचा प्रश्नही सुटला होता. आता तिला प्रतिक्षा होती ती परीक्षा संपायची.
क्रमशः