थरार...भाग१विषय भूतकाळात डोकावताना.जलद कथा लेखन स्पर्धा

एक गूढ कथा
थरार…
विषय भूतकाळात डोकावताना.
जलद कथा लेखन स्पर्धा.
भाग१


योगेश अमरावतीला जाण्यासाठी निघाला . बसमध्ये खिडकीपाशी छान जागा मिळाल्याने खूष झाला. बसमधून मागे पळणारी झाडं बघताना त्याला लहानपण आठवलं.त्याबरोबर मामाच्या गावाला जाऊया हे गाणही आठवलं तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

अचानक बस थांबली.त्यासरशी सहज योगेशचं खिडकीतून बाहेर लक्ष गेलं आणि तो दचकला. खिडकीबाहेर त्याला झाड दिसलं जे मरणासन्न अवस्थेत असल्यासारखं दिसलं. त्या झाडाला एकही पान नव्हतं. झाड काळठिक्कर पडलेलं होतं.ते झाडं बघून योगेशने घाबरून डोळे मिटले. योगेशच्या अंगाला थरथर सुटली.

बस चालू झाली आणि पुढे जाऊ लागली पण योगेश काही वर्ष मागे गेला भूतकाळात.

दहा वर्षापूर्वी घडलेलं ते सगळं जसच्या तसं योगेशच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्याने गच्च डोळे बंद केले होते तरी तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिलाच. तो प्रसंग अगदी काल घडल्यासारखा वाटू लागलं.

बघता बघता योगेश त्या प्रसंगात पुन्हा अडकला…

काय होता तो प्रसंग? ज्याने योगेश एवढा घाबरला. दहा वर्ष उलटून गेली तरी त्या प्रसंगाचा धसका अजूनही योगेशच्या मनातून गेली नव्हती.

योगेश दहा वर्षापूर्वी त्याच्या गावी गेला होता. फार छोटंसं गाव होतं. आपल गाव एकदातरी बघावं म्हणून गेला होता. ते गाव इतकं छोटं होतं की एसटी सुद्धा तिथपर्यंत जात नव्हती.हायवे वर उतरून गावात पायी जावं लागतं असे.

गाव बघून परत जायला उशीर झाला.योगेश हायवेवर जायचा रस्ता गावक-यांना विचारून निघाला.

गावकऱ्यांनी एक शाॅर्टकट सांगीतला पण संध्याकाळच्या वेळी त्या रस्त्याने जाऊ नका म्हणाले.कारण जंगल लागेल.

योगेशने गावकऱ्यांना हो हो केलं आणि जंगलातून असलेल्या शाॅर्टकटनेच निघाला. जंगल फार दाट असल्यामुळे त्याला थोड्यावेळाने भीती वाटायला लागली. कारण आजूबाजूला अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं त्यात भर घालणारे चित्र विचीत्र आवाज येऊ लागले तसं योगेशला भीतीने कापरं भरू लागलं.

सारखी बायकोची ,मुलांची आठवण यायला लागली. पायाखालचा पाचोळा चालताना वाजत होता. त्या आवाजाने अजून वातावरण गंभीर झालं.मधूनच वाघाची डरकाळी ऐकू येई. तेव्हातर एका जागी लटलटत्या पायाने योगेश उभा राही. त्याला डोळे उघडण्याची पण हिम्मत झाली नाही.

का आपण शाॅर्टकटच्या मोहात पडलो असं योगेशला आता वाटू लागलं. तसा स्वतः वरचं तो चिडला.तशी योगेशला शाळेपासूनच शाॅर्टकट वापरायची सवय होती. अभ्यास असो वा खेळ योगेश कधीही सरळ मार्गाने अभ्यास करत नसे किंवा खेळत नसे.तेव्हा त्याला मजा यायची पण आज त्याला भिती वाटू लागली.

तोंडाने रामनाम म्हणावं म्हणजे भिती वाटणार नाही असं त्याला वाटलं म्हणून तो \"रामराम\" म्हणायला लागला. तो जसा रामनाम म्हणू लागला योगेशला एकदम विचीत्र जाणीव झाली.कसली…? हे त्यालाच कळत नव्हतं.

निर्मनुष्य रस्ता…. रस्त्यावर पडलेला पालापाचोळा,त्या पाचोळ्यावरून येणारा आवाज…चालण्याचा…चप.. चप..चप…

गोठवणारी थंडी. हवेत मिसळलेला धूर आणि धुरकट वास….

सगळा परीसर विचीत्र उन्मादाने भारलेला…
एक वेगळ्या शक्तीची जाणीव त्या वातावरणात भरलेली आहे.

अश्या वातावरणात योगेश जीव मुठीत धरून चालतोय. तोंडाने सतत रामनाम जप चालू आहे. त्याला मध्येच सरसर पळण्याचा आवाज आला तसं घाबरून गर्रकन योगेशने मागे वळून बघीतले. मागे कुणीच नव्हतं. भीतीने त्याचे दात वाजायला लागले त्याचवेळी त्याच्या मागून जोरजोरात हसण्याचा आवाज आला. मनातल्या मनात योगेशने स्वतःलाच शिव्या घातल्या.

" का मी शाॅटकट आहे म्हणून या रस्त्याने आलो. मीच मूर्ख. त्या गावक-याने सांगूनही मी मी का ऐकलं नाही." असं म्हणून योगेश स्वतःच्या कपाळावर हाताच्या मुठीने ताडताड मारून घेऊ लागला.

__________________________________
क्रमशः काय झालं असेल योगेश बरोबर.बघू पुढील भागात.
© मीनाक्षी वैद्य

🎭 Series Post

View all