थँक्यु मोदीजी."

एका गृहीणीची नोटबंदी काळातील विनोदी कथा
ट्रिंग ट्रिंग ..अश्या जुन्या फोनप्रमाणे रेवाचा मोबाईल सकाळी घाईच्यावेळी कोकलला..हा रेवाच्या लाडक्या मैत्रीणीचा सुधाचा फोन होता.

"हैलो ,रेवा आज भिशी आहे..तिही शेवटची ! तर नक्की ये. मला वेळ नाही.मुलांच करायचं होतं  हे बहाणे चालणार नाही. "तु ये आणि भिशीचे पैसे घेउन जा" असं म्हणालीस तर बिलकुल बोलणार नाही तुझ्याशी."सुधाने अगदी प्रेमाची धमकी देत म्हटलं.

"हो..हो..अगं नक्की येणार गं.चल मी ठेवते .येते मी चारला." रेवाने फोन ठेवत म्हटलं.

"आई ..तुला भिशी लागणार यावेळी. तुझी भीशी लागली  ना की मला नवा लॅपटॉप हवा हा!." बावीस वर्षाची अवनी रेवाला अगदी लडात येऊन आईला मिठी मारत म्हणाली .

"नाही हा !मला बाईक पाहीजे .माझ्या सगळ्या मित्रांकडे बाईक आहे. मीच काय म्हणुन बसने जायचं.मी आधीच सांगतो.बाईक नाही मिळाली  तर मी अभ्यास करणार  नाही." अठरा वर्षाचा संजु सरळ आईला धमकी देत म्हणाला. 

हे ऐकुन तर रेवाला मनात एकच डॉयलॉग आठवला..'गाँव बसा नहीं ओर लुटेरे आ गए |" 

"हे बघा !आधी भिशीचे पैसे घरात तर येउदे..मग बाबाच ठरवतील काय करायचं?" हे बोलुन तिने मुलांना टाळायचा प्रयत्न केला .मुले त्याच्यावर अजुन काही बोलणार इतक्यात एक धारधार आवाज तिघांच्या कानी आला.

"अरे..!काय चाललंय तुमचं.भिशी आईची आहे.तुमची नाही." गिरीश, रेवाचा नवरा गिरीश मुलांवर डाफरत म्हणला तसं कुठेतरी रेवाला मनातुन छान वाटलं.

मुले निराश होउन आपल्या रूममध्ये निघुन गेली ,तसा मुंल आजुबाजुला नाही आहेत हे पाहुन गिरीश लाडात येता रेवाला म्हणाला.

"रेवा ,अगं ! सुमतीच्या मुलीचं लग्न ठरलंय.आई म्हणत होती.मामा म्हणुन आपणही सोन्याच काहीतरी द्यायला हवं..तुला तर माहीत आहे..माझा पगार कितीसा पुरतो.
तर तु जरा तुझे भिशीचे पैशे देशील का? "

"अहो !पण सासुबाई तर दागिना देणारच आहेत ना !मग आपण का म्हणुन वेगळ द्यायचं ?तसही माझी फार दिवसांची इच्छा आहे हो..पु.ना.गाडगीळांच्या नवीन हिऱ्यांच्या कुडी घ्यायची. " रेवाने आपला नकार  गिरीशला दर्शवला.

"हे बघ रेवा..तुला कशाला दागिने हवेत ?तु तर साधी गृहीणी आहेस. तु कुठे जाऊन मिरवणार आहेस. कपाटातच राहणार ते.त्यापेक्षा श्वेताला दिला दागिना तर सुमतीच्या सासरी आपला मान वाढेल गं.. ती ऑफिसला जाते .तिच्या कामाला येईल .लाईट वेट ज्वेलरी.
तसही तु कुठे कमवतेस ? जो काही पैसा आहे तो माझाच तर  आहे . तु तर फक्त भिशीत लावते."

"मग मी ठरवलं त्या पैशाचं काय करायच तर बिघडलं कुठे?" असं बोलुन गिरीशने विषयच संपवला.

हे सगळ ऐकुन रेवा मनातुन निराश झाली.गेले कित्येक वर्ष असचं होतं होत.तिने घर खर्चातुन पैसे साठवुन भिशी लावायची आणि घरच्या अडणीत ते पैसे देउन टाकायचे.त्यामुळे घरातल्यांना तिचा पैसा हा आपलाच गरजेसाठी खर्च करयचा पैसा आहे असं वाटायला लागलं होतं. सगळीजणं हेच विसरली होती की ती हा पैसा घरखर्च वाचवुन जमवते.वाढत्या महागाईच्या जमान्यात भिशीच्या पैसे जमा करण्यासाठी ती स्वत:च्या आवडीच्या वस्तु खरेदी करण्यापासूनही स्वत:ला रोखायची.
आज त्याच गोष्टींची कदर कुणालाही नव्हती.

"एक गृहीणी किती काम करते हा प्रश्नच का पडतो ? खरतर ती घरी राहुन ,घर सांभाळुन मोलकरीण,आया ,नर्स ,टीचर,पाळणा घर ,प्लंबर ,इलेक्ट्रीशन ह्यांचा साऱ्यांचा खर्च वाचवते. आणि जेव्हा तिला काही हवं असतं तेव्हा मात्र ती कमवत नसल्यामुळें तिच्या गरजांचा,आकांक्षाचा विचार कोणीच का करत नाही?" रेवाने तयार होताना आरश्यात स्वत:च्या प्रतिबिंबालाच हा प्रश्न विचारला.

मग अचानक रेवाला काहीतरी सुचलं आणि ती भिशीला निघुन गेली.आज सगळ्याजणी खुप खुश होत्या.रेवाही आज घड्याळ्यात न पाहता शेवटपर्यत भिशीपार्टीत रमली .जणु तिला आज घरची ओढच नव्हती. 

भिशी संपल्यावर तशी रेवा बाजारातुन वाणसामान खरेदी करून रात्री उशीराच घरी पोहचली. रेवाने तसं घरी कळवल होतं तरी सर्वजण चिंतेत बसलेले पाहुन ती चाट पडली. 

रेवा आलेली पाहुन गिरीश पटकन रेवाकडे आला नि म्हणाला,"रेवा तुझी भिशी लागली ?"

तशी ती चाचरत म्हणाली." हो लागली का हो ?" आणि रेवाने पटकन बॅगेवर हात ठेवला.

" रेवा अग !मोदींनी आज पासुन नोटबंदी केलीय.पाचशे आणि हजाराचे नोट बंद झाले चलनातुन.आता भिशीचे पैसे म्हणजे कचरा झाला. आता भिशीचे पैसे कुठेच खर्च करता येणार नाही." 

गिरीशने असं म्हणताच रेवाने वाण सामानाच्या पिशव्या धाडकन खाली टाकल्या.ओढणीचा पदर तोंडाला लावला आणि येणारी कढ दाबल्यासारखं केलं.अचानक उठली नी
रडतच बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा घट्ट बंद केला.

गिरीश व मुलांना असं वाटलं की रेवाला आपल्या मागण्या पुरवता आल्या नाही म्हणुन दु:ख झालय.ते बाहेरून  लगेच तिच सांत्वन करत म्हणाले.

"आई..आई..."
" रेवा.. रेवा अगं दार उघड!"
मुलांनी दरवाजावर थपाड्या मारल्या पण, काहीच प्रतिसाद येत नव्हता.
शेवटी गिरीश दरवाजा बडवुन थकत म्हणाला ,

"रेवा जाउदे गं..नको विचार करू.भिशी लागलीच नाही असं समजुया. माझ्या बोनसमध्ये मुलांच मॅनेज करू आणि श्वेताला वेगळा दागिनाही  कशाला द्यायला हवा.आई बाबा देणार तेच पुरेसं आहे .चल तु बाहेर ये."

इकडे रेवा दरवाजावर पडणाऱ्या थपाड्या आणि मुलांच्या हाकांकडे दुर्लक्ष करून आरश्यात स्वत:ला बघुन खुदकन हसत होती.तिला काही वेळापुर्वीच आठवलं.

भिशी संपल्यानंतर पु.ना.गाडगीळ यांच्या दुकानात आज ती एकटीच गेली होती.एवढी मोठी खरेदी एकटीने ती पहिल्यांदाच करत होती. तिने बॅगेतुन हजारच्या नोटा काढल्या आणि एक न्युज पेपरचं कात्रण जे तिने कित्येक महिने जपुन ठेवलेलं ते काढलं आणि दागिन्यांच्या कांउटरवर ठेवलं.सेम तसेच कानातले डोळ्यासमोर प्रत्यक्षात पाहुन ती हरखली.
कांउटरवरच्या आरश्यात ते कानातले घालुन तिला फारच छान वाटलं.होत्या त्या लहानश्याच कुड्या पण अस्सल हिऱ्यांची चमक तिच्या सौंदर्यात भरच घालत होती. तिने कानातले पॅक करायला सांगितले आणि बिलिंग कांउटरवर गेली.बिलिंग कांउटरवरच्या माणसाने तिला हसत बिल दिलं.

इतक्यात तिच्या मनाने कच खाल्ली. नोटा हातात असुनही  रेवाला तरीही पैसे द्यायला मन होत नव्हत. देवु का नको देवु हा प्रश्न तिला सतावत होता. आज ती रागात ठरवुन आलेली एकदातरी स्वत:च्या आवडीचं घ्यायचं आणि घरातल्यांना धडा शिकवायचा..

पण आता प्रत्यक्षात करताना मात्र घरात सांगणार काय? मुलांचा व नवऱ्याचा विरोध ,सासु सासरे ह्यांचे टोमणे सहन करू शकणार आहोत का आपण ?ह्या विचाराने तिचं मन खचलं .ती काउंटरवरून परत मागे फिरली आणि गिरीशचे एक वाक्य तिच्या मनात घुमलं,

"तसतरी तु कुठे कमवतेस ? जो काही पैसा आहे तो माझा आहे ना. तू तर भिशीत लावते फक्त ."

"बस..!नाही हा पैसा माझा आहे..मी वाचवलाय.." हे उत्तर रेवाच्या मनात आलं आणि तिने कॅश देऊन दागीना आणि रिसीट दोन्ही घेतली. हे सगळ होताना टीवीवर मोदीजींच भाषण सुरू झालं होतं,ते भाषणही संपल आणि दुकानात सगळीकडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

रेवालाही एवढचं समजलं की हजार व पाचशेच्या नोटा चलनातुन बंद झाल्या आहेत.सगळीकडे जरी काळा पैसा लपवायचा कसा हीच चर्चा होत असली तरी रेवाला मात्र उपाय मिळाला होता, घरी कुणालाही न दुखवता तिचा स्वत:चा पैसा तिच्यासाठी वापरायचा आणि एकदातरी घरच्यांना धडा शिकवल्याचं समाधान मिळवायचा.

हेच आता आठवताना तिच्या कानातील हिऱ्यांच्या कुड्या चमकत तिच्या चेहऱ्यावर एक वेगळच तेज आणत होत्या.मग तिच्या तोंडातुन एकच वाक्य निघालं."थँक्यु मोदीजी."