ठकबाजी.भाग ५ अंतिम

तुला लाज वाटली नाही माझ्या भावनांशी खेळायला. मीच मूर्ख मी माझ्या जन्मदात्या आई-वडिलांना आणि माझ्या बहिणीला अंधारात ठेवत होते. मी विश्वासघात करणार होते. मी तुझ्यासारख्या


त्याच रात्री आरोही प्रमोदला फोन करते आणि आपण पळून जाणार आहोत हे आपल्या लहान बहिणीला कळले आहे हे सांगते.

" आरोही, आता आपल्याला पळणं मुश्किल होऊन जाईन .आता तू एक काम कर. तू सर्व पैसे, दागिने जे काही आहे ते तू माझ्याकडे आधीच दे. मी आपल्या राहायची सर्व व्यवस्था करतो आणि जशी व्यवस्था होईल तसं मी तुला घेऊन जाईन." प्रमोद.

आरोहीला प्रमोदचं म्हणणं पटतं .ती विचार करते दुसऱ्या दिवशी आपण प्रमोदला पैसे आणि दागिने देऊयात म्हणजे प्रमोद आपली व्यवस्था करेल. ती त्याच विचारात झोपी जाते. इथे वैशालीला झोप लागत नाही. ती प्रचंड चिंतीत, असते एकीकडे मोठी बहीण लग्न ठरलं असताना एका दुसऱ्या मुलासोबत पळून जाणार असते आणि त्यापेक्षा जास्त तिला प्रमोद तिला फसवणार आहे हे आतूनच वाटत असते.

वैशाली ठरवते काहीही झालं तरी आपण आपल्या बहिणीला हे पाऊल उचलू दयायचे नाही. त्यासाठी ती प्रमोदची सारी चौकशी करण्यासाठी एक डिटेक्टिव्ह त्याच्यापाठी लावते आणि तिला कळतं की प्रमोदचं आधीच लग्न झालेलं आहे आणि त्याचे आई वडील गावी असतात. त्याला दोन मुलं असतात. प्रमोद दिसायला हँडसम आणि त्याची पर्सनॅलिटी खूपच छान असल्यामुळे तो तरुण मुलींना फसवतो आणि प्रेमाचे खोटं नाटक करतो आणि असाच अनेक मुलींना फसवून पैसा घेऊन नंतर फरार होतो.

रात्र होते आई-बाबा झोपी गेल्यावर वैशाली ठरवते की, प्रमोद विषयी जी माहिती आपल्याला कळली आहे ती लगेच ताईला सांगावी.

वैशाली झोपायचे नाटक करते. ती आरोहीची वाट बघते. आरोही रूममध्ये येते. ती झोपायचे नाटक करते. वैशालीला झोप येत नाही, कारण की तिला सर्व सत्य परिस्थिती कळलेली असते. वैशालीला कपाट खोलण्याचा आवाज येतो पाहते तर आरोही कपाटातील पैसे आणि सोनं एका बॅगमध्ये भरत असते.

वैशाली उठते आणि तिला म्हणते


"ताई,जरा थांब मला तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे."

आरोही तिला म्हणते

" वैशाली तू मला थांबवू नकोस. प्लीज वैशाली."

"ताई तुला आई-बाबांची शपथ आहे, तुला ऐकावंच लागेल" वैशाली.

वैशाली बोलू लागते
" ताई मी त्या दिवशी तुझ्या फोन मधून त्या प्रमोदचा फोटो घेतला होता आणि त्याच्यापाठी एक डिटेक्टिव लावला होता. मला असं कळलं आहे की प्रमोदचं आधीच लग्न झालेलं आहे."

हे ऐकून आरोहीला धक्का बसतो.


वैशाली पुढे बोलू लागते

"ताई हा प्रमोद लफंगा आहे. तो तुला म्हणाला होता की त्याचे आई-बाबा परवानगी देणार नाही; पण ह्याचे तर आधीच लग्न झालं आहे. ह्याला दोन मुलं देखील आहेत. ह्याचे आई-बाबा गावी असतात आणि हा असाच मुलींना फसवून त्यांच्याकडून पैसे, दागिने गोळा करून फरार होतो. हे सर्व ऐकल्यावर आरोहीला रडू कोसळते. आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्याची तिला खंत वाटते. ती वैशालीच्या गळ्यात पडून रडते आणि तिने जो योग्य रस्ता दाखवला त्यासाठी तिचे आभार मानते.

वैशाली म्हणते
"ताई, फक्त आभार मानू नकोस आता आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे."

आरोही म्हणते
"काय महत्त्वाचं काम करायचं आहे."


"तू प्रमोदला फोन लाव." वैशाली.

आरोही चिडते. त्या नीच माणसाला मी फोन लावणार नाही.

"ताई तू फोन लाव. प्लिज माझं ऐक. आज तू सुटली त्याच्या कचाट्यातून ; पण उद्या जर त्याने दुसऱ्या मुलीला फसवले तर तिचं काय? तिचे आयुष्य तर बरबाद होईल. कुठेतरी हे आपल्याला थांबायला हवे."

आरोही विचार करते आणि म्हणते

"वैशु, तुझं बरोबर आहे आता आपण ह्याला सोडायचं नाही. आरोही त्याला फोन लावते आणि भेटण्यासाठी एक जागा निश्चित करते. इथे वैशाली पोलिसांना याबाबत खबर देते ;कारण की पोलीस त्याच्या शोधातच असतात. हा वेष बदलून निरनिराळ्या ठिकाणी अशी फसवेगिरी करतच असतो.

प्रमोद ठरलेल्या ठिकाणी बरोबर येतो. तो आरोहीची वाट पाहत असतो. आरोही बॅग घेऊन येत आहे हे पाहून प्रमोद प्रचंड खुश होतो. मासा जाळ्यात अडकल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसते. तो ती बॅग घेण्यासाठी तिच्या जवळ येतो. तितक्यात त्याला पोलीस दिसतात. पोलिसांना बघितल्या बघितल्या पळ काढतो; पण चारी बाजूने पोलीस उभे असतात आणि त्याला पकडतात. आरोही प्रमोद जवळ येते आणि त्याच्या जोरात कानशिलात लगावते.

"तुला लाज वाटली नाही माझ्या भावनांशी खेळायला. मीच मूर्ख मी माझ्या जन्मदात्या आई-वडिलांना आणि माझ्या बहिणीला अंधारात ठेवत होते. मी विश्वासघात करणार होते. मी तुझ्यासारख्या माणसाच्या प्रेमात पडले हे मी माझं दुर्भाग्य समजते.

"घेऊन जा पोलीस साहेब ह्या लफंग्याला."

आरोहीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती वैशूला घट्ट मिठी मारते आणि म्हणते
"वैशू,आज तू माझं खऱ्या अर्थाने रक्षण केलंस. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही."

वैशाली आरोहीच्या डोळ्यातले पाणी पुसत म्हणते.
"ताई, आता रडायचं नाही. आता लग्नाची तयारी आपल्याला जोरात करायची आहे बरं का? हो आणि ते पैंजण कुठे बरं हरवलं तेही शोधुया."

दोघी बहिणी खळखळून हसतात आणि पुन्हा एकमेकींना मिठी मारतात.

खरंतर आयुष्यात खूप माणसं भेटतात. कधी कधी आपण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आपले नुकसानच होते. जसे ह्या कथेत प्रमोद सारखा भामटा आरोहीच्या भावनांशी खेळतो आणि तिला फसवायला निघालेला असतो. त्याच वेळी आरोहीची लहान बहीण वैशाली प्रमोदचा मुखवटा दूर करते आणि खरं रूप दाखवते. प्रत्येक वेळी वैशाली सारखी व्यक्ती आपल्याला भेटेलच असे नाही. त्यामुळे माणसं ओळखणे ही कला प्रत्येकाने अवगत केलीच पाहिजे तरच ह्या दुनियेत आपला निभाव लागणार. स्वतःचे रक्षण करणे ही स्वतःचीच जबाबदारी आहे. बरोबर ना?

समाप्त.
अश्विनी ओगले.
वाचकहो कशी वाटली कथा? कंमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक,शेअर जरूर करा. अश्याच कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा. धन्यवाद.

🎭 Series Post

View all