ठकबाजी.भाग ४

मला माहित नाही पुढे काय होणार ; पण मला इतकंच ठाऊक आहे की मला माझं आयुष्य प्रमोद सोबतच जगायचे आहे.तू जर आई बाबांना काही सांगितले तर मी माझे काहीतरी बरे वाईट करून घेईन."


गेल्या भागात आपण पाहिले वैशालीला आरोहीचे सत्य कळते. ती एका दुसऱ्याच मुलावर प्रेम करत असते.

ती आरोहीला विचारणार तेवढ्यात आई बाबा येतात आता पाहू पुढे.


आरोहीच्या आई-बाबांच्या डोळ्यांमध्ये पाणी येते ; कारण आरोही आता काहीच दिवसानंतर तिच्या सासरी जाणार.

अनेक जुन्या आठवणी दाटून येतात. इवल्याश्या पावलांनी आरोही पहिल्यांदा घरी आली, तेव्हापासून ते आज पर्यंतच्या अनेक लहान सहान गोष्टी त्या दोघांनाही आठवत होत्या. बघता बघता आरोही कधी मोठी झाली आणि ती आता सासरी जाईल या भावनेने दोघेही आई-वडील दु:खी झाले होते. आरोहीला सुद्धा आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू बघून खूप वाईट वाटले आणि मनामध्ये प्रमोदचाही विचार आला. प्रमोदवर,आपण खरं प्रेम करतो. आई बाबा आपल्याला लग्न झाल्यावर नक्कीच माफ करतील. तिला अपेक्षा होती सर्वकाही ठीक होईल. खरंतर तिचेही आई-बाबांवर जीवापाड प्रेम होते. आई-बाबांची लाडकी लेक होती. लहानपणापासून आरोहीला हवं तसं सगळ्या गोष्टी मिळत गेल्या होत्या. आई-बाबांनी सर्व लाड पुरवले. कोडकौतुक तर नेहमीच होत राहीले होते. मग इतकं सगळं असून सुद्धा आरोही असा निर्णय का घेत होती? प्रेमापोटी?

दुसऱ्या दिवशी आई-बाबा काही कामानिमित्त बाहेर गेले होते. वैशाली ठरवते आता काहीही झालं तरी आरोहीशी बोलायचं. आरोही आपल्या रूममध्ये बसली होती. तिला किशोरचा फोन येतो. फोन वाजत असतो तरीदेखील ती फोन उचलत नाही.

वैशालीला पाहिल्यावर आरोही किशोरचा फोन घेते. पलीकडून किशोर बोलत असतो.

" आरोही आपल्या लग्नानंतर आपण मनालीला फिरायला जाणार आहोत. मी आताच तिकीट बुक केले. आरोही समोरून फक्त हो हो करत असते. ती एकही वाक्य बोलत नाही. किशोर जे पण म्हणतो त्याला ती हो ला हो करते. थोड्यावेळाने आरोही काहीतरी बहाणा करून किशोरचा फोन ठेवते. हे सर्व काही पाठी उभी असलेली वैशाली बघत असते.

ती सरळ विषयाला हात घालते.
"ताई , तुझं नक्की काय चाललं आहे ?मला कळू शकेल ?"

नजर चोरत आरोही तिला विचारते
" नक्की तुला म्हणायचं काय आहे?"

वैशाली कडक आवाजात म्हणते.

"ताई ,काल मी तुझं फोनवरच सर्व बोलणं ऐकलं आहे. तू प्रमोद बरोबर पळून जाणार आहेस आणि जर तुला किशोरशी लग्न करायचं नव्हतं तर तू त्याला हो का म्हणालीस?

का तू आई-बाबांना खोट्या आशा दाखवल्यास? हे सर्व ऐकून आरोहीला धक्का बसतो. आता आपलं प्रेम प्रकरण लहान बहिणीपर्यंत गेले आहे म्हटल्यावर आरोहीला खरं काय ते सांगावं लागणार होतं.

आरोही म्हणते

" खरंतर मला माहित आहे जे पण मी करते आहे ते चुकीचं करते आहे. मीच ते पैंजण फेकून दिले. किशोर हा खूप चांगला मुलगा आहे; पण वैशाली माझं खरं प्रेम प्रमोदवर आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करते."

प्रमोदने माझ्याकडून वचन घेतले आहे की तो लग्न करणार तर माझ्याशीच करणार. खरं तर प्रमोदचे आई-वडील आमच्या लग्नाला तयार नाहीत. काहीही झालं तरी ते लग्न करणार नाही असंच म्हणतात. प्रमोद मला म्हणाला आहे मी लग्न करेल तर तुझ्याशीच करणार नाही तर जीव देईन. म्हणून आम्ही दोघांनी पळून जायचा विचार केला."

वैशाली " ताई तू हे सर्वकाही आई बाबांना सांगू शकत होतीस; मग तू का नाही सांगितलंस?

" प्रमोदने माझ्याकडून वचन घेतले आहे, कोणाला काहीच सांगायचे नाही. जर कोणाला कळलं तर मग पळून जाणं कठीण होईल."

वैशालीला प्रमोदचं म्हणणं पटत नाही.

" खरंतर प्रमोदवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो म्हणाला आहे एकदा लग्न झालं तर तो स्वतः आई-बाबांशी बोलणार आहे." आरोही.

वैशाली आरोहीला सतर्क करते.
"ताई मला हा मुलगा बरोबर वाटत नाही. ह्या काल आयुष्यात आलेल्या मुलाचे प्रेम तुला जन्मदात्यापेक्षा जास्त वाटते. तू काय करते आहेस ताई ? तू किशोरशी लग्न कर ताई तो खूप चांगला मुलगा आहे."

आरोही चवताळते " मी लग्न करणार तर प्रमोदशी. नाही तर जीव देईल. आरोहीच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी होती. प्रेमात वेडी झाली होती. तिला प्रेमाची नशा चढली होती.

ती वैशालीला म्हणते
" वैशू माझा प्रमोद असा नाही. तो माझा विश्वासघात करणार नाही. वैशू, तू मला वचन दे आई बाबांना तू ह्याच्यातलं काहीच सांगणार नाही. मला माहित नाही पुढे काय होणार ; पण मला इतकंच ठाऊक आहे की मला माझं आयुष्य प्रमोद सोबतच जगायचे आहे.
तू जर आई बाबांना काही सांगितले तर मी माझे काहीतरी बरे वाईट करून घेईन."


क्रमशः

अश्विनी ओगले.

🎭 Series Post

View all