ठकबाजी. भाग ३

वैशालीला मनातल्या मनात असे वाटत होते की आई बाबा ताई वर किती जिवापाड प्रेम करतात आणि ताई , आई-बाबांचा विश्वासघात करणार आहे आणि हे सर्व करताना तिला काहीच कसं काय वाटत नाही.


गेल्या भागात आपण पाहिले लक्ष्मीच्या लक्षात येते आरोहीच्या पायात पैंजण नाही. आरोही देखील न कळल्याचे नाटक करते. आई बाबा खरेदीला गेले असता वैशाली आरोहीशी तिच्या लग्नाच्या खरेदीबाबत, पार्लरवाली विषयी बोलते तरी ती उत्साह दाखवत नाही. वैशाली तिला काही प्रॉब्लेम आहे का विचारते.

आता पाहू पुढे.

आरोही :"काही नाही गं प्रॉब्लेम. माझी अशीच चिडचिड होते आहे. लग्न ठरल्यापासून वेगवेगळे विचार मनात येतात."

तोच आरोहीच्या फोनची रिंग वाजते.

फोनकडे पाहिल्यावर आरोहीचे हावभाव बदलतात. तिचा चेहरा प्रफुल्लित होतो.

ती आरोहीला म्हणते "माझ्या मैत्रिणीचा फोन आहे."

आरोही रूममध्ये निघून जाते.
वैशालीला आता तर अजून शंका येते. \"आताच तर आरोही तोंड पाडून बसली होती आणि फोन आल्यावर लगेच खूश झाली.\"

नक्कीच काहीतरी गडबड आहे हे तिला कळून चुकले होते.

आरोही कोणाशी बोलते आहे हे ऐकण्यासाठी ती दाराला कान लावते. आरोही मैत्रिणीशी नव्हे तर कोणातरी मुलाशी गप्पा मारत
होती.

आरोही बोलत होती.
"आपण आठ दहा दिवसात कुठंतरी दूर जाऊया, वेगळ्या शहरात. मी पैश्याची सोय केली आहे आणि माझे दागिने देखील मी घेऊन येईल. काल मी त्या किशोरने दिलेलं पैजण माझ्या घराच्या पाठी झाडी आहे तिथे टाकून दिले. मला त्याच्याशी नाही तर तुझ्याशी लग्न करून सुखाचा संसार करायचा आहे. चल फोन ठेवते. आई बाबा येतील. लव यु प्रमोद."

हे सर्व ऐकून वैशालीला धक्काच बसतो.
ताई कोणातरी दुसऱ्यासोबत प्रेम करते. ती पळून जाणार आहे. वैशालीला आत्ताच्या आता वाटत होते सरळ जाऊन जाब विचरावा.

\"जर तुला कोणी दुसरा आवडतो तर किशोरला लग्नासाठी हो का म्हणाली?\"

वैशालीला आता रहावत नव्हते.

ती अरोहीला जाब विचारण्यासाठी तिला हाक देणार तोच बेल वाजली.

आई बाबा आले होते. आई बाबांना पटकन सर्वकाही सांगावे असे झाले होते. तिने विचार केला आधी अरोहीशी बोलून बघावं. आई बाबा नसतील तेव्हा बोलूया.

लक्ष्मी सामानाची पिशवी ठेवत म्हणाली.
"वैशु,जरा पाणी दे गं. किती गरमी आहे बाहेर. जीव वैतागला बघ"

"हो आई देते" वैशाली.

वैशालीने आई बाबांना पाणी दिले आणि तिथेच उभी राहिली. तीच्या डोक्यात आरोही जे काही म्हणाली होती ते फिरत होते.

विचारात गुंग असलेल्या वैशालीला आई म्हणाली.
"वैशाली,कोणत्या विचारात आहेस?"

तरी तिचे लक्ष नव्हते.

"अगं, वैशु काय झाले बाळा?"

"काही नाही आई" वैशाली.

आरोही रूममधून बाहेर आली.

तिला पाहून वैशालीला प्रचंड राग आला.

बाबांनी अरोहीला अगदी तसेच पैंजण आणले होते जे किशोरने तिला दिले होते.

आरोहीला म्हणाले

"बघ आरू बेटा , मी तुला म्हणालो होतो ना अगदी तसेच पैंजण मी आणणार म्हणून."

वैशालीला मनातल्या मनात असे वाटत होते की आई बाबा ताई वर किती जिवापाड प्रेम करतात आणि ताई , आई-बाबांचा विश्वासघात करणार आहे आणि हे सर्व करताना तिला काहीच कसं काय वाटत नाही.

लक्ष्मी आणलेला बस्ता दाखवत होती. कोणाकोणाला काय काय साड्या आणल्या आहेत ते दाखवत होती. घरातल्या जवळच्या नातेवाईकांना जरा महागातल्या साड्या घेतल्या होत्या. आई-बाबांनी बरेचसे सामान खरेदी केले होते.

क्रमशः

अश्विनी ओगले.


🎭 Series Post

View all