तेरा साथ है?? भाग ३

कथा त्या दोघांची


तेरा साथ है?? भाग ३


मागील भागात आपण पाहिले की सुमेधाला तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जायचे आहे, आणि तिला तिच्या नवर्‍याची परवानगी हवी आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" संध्याकाळी किती पर्यंत घरी येणार?" विशालने विचारले.

" म्हणजे तुमची परवानगी आहे का?" सुमेधाने आनंदाने विचारले.

" तू जाणार कशी आणि येणार कशी?" त्याने त्याच गंभीरपणे विचारले.

" मी रिक्षाने जाईन आणि रिक्षाने येईन." ती पटकन बोलली. त्यावर काहीच न बोलता विशाल विचारमग्न झाला.

" अंधार पडायच्या आत ये.." विशाल उठून हात धुवायला गेला. त्याचा मूड बघून सुमेधाला मैत्रिणींकडे जायचा प्लॅन कॅन्सल करावासा वाटत होता. पण तिथेही जावेसे वाटत होते. शेवटी शनिवार उगवला. नेहमीची वेळ झाली तरी विशाल जीमला जायला निघाला नव्हता.

" आज जाणार नाही का?" सुमेधाने विचारले.

" तुला सोडीन मगच जाईन." विशाल बोलला. यावर काहीच न बोलता सुमेधा तयार व्हायला गेली. विशालने तिला सोडले. निघताना परत एकदा अंधार पडण्याआधी घरी येण्यास बजावले. मैत्रिणींना भेटायला आतुर झालेली ती, तिच्या कानापर्यंत त्याचे शब्द पोहोचलेच नाही.
मैत्रिणींना भेटून सुमेधाला खूपच आनंद झाला. तिच्या लग्नानंतरच्या गोष्टी ऐकायला त्या आतुर होत्या तर त्यांच्या गमतीजमती ऐकायला सुमेधा आतुर होती. दुपारची जेवणे झाली. सगळं बाहेरूनच मागवलं होतं. त्यानंतर पिक्चरचा प्लॅन ठरू लागला.

" ए मी नाही हां येत पिक्चरला. सहाचा शो नऊपर्यंत संपेल. त्यानंतर घरी जायला उशीर होईल. यांना नाही आवडणार." सुमेधा आढेवेढे घेऊ लागली.

" आम्ही काय परत परत येणार आहोत का? थोडाच वेळ. कर ना ॲडजस्ट." मैत्रिणींचा आग्रह सुरू झाला आणि सुमेधा ते आमंत्रण नाकारू शकली नाही. पिक्चरला जायच्या आधी तिने विशालला मेसेज करून ठेवला. पिक्चर संपला. परत हॉटेलमध्ये जाऊन जेवणं झाली. आणि सगळ्याजणी परत जायला निघाल्या. सुमेधा बाहेर आली. तिने पर्समधला मोबाईल काढला. विशालचे दहा मिस्ड कॉल होते. तिला त्याचा चिडलेला चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला. ती रिक्षासाठी म्हणून उभी राहिली. तिच्या मैत्रिणींनी तिला रिक्षात बसवून दिले. लगेच रिक्षा मिळाली म्हणून तिने देवाचे आभार मानले. तिचा हात परत परत मोबाईलकडे जात होता. ती निघाली आहे , हे विशालला समजावे म्हणून तिने त्याला लोकेशन पाठवले. तो ऑनलाईन होता पण त्याने तिला काहीच रिप्लाय दिला नाही. हे बघून तिला वाईट वाटत होते. पण त्याच्याशी फोनवर आत्ता बोलायची तिची हिंमत नव्हती.

सुमेधाचे वागणे बाजूच्या आरशातून रिक्षावाला बघत होता. सुमेधाच्या घराकडचा रस्ता तसा थोडासा निर्जन होता. दिवसा जरातरी वर्दळ असायची. पण आत्ता एवढ्या रात्री तिथे चिटपाखरूही नव्हते. गार वारा वहात होता. थंडीने सुमेधाच्या अंगावर शहारे आले. तिने अंगाभोवती हात लपेटून घेतले. आज खूप दिवसांनी साडी किंवा ओढणी काहीच नसल्याने तिला कसंतरीच झाले. सकाळी पटकन संपलेला रस्ता आता संपता संपत नव्हता. आणि अचानक रिक्षा थांबली.


पोहोचू शकेल का सुमेधा घरी व्यवस्थित? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all