तेरा साथ है तो भाग १

This Is A Romantic Love Story


आज स्वरा सकाळी लवकरच उठली होती. तिने आज लवकरच स्वतःचे आवरले होते. तिने नाष्टा तयार केला आणि ती तिची रूममेट शिल्पाला उठवत म्हणाली.

स्वरा,“उठा मॅडम! मी नाष्टा तयार करून ठेवला आहे. मी नाष्टा करते आणि निघते आता! इंटरव्ह्यूवला उशीर व्हायला नको.” ती म्हणाली.

शिल्पा,“ थँक्स यार! आणि ऑल द बेस्ट!” ती आळस देत म्हणाली.

स्वरा,“ तुझं थँक्स तुझ्याजवळ ठेव मी आवरून निघते.” ती हसून म्हणाली आणि स्वतःच व्यवस्थित आवरून बाहेर पडली.

स्वराने बी.कॉमनंतर एम.बी.ए फायनान्समधून केले होते. आज तिचा एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये पहिलाच इंटरव्ह्यूव होता आणि कोणत्या ही परिस्थिती तिला नोकरी हवीच होती. ती एका बहुमजली इमारती मधील एका चकचकीत ऑफिसमध्ये पोहोचली. तिथे तिच्यासारखे जवळजवळ पाचशे उमेदवार होते आणि व्हेकेंन्सी फक्त एक! इतके लोक पाहून ती घाबरली. तिच्या पोटात भीतीने खड्डा पडला. ती जाऊन एका खुर्चीवर बसली.तिच्या मनात अनेक विचार फेर धरून नाचत होते.

‛ आज आपलं पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन व्हायला हवं.तरच आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जाता येईल आणि ही नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल. ही नोकरी आपल्याला मिळवयलाच हवी. नाही तर गावाकडे जावे लागेल आणि मग बाबा माझं लग्न लावून देतील. मला पुण्यात राहायचं असेल आणि लग्न टाळायचं असेल तर नोकरी हवीच. नोकरी मिळाली तर लग्न करण्यासाठी वर्ष भर तरी टाळाटाळ करता येईल.’ ती स्वतःलाच बजावत होती.

स्वरा मूळ संगमनेरची होती. बी.कॉमनंतर ती एम.बी.ए करण्यासाठी पुण्याला आली. तिला आता पुन्हा गावाकडे जायचे नव्हते आणि इतक्यात तर लग्न मुळीच करायचे नव्हते म्हणून ती जॉब मिळवण्यासाठी धडपडत होती. या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये एकच जागा होती आणि मुलाखतीचे तीन राऊंड होणार होते. अडथळ्यांची शर्यतच जणू जो या शर्यतीत टिकेल तो पहिला राऊंड पार करून दुसऱ्या राऊंडमध्ये पोहोचणार होता आणि जॉबच्या एकेक पाऊल पुढे जाणार होता. आज तिला पहिला राऊंड काही ही करून पार करायचाच होता.

तिचे नाव पुकारले गेले आणि मनातील उलथापालथ चेहऱ्यावर न दिसू देता ती आत्मविश्वासाने चालत केबीनमध्ये गेली. तिचा इंटरव्ह्यूव अर्धा तास चालला आणि तिने व्यवस्थित उत्तरे दिली. बाहेर येताना तिच्या चेहऱ्यावर इंटरव्ह्यूव चांगला झाल्याचे समाधान झळकत होते.

ती त्या दिवशी रूमवर निघून गेली आणि पुढच्या राऊंडसाठीच्या फोनची वाट पाहू लागली. दुसऱ्याच दिवशी तिला अपेक्षित रिस्पॉन्स आला. दोन दिवसाने तिला दुसऱ्या राऊंडसाठी बोलवण्यात आले. पहिल्या वेळी पेक्षा दुसऱ्या वेळी तिचा कॉंफीडन्स चांगलाच वाढला होता. ती ऑफिसच्या दारात पोहोचली आणि गुळगुळीत पारशीवरून तिचा पाय घसरला पण तिने स्वतःला सावरले. तोच तिच्या मागून येणारा एक तरुण तिला म्हणाला.

“ मिस जरा सांभाळून चाला.”

खरं तर स्वराला त्याचा राग आला होता तिने त्याच्याकडे एक जळजळीत नेत्र कटाक्ष टाकला पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत रिसेप्शनिष्टकडे काही तरी चौकशी करून खुर्चीवर जाऊन बसली. आज पहिल्या वेळी पेक्षा कॅण्डीडेटस् कमी दिसत होते. तो मुलगा ही ती ज्या रोमध्ये बसली होती. तिथेच येऊन बसला. तिने त्याच्याकडे तिरकस नेत्र कटाक्ष टाकला आणि मनातच चरफडत म्हणाली.

‛म्हणजे हा पण इंटरव्ह्यूव द्यायला आला आहे!’

ती केबीनमध्ये जाताना त्या मुलाने तिला गोड हसून ऑल द बेस्टचा अंगठा दाखवला आणि ती अजूनच चिडली.पण तसं न दाखवता तिने हसून त्याच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.तिच्या मनात विचार तरळून गेला.

‛मुर्खच आहे. मी याची कॉम्पिटीटर आहे आणि हा मलाच ऑल द बेस्ट म्हणतोय.’

या वेळी ही ती चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यूव देऊन बाहेर पडली. त्या मुलाचा नंबर तिच्यानंतर दोन लोकांच्या नंबरनंतर होता. ती बाहेर जाताना त्याने तिला ओळखीची स्माईल दिली. ती नाटकीपणे हसली आणि निघून गेली. पुन्हा पुढच्या कॉलची वाट पाहत राहिली. तीन दिवसांनी तिला पुढच्या राऊंडचा कॉल आला. दोन दिवसांनी परत तीच सगळी प्रोसिजर होणार होती. ती पुन्हा तयारी निशी इंटरव्ह्यूवसाठी पोहोचली. आज फक्त नऊ लोक इंटरव्ह्यूवसाठी आलेले दिसत होते म्हणजे तिसऱ्या राऊंडसाठी फक्त दहा लोकांची निवड झाली होती. त्यात नऊ लोकांत तिला पुन्हा तो दिसला. आज तो तिच्याजवळच्या खुर्चीवर बसला होता. त्याने तिला पाहिले आणि स्माईल केले. ती ही हसली.

आज ती तिच्या ही नकळत त्याला न्याहाळत होती. उंचापुरा, उभट चेहऱ्याचा नाकी-डोळे नीटस पण डोळे मात्र विलक्षण होते त्याचे काळेभोर पाणीदार जणू काही आत्ताच सुरमा लावला आहे असे! सावळ्या रंगाचा, कुरळ्या दाट पिंगट केसांचा हँडसम तो! त्याच्या व्यक्तिमत्त्वात कमालीचा कॉम्फीडन्स दिसत होता. दोन मिनिटं ती त्याला पाहत राहिली आणि कोणाच्या तरी बोलण्याने भानावर आली. तो बोलत होता आवाज ही मादक जणू काही आत्ताच मधाचे बोट चाखून आला आहे.

“हाय! मी आशिन परांजपे! अभिनंदन तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी सिलेक्ट झालात त्याबद्दल!” तो उजवा हात पुढे करत हसून म्हणाला आणि त्याच्या मोत्यासारख्या शुभ्र दंतपंक्तीने तिचे लक्ष वेधले.तिने स्वतःचा हात पुढे केला आणि म्हणाली.

“तुमचे ही अभिनंदन! पण नोकरी एकालाच मिळणार आहे.” ती हसून म्हणाली.

“ सो व्हॉट! अरे आपण इतक्या पाचशे लोकांमधून तिसऱ्या राऊंडसाठी दहा लोकांमध्ये आहोत म्हणजे आपल्यात नक्कीच काही तरी स्पार्क असेल ना? आता नोकरी कोणाला मिळणार हा नशिबाचा भाग आहे.” तो थोडा बेफिकीरपणे म्हणाला.

“ते देखील आहेच म्हणा!” ती हसून म्हणाली.

तिचा इंटरव्ह्यूव झाला आणि ती निघून गेली. दोन ते तीन दिवसाने निकाल कळणार होता. ती तिच्या रूमवर गेली पण तो तिच्या मनात रुंजी घालत होता. ती स्वतः आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःला न्याहाळू लागली. रंगाने तशी निमगोरी,तिथल्या तिथेच असलेले नाक आणि काळे अगदी सामान्य डोळे, अगदी किरकोळ बांध्याची पण काळ्याभोर लांब केसांची तिच्या दाट केसांची वेणी तिच्या माने बरोबर नागिनीसारखी हेलकावे खात असे.ती स्वतःला आरशात पाहत मनातच बोलत होती.

“किती सामान्य दिसते नाही मी! माझ्यापेक्षा सुंदर मुलींना पाहून जेव्हढा हेवा मला वाटला नाही जेव्हढा त्या आशिनला पाहून वाटला. परमेश्वर एखाद्याला दोन्ही हाताने किती भरभरून देतो ना! दिसायला कसला हँडसम आहे तो! काळेभोर पाणीदार डोळे, त्या शुभ्र दान्तपंक्ती, आवाज ही किती छान आहे आणि हुशार देखील असणारच उगीच का तिसऱ्या राऊंडपर्यंत पोहोचला.मॅडम त्याचा इतका विचार करू नका तुमचा स्पर्धक आहे तो! अरे आपण तर त्याला आपले नाव सांगायचे विसरलोच की त्याने तरी कुठे विचारले आपल्याला आपले नाव? असो आपल्या आवाक्याच्या बाहेरचा आहे तो स्वरा मॅडम!” ती स्वतःशीच म्हणाली आणि तिच्या कामात व्यस्त झाली.

आज तब्बल पाच दिवस होऊन गेले तरी त्या ऑफिसमधून कोणताच कॉल आला नव्हता. त्यामुळे तिने ती नोकरी आपल्या हातून गेली असे गृहीत धरले आणि ती सकाळी सकाळी वर्तमानपत्रात जॉबसाठीच्या जाहिराती पाहत होती. तितक्यात तिचा फोन खणखणला. तिने फोन उचलला आणि तिने बसल्या जागेवरच अत्यानंदाने उडी मारली. तिला ऑफिसमध्ये बोलावले होते. जॉब तिलाच मिळाला होता.

ती दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायला निघाली पण जॉब मिळाल्याच्या आनंदाबरोबर तिच्या मनात एक हुरहूर देखील होती.मला जॉब मिळाला म्हणजे आशिनला नोकरी मिळाली नाही. म्हणजे तो आपल्याला आता कधीच भेटणार नाही. हा विचार मनात डोकावताच तिचे मन थोडे नाराज झाले. आपण त्याच्याबद्दल इतका विचार का करत आहोत हे मात्र तिला कळत नव्हते. तरी ती त्याच्याबद्दलचे मनातील विचार झटकत ऑफिसमध्ये पोहोचली.

स्वरा आशिनच्या प्रेमात तर पडली नव्हती. तिची आणि त्याची भेट आता कशी होणार होती? कारण ऑफिसमध्ये तर एकच व्हेकंन्सी होती आणि ती जागा तर स्वराला मिळाली होती. त्यामुळे तो त्या ऑफिसमध्ये तिला आता भेटणे अशक्यच होते. नोकरी मिळाल्याचा आनंद असला तरी तिचे मन नाराज होते.

आशिन स्वराला पुन्हा भेटेल का? पाहूया पुढच्या भागात
क्रमशः

आजपासून आपण जाणार आहोत एका नव्या रोमँटिक सफारीवर! माझ्या कथेला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका फक्त आपल्या इरा पेजवर!
©swamini chougule
★★★

🎭 Series Post

View all