तेरा साथ है तो भाग ७

This Is A Love Story


दिवस वाऱ्यासारखे उडून जात होते. आशिन-स्वरा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.दोघे ही विक एन्डला त्याच्या फ्लॅटवर भेटायचे. कधी फिरायला जायचे.एकमेकांचा सहवास आणि चोरटे स्पर्श मनसोक्त अनुभवायचे.दोघे ही बिनधास्त एकमेकांना सुखावत असले तरी आशिन त्याची मर्यादा पाळून होता.तो कधीच एका मर्यादेच्या पुढे गेला नव्हता.

अशीच नेहमीप्रमाणे स्वरा विक एन्डला आशिनच्या फ्लॅटवर आली होती. आज रविवार असल्याने असं ही दोघे निवांत होते.ती आज सकाळीच त्याच्या फ्लॅटवर आली होती. ती किचनमध्ये स्वयंपाक करत होती आणि आशिन तिथे तिला मदत करण्याच्या नावा खाली त्रास देत होता.स्वरा समोर पाहून चपात्या लाटत होती आणि आशिनने तिला मागून मिठी मारली.

स्वरा,“ सोड बरं आशु काय चालले आहे तुझे मघाशीपासून! मी स्वयंपाक करत आहे ना!” ती स्वतःला सोडवून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत त्याला म्हणाली.

आशिन,“ आल्यापासून नुसती किचनमध्ये घुसून बसली आहेस. नाष्टा केला आहे ना मग स्वयंपाकाची लगेच गरज काय? तू लग्नानंतर पण अशीच वागणार का? त्या पेक्षा ना मी एक कुक ठेवतो स्वयंपाकाला!” तो तिला स्वतःकडे वळवून घेत नाराजीने बोलत होता.

स्वरा,“ झालंच की तुला थोडा पण दम निघत नाही का? आणि तुझ्याच आवडीचे बनवत आहे ना सगळं? आलाय मोठा कुक ठेवणारा!आणि काय हवं रे तुला किती वेळ झालं इथे लुडबुड सुरू आहे तुझी!” तिने वैतागून विचारले.

आशिन,“ एक तर तुला असं भेटण्यासाठी आठवडा भर वाट पहावी लागते आणि आता आलीस की लागली किचनमध्ये! मला हवं ते घेतो माझं मी!” असं म्हणून त्याने तिला भिंतीला टेकवले आणि तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेतला. त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. ती ही त्याच्याबरोबर विरघळू लागली. दोघे बराच वेळ एकमेकांमध्ये गुंतत होते. स्वरा भानावर आली ती कसल्याशा जळक्या वासाने. तव्यावर चपाती करपत होती.

स्वरा,“सोड बरं आशु मला तू अति शहाणा आणि मी दीड शहाणी बघ चपाती करपली तव्यात!” ती त्याला ढकलत वैतागून म्हणाली.तिने पटकन गॅस बंद केला. आशिनने मात्र तिला दोन्ही हातावर उचलले आणि तो म्हणाला.

आशिन,“ तू अशी नाहीच ऐकणार गॅस बंद केलास ना झालं मग! मला भूक नाही.” असं म्हणून तो तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिला बेडवर अलगत झोपवले

स्वरा,“नालायक आहेस तू! आजकाल खूप मनमानी करायला लागला….” ती झोपल्या जागेवरून बोलत होती पण तिचे पुढचे शब्द ओठातच राहिले कारण त्याने पुन्हा तिचे ओठ स्वतःच्या ओठात कैद केले होते.

दोघे ही भान हरपून एकमेकांच्या मिठीत विरघळत होते. थोड्या वेळाने आशिनने तिला सोडले आणि ती त्याला मिठी मारून त्याच्या छातीवर विसावली.

स्वरा,“ झालं समाधान? नालायक कुठला?” ती लटक्या रागाने म्हणाली.

आशिन,“ नाही ना! उपाशीच आहे मी अजून अर्धा! स्वरा तीन महिने झाले तुझ्या म्हणण्याप्रमाणे अजून तीन महिने! मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आता आणि असं अर्ध उपाशी तर नाहीच नाही. तू अशी माझ्या मिठीत असली की मला मोह आवरता आवरत नाही आणि मग त्रास होतो अशा अर्धवट उपवासाचा! आपण लग्न करूया ना लवकर!” तो तिच्या गोऱ्या उघड्या पाठीवरून हात फिरवत बोलत होता.

स्वरा,“ मी नाही तुझ्यावर बंधन घातलं कसलं ही! तूच असा वागतोस. आणि स्वतःला आणि मला पण त्रास देतोस. एक तर तुला राहवत पण नाही आणि साहवतपण नाही. कुणी सांगितलं आहे तुला मर्यादा वगैरे पाळायला?” ती त्याचे नाक ओढत लाडीकपणे बोलत होती.

आशिन,“ माझं मन नाही मनात ना? काय करू मी! आपण ना आता लग्न करू.मी माझ्या आई-बाबांनी सांगतो तुझ्या घरी जाऊन रीतसर तुला मागणी घालायला.” तो बेडला टेकून बसत आणि तिला उठवून स्वतः जवळ ओढत म्हणाला.

स्वरा,“ ठीक आहे करू आपण लग्न! पण माझ्या घरी नाही सांगायचे काही.” ती त्याचा हात हातात घेत म्हणाली.

आशिन,“ काय? वेडी आहेस का तू?” त्याने आश्चर्याने विचारले.

स्वरा,“ नाही. मी आजपर्यंत माझ्या घरच्यांबद्दल तुझ्याशी बोलणं टाळत आले पण इट्स हाय टाईम नाऊ! माझ्या घरी माझे आई-वडील मोठा भाऊ आणि माझ्यापेक्षा मोठी असलेली बहीण आहे. मी घरात लहान आहे.आई-वडील दिसायला छान आहेत त्यामुळे मुलं ही छान असलीच पाहिजेत हा समज!माझे भाऊ-बहीण दिसायला सुंदर पण मी दिसायला बेताचीच त्यामुळे मला कायम हीन वागणूक मिळाली. त्यातूनच मी दिसायला चांगली नाही हा न्यूनगंड माझ्या मनात तयार झाला.पण मी हुशार होते. माझ्या हुशारीच्या जोरावर मेरिटमध्ये आले बी.कॉमला आणि त्यानंतर एम.बी.ए. एंट्रन्स देखील चांगल्या मार्कानी पास झाले. मला मुंबईतील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले पण घरात सगळे मागास मनोवृत्तीचे आहेत. तुला इतक्या लांब सोडणार नाही असे बाबांनी सांगून टाकले. मी आईला गळ घातली. उद्या लग्न करताना माझे शिक्षण कामी येईल असे सांगून तिला बाबांशी बोलायला भाग पाडले. बाबांना ही माझे म्हणणे पटले आणि त्यांनी मला शिक्षणासाठी मुंबईत पाठवून दिले. मी मुंबईत आले आणि मोकळा श्वास घेतला. दोन वर्षे पूर्ण झाले आणि डिग्री मिळाली पण मला पुन्हा गावाकडे जायचे नव्हते कारण मला मिळणारी वागणूक आणि दुसरं म्हणजे माझे लग्न लगेच लावून दिले असते बाबांनी! मला इतक्यात लग्न करायचे नव्हते म्हणून मी नोकरीसाठी धडपडू लागले आणि लकिली मला पहिल्याच प्रयत्नात नोकरी मिळाली आणि तू देखील! तू मला माझी नव्याने ओळख करून दिली आशु! तू मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलेस. माझे घरचे मागास विचारांचे आहेत लव्ह मॅरेज म्हणजे त्यांच्यासाठी पाप आहे. जात-पात, गोत्र या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यांना जर कळले की मी तुझ्या प्रेमात आहे तर ते मला इथून जबरदस्तीने घेऊन जातील आणि माझं लग्न कुठे तरी करून देतील. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय त्यापेक्षा त्यांना न सांगता आपण लग्न केले तर ते काहीच करू शकणार नाहीत कारण आपण कायदेशीर नवरा-बायको असू.” ती रडत बोलत होती.

आशिन,“ अग पण तुझ्या आई-वडिलांच्या संमती शिवाय लग्न करायचे का आपण?” त्याने तिचे डोळे पुसत विचारले.

स्वरा,“ हो!कारण ते माझ्या मनातून त्यांच्या वागणुकीमुळे केंव्हाच उतरले आहेतच आणि दुसरं ते आपल्या लग्नाला संमती देणारच नाहीत. उलट तुझा आणि तुझ्या आई-वडिलांचा अपमानच करतील.त्यापेक्षा त्यांना न सांगता आपण लग्न करू प्लिज!” ती त्याला पाहत म्हणाली.

आशिन,“ बरं तुझ्या इच्छे पुढे आणि आनंदापेक्षा मला काहीच महत्त्वाचे नाही. मी उद्याच आई-बाबांशी बोलून घेतो. तुझ्याबद्दल मी आधीच घरी कल्पना दिली आहे. आपण पुढच्या आठ दिवसात गावी जावून लग्न करू पण माझी एक अट आहे.” तो तिला रोखून पाहत म्हणाला.

स्वरा,“अट? कोणती?” तिने घाबरून विचारले.

आशिन,“ लग्न झाल्यावर आपण तुझ्या गावी जाऊन तुझ्या घरच्यांचा आशीर्वाद घ्यायला जायचे.” तो म्हणाला.

स्वरा,“ ठीक आहे. तुला हौसच असेल अपमान करून घ्यायची तर घे भागवून! असं ही ते माझ्याशी असणारे संबंध तोडणारच आहेत त्यांना मी त्यांच्या परस्पर लग्न केले हे कळाल्यावर!” ती थोडी दुःखी होत म्हणाली.

आशिन,“ एक प्रयत्न करूयात का मग आपण?” त्याने तिचा हात धरून विचारले.

स्वरा,“नको. त्याचा काही उपयोग नाही मी माझ्या बाबांना चांगलं ओळखते. फक्त आईची आठवण येईल मला. मी इतकी वर्षे फक्त तिच्यामुळे त्या घरात टिकून राहिले.तिचा जीव आहे माझ्यावर पण तुला जेंव्हा ती माझ्या नवऱ्याच्या रुपात पाहिल तेंव्हा खुश होईल.” ती डोळे पुसत म्हणाली.

आणि आशिनने तिला जवळ घेतले.ती बराच वेळ त्याच्या मिठीत मुसमुसत राहिली. तिने आज त्याच्यासमोर तिच्या आयुष्यातली काळी बाजू उलगडली होती. खरं तर कोणत्या ही मुलीच्या आयुष्यात लग्न हा खूप मोठा सोहळा असतो आणि तो तिला आप्तस्वकीयांबरोबर साजरा करायचा असतो पण स्वराने मात्र थोडा वेगळा निर्णय घेतला होता कारण ती तिच्या वडिलांना चांगलच ओळखत होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या घरच्यांनी तिला दिलेली वागणूक ज्यामुळे तिच्या मनात आई सोडली तर भाऊ-बहीण आणि वडील यांच्याबद्दल कटुता होती.
क्रमशः
©Swamini chougule
★★★

🎭 Series Post

View all