तेरा साथ है तो भाग २

This Is A Love Story


भाग 2

ती ऑफिसमध्ये निघाली पण तिच्या मनात एक प्रकारची हुरहूर होती कारण आता आशिन तिला भेटणार नाही. हा विचार तिला सतावत होता.त्याला तर आपण आपले नाव देखील नाही सांगितले. एक विचार तिच्या मनात चमकून गेला.या सगळ्या विचारांच्या तंद्रीतच स्वरा ऑफिसमध्ये पोहोचली तर तिच्या आधी तिला तिथे हसतमुखाने हजर असलेला आशिन दिसला. तिला त्याला पाहून मनोमन आनंद तर झाला पण तिला त्याला पाहून आश्चर्य देखील वाटले. आशिनला ही स्वराला पाहून आश्चर्य वाटत होते कारण एकच व्हेकेंसी होती. मग दोघांना ही का बोलावले आहे असा प्रश्न दोघांना ही पडला होता.

तेवढ्यात रिसेप्शनिष्टने दोघांना ही केबीनमध्ये बोलावले आहे असे सांगितले. दोघे ही केबीनमध्ये गेले तर मिस्टर पाटील हसून दोघांना ही म्हणाले.

पाटील,“ या मिस्टर आशिन आणि मिस स्वरा!बसा!”

दोघे ही त्यांना थँक्स म्हणाले आणि त्यांच्यासमोर खुर्च्यांवर बसले.दोघांच्या ही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह साफ झळकत होते. ते पाहून पाटील त्यांना म्हणाले.

पाटील,“ तुमच्या मनात असलेले प्रश्न मला कळत आहेत. खरं तर इंटरव्ह्यूव असिस्टंट मॅनेजरच्या एकाच पदासाठी होता आणि भरायचे देखील एकच पद होते पण तुमच्यासारखे टॅलेंटेड कॅण्डीडेट कंपनीला सोडायचे नव्हते म्हणून मग मॅनेजमेंटने एक निर्णय घेतला आहे.”ते म्हणाले.

स्वरा,“तो कोणता?” तिने न राहवून विचारले.

पाटील,“मिस स्वरा तुम्हाला आम्ही असिस्टंट मॅनेजर म्हणून अपॉइंट करत आहोत हे त्याचे अपॉइंटमेंट लेटर!” ते तिच्या हातात एक लिफाफा देत म्हणाले. ते ऐकून आशिनच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्याचे भाव उमटले. मग त्याला इथे का बोलावले गेले आहे हे त्याला कळत नव्हते.

स्वरा,“ थँक्स सर!” ती आनंदाने म्हणाली.

पाटील,“ मिस्टर आशिन तुमच्या चेहऱ्यावरचे प्रश्न मला कळत आहेत हे तुमचे अपॉइंटमेंट लेटर.” त्यांनी त्याच्या पुढ्यात एक लिफाफा ठेवला. आशिनने तो लोफाफा उघडला आणि त्यातला कागद वाचू लागला. तो कागद वाचताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते आश्चर्य आणि आनंद असे संमिश्र भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. त्याने ते लेटर पाहून विचारले


आशिन, “मी इंटरव्ह्यूव असिस्टंट मॅनेजर पदासाठी दिला होता पण हे…. हे मला खरंच वाटत नाही.” तो अडखळत बोलत होता.

पाटील,“हे खरं आहे मिस्टर आशिन! अहो तुम्हांला आम्ही मॅनेजर म्हणून अपॉइंट करत आहोत. आमच्या टीमने तुमच्या दोघांचा ही इंटरव्ह्यूव घेतला. तुम्ही दोघे ही असिस्टंट मॅनेजर पदासाठी योग्य होता पण व्हेंकेंसी मात्र एक होती आणि आम्हाला तुमच्या दोघांसारखे टॅलेंटेड कॅण्डीडेट सोडायचे नव्हते म्हणून आमच्या मॅनेजमेंट टीममध्ये चर्चा झाली आणि तुम्हा दोघांना ही नोकरी द्यायचा निर्णय झाला पण कोणाला असिस्टंट मॅनेजर आणि कोणाला मॅनेजर पदावर रुजू करून घ्यायचे हा प्रश्न पडला मग दोघांचे इंटरव्ह्यूव पुन्हा पाहण्यात आले. दोघांमधील मिस्टर आशिन थोडे सरस ठरले आणि मिस स्वरा थोडी कमी! उन्नीस-बीसचा फरक मग मुंबईमधील एका ब्रँचमधील मॅनेजरला आम्ही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं त्याला शिफ्टिंग हवेच होते कारण त्याची फॅमिली तिथेच होती आणि तुम्हा दोघांना ही नोकरी मिळाली. अभिनंदन! उद्याच मुलुंडच्या आपल्या शाखेत रुजू व्हा.” ते दोघांना हसून म्हणाले.

स्वरा,“ थँक्स सर!” ती आनंदाने म्हणाली.

आशिन,“ थँक्यू सो मच सर!” तो आत्यंधिक आनंदाने म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

दोघे ही ऑफिसमधून बाहेर पडले.आशिन आनंदानेच स्वराला म्हणाला.

आशिन,“ मिस स्वरा तुमच्यामुळेच मला आज अनपेक्षितपणे मॅनेजरचे पद मिळाले आहे. थॅंक्यू सो मच! की नाराज आहात तुम्ही? की मला मॅनेजर आणि तुम्हाला असिस्टंट मॅनेजर हे पद मिळाले?” त्याने साशंकपणे विचारले.

स्वरा,“ पहिले तर तुम्हाला मी नाव न सांगता तुम्हांला माझे नाव कसे कळाले? आणि नाही वो मला काहीच वाटले नाही. मी ज्या पदासाठी इंटरव्ह्यूव दिला होता ती नोकरी मला मिळाली आणि सर काय म्हणाले की उन्नीस-बीस फरक आहे. तुम्ही माझ्यापेक्षा थोडे जास्त टॅलेंटेड आहात. अभिनंदन!” ती त्याच्यासमोर उजवा हात करत हसून म्हणाली.

आशिन,“पाटील सर म्हणाले ना मिस स्वरा ते ऐकून तुमचं नाव कळलं आणि थँक्स!आणि तुमचेपण अभिनंदन!आज माझ्याकडून तुम्हांला ट्रीट चला समोरच कॅफे आहे.” तो तिला म्हणाला.

स्वरा,“ठीक आहे चला आणि मला अरेतुरे केलं तरी चालेल.” ती हसून म्हणाली.

आशिन,“ हो मला ही अरेतुरे करा असं ही आपल्याला आता एकत्र काम करायचे आहे.(तो म्हणाला आणि दोघे कॅफेमध्ये गेले.) तुम्हाला कोणत्या प्रकारची कॉफी आवडते?” त्याने ऑर्डर देण्या आधी तिला विचारले.

स्वरा,“ हॉट कॉफी! काय आहे चहा कॉफी कशी गरम गरमच घ्यावी. जीभेला चटका बसूपर्यंत ती कोल्ड कॉफी काय म्हणून लोक पितात काय माहीत?” ती थोडं तोंड वाकडं करत म्हणाली.

आशिन,“ एक हॉट कॉफी आणि एक कोल्ड कॉफी!आणि दोन पेस्ट्रीज.” तो म्हणाला आणि स्वराच्या चेहऱ्याचा रंग उडाला.

स्वरा,“ सॉरी ते मी….” ती अडखळत म्हणाली. तर आशिन फसकन हसला. तो स्वतःचे हसू आवरत म्हणाला.

आशिन,“ इट्स ओके! मला बाबा दोन्ही प्रकारच्या कॉफी आवडतात. जिभेला चटका देणारी ही आणि गळ्याला गारवा देणारी ही!”

स्वरा,“ हो का?” ती नाटकी हसून म्हणाली आणि मनात म्हणाला

‛विचित्र नमुला आहे हा!’

आशिन,“हो मी जरा विचित्र आहे.” त्याला जणू हिच्या मनातले ऐकू गेल्यासारखं तो म्हणाला आणि स्वरा थोडी दचकली.

स्वरा,“असं काही नाही.” ती थोडी सावरून बसत म्हणाली.

आशिन,“ मला काय वाटतं माणसाने सगळं करून पाहावं. सगळ्या टेस्ट चाखून पहाव्यात. शेवटी माणसाचा जन्म एकदाच मिळत असतो.” तो अगदी मोकळेपणाने बोलत होता.

स्वरा,“ मला तसं नाही वाटतं. कारण माझा स्वभाव थोडा चुझी आहे. मला खूप कमी गोष्टी आवडतात.” ती म्हणाली.

आशिन,“ दॅट्स कुल!प्रत्येकचे विचार वेगळे.” तो म्हणाला आणि तोपर्यंत कॉफी आणि पेस्ट्रीज आले.दोघांनी ही ते संपवले. स्वरा म्हणाली.

स्वरा,“ बरं मी निघते. उद्या ऑफिसमध्ये भेटूच आणि पुढच्या वेळी ट्रीट माझ्याकडून!” ती मनगटीघड्याळ पाहत म्हणाली.

आशिन,“ओके बाय!” तो म्हणाला.

स्वरा आज मनातून खूप खुश होती. एक तर तिला जॉब मिळाला होता त्यामुळे तिचे सगळे प्रश्न सुटले होते तर दुसरं आशिनबरोबर तिला काम करायला मिळणार होते. ती नाचतच रूमवर गेली. एव्हाना संध्याकाळचे सहा वाचले होते. त्यामुळे शिल्पा घरी आली होती. तिने पर्स खुर्चीवर फेकली आणि शिल्पाचे दोन्ही हात धरून एक गिरकी मारली. शिल्पाने तिला थांबवले आणि हसतच तिला विचारले.

शिल्पा,“ नोकरी मिळाली वाटतं मॅडमला?”

स्वरा,“ हो मिळाली ना! तुला खूप काही सांगायचे आहे ग! मी फ्रेश होऊन येते. तोपर्यंत तू चहा कर ना!” ती म्हणाली आणि बाथरूमकडे वळली. ती चेंज करून फ्रेश होऊन आली तोपर्यंत शिल्पा चहा आणि बिस्कीट घेऊन किचनमधून बाहेरच्या रूममध्ये आली.

शिल्पा,“ हा बोल आता काय काय झाले. बाकी नोकरी मिळाली तुला ते भारी झालं.” ती चहाचा कप तिच्या हातात देत म्हणाली.

स्वरा,“ हो ना पण मी ऑफिसमध्ये पोहोचले तर माझ्याबरोबर इंटरव्ह्यूव दिलेला. आशिन ही हजर होता.व्हेंकेसी एक आणि कंपनीने नोकरी देण्यासाठी दोन कॅण्डीडेट बोलवले होते. मी तर जरा घाबरले होते पण आशिनला पाहून बरं देखील वाटत होतं. तोपर्यंत केबीनमध्ये दोघांना ही बोलवण्यात आले. अँड गेस व्हॉट आम्हा दोघांना ही नोकरी मिळाली.”ती उड्या मारत म्हणाली.

शिल्पा,“ अग व्हेकेंसी एक आणि तुम्हा दोघांना नोकरी कशी मिळाली?” तिने काहीच न कळल्याने विचारले.

स्वरा,“अग असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टसाठी आम्ही दोघे इलिजेबल होतो पण ती पोस्ट मला मिळाली आणि आशिनला मॅनेजरची पोस्ट मिळाली.”ती खुश होत म्हणाली.

शिल्पा,“ अग ये मूर्ख! तुझ्यामुळे त्या मुलाला मॅनेजरची पोस्ट मिळाली आणि तू खुश होत आहेस?” ती थोडी रागाने म्हणाली.

स्वरा,“ असं काही नाही ग अग पाटील सर म्हणजे आमचे बॉस म्हणाले की उन्नीस-बिसचा फरक आहे दोघांच्यामध्ये तो बिस आहे आणि खरच आहे ग ते; तो माझ्यापेक्षा थोडा हुशार आहे. आज ट्रीटपण दिली त्याने मला!” ती पुन्हा खुश होत म्हणाली.

शिल्पा,“ काय मॅडम प्रेमात पडला की काय त्याच्या?” ती भुया उडवत हसून तिला पहात म्हणाली.

स्वरा,“ नाही ग बाई! तो कुठे हँडसम, गुड लुकिंग आणि मी कुठे? माझ्या अवाक्याच्या बाहेरचा आहे तो!” ती थोडी उदास होत म्हणाली.

शिल्पा,“ ओय होय हँडसम, गुड लुकिंग अँड ऑल दॅट!”ती तिला चिडवत म्हणाली.

स्वरा,“ गप्प ग!” ती हसून म्हणाली.

जेवण करून तिने रात्रीच उद्या ऑफिसमध्ये जाण्याची तयारी करून ठेवली. स्वरा आशिनच्या खरंच प्रेमात पडली होती का?पण आशिनच्या मनात तसं काही असेल का?
क्रमशः
©swamini chougule

🎭 Series Post

View all