तेरा साथ है तो भाग ११

This Is A Love Story

आशिनने बाईकला किक मारली आणि स्वरा त्याला खेटून बाईकवर बसली. तिने त्याच्या कमरे भोवती दोन्ही हात लपेटले होते आणि आशिन साईट मिररमध्ये तिला पाहून गालात हसला. स्वराने त्याच्याकडे डोळे वटारून पाहिले पण ती लगेच गोड लाजली. आशिनने त्याची टू व्हीलर एका पंचतारांकित हॉटेलसमोर थांबवली. त्याने तिचा हात धरला आणि दोघे ही हॉटेलच्या प्रायव्हेट एरीआमध्ये पोहोचले. स्वरा सगळीकडे पाहत होती. सगळीकडे एकमेकांपासून दूर दूर छोट्या छोट्या झोपड्या दिसत होत्या. आशिन तिला एका झोपडीत घेऊन गेला. बाहेरून झोपडी वाटत असली तरी आत सुंदर सजावट केलेली होती. आत टेबल दोन खुर्च्या आणि इंटर कॉम होता म्हणजेच ही जागा खास कपल्ससाठी बनवण्यात आली होती. कपल्सच्या प्रायव्हसीची पूर्ण काळजी घेण्यात आली होती.

स्वरा,“ आशिन तू ना नुसता उधळ्या आहेस!किती पैसे खर्च केलेस?” तिने थोड्या रागाने विचारले.

आशिन,“ यार स्वरू रोमान्सचा विचका नको करुस! आणि काय पैसा पैसा करतेस ग? हे दिवस पुन्हा येणार आहेत का आपल्या आयुष्यात? आणि आजचा दिवस तर खूप खास आहे माझ्यासाठी तरी!” तो तोंड वाकडं करत नाराजीने म्हणाला.

स्वरा,“ अच्छा फक्त तुझ्यासाठी खास आहे का आजचा दिवस? माझ्यासाठी नाही का? बाय दि व्हे मी पण तुझ्यासाठी गिफ्ट आणले आहे.” असं म्हणून तिने एक बॉक्स त्याच्यासमोर धरला. त्याने तो बॉक्स उघडला आणि खुश होत म्हणाला.

आशिन,“ कपल वॉच? मस्त आहे की!”

स्वरा,“ आवडली ना तुला? एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी!हे घड्याळ कायम तुला माझी आठवण करून देत राहील.” ती हसून म्हणाली.

आशिन,“ छान आहे आवडली मला! आणि तुझी आठवण करून द्यायला तुला विसरायला तर हवे आधी स्वरू! माणूस श्वास घेणं विसरतं का? श्वास थांबला तर माणूस मरून जातो. तू माझा श्वास आहे. तुझ्या शिवाय मी मरून जाईन.” तो तिचा हात हातात घेत म्हणाला. ती हसली आणि त्याला म्हणाली

स्वरा,“ असं कोणा वाचून कोणी मरत नसते आशिन! या सगळ्या कवी कल्पना आहेत! समज मी उद्या मेलेच तर तू जास्तीतजास्त रडशील, दुःखी होशील पण वर्ष भरात सावरशील आणि पुढे एक दोन वर्षात घरच्यांच्या सांगण्यावरून दुसरं लग्न करशील. जास्तीतजास्त पाच-सहा वर्षात मला विसरून ही जाशील आणि त्यात गैर काहीच नाही. जग असेच आहे साहेब कोणी कोणासाठी मरत नसतं.” ती म्हणाली आणि आशिन मात्र तिच्यावर चिडला.

आशिन,“काही तरी उगीच अभद्र बरळू नकोस कळलं तुला आणि जर माझी परीक्षा घ्यायची असेल तर घेऊन बघ पश्चात्ताप होईल तुला! कारण तू मला अजून ओळखले नाहीस. मी नाही बोलत आता काही पण लक्षात ठेव तुझ्या शिवाय मी नाही राहू शकत नाही.

मैं तेरे इश्क़ में
मर न जाऊं कहीं
तू मुझे आज़माने
की कोशिश न कर
मैं तेरे इश्क़ में
मर न जाऊं कहीं
तू मुझे आज़माने
की कोशिश न कर
ख़ूबसूरत है तू तो
हूँ में भी हसीं
मुझसे नज़रें चुराने
की कोशिश न कर
मैं तेरे इश्क़ में”

असं म्हणून तिच्या हात धरून गाणं म्हणू लागला आणि स्वरा हसायला लागली.

स्वरा,“ बास बास भावना पोहोचल्या मॅनेजर साहेब आणि गाण्याची मैफिल घरी जाऊन रंगवू आता भूक लागली आहे. जेवण ऑर्डर करा.”

वर्तमान….

हे सगळं आठवून स्वरा रडत रडत हसू लागली. तिने डोळे पुसले आणि पेन-पेपर घेऊन तिने काही तरी लिहले. लिहिताना मात्र तिच्या डोळ्यातून सतत अश्रूसरी बरसत होत्या. तिने चिठ्ठी लिहली आणि कॉर्नर पिसवर ठेवली त्यावर तिथं त्याचा आणि तिचा फोटो असलेली फोटो फ्रेम ठेवली.

स्वराला दोन दिवस झालं अस्वस्थ वाटत होतं. तिला सतत मळमळत होतं. आता तर तिला उलटी आल्या सारखं झालं म्हणून ती बाथरूमकडे पाळाली. तिला उलट्या झाल्या आणि जरा बरं वाटलं. तिने कॅलेंडर पाहिले आणि तिच्या काही तरी लक्षात आलं. तिने फोन केला आणि थोड्याच वेळात एक माणूस काही तरी देऊन गेला. स्वराला पुन्हा उलटी आली म्हणून ती बाथरूममध्ये गेली. ती तोंड पुसत बाहेर आली तर तिचा मोबाईल वाजत होता. तिला वाटलं फोन आशिनचा असेल त्याचा फोन असेल तर उचलायचा नाही असे मनोमन ठरवत तिने फोन पाहिला तर फोन तिची मैत्रीण शिल्पाचा होता. तिने फोन उचलला तर शिल्पा रडत काही तरी सांगत होती.

स्वरा,“ काय? कधी? अग पण इतक्या कमी वयात कसं काय? बरं तू शांत हो! काही होणार नाही त्याला! मी निघतेय हॉस्पिटलसाठी तू कोणते हॉस्पिटल ते सांग. बरं ठीक आहे. शिल्पा प्लिज शांत हो! काही नाही होणार त्याला! तुझे मम्मी-पाप्पा आले आहेत ना? आणि धनंजयचे? बरं! मी येऊ का? बरं ठीक आहे काळजी घे!”

काही तरी गंभीर घडले होते आणि शिल्पा तिच्याशी बोलताना सतत रडत होती. स्वरा येते म्हणाली तर ती नको म्हणाली. तीच बोलणं ऐकून स्वरा सुन्न झाली होती. ती बराच वेळ तशीच बसून राहिली. डोळ्यातून मात्र अश्रू वाहत होते. तिने मोबाईल हातात घेतला दोन वेळा कोणाला तरी फोन करण्यासाठी नाव पाहिले आणि पुन्हा काही तरी विचार करून फोन ठेवून दिला.
•••••

इकडे अफिसमध्ये आशिन त्याच्या कामात गर्क होता. पण अधूनमधून त्याला सकाळी स्वराशी झालेलं भांडण आठवत होते आणि त्याने तिला बोललेले शब्द आठवले की तो अस्वस्थ होत होता. तो स्वतःलाच मनातून दोष देत होता.

‛आशिन तू स्वराला असं बोलूच कसं शकतोस? ती तुझ्या आयुष्यातुन वजा झाली तर तुझं आयुष्य शून्य आहे. मूर्ख कुठला.’ तितक्यात कोणी तरी त्याच्या केबीनचे दार नॉक केले आणि तो भानावर आला.

आशिन,“ यस कम इन!” तो म्हणाला त्याची सेक्रेटरी इशा होती.

इशा,“ सर आज सहा मार्च आहे.आपल्या डोंबिवली ब्रँचच्या मॅनेजरची रिपोर्ट सादर करायची आज शेवटची तारीख आहे.” ती म्हणाली आणि आशिनने तिला विचारले.

आशिन,“ किती तारीख आहे आज?”

इशा,“ सहा मार्च!” ती म्हणाली.

आशिन,“ अरे यार!(तो डोक्याला हात लावून म्हणाला आणि समोर इशाला पाहून सावरला आणि तिला म्हणाला.) बरं तू जा आणि फोन करून त्यांचे अपडेट घे.” तो म्हणाला आणि इशा हो म्हणून निघून गेली. तो मनात स्वतःशीच बोलत होता.

‛ मूर्ख!बेअक्कल आशिन अरे आज सहा मार्च आहे. म्हणूनच स्वरा तुला आज लवकर घरी ये म्हणत होती पण तू मूर्खा कामाच्या व्यापात आजचा दिवस कसा विसरू शकतोस? फोन करायला हवा तिला पण ती फोन उचलेल का? भांडण झाले की उचलत नाही ती फोन! करून पहावा उचलला तर उचलला. मॅनेजर साहेब आज लवकर जावे घरी; जाताना काही तरी गिफ्ट,बुके आणि तिच्या आवडीच काही तरी खायला घेऊन जाऊ. आता खूप मनधरणी करावी लागणार आहे. आली तर आज डिनरला जाऊ.आज माती खाल्ली तू! भोग आता कर्माची फळे!’ विचार करत त्याने दोन वेळा फोन लावला पण तिने उचलला नाही.

त्याने काम करत पुन्हा-पुन्हा स्वराला फोन लावला पण स्वरा फोन उचलत नव्हती. त्याला सकाळी तिला तो जे बोलला त्याचा राहून राहून पश्चात्ताप होत होता. त्याला आत्ताच घरी जाऊन तिला मिठी मारावी आणि माफी मागावी असे राहून राहून वाटत होते पण तो तसं करू शकत नव्हता कारण त्याला आज ऑफिसमध्ये खूप कामं होती.त्यामुळे तो कामाला लागला. तरी अधून मधून स्वरा फोन उचलेल या आशेने तो फोन करत होता पण स्वराने मात्र फोन उचलला नव्हता. आशिन मात्र आता रडकुंडीला आला होता. त्याने पाच वाजताच कामं आटोपली आणि तो घरी निघाला.


त्याने जाता जाता. बरीच खरेदी केली त्यामुळे आणि ट्रॅफिकमुळे त्याला घरी पोहोचायला दोन तास लागले. त्याने कार पार्किंगमध्ये पार्क केली आणि धावतच लिफ्टकडे गेला. सातव्या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि तो झपाझप पाऊले टाकत घराच्या दारात पोहोचला. त्याने अधिरपणे बेल वाजवली पण बराच वेळ बेल वाजवून देखील स्वरा दार उघडत नव्हती. त्यामुळे तो आता अस्वस्थ झाला. त्याच्या मनात भलते सलते विचार येऊ लागले पण ते त्याने प्रकर्षाने झटकले.

त्याने त्याच्या जवळची लॅच की काढली आणि तो घरात गेला. घर अगदी शांत शांत वाटत होते.दिवस मावळून गेला तरी लाईट्स ही लावल्या नव्हत्या.त्याने लाईट्स लावल्या किचनमध्ये खायचे समान ठेवले. आज देव्हाऱ्यात स्वराने सांजवात देखील केली नव्हती. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले कारण काही ही झाले तरी स्वरा सांजवात लावायचीच. तो स्वराला हाक मारत होता पण स्वरा ओ देत नव्हती. आशिन आता घाबरला त्याने स्वतःला समजावले की ती वर बेडरूममध्ये झोपली असेल म्हणून तो बुके आणि आणलेल गिफ्ट घेऊन जिना चढून वर त्यांच्या बेडरूममध्ये गेला आणि समोरचे दृश्य पाहून त्याच्या हातातले समान गळून पडले.

असे काय घडले असेल? स्वराने काही वेडेवाकडे पाऊल तर उचलले नसेल?
क्रमशः

🎭 Series Post

View all