तेरा साथ हो तो- भाग1

Gosht Tyachi Aan Tichi
 "सिद्धी,अन्वित काय करतो गं आता? आठवण आली म्हणून सहज विचारलं." निशा आपल्या मैत्रिणीला म्हणाली.

"तो..लंडनला असतो. पण सध्या इकडे बहिणीच्या लग्नासाठी आला आहे असे कळले. पण आता तू त्याच्या नादी अजिबात लागू नकोस हं. त्यानेच ब्रेकअप केले होते ना? आता तू स्वतःहून त्याला फोन केलास तर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेव." सिद्धी चिडून निशाला म्हणाली.

"नाही ग. मी का करेन त्याला फोन? मी आपलं सहजच विचारलं." निशा खालच्या आवाजात म्हणाली. 

"मला माहितीये निशू, आठवण येणं अगदी साहजिकच आहे. पण आता या गोष्टीला तीन वर्षे उलटून गेली. तो लंडनला जाऊन छान सेटल झाला आहे. त्याने मागे वळून पाहिले का परत कधी? नाही ना? मग आता आपणही पुढेच पाहायचे." सिद्धी निशाला समजावत म्हणाली.

इतक्यात बेल वाजली म्हणून सरिताताईंनी दार उघडले. "निशू..अप्पू आली आहे." सरिताताई हॉलमधूनच ओरडल्या. तशी फोन ठेवून निशा बाहेर आली.
"निशू, पटकन आवरून घे. तुला परवा म्हटलं होतं ना माझ्या कझिनचा लग्न आहे. अगं, तिच्या घरी मेहंदी काढायला जायचं आहे आपल्याला. आज संध्याकाळी मेहेंदीचा कार्यक्रम आहे आणि तिला मेहंदी काढणारी मेहेंदीवाली एकच आहे आणि मुली मात्र दहा-बारा!
सो, मी तुझी मेहेंदीचे डिझाईन्स तिकडे दाखवून आली आहे. ते त्या मुलींना खूपच आवडले आहेत. आपण थोड्या वेळात निघू, संध्याकाळी तिथला कार्यक्रम झाला की आमच्या घरी राहायला जाऊ. ठीक?" अपूर्वा भराभरा म्हणाली.

"येते मी. पण सगळे तुझे तूच ठरवलेस? निदान आधी मला विचारायचे तरी." निशा.

"निशू, उगाच कटकट करू नकोस हं. आत्ता आली आहे ना मी तुला सांगायला? चला आवर लवकर. काकू, मी निशाला आता घेऊन जाती आहे. रात्री ती आमच्या घरी राहायला येईल आणि तशीही उद्या ऑफिसला सुट्टी आहे." अप्पू सरिता ताईंना म्हणाली.

"तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी काहीही गोंधळ घाला. आज-काल आयांना परवानगी विचारायची गोष्ट लांबच राहिली." सरिताताई स्वयंपाक घरात निघून गेल्या.

मेहंदी कलरचा, कुडता त्यावर पांढऱ्या रंगाची लेगिन्स, कपाळावर छोटीशी टिकली लावून, आपले खांद्यापर्यंत रुळणारे केस निशाने एका पिनेत गुंडाळून टाकले. कानात हलकेसे झुमके आणि हातात दोन बांगड्या अडकवून ती तयार झाली.

"रेडी? अगं, तुझ्या मेहेंदीचा कार्यक्रम नाही तिकडे. इतकी काय नटलीस? असो, पण खूप छान दिसते आहेस." अप्पू गडबड करत म्हणाली.

"आजी, तुमच्या नात्याची पटकन दृष्ट काढून टाका." अप्पू आतल्या खोलीत जात म्हणाली.

"ए, नको ना यार. मला नाही आवडत असले काही." निशाने आपले डोळे मोठे केले.

"अप्पू, आधी इकडे ये. तिथे कोणी छानसा मुलगा असेल तर लगेच मला कळव. तुझी मैत्रीण सव्वीस वर्षाची घोडी झाली, तरी लग्नाला अजून नाहीच म्हणते." सरिताताई हळूच कुजबूजत म्हणाल्या.

"हो. काकू, सांगेन मी. पण आता मी निघतो. खूपच उशीर होतो आहे." असे म्हणत दोघे घराबाहेर पडल्या.

"आई काय म्हणत होती गं तुला?" निशा अप्पूच्या मागे गाडीवर बसत म्हणाली.

"काही नाही गं. ते आपलं नेहमीच काहीतरी. ते जाऊ दे. वाटेत मेहेंदीचे कोन घ्यायचे तेवढे लक्षात ठेव." अप्पूने विषय बदलत गाडी स्टार्ट केली आणि दोघी निघाल्या.

क्रमशः

🎭 Series Post

View all