भाग:- २५
मागील भागात:-
ज्यावेळी अभिला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी पाठ फिरवली. 'सुख के सब साथी दुःख में कोई' असे अभि-स्मिता बाबतीत झाले.
मोठा बंगला बघून मेहुणे हरखून गेले. बायकासोबत कित्येक दिवस ते बंगल्यात मुक्काम ठोकतं. मनात कोणतीही अढी न ठेवता स्मिता मनापासून त्यांचे सारे करायची. किती केले तरी ते टोमणे मारायचे. ती उत्तर देणार होती : पण अभिचं त्यांना म्हणाला ज्यामुळे त्यांची बोललीच बंद झाली.
आता पुढे:-
"खरं तर मी बोलणार नव्हतो, आतापर्यंत बहिणींची तोंड बघून गप्प बसलो होतो. तुम्ही या घरात आहात ते फक्त स्मितामुळे. मला तर तुम्हाला बोलायची, तुमची तोंड पाहायचीही इच्छा नाही. आता राहात तर गप्प राहा. नाही तर दार तिकडे आहे." अभि शांतपणे मेहुण्यांना म्हणाला.
"बघ बघ, तुझा भाऊ कसा बोलतोय. सायेब काय झाला अन् लईच रूबाब झाडाया लागलाय की. केले उपकार इतक्या लवकर विसरलास काय? कोणामुळे झालास? आमच्यामुळेच ना." मोठा मेहुणा रागाने लाल होतं बहिणीला म्हणाला.
अभि उपहासकात्मक हसला व टाळ्या वाजवत म्हणाला,"हो का? तुमच्यामुळे साहेब झाले मी! अरे वा! मला तर माहितीच नव्हते हे. अरे, चालत्या बसमधून ढलणारे तुम्ही? आबांचा तिसरा होत नाही तोवर त्यांच घरदार विकून खाणारे तुम्ही? तुमच्यामुळे मी साहेब झालो असे म्हणता तुम्ही. देवाला तरी घाबरा हो इतकं खोटं बोलताना. एवढं खोटताना जीभ कशी झडली नाही तुमची."
अभि जोर जोरात श्वास घेत होता. ते खाली मान घालून बसले.
त्याला वयोमानानुसार बी पी झाला होता. स्मिताला त्याची काळजी वाटत होती म्हणून ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती.
"अहो, तुम्ही शांत व्हा. त्रास होईल तुम्हाला." ती त्याचा दंड चोळत चिंतेने म्हणाली.
" त्रास तर होतोय, मितू. ह्यांना पाहिलं की मला ते सारं आठवतं. मग त्या मनावरच्या जखमा पुन्हा ओल्या होतात. तू म्हणालीस होतीस ते तसे वागले म्हणून आपणही तसेच वागलो तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय? ते विचार करून गप्प होतो. बहिणींनाही आपल्या सुखीचा भागीदार बनावं हा विचार केला होता मी व मितूने. पण तुम्ही आमच्याच घरात राहून माझ्या बायकोचा अपमान करत आहात. एक तुम्ही मला बोलला असता तर चाललं असतं पण माझ्या घराच्या लक्ष्मीचा अपमान मी कदापी सहन करणार नाही. राहू वाटलं चांगल्या गुणाने तर राहा आणि तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दार तिकडे आहे." स्वतःच्या दंडावरील स्मिताचा हातावर हात ठेवत आधी तिच्याकडे पाहिले व नंतर त्या तिघांकडे बघत म्हणाला.
तिघांनी शरमेने माना खाली घातल्या होता. बहिणी त्यांच्या वतीने माफी मागत रडत होत्या.
अभि त्यांना म्हणाला,"माफ कर आक्का, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर. पण खरंच गं आता पाणी डोक्यावरून जात होतं म्हणून मी बोललो. तू माफी मागावी म्हणून नाही म्हणालो. अगं, किती दिवस अजून मी सहन करू. त्याला मर्यादा असते ना गं." त्याचे डोळ्यांतील आसवांचा पूर कधीही पापण्यांचा बांध फोडून वाहेल असे झाले होते.
मेहुण्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटू लागली. ते मान घालत अभिसोमर हात जोडून माफी मागितली व गुपचुप आपला गाशा गुंडाळून तेथून काढता पाय घेतला.
कालांतराने जितेश व रितेश यांची लग्न झाली. आरूषीचे लग्न करण्यासाठी अभि व स्मिता यांनी प्रयत्न केले ; पण प्रत्येक वेळी तिचं दिव्यांग असणे आड येत होते. जरी जमलं तरी वर पक्षांची भरपूर अपेक्षा असायची. लग्नाच्या आधीच एवढी अपेक्षा मग नंतर किती करतील, जरी पूर्ण केली तरी ते नीट वागवतील असे मनातील प्रश्न आरूषीने त्यांना बोलून दाखवला. त्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नव्हती असे नव्हतं.
तिच्या दिव्यांगा सहित तिला मनापासून स्विकारणारा, प्रेम करणारा, समजून व काळजी घेणारा जोडीदार मिळाला तर तिला लग्नाला ना नव्हती ; पण असा जोडीदार मिळणं कठीण आहे हे ती जाणून होती.
ती त्यांना म्हणाली,"आईबाबा असा जोडीदार मिळणं कठीण आहे. नाही मिळाला तरी हरकत नाही. लग्न केलेच पाहिजे असं काही नसतं. तुम्ही माझी काळजी करू. तुम्ही मला शिक्षण देऊन सक्षम तर बनवलं आहे. स्वतः च्या पायावर उभी आहे. इतका छान परिवार आहे. आणखी काही नको मला. यातच मी खुश आहे. तुम्ही या दोघांच बार उडवून टाका. लोकांचा विचार करू नका." ती त्या दोघांवर एक कटाक्ष टाकत बोलत होती.
"बेटा, तुझं बोलणं पटतय गं. तुला योग्य जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करू आम्ही देवाला." अभि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.
कार 'अस्मिता' उभी राहिली तेव्हा स्मिता तिच्या भूतकाळातून बाहेर आली. सगळ्या घटना एखाद्या चलचित्रासारख्या तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. अभिने तिला काय झाले म्हणून विचारल्यावर काही नाही असे तिने मान डोलावली.
आरूषीची काळजी सोडता त्या दोघांना बाकी कशाची चिंता नव्हती.
काही दिवसांनी-
आरूषी ज्या ऑफिसमध्ये काम करत होती. तिथेच तिच्या कलीग अमोलला पहिल्या दिवसापासून आरूषी खूप आवडतं होती. तो सधन कुटुंबातील मुलगा होता. आईबाबांचा एकुलता एक, दिसायला रूबाबदार, देखणा व हुशार होता. थोडा खोडकर, मिश्किल असा, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघणारा हसतमुखानं वावरणारा हा अमोल कधी आरूषीच्या सुंदरतेवर व शांत स्वभावाच्या प्रेमात पडला हे त्याचं त्यालाच कळलं नाही ; तिच्यासमोर तो कधी बोलला नाही. त्याची कधी हिम्मतच झाली नाही.
एकदा तिच्या पाहायला पाहुणे येणार ही बातमी त्याला कळली आणि तो मनात खूप घाबरला. त्या पाहुण्या आधी आपणच पाहुणे म्हणून गेलो तर कदाचित आपला मेळ बसेल असा विचार करून तो अभि व स्मिता यांना भेटायला गेला. याबाबत त्याने आधी त्याच्या घरी सगळं सांगितले. सुरूवातीला ते मान्य नव्हते पण त्याचे प्रेम बघता ते तयार झाले.
क्रमशः
आरूषी या लग्नाला तयार होईल का? आरूषीबद्दल खरं कळल्यावर ही अमोल लग्नाला तयार होईल का?
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.