Login

तेरा मेरा साथ रहे भाग-२२

अभिषेक व स्मिता यांच्या आयुष्यातील चढउतार सांगणारी कथा
भाग:- २२

मागील भागात:-

"इतकं सर्व सामानाची गरज नव्हती. हळूहळू नंतर घेता आलं असतं ना. उगीच एवढा खर्च का केलात?" स्मिता काळजी करत म्हणाली.

तिचं बोलणं ऐकून अभि डोळे उघडत म्हणाला, "मी गरजेचे सामान आणले होते. त्या दोघांनी माझे ऐकले नाही. आरूसाठी मी पाळणा घेणारच होतो पण त्याने घेऊन दिला."

आता पुढे:-

अभिच्या बोलण्यावर स्मिता कपाळावर आट्या पाडत म्हणाली," कोण ती दोघं?"

तो सुस्कारा टाकत म्हणाला,"मामा आणि राजन."

"काय ! त्या दोघांनी घेऊन दिलं. पण तुम्ही नको म्हणायचं ना." ती नाराज होतं म्हणाली.

"मी नको म्हणालो नाही असं वाटतं नाही का तुला?" त्याने उलट तिलाच प्रश्न विचारला.

"अहो, तसं नव्हतं म्हणायचं मला." ती वरमत म्हणाली.

"मी खूप वेळा नको म्हणत होतो ; पण मामांनी थोडी भांडी आणि राजनने पाळणा घेऊन दिला. लेकीच्या संसाराला आमचा थोडाफार हातभार लागला तर आम्हाला आनंदच वाटेल, अभि. माझ्या जागी केशवने घेऊन दिला असता तर त्यांनाही तू नाही म्हणाला असताच काय? मामा असे बोलल्यावर तूच सांग काय म्हणायला पाहिजे होतं मी आणि माझ्या भाचीसाठी पहिल्यांदा काहीतरी घेऊन देण्याची संधी माझ्यापासून हिरावून घेऊ नको असे राजन म्हणाला. मग आरूप्रती त्याचं प्रेम पाहून मी नकार देऊ शकलो नाही." अभि आरूवर नजर टाकत म्हणाला.

त्याच्या बोलण्यावर ती निरूत्तर झाली. थोड्यावेळ शांत बसली. ती काहीच बोलत नाही म्हणून तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला,"मितू , त्यांची मदत घेतलेली तुला आवडली नाही असं मला वाटतं आणि मी चुकीचे वाटत असेल तर मी त्यांना ते परत घ्यायला सांगतो. पण तू नाराज होऊ नकोस."

"अहो, काहीही काय हो. मी तुमच्यावर नाराज नाही. तुम्ही काहीचं चुकीचे केलेले नाही. आबा व राजन यांना आपली काळजी आहे. म्हणून त्यांनी मदत केली. परत करण्याची भाषा करू नका. त्यांना वाईट वाटेल. कधी त्यांना मदत लागली तर आपणही करू. म्हणजे आपल्यालाही समाधान होईल." ती त्याला बिलगत म्हणाली.

त्याने आज तिला पहिल्यांदा स्मिता न म्हणता मितू म्हटल हे नंतर तिच्या लक्षात आलं. ती बावरत त्याच्या छातीत चेहरा लपवत म्हणाली,"अहो, तुम्ही मला मगाशी काय म्हणून हाक मारली."

"आलं का तुझ्या लक्षात? मितू म्हणालो होतो मी. आवडलं नाही का तुला? मितू.." तो बोटाने तिची हनवुटी वर करत मुद्दाम मितू या शब्दांवर जोर देतं मिश्किल अंदाजात म्हणाला.

तिच्या चेहऱ्यावर सलज्जा भाव उमटले. तिने लाजून चेहरा तिच्या ओंजळीत लपवला.

"ए मितू, सांग ना. नाही आवडलं का?" तो तिची ओंजळ काढत हसतं म्हणाला.

"आवडलं ना. खूप खूप आवडलं." ती प्रेमाने त्याच्या कुशीत शिरली.

हसतं हुंकार भरत त्यानेही तिला प्रेमाने कुशीत सामावून घेतले.

असेच काही दिवस निघून गेले. सगळं छान सुरळीत चालू होतं. घरकाम, आरूषीची देखभाल, अभिची काळजी यात स्मिताचा दिवस निघून जाई. ती सर्व काही आनंदाने करतं होती. अभि नोकरी सांभाळून पुढच्या परीक्षा देत होता.

आरूषी एक- दीड वर्षाची झाल्यावर तिच्या पायांवर उपचार सुरू केले. त्यात यश मिळाले. ती जशी मोठी होईल तशी चालू शकेल असे डाॅक्टरांनी सांगितले ; पण चालताना तिचा पाय थोडा तिरपा पडायचा त्यामुळे चालताना तिला थोडा त्रास व्हायचा. ते दोघे तिची खूप काळजी घेत होते. तिला कोणताही गोष्टींची कमतरता भासू न देता तिला स्वतःच्या पायावर उभा करायचं असे या पतिपत्नीनी ठरवलं.

कालांतराने अभि व स्मिता यांच्या संसारवेलीवर जितेश व रितेश ही दोन गोंडस मुले झाली. उभयंताना खूप आनंद झाला. त्यांच्या येण्याने परिवार पूर्ण झाला होता. यांच्या येण्याने आरूषीबद्दल काळजी व प्रेम कमी झालं नाही. तीही त्या दोन्ही भावंडांबरोबर मस्ती करत छान राहत होती.

या दरम्यान अभिही परीक्षा पास होऊन शाखा अभियंता बनला होता. सगळं सुरळीत चालू होतं दर पाच वर्षांनी बदली होत होती. अभि स्मिता व मुलांना सोडून कधीच राहत नव्हता. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी तो सोबत बिऱ्हाड घेऊन जात होता. कैलासही त्याचा सहकारी म्हणून नेहमी त्याच्या सोबत असायचा. सुमतीचीही त्याला साथ असायची.

बदलीच्या एका गावी ते सर्व राहायला आले. तेव्हा त्याची व रमाकांतची ओळख झाली. खरं तर रमाकांत त्याच्या ऑफिसमधे कारकून म्हणून काम करत होता. त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी अभिने त्याची खूप मदत केली होती म्हणून तो त्याला खूप मानत असे.

अभिचा स्वभाव शांत, समजूतदार व प्रेमळ असल्याने ऑफिसमध्ये सर्वांना तो आवडायचा. त्याची मदत करण्याची वृत्ती अख्ख्या पंचक्रोशी पसरली होती. कोणी त्याच्याकडे मदतीसाठी आला आणि त्याने कधी मदत केले नाही असे व्हायचेच नाही.

रामकांतही स्वभावाने शांतच होता. नंतर सहवासाने त्याच्यात व अभिमध्ये मैत्री झाली. जे चिरकाल टिकली. त्याची बायको स्वभावाने थोडी भांडकुदळ असली तरी साफ मनाची होती. त्या दोन्ही परिवारामध्ये छान बाॅण्डिंग तयार झालं होतं. सुमती नंतर रमाकांतची बायको रूपा ही स्मिताला मिळालेली चांगली मैत्रिण होती.

त्या गावतच त्याला त्याचा बालपणीचा मित्र संकेत भेटला. तो ही अभियंता होता. त्याची आणि अभिची पुन्हा भेट झाली. दोघेही आनंदीत होते. पण म्हणतात ना जास्त आनंद झाला तर त्या आनंदावर विरजन पडते. तसेच झाले.

अभि ऑफिसमध्ये गेल्यानंतर दोन तासाने स्मिताच्या कानावर एक बातमी आली ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

क्रमशः

कसली बातमी कळली असेल?

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५

सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.