भाग- २०
मागील भागात:-
"चल येतो मी, तुझी आणि आरूची काळजी घे, येतो पुढच्या आठवड्यात तुम्हा दोघींना घेऊन जायला. सर्व आवरून ठेवं." तो तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला आणि आरूषीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत माथ्यावर ओठ टेकवले. पुन्हा एकदा त्या दोघींवर एक प्रेमळ कटाक्ष टाकून तो शहराकडे रवाना झाला. त्याच्यासोबत अशोकपण गेले.
आता पुढे:-
शहरात आल्यावर अभिने अशोकसोबत दोन-तीन ठिकाणी घर पाहिले. त्याच्या मित्राने आधीच त्याला त्याबद्दल सांगितले होते. त्यामुळे त्याला जास्त शोधाशोध करावी लागली नाही. त्यातलं एक दोन रूमचं घर त्याला खूप आवडलं. त्याचं भाडं त्याला परवडणारे होते. थोडं डिपाॅझिट भरून ते घर फायनल केलं. यातच संध्याकाळ झाली तसे त्याने अशोक यांना गावी पाठवून दिले. जरूरी सामान आणेपर्यंत ते थांबतो म्हणतं होते ; पण त्यांना दगदग होईल याचा विचार करून मित्र आहेत सोबतीला ते मदत करतील असे सांगून त्याने त्यांना जायला सांगितले.
एका आठवड्याने अभि गावी येऊन स्मिता व आरूषी दोघींना आपल्या घेऊन जायला तिच्या गावी आला.
सगळी आवरा आवर केल्यावर तो अशोक व सुवर्णा यांचे आशीर्वाद घेत म्हणाला, "मामा-मामी, तुम्ही माझी अमानत आतापर्यंत सांभाळून ठेवलीत. खरं तर लेकीचं लग्न झाल्यावर तिने सासरी राहायचे असते. तिने सासर अनुभवले; पण ते खूप वाईट दिवस होते. माझ्या आईने तिला खूप त्रास दिला. जे तिने हसतं हसतं सगळं सहन केलं तेही फक्त माझ्यामुळे."
अशोक व सुवर्णाला स्मिताने काहीच सांगितले नव्हते. तिथले वातावरण तिला सूट झाले नाही असे तिने सांगितले होते.
नंतर अभिनेच सर्व त्यांच्या कानावर घातले होते. हे मात्र स्मिताला माहिती नव्हते. नंतर ते कळले होते. आता तो सर्व त्याच्यामुळे झाले म्हणून तो स्वतःला त्रास करून घेईल. त्याच्या काळजीने ती त्याला थांबवत म्हणाली,"अहो, जाऊ द्या ना, मागच्या गोष्टी कशाला उगाळत बसायचं? आणि हो, तुमच्यामुळे काही झालं नाही. हवा बदल झालं म्हणजे माणूस आजारी पडतोच ना. तुम्ही उगीच स्वतःला त्रास करून घेऊ नका, बरं."
"बघा, मामा तुमची मुलगी माझ्या बायकोची बाजूपण घेऊ देत नाही." अभि मिश्किलपणे म्हणाला.
"अहो, काहीही काय!" ती लटका राग दाखवत डोळ्यांने दटावत बावरत म्हणाली.
तो हसत पुढे म्हणाला, "मामा, या तीन वर्षात तुम्ही खूप मदत केली. फक्त तिला सांभाळलंच नाही तर माझ्यासाठीही खूप काही केलेत. आता तुम्हाला कधीही माझी गरज लागली तर अगदी हक्काने फक्त एक हाक द्या. मी केव्हाही हजर असेन. जावई नाही आधी तुमचा भाचा होतो आणि आता तुमचा दुसरा मुलगा समजा."
"हो, जावईराजे तुम्ही, आमच्यासाठी दुसरा मुलगाच आहात." अशोक त्याचा खांदा दाबत भारावून म्हणाले.
"अरे, मुलगा मानता ना, मग आहो जाओ नका बोलू. सरळ अभि म्हणा, लग्ना आधी जसे म्हणत होतात ना अगदी तसेच." अभि त्यांच्या गळ्यात पडत म्हणाला.
त्यांनी हसत मान डोलावली.
"तुम्ही, स्मिताची अजिबात काळजी करू नका. तिने खूप काही सहन केलंय ; पण आता तिला सर्व सुख देईन. अगदी आनंदात ठेवेन." अभि पुढे म्हणाला.
"ते ठाव हाय आम्हास्नी, अभि. तुम्ही आता कुठली बी झळ तिच्यापतुर येऊ देणार न्हाई. आता खऱ्या मंदी तुमचा परपंच सुरू झाला. तवा नीट राव्हा. एकमेकांची काळजी घ्या. सुखानं संसार करा." सुर्वणा भरभरून आशीर्वाद देत म्हणाली.
खरंतर लेकीला सासरी पाठवणे म्हणजे आईवडिलांसाठी खूपच कठीण,भावूक व हळवा क्षण असतो. त्यांचा जीव कासावीस होतं असतो. जोपर्यंत तिची खुशाली कळतं नाही तोपर्यंत त्यांचा जीव तिच्या काळजीने टांगणीला लागलेला असतो.
आज स्मिताला पाठवताना त्यांना खूप हळवा व्हायला झालं.
अभिने सुवर्णाचे हात हातात घेत काळजी घेईन असे आश्वासन दिले.
नंतर तो राजनजवळ आला. त्याला आलिंगन देत म्हणाला, "राजन, तू मला नेहमी मोठा भावासारखा वाटलास. तू असल्यामुळे मला भाऊ नाही असे कधीच वाटलंच नाही. तू नेहमी मला साथ दिलीस. इथून पुढेही आपण असेच राहू."
"हो, नक्कीच. फक्त माझ्या बहिणीची काळजी घे. खरं तर तुला हे सांगण्याची गरज नाही. माझ्या झिपरीने खूप सहन केलंय रे. म्हणून म्हणतोय. राग मानू नकोस." राजन स्मिताला जवळ घेतं भावूक होतं म्हणाला.
अभिने हो म्हणत मान डोलावली. स्मिताच्या कुशीतल्या आरूला त्याच्याकडे घेतलं.
तिला गलबलून आलं. ती "दादा" म्हणतं राजनला बिलगली.
नंतर अभिने सुनीताचेही आभार मानले. तिने बळजबरी हसत हात जोडले. ती मनात पुटपुटली,' बरं, झालं एकदाची पिडा जातं आहे. त्या कार्टीच्या रडण्याने रातभर झोप यायची लागत नव्हती. आता मला मस्त झोप लागेल. जा बाबा, लवकर घेऊन जा ही ब्याद.'
अभिच्या हातातील आरूषीला पाहून सुनीताने नाक मुरडलं.
स्मिताने तिची व आरूषीच्या कपड्यांची पिशवी घेतली. सर्वांचा निरोप घेऊन ते शहराकडे निघाले. तिला वारंवार भरून येतं होतं; पण स्वतःच्या मनाला सावरत अभिसोबत नव्या प्रवासाला निघाली.
शहरात अभि तिला त्या भाड्याच्या घरी घेऊन आला. दार उघडाच ती आतलं सर्व पाहून चाट पडली.
क्रमशः
काय पाहिले स्मिताने?
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा