Login

तेरा मेरा साथ रहे भाग-१९

अभिषेक व स्मिता यांच्या आयुष्यातील चढउतार सांगणारी कथा
भाग- १९

मागील भागात:-

अभिने दोन्ही भुवया जवळ आणत काय अशा आविर्भावात उडवले.

स्मिता गाल फुगवत म्हणाली,"करा म्हणते ना?"

त्याने हात पुढे केले तसे तिने तिच्या हातातलं त्याच्या हातावर ठेवले. ते पाहून त्याचे डोळे विस्फारले. तो चमकून तिच्याकडे थोडं हुश्यातच पाहू लागला.

आता पुढे:-

"स्मिता, हे काय आहे? आणि तुझ्याकडे इतके कसे?" अभि जवळ जवळ स्मिताला जाब विचारल्यासारखं म्हणाला.

"ते मी..ते.." ती नजर चोरत इकडेतिकडे बघत पदराशी चाळा करत होती.

"स्मिता, काय विचारतोय मी?" तो छकुली व घरातील लोकांचा विचार करून शक्य तितक्या शांत स्वर ठेवून तिच्या दंडाला धरत म्हणाला.

"मी कोणाकडून उसने आणले नाहीत, ओ. हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत. आता तुम्ही घर बघणार म्हणजे पैसे लागणार ना मग ते भाड्याचे का असेना. तुमच्याकडे सध्या इतके पैसे नसतीलच. आताच कुठे नौकरी भेटली आणि पगार महिना भरल्यावरच मिळेल ना. तो पर्यंत हे पैसे कामी येतील." ती तिच्या दंडावरील त्याच्या हातावर हात ठेवत त्याच्या डोळ्यात पाहतं पुन्हा नजर खाली करत म्हणाली.

क्षणभर अभि काहीच बोललाच नाही. तिच्या या बोलण्यावर काय बोलावं, कसे व्यक्त व्हावे? ते त्याला कळतं नव्हतं.

'आपण तिकडे काम कर शिकत होतो, तर इकडे हि पण काम करत होती. भविष्यात आपल्याला मदत होईल म्हणून तीही कष्टच करत होती तेही आपल्याला माहिती नसताना. किती धडपड हिची. मी कधीही आलो की थकवा न जाणवून देता किती प्रेमाने, हसतमुखाने माझं सगळं करतं होती. आपण पण किती वेडे आहोत! पुन्हा तिला गृहीत धरलो. आपणच तिला समजून घेण्यात कमी पडलो. किती प्रेम, त्याग व समर्पण आहे हिच्यात. आबांनी किती लांबचा विचार करून माझ्यासाठी हिची निवड केली. तीही प्रत्येक वेळी त्यांची निवड सार्थ असल्याची जाणीव करून देते. थँक्यू आबा.' तो तिच्याकडे पाहत मनात तिचे कौतुक करत त्याच्या आबांचा निर्णय योग्य असल्याचा प्रत्यय येत त्यांचे मनोमन आभार व्यक्त करतं होता. त्याचे डोळे आसवांनी तुडुंब भरून आले. कंठ दाटून आला.

तो काहीच बोलतं नाही म्हणून तिने नजर वर करून पाहिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी पाहून तिच्या मनात कालवाकालव झाली.

"अहो, काय झालं? माझं काही चुकलं का? तसं असेल तर मला माफऽऽ.." ती त्याच्या गालांवर ओघळणारे अश्रू पुसत त्याला हात जोडत म्हणत होतीच तोच त्याने एका हाताने तिचे जोडलेले हात स्वतःच्या हातात घट्ट पकडले व दुसरा हात तिच्या तोंडावर ठेऊन नकारार्थी मान डोलावली.

त्याच्या या कृतीने ती गोंधळून व भांबावून गेली. त्याच्या नजरेत तिच्याबद्दल आदर व कृतज्ञता झळकत होती. ती त्याची नजर वाचण्याचा प्रयत्न करत होती.

त्याने तिला ओढून घेत घट्ट मिठी मारली. ती मिठी तिला मात्र खूप काही सांगून गेली. ती त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करू लागली. थोडा वेळ तिच्या मिठीत विसवल्यावर त्याला बरे वाटू लागले.

तिने त्याला प्यायला पाणी दिले. पाणी पिल्यावर त्याला आणखी बरे वाटू लागले. तो तिला घेऊन छकुलीजवळ बसत म्हणाला,"बघितला का, आरू? तुझी आई ना किती पुढचा विचार करते? स्वतःची सोडून सगळ्यांची काळजी असते हिला. बघ बाबांच्या मनातलं जाणून लगेच कसे चुटकी सरशी प्रश्न सोडवून टाकला. खूप हुशार, समजूदार, प्रेमळ आहे हो, तुझी आई. आपण खूप नशीबवान आहोत बरं का! ही आपल्या आयुष्यात आहे म्हणून."

"काय ही काय हो, तसं काही नाही हं, आरू. उलट मी नशीबवान आहे की माझ्या नशीबात गोंडस,नाजूक अशी तू आणि समजूदार, प्रेमळ असे तुझे बाबा भेटले." ती त्याला बिलगून म्हणाली.

"हो का? आम्हाला बुवा, माहितच नव्हतं की आरूचे बाबा समजूदार व प्रेमळ असलेले." तो डोळा मारत तिला जवळ घेत म्हणाला. 

तशी ती शहारली. एक गोड शिरशिरी तिच्या शरीरातून धावू लागली. ती बावरत नजर झुकवत हसतं म्हणाली, "हो का? आम्हाला तरी कुठे माहिती होतं, आरूची आईपण तशीच आहे."

थोडावेळ आरूषीशी बोलून व खेळून झाले. ती दूध पिऊन झोपी गेली. त्याने जेवणं केलं व जायची तयारी करू लागला.

"स्मिता, तुझा स्वाभिमानी स्वभाव मला आवडतो. पण प्लिज कष्टाची कामे करत जाऊ नकोस. आता मला नौकरी लागली तर तुला काम करण्याची गरज नाही. आधीही गरज नव्हतीच. मी आता सगळं सांभाळून घेतलं असतं. ते .." तो तिला म्हणत होताच की ती त्याला मध्येच तोडत म्हणाली "अहो, आता नाही करणार काम. तेव्हा वेळ जातं नव्हता तेव्हा पुढे आपल्या भविष्याचा विचार करून मी काम करत होते. असंही संसार आपल्या दोघांचा आहे ना मग दोघांनीही संसाराला हातभार लावला तर छान ना. आणि हो, कसे सांभाळत असतं तुम्ही,हं.. उसन वगैरे अजिबात घेत बसू नका. जेवढं लागतं तेवढं गरजेच्या सामानाची लिस्ट बनवली आहे मी. तेवढंच आणा. काही लागलं तर पाहू मग नंतर. त्या पैशांची तुम्हाला मदतच होईल. तेव्हा जास्त विचार करू नका."

"बरं, बाबा! बोलण्यात तुला कोण हरवलं बरं." तो तिचे नाक ओढत हसत म्हणाली.

"अहो", म्हणत तिने लटक्या रागात त्याच्याकडे पाहिले. तेवढ्यात अशोकने बाहेरून हाक मारली.

"अभि, निघायचे का? " अशोक म्हणाले. 

"हो आलो, मामा." त्याने आतून आवाज दिला.

"चल येतो मी, तुझी आणि आरूची काळजी घे,  येतो पुढच्या आठवड्यात तुम्हा दोघींना घेऊन जायला. सर्व आवरून ठेवं." तो तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला आणि आरूषीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत माथ्यावर ओठ टेकवले. पुन्हा एकदा त्या दोघींवर एक प्रेमळ कटाक्ष टाकून तो शहराकडे रवाना झाला. त्याच्यासोबत अशोकपण गेले.

क्रमशः

कसा असेल अभि व स्मिता यांचा शहरातील पुढील प्रवास?

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५

सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


🎭 Series Post

View all