Login

तेरा मेरा साथ रहे भाग-१८

अभिषेक व स्मिता यांच्या आयुष्यातील चढउतार सांगणारी कथा
भाग-१८

मागील भागात-

अभि विचारात पडला. स्मिता त्याला म्हणाली, "अहो, मी या बाळाबद्दल एक निर्णय घेतला. तुम्हाला जर योग्य वाटतं असेल तरच .."

"आपण ह्या बाळाला सांभाळ करायचा. आईबाबांचं नाव व प्रेम द्यायचं हाच निर्णय घेतलास ना तू?" अभि तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.

स्मिताने चमकून त्याच्याकडे पाहिले. आपल्या मनातलं त्याने अचूक ओळखले याचा तिला आनंद झाला. पण तो तिच्या निर्णयाला होकार देईल का ही धाकधूक तिच्या मनात होती.

आता पुढे:-

थोडे विचार करून अभि स्मिताला म्हणाला,"स्मिता, मला काहीच हरकत नाही. आपण ह्या बाळाला आईवडिलांचे नाव व प्रेम देऊ."

स्मिताची कळी खुलली. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पुढचे कसे बोलावे म्हणून तो थांबला. तो तिच्याकडे व तिच्या कुशीत निवांत झोपलेल्या निरागस छकुलीकडे पाहत मनात शब्दांची जुळवाजुळव करत होता.

"मला माहिती होतं, तुम्ही माझ्या निर्णयात माझी साथ द्याल." ती आनंदाने त्याच्याकडे पाहत म्हणाली.

"स्मिता, माझे बोलणे पूर्ण ऐकून घे. मग बाकी पुढचे पाहू." तो भुवई खरवडत म्हणाला.

ती गंभीर होऊन त्याच्याकडे पाहत म्हणाली,"म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? स्पष्ट सांगा ना."

"ठीक आहे स्पष्टच बोलतो. स्मिता आता आपल्याला मुलं बाळं नाही. पण भविष्यात जेव्हा आपली स्वतःची मुलं होतीलं तेव्हा आपण तेवढंच प्रेम या छकुलीला देवू शकू का? मी तर प्रयत्न करेन माझ्या परिने. तूही करशील का? स्वतःचे बाळासारखे करशील का तिचे सगळं? हे बघ राग मानू नकोस. पुढे कोणते प्रश्न येऊ नयेत. म्हणून म्हणतोय मी. कारण आईवडील नसल्याचे दुःख माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळेल. जे माझ्या वाट्याला आलं ते हिच्या वाटेला नको यायला. बघ पुन्हा एकदा विचार करं. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. ज्यात आपल्याबरोबर ह्या निष्पाप जीवाची आबाळ होईल. तिच्यावर कोणताही अन्याय होऊ नसे मला वाटतं. तू कोणताही निर्णय घेतला तरी मी नेहमीच त्या निर्णयाचा मान ठेवत त्यात तुझ्या सोबत असेन." तो भावूक होतं छकुलीच्या इवल्या कपाळावरून हात फिरवत म्हणाला.

त्याचं म्हणणं चुकीचे नव्हतं. बरोबर तेच तो बोलत होता. असे कित्येकदा पाहायला मिळतं की आपलं अपत्य जन्माला आले की अशा बाळाचा विसर पडतो. ती विचारात पडली. तेव्हा तो म्हणाला, "नीट विचार करून सांग. चल आत जाऊ. बाहेर हिला त्रास होईल?" तो छकुलीला तिच्या कुशीतून त्याच्या हातात घेत म्हणाला.

तिने मान डोलावली व त्याच्यासोबत आत गेली. त्याने तिला अलगद अंथरुणावर झोपवले. अगावर पांघरून टाकले.

रात्री सर्वांचे गप्पा मारत जेवण झाली. पण स्मिताचे मात्र जेवणात लक्ष नव्हते. ती अजूनही त्याच्या  बोलण्याचा विचार करत होती.

अभी अंगणातील बाजवर आकाशातील चांदण्या निरखत पहुडला होता. स्मिता छकुलीला कुशीत घेऊन घरात पहुडली होती. दोघांच्या डोक्यात छकुलीचाच विचार होता. ती एकटक त्या निरागस जीवाकडे पाहत होती. ते कोकरू तर मस्त झोपले होते तिच्या कुशीत आईची कुश समजून. तिने खूप विचारांती निर्णय घेतला. सकाळी तो निर्णय अभिला सांगायचा असा विचार करून ती कुशीतील छकुलीच्या माथ्यावर पापी घेत हसतं तिला जवळ घेऊन झोपली.

सकाळी सगळे आवरून झाल्यावर ती अभिजवळ आली. त्याला माहिती होतं तिला काय बोलायचे असेल ते. त्याने डोळ्यांने बोलं असे इशारा करतं टकामका बघत हात पाय हालवत खेळणाऱ्या छकुलीला घेतलं.

स्मिता त्या दोघांकडे पाहत म्हणाली,"अहो, तुमच्या बोलण्याचा मी खूप विचार केला. तुम्ही बोललात ते काय चुकीचे नाही. पण आपण तशी वेळ येऊ द्यायचीच नाही. तुम्ही जसे तुमच्या परिने प्रयत्न कराल. मीही प्रयत्न करेन. मी निर्णय घेतला आहे. आपलं दोघांचं पहिलं अपत्य आपली छकुलीचं असेलं. तुम्हाला काही हरकत तर नाही ना माझ्या या निर्णयाचा?"

"स्मिता, मी तुला रात्रीही म्हणालो ना, तुझ्या निर्णयात मी नेहमीच तुझ्या सोबत असेन." त्याने आधी हातातील छकुलीला बाजावर अलगद खाली ठेवले व तिचा हात हातात घेत हसतं म्हणाला.

"खरंच ना !" ती हातात हात घट्ट करत साश्रू नयनांनी आनंदाने म्हणाली.

त्याने पापण्या उघडझाप करत हुंकार भरत तिला जवळ घेतलं. ती हसत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून आंनदाश्रू गाळू लागली.

"ए, वेडू, रडतेस काय? चल आता ह्या छकुलीचं छानसं नाव सुचवं बरं." तो तिच्या खांद्याला पकडत आपल्यापासून बाजूला करत तिचे डोळे पुसत हसत म्हणाला.

"हो, आपल्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी येणारी. आपल्या आयुष्यात सुखाची रास आणणाऱ्या छकुलीचं नावं असेल आरूषी." स्मिता नाक ओढत हलके हसतं म्हणाली.

"व्वा! खूप सुंदर नाव सुचलं गं, तुला. मस्तच. तू खूप छान बोलतेस हं. एकदम शब्द वेचून बोलतेस असे वाटतं." तो तिला कौतुकाच्या नजरेने तिला बघत आनंदाने म्हणाला.

"काही ही काय हो! मी असंच मनात आलं ते बोलते. शब्द वेचते असे काय नाही हं." ती बावरं हसतं म्हणाली.

यात तो फक्त हसला. नंतर थोडं विचार करून म्हणाला, "आपण पुढच्या आठवड्यात शहरात जाऊ. मी आज जातो, एखादे भाड्याचे घर बघून, थोडेसे सामान वगैरे घेऊन ठेवतो. नंतर तुम्हां दोघांना घेऊन जातो. तू सामानाची लिस्ट करून दे."

"बरं, फक्त गरजेचे सामान घेऊन या. बाकी हळूहळू घेऊ." ती विचार करतं म्हणाली.

तिने त्याला छकुलीकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि  ती तिच्या साडीचे गाठोडं काढलं ज्यात अजून एक छोट्याशा फकड्यात काही तरी बांधून ठेवलं होतं. त्यातील ते काढून हातात घेऊन ती त्याच्याकडे आली व लाडीक स्वरात म्हणाली, "अहो, हात पुढे करा ना!"

त्याने दोन्ही भुवया जवळ आणत काय अशा आविर्भावात उडवले.

ती गाल फुगवत म्हणाली, "करा म्हणते ना?"

त्याने हात पुढे केले तसे तिने तिच्या हातातलं त्याच्या हातावर ठेवले. ते पाहून त्याचे डोळे विस्फारले. तो चमकून तिच्याकडे थोडं हुश्यातच पाहू लागला.

क्रमशः

अभिच्या हातात स्मिताने काय ठेवले? काय म्हणेल तो तिला?

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५

सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


🎭 Series Post

View all