भाग:- १५
मागील भागात:-
अभिने मालनचे घर सोडले. अंकुशने त्याला डिप्लोमा करायचा सल्ला देऊन त्याला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. थोडे दिवस त्याला त्याच्याकडील रिकाम्या खोलीत राहायला सांगितले. त्याचे आभार मानू लागला.
आता पुढे:-
अभि अंकुशचे आभार मानत म्हणाला, "दादा, खूप आभार तुमचे. खरं तर मला तुमच्यामुळे खूप मोठा आधार मिळाला. अशा परिस्थितीत स्मिताला कोठे घेऊन जाऊ हा प्रश्न मला भेडसावत होता. तुमचे उपकार कसे फेडू कळतं नाही मला. आयुष्यभर मी तुमचा ऋणी असेन." त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते, हात जोडून तो मान खाली घालून अंकुशपुढे उभा होता.
त्यावर अंकुशने त्याचे जोडलेले हात आपल्या हातात घेऊन सोडवत त्याला घट्ट आलिंगन दिले.
नंतर त्याची पाठ थोपटत म्हणाला,"ए वेड्या, आताच म्हणालो ना तू माझा लहान भाऊ आहेस. मग आभार, उपकार व ऋण असे का म्हणतोस? ते सर्व तुला नोकरी लागली की म्हण. आता सध्या हाॅस्पिटलमध्ये जा. सुनबाई वाट बघत असेल, जा पटकन."
अभिने शर्टाच्या बाह्याने डोळे पुसले, नाक ओढत हलके स्मित केले.
"आता कसं बघ हसल्यावर किती छान दिसतोस. असेच हसत राहा. जा आता." अंकुश हसत डोळे मिचकावत त्याचे केस व्यवस्थित करत म्हणाला.
त्याने हो मध्ये मान डोलावली. अंकुशने काही पैसे त्याच्या शर्टाच्या खिशात ठेवले. अभिला त्या व्यक्तीविषयी प्रचंड आदर निर्माण झाला. त्याची मदत व आश्वासक बोलणे, त्याची ती प्रेमळ मिठी त्याला खूप काही सांगून तर गेलीच आणि सोबत त्याला जगण्याची नवी उमेद व वाट मिळाली.
एकीकडे सावत्र आईने स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर करून घेतला. तर दुसरीकडे अंकुश सारखी माणसे ज्यांच्याशी त्याचं काहीच नातं नाही तरीही आपलीशी वाटतात व न सांगताच मनातील ओखळून मदत करतात. जगात अजूनही माणुसकी व चांगुलपणा शिल्लक आहे हे अंकुशमुळे त्याला कळले.
एक मार्ग बंद झाला की दुसरा मार्ग मिळतो हे अभिच्या बाबतीत झाले.
अभि हाॅस्पिटलमध्ये आला तर स्मिता नुकतीच उठली होती. नर्सने तिला तो कामासाठी बाहेर गेल्याचे सांगितले होते. त्याला आलेले पाहून तिने काम झालं का विचारल्यावर त्याने हो मध्ये मान डोलावली. त्याचा उदास झालेला चेहरा पाहून तिला कसं तरी वाटलं.
आपल्या काळजीने त्याचा चेहरा असा झाला काय असे तिच्या मनात आले. ती म्हणाली, "अहो, मी आता ठीक आहे. काळजी करू नका."
त्याने फक्त हुंकार भरला. दुपारचे जेवणं त्याने पुन्हा उपहारगृहातून आणले. दोघे मिळून जेवले. डाॅक्टरांना त्याने तिच्या तब्बेतीबद्दल विचारले तर ती आता ठीक आहे. संध्याकाळी डिस्चार्ज देतो. फक्त थोडे दिवस काळजी घ्यायला सांगितले.
त्याने कपड्यांची पिशवी सोबत आणलेले पाहून तिला कळून चुकले की त्याचे नक्कीच मालनशी वाद झालेत. आता काही विचारणे तिला योग्य वाटले नाही. तो स्वतःहून सांगेल नाही तर योग्य संधी साधून त्यावर बोलू असा तिने मनात विचार केला.
संध्याकाळ झाली डाॅक्टरांनी पुन्हा स्मिताला तपासले.
"आता काळजीचे कारण नाही, तुम्ही घरी जाऊ शकता. जी औषध गोळ्या दिली आहेत तेच घ्या. अशक्तपणा आहे थोडा, तेव्हा व्यवस्थित जेवणं करा व थोडे दिवस आराम करा. पुन्हा काही वाटलं तर या." असे डाॅक्टरने सांगितले तेव्हा अभि थोडा रिलॅक्स झाला. त्यांचे आभार मानून तो तिला घेऊन रिक्षात बसला.
रिक्षा मालनच्या घरी न जाता दुसरीकडे वळल्याने तिने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातील प्रश्न समजून त्याने फक्त तिच्या हातावर हात ठेवत डोळ्यानेच सांगतो थोडा धीर धर असे खुणावले. त्याच्या डोळ्यात बरेच काही होते जे ती वाचण्याचा प्रयत्न करत होती. भलेही त्यांचं सहवास जास्त दिवसांचा नव्हता पण एकमेकांबद्दल बरंच त्यांना न सांगताही कळतं होतं. त्याच्या डोळ्यांतील भाव व चेहऱ्यावरील वेदनाने तिला कळवळून आलं.
'आपल्यामुळे त्यांनी आईशी वाद घातला तर नसेल ना. आता कुठे घेऊन जात आहेत? काही झालं तरी आपण त्यांची साथ सोडायची नाही.' ती त्याच्या हातातील हात घट्ट पकडून दुसऱ्या हाताने त्याच्या दंड पकडून खांद्यावर डोकं टेकवत मनात विचार करत होती.
तोच रिक्षा थांबली. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला खाली उतरायला लावले. ती चुपचाप खाली उतरली. आजूबाजूचा परिसर न्याहाळत उभी राहिली. त्याने रिक्षाचे पैसे दिले. रिक्षा निघून गेली. रिक्षाच्या आवाजाने अंकुश व त्याची पत्नी मीना बाहेर आले. त्या दोघांची अभिने ओळख करून दिली.
अंकुश त्याला म्हणाला,"अभि, आज आमच्याकडे राहा. उद्या सकाळपर्यंत खोलीची साफसफाई पूर्ण होईल. तसंही सुनबाईं आताच्या हाॅस्पिटलमधून आलेत तेव्हा त्यांना आराम हवा ना. मीना सुनबाईंना तुझ्यासोबत घेऊन जा. त्याचं जेवणाचं बघ. मी आणि अभी आहेत हाॅलमध्ये." नंतर तो मीनाकडे पाहून तिला सांगितले. तिने मान डोलावली व स्मिताला हाताला धरून घेऊन गेली.
अंकुशचा स्वतंत्र असा बंगला होता. बंगल्याच्या बाहेर एक गेस्ट हाऊस होतं पण ते बऱ्याच दिवसापासून ती बंद होतं आणि थोडं समानही अस्ताव्यस्त पडलेलं होतं म्हणून अभि गेल्यानंतर त्याने माणसे लावून ते साफ करून घ्यायला सांगितले होतं. पण अजूनही ते काम पूर्ण झाले नसल्याने त्याने त्याच्याच बंगल्यात त्या दोघांची राहण्याची व्यवस्था केली होती.
रात्री अभिने तो उद्या सकाळी डिप्लोमाचा फाॅर्म भरायला शहरात जाणार हे तिला सांगितले.
दुसऱ्या दिवशी तो फाॅर्म भरून आला. येता येताच त्याने मनात एक निर्णय घेतला. त्या निर्णयाने स्मिता काय म्हणेल याची त्याला काळजी वाटू लागली.
क्रमशः
अभिने काय निर्णय घेतला असेल? स्मिताला तो निर्णय मान्य असेल का?
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा