भाग:- १४
मागील भागात:-
स्मिताला बरे वाटल्यावर अभि तिला औषध गोळ्या देऊन घरी येऊन तिचे व त्याचे कपडे एका पिशवीत भरले व तेथून निघणार तोच मालन स्मिताबद्दल साधी चौकशी न करता तिला वाईट बोलू लागली.
आता पुढे:-
मालनच्या मनात स्मिताबद्दलचा तिरस्कार व तिच्यावरील काढलेली भडास याने अभिच्या मस्तकावरील शीर ताणली गेली. तिचा स्वार्थी विचार ऐकून तर त्याला तिची किव करावीशी वाटली.
"वा! काय छान विचार आहेत गं तुझे?" तो कुत्सित हसत टाळ्या वाजवत म्हणाला.
"व्हयं, मंग तुझ्या भल्याचाच इचार केला नव्हं, यात वंगाळ काय? ती अवसदा.." ती पुढे बोलत होती तोच अभि मोठ्याने गरजला,"बास, खबरदार तर जर पुन्हा माझ्या बायकोबद्दल काही वाईट बोललीस तर. खूप ऐकून घेतलं तुझं. पण आता नाही. आता आम्ही दोघंही इथे राहणार नाही. आता पर्यंत आम्हा दोघांना आसरा दिलास. त्याबद्दल तुझे आभार." अभि कोपऱ्यापासून हात जोडून कपाळावर लावला.
"त्या आसऱ्याचा मोबदला तू पुरेपूर आमच्या दोघांकडून वसूल करून घेतलास. आता कळलं मला की आबांनी तुझा उल्लेख का केला नाही? तुझ्याबद्दल का सांगितले नाही मला? येतो मी." तो पुढे तावातावाने म्हणाला.
"कुठे जाणार हाईस? तुझ्या त्या सासुरवाडीला, जिथे त्यांचीच खायची पंचाईत?" मालन बाकी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बेरकी हसतं टोमणा मारत म्हणाली.
"मी कुठेही जाईन? त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाही. तू त्याची काळजी करू नकोस. माझी मी त्याची व्यवस्था करीन." अभि रागाने तिला एक जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला व पुन्हा फिरून न पाहता झपझप पावलं टाकत तिथून बाहेर पडला.
अभि मालनचे घर सोडून त्याला मुकादमाचे काम देणाऱ्या व्यक्ती अंकुशकडे आला. त्याने बायको आजारी असून तिला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे सांगितले. तिला बरे वाटल्याशिवाय तो कामावर येऊ शकणार नाही असे सांगून तो जाऊ लागला.
त्याने अभिला थांबवले व म्हणाला, "अभि, मी काल तुला एक फाॅर्म भरायला सांगितले होते. त्याचा विचार करं. कमवा आणि शिकवा या तत्वावर ते आहे, तू पार्ट टाईम कामपण करून शिकू शकतोस. डिग्री करण्यात तुझे चार वर्षे जातील. दहावीच्या बेसवर तुला डिप्लोमाला सहज अॅडमिशन भेटेल. जे पैसे लागतील ते मी देतो. मला माहिती तू खूपच स्वाभिमानी आहेस. माझ्याकडून पैसे घेणार नाहीस हे माहिती आहे मला. इतक्या दिवसापासून तुला पाहत आलोय. तुझा प्रामाणिकपणा मला खूप भावला. हवं तर हे पैसे तू मला तुला नोकरी लागल्यावर दे. आता उधार म्हणून घे. बघ विचार करं." अंकुश कळकळीने बोलत होता.
त्याचे बोलणे ऐकून त्याने थोडा विचार गेला. खरं तर स्मिताच्या काळजीत तो त्या फाॅर्मबद्दल पूर्ण विसरून गेला होता. आता अंकुश बोलल्यावर त्याला त्या फाॅर्मची आठवण आली.
"धन्यवाद, दादा! मी तर विसरूनच गेलो होतो. आत्ताच भरतो ते फाॅर्म द्या इकडे. उद्या शेवटचा दिवस आहे तर आज तुम्ही तो सबमीट करून याल का? कारण स्मिताला अशा परिस्थितीत मी एकटी नाही सोडू शकतं." अभि विनंती सुरात म्हणाला.
"अरे, तुझी आई आहे ना, तिला सांग तिच्याजवळ थांबायला आणि तूच जाऊन सबमीट करून ये." अंकुश म्हणाला.
मालनबद्दल कसे सांगावे या पेचात अभि पडला. मग थोडा विचार करून म्हणाला, "तिचं वय झालंय ना, तिला कसं जमणार सगळं? त्यापेक्षा असं करतो आज तिला डिस्चार्ज मिळाले की मग घरी सोडून जाईन फाॅर्म सबमीट करायला."
मालनबद्दल बोलताना त्याचे चेहऱ्यावरील हावभाव बदलले होते. तो नजर चोरत होता. त्यावरून अंकुशच्या लक्षात आले की तो काही तरी लपवत होता. त्याचा चेहरा आधीच उतरला होता. त्यात डोळ्यातही उदासी भरलेली वेदना दिसून येत होती.
मालनबद्दल सांगण्याचं त्याने टाळले. सावत्र असली तरी ती आईच होती. मग तिच्याबद्दल तो जगाला वाईट सांगू शकत नव्हता.
अंकुशने काय झाले ते नंतर विचारू असा मनात विचार करत ठीक आहे म्हणत मान डोलावली.
अभि फाॅर्म घेऊन भरून त्याच्याकडे परत देत म्हणाला, "उद्या येतो. तिला तिच्या माहेरी सोडतो विश्रांतीसाठी. इतक्यात ती माहेरीही गेली नाही. हवामानात तेवढाच बदल होईल."
तरीही अंकुशला राहवले नाही तो त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,"अभि, काय झालं खरं सांगशील? तुझा चेहरा एवढा का उतरला आहे? तुला आणखी काय मदत लागली तर सांग? तू मला लहान भावासारखा आहेस. काहीही लपवू नकोस. काय अडचण आहे ते सांग."
अभिने एक सुस्कारा टाकत घडलेले सर्व त्याला सांगितले. तेव्हा त्यालाही मालनचा फारच राग आला. त्याला सुरूवातीपासूनच मालन आवडत नव्हती. तिच्याबद्दल गावात लोक वाईटच बोलले जातं होते. तिचं गावातील कोणाशीच नीट पटत नसायचे. ती जेव्हा अभिच्या पगाराबद्दल त्याला विचारायला आली होती तेव्हाच अंकुशने तिला खडसावले होते व अभिलाही त्याबद्दल सांगितले होते. पण अभिने त्यावेळी एवढे जास्त लक्ष दिले नव्हते.
"अभि, मी तुला त्या बाईबद्दल आधीच सांगितले होते. माफ करं, तुला वाईट वाटलं असेल तर जी तिच्या नवऱ्यालची नाही बनू शकली ती तुझी आई कशी होईल? जाऊ दे ते सोड. आता जास्त विचार करू नकोस. एक काम करं, स्मिताला डिस्चार्ज मिळाले की माझ्या घरी ये. माझी एक खोली रिकामी आहे. तिथे तू व स्मिता राहू शकता. बाकी आमची मंडळी म्हणजेच आमची कारभारीन स्मिताला मदत करेल." आण्णाचे हक्काने बोलल्याने अभिला भरून आले. त्याचे भरलेले डोळे पाहून आण्णाने त्याला गळ्याशी लावून घेतले.
क्रमशः
अभि अंकुशची मदत घेईल का? तो स्मिताला मालनबद्दल सांगेल का? पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी वाचत राहा..तेरा मेरा साथ रहे चा पुढचा भाग..
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा