भाग-१३
मागील भागात:-
स्मिता आजारी असतानाही मालनला तिला काम करायला सांगते. तिने थोडंही आराम केलेले तिला आवडत नाही. लगेच तिच्या वडिलांचा उद्धार करते हे तिला सहन होत नाही तेव्हा तीही तिला प्रतिउत्तर देते. तेव्हा मालन तिच्यावर खेकसत तिला ढकलून देते तेव्हा पडणार असते तोच नेमकं अभि तेव्हा येतो व तिला सावरतो. पण ताप खूप असल्याने तिची शुध्द हरपते. तो घाबरून लगेच तिला हाॅस्पिटलमध्ये नेतो तर मालन त्याला अडवते ती नाटक करत असल्याचे त्याला सांगते, त्यावर तो फक्त एक जळजळीत कटाक्ष टाकतो व रिक्षाने स्मिताला हाॅस्पिटलमध्ये घेऊन जातो. उपचारानंतर तिला बरे वाटते. तो मनात काही तरी ठरवतो.
आता पुढे:-
दुसऱ्या दिवशी स्मिताला थोडं बरे वाटतं होतं. तिचा ताप पूर्णपणे उतरला होता. पण अशक्तपणा आल्याने चेहऱ्यावर बराच थकवा जाणवत होता. तिला उठलेले पाहून अभिला तिच्या बेडजवळील स्टूलवर सावरून बसला. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत काळजीने तिला म्हणाला, "बरं वाटतंय ना आता? "
त्याच्या डोळ्यांतील तिच्याबद्दल प्रेम व काळजी पाहून तिला बरं वाटलं, मलूल चेहऱ्यावर हलकंसं हसत ती म्हणाली, "हो, आता बरी आहे पण थोडं अशक्तपणा जाणवतोय." ती उठून बसायचा प्रयत्न करत होती.
त्याने तिला उठायला मदत केली. तिच्या पाठीमागे उशी ठेवून तिला बसवलं. तिला फ्रेश व्हायचं होतं आणि वाॅशरूमलाही जायचं होतं. तिची चुळबुळ जणू त्याला कळली. तो तिला फ्रेश व्हायला हाताला धरून घेऊन गेला. तिचं आवरून होईपर्यंत तिथेच दाराजवळच थांबला. ती बाहेर आल्यावर तिला तिच्या बेडवर बसवून तिथल्या उपहारगृहातून चहा नाष्टा घेऊन तिला दिला व फ्रेश होऊन त्यानेही घेतलं. नंतर तिला गोळ्या औषधे दिले. औषधामुळे पुन्हा तिला झोप लागली. ती झोपून गेली. औषधाच्या ग्लानीमुळे ती दोन तास तरी उठणार नाही हे त्याला नर्सकडून समजले होते. नर्सला तो येईपर्यंत तिची काळजी घ्यायला सांगून तो आधी घरी गेला. अंघोळ करून स्वतःचे व स्मिताचे कपडे एका पिशवीत भरले. या दरम्यान तो मालतीशी एका शब्दानेही बोलला नाही. तिनेही स्मिता कशी आहे अशी साधी चौकशी केली नाही. तो दोघांचे कपडे भरत होता तेव्हा ती तिरक्या नजरेने कपाळावर आट्या पाडत बघत होती.
ती पिशवी हातात घेऊन तो घराबाहेर पडणार तोच मालन त्याला उपहासक हसत म्हणाली,"लयच पुळका आलाय तुला बायकोचा. तिने कान भरले वाटते माझ्याविषयी. म्हणूनश्यान मला चकार शब्द बोलला न्हाईस."
त्याने एक नजर तिच्याकडे पाहिले, एक सुस्कारा टाकतं तिच्याजवळ आला. कपाळावर दोन बोटं घासली. खरं तर त्याला तिचा खूप राग आला होता. पण तरीही तो राग आवरत शांतपणे म्हणाला, "तिला जर तुझ्याविषयी माझे कान भरले असते ते तिने केव्हाच केले असते. इतकं सगळं सहन करत स्वतःची ही अवस्था करून घेतली नसती. आणि हो आलाय मला तिचा पुळका कारण ती माझी बायको आहे."
"व्हयं, बायको हाय म्हटल्यावर तिचा पुळका येणारचं. आता आयची काय गरज नव्हं तुला?" मालन नाकपुड्या फुगवत म्हणाली.
"ह, आई, आई या शब्दाचा अर्थ तरी माहिती का गं तुला? किती आस लावून आलो होतो तुझ्यासोबत? आईचं प्रेम, माया तुझ्याकडून मिळावी एवढीच साधी अपेक्षा ठेवली होती गं मी. पण नाही, तुला आई म्हणणं म्हणजे आई या शब्दाचा अपमान होईल. मी तुला देत असलेलो पगार तेवढाच की त्यापेक्षा जास्त आहे, याची तू चौकशी केलीस. तरी मी गप्प बसलो. स्मिताला किती वेळा टोमणे मारलेस तरी मी काहीच बोललो नाही. अगदी मी आठवड्यातून एकदा घरी असलो तरी तू तिला माझ्याजवळ येऊ देत नव्हतीस. सतत काही ना काही कारण नाही तर काम सांगून तिला माझ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होतीस. तेव्हा वाटतं होतं की माझा जम व्यवस्थित बसला नाही, इतक्यात संसाराची जबाबदारी माझ्यावर पडू म्हणून तू तसे करतेस. पण नाही आता कळतंय की तू तुझे पितळ उघडे पडू नये म्हणून तसं करत होतीस."
"तोंडाला येईल ते बोलू नगोस. म्या कुठे चौकशी करत होते तुझ्या पगाराची. ते तर तू कुठे वाईट साईट गोष्टीवर पैका घालवू नयेस म्हणून विचारलं तर काय वंगाळ केलं रं? राहिलं त्या अवदसेला तुझ्यापासून लांब ठेवायचं तर ती तुला शोभत नहाई. ती तुझ्या लायक नाय. कशी दिसते काळी, ना रूप ना वाण." ती तोंड वाकडं करत बोलत होती. अभि भयंकर तापला होता. त्याची हाताची मुठ घट्ट आवळून धरली. तरीही तो संयम राखत ती अजून काय बोलते हे ऐकण्यासाठी तो थांबला.
"तू तिला सोडून दे, तुला शहरात चांगली काम भेटलं की मंग तुझं लगीन एका चांगल्या देखण्या व पैकेवाल्या पोरीशी लावून देण्याचा माझा विचार होता. म्हंजी तुझं बी नशीब फळफळलं असतं अन् माझ्या म्हातारपणाची व्यवस्था बी झाली असती. पर न्हाय, त्या अवदसेने तुला काय पट्टी पढवली काय माहिती देव जाणे? ती.." मालन नाक मुरडत जस जशी बोलत होती तस तसे अभिने आपली पिशवीवरील मुठ आणखीनच आवळून धरली.
क्रमशः
अभि मालनला प्रतिउत्तर देईल का? काय होईल पुढे याची उत्सुकता आहे जाणून घेण्यासाठी वाचत राहा..तेरा मेरा साथ रहे
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा