भाग-१६
मागील भागात:-
रात्री अभिने तो उद्या सकाळी डिप्लोमाचा फाॅर्म भरायला शहरात जाणार हे स्मिताला सांगितले.
दुसऱ्या दिवशी तो फाॅर्म भरून आला. येता येताच त्याने मनात एक निर्णय घेतला. त्या निर्णयाने स्मिता काय म्हणेल याची त्याला काळजी वाटू लागली.
आता पुढे:-
फाॅर्म भरून आल्यावर अभि अंकुशने दिलेल्या गेस्ट हाऊसमध्ये आला. स्मिता नुकतीच उठलेली होती. अंगात अजूनही अशक्तपणा होता. तो येऊन तिच्याजवळ बसला. तिचा हात हातात घेत तिला म्हणाला,"स्मिता, मला दोन दिवसानंतर पुढील शिक्षणासाठी शहरात जावं लागेलं आणि तीन वर्षे तिथेच राहावे लागेल. तिथे मी कमवा व शिका या तत्त्वावर चाललो आहे. माझ्या एकट्याची सोय होईल तिथे तेव्हा मला तुला घेऊन जाता येणार नाही. तुला एकटीने इथे ठेवणं माझ्या जीवावर येतंय. पुन्हा तुला मालनआईकडे ठेवण्याचा प्रश्नच येतं नाही. मी विचार करतोय की.. " बोलता बोलता तो थांबला.
ती फक्त त्याच्या चेहऱ्याचं निरिक्षण करतं होती. तो आपला विचार करतो या विचाराने तिला छान वाटतं होतं.
ती एकटक बघतेय हे पाहून तो नजरेने काय म्हणून विचारतो. तेव्हा काय नाही या अविर्भावात ती मान डोलवत व खुणेनेच पुढे बोलायला सांगते.
तो दीर्घ श्वास घेऊन पुढे म्हणाला, "हे बघ स्मिता, माझ्यामुळे तुझी आधीच खूप फटफट झाली आहे. तिचे सगळे का तू ऐकून घेत सहन करत होतीस? अगं, अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. तू जर तिला तिथल्या तिथे उत्तर दिले असते तर ती वेळ आलीच नसती. माहिती आहे मला की तू माझ्यामुळे सगळं सहन करत होतीस. पण एकदा तू मला सगळं सांगायला हवं होतंस. त्या दिवशी मी जर वेळेवर आलो नसतो तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही मला. तुझी अवस्था पाहून माझा जीव कासावीस झाला होता. किती जीव काढलासं तू माझा? तू शुध्दीवर येत नव्हतीस तोपर्यंत एक क्षण एक एक युगासारखा वाटतं होता. तुला काय झाले तर काय केलं असतं मी? विचार सुध्दा करावासा वाटत नाही.
अगं, तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य जगायचे स्वप्न पाहिले आहे मी. कोणत्याही किमतीवर मी तुला गमावून नाही शकत." आता त्याच्या डोळ्यात आसवांची गर्दी जमा झाली. तिचा चेहरा त्याला अंधुक दिसू लागला.
अगं, तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य जगायचे स्वप्न पाहिले आहे मी. कोणत्याही किमतीवर मी तुला गमावून नाही शकत." आता त्याच्या डोळ्यात आसवांची गर्दी जमा झाली. तिचा चेहरा त्याला अंधुक दिसू लागला.
तिलाही गलबलून आलं. ती त्याला बिलगून म्हणाली,"अहो, मी ठीक आहे. तुम्ही सोबत असताना कशाची पर्वा नाही मला? तुम्ही शांत व्हा पाहू आधी. तुम्ही आलात ना वेळेवर, मग प्रश्न काय आहे? झाले मी ठीक. त्या गोष्टीचा जास्त विचार करू नका. तो वाईट स्वप्न होतं असं म्हणून विसरून जा. मी स्वतःची काळजी घेईन. तुम्ही बिनधास्त शहरात जा . माझी काळजी अजिबात काळजी करू नका. बघता बघता तीन वर्षे अशीच निघून जातील. तुम्ही चांगल्या मार्कांनी नक्कीच पास होणार आणि चांगली नोकरी पण लागणार हे माहिती मला. तेव्हा आता तुम्ही माझा विचार सोडा व तुमच्या अभ्यासाचा विचार करा. मी इथे अंकुश भावजी व मीनाताईसोबत राहीन." ती त्याचा चेहरा ओंजळीत धरून त्याला समजावू लागली.
"नाही गं, माझं मन नाही धजावत तुला इथे एकटीला सोडून जायला. दादा दिवसभर घरी नसतात आणि वहिनी पण त्यांच्या कामानिमित्त बाहेर जातात मग तुला एकटीला पाहून ती बाई इथे येऊन तुला त्रास द्यायला कमी करणार नाही. त्यापेक्षा तू मामा मामींकडे जा. तिथे राहिलीस म्हणजे मी बिनघोर राहिन. म्हणजे माझी काळजी मिटेल व मी बिनधास्त तिकडे राहिन. मला जास्त येणं होणार नाही. पण जेव्हा तीन चार दिवसांची सलग सुट्टी असेल तेव्हा तुला भेटायला नक्की येईन. एकदा का शिक्षण संपून नोकरी लागली की मग तुलाही तिकडे घेऊन जाईन. " आता तो तिचा चेहरा ओंजळीत घेत काळजीने म्हणाला.
त्याच्या बोलण्यात व डोळ्यांत तिला तिच्याबद्दल फक्त काळजीच नाही तर प्रेमही दिसत होतं. ते पाहून तिने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्याने प्रेमाने तिला मिठीत घेतले. तीही त्याच्या प्रेमळ मिठीत विरघळून गेली.
दोन दिवसांनी अभिने अंकुशचे आभार मानून स्मिताला तिच्या आईबाबांकडे सोडलं. या दरम्यान राजनचे लग्न झाले होते. त्याची बायको सुनिता थोडी तुसडीचं होती.
स्मिताला पाहून ती तोंड वाकडं करत मनात पुटपुटली, 'आली ही बया आता माझ्या डोक्यावर मीऱ्या वाटायला. आधीच आमचेच खायचे वांदे, वरून ही आली आमच्या उरावर बसायला.'
काही दिवस निघून गेले. शहरात अभि काम करत शिकत होता. इकडे स्मिताला घरात बसून कंटाळा येऊ लागला. त्यात घरात कोणी नसताना सुनिता तिला टोमणे मारायची. तीही तिच्याच भाषेत तिला उत्तर देत होती. अभिने तिला सांगून ठेवले होते. जिथे आपली चूक नसते तिथे आपण ऐकून घ्यायचे नाही, सडेतोड उत्तर द्यायचे.
वेळ जावा व चार पैसे गाठीशी पडतील व तोच पैसा अभिच्या शिक्षणाच्याही कामी येईल ह्या विचाराने स्मिता मिळेल ते काम करू लागली. कधी गंवड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून तर कधी शेतमजूर म्हणून. कधी स्वयंपाक करायलाही जायची. अर्थात ते अभिला माहिती नसायचे. जेव्हा तो यायचा तेव्हा ती घरातच असायची. कारण त्याची येण्याची व जाण्याची वेळ बहुदा तिला माहिती असायची. दोन चार सुट्ट्या लागून असायच्या की तो येणार हे ती कॅलेंडरमध्ये खूण करून ठेवायची. त्यामुळे शक्यतो ती त्याला तिच्या कामाबद्दल कळू देत नसायची.
हळूहळू दिवस निघून गेले. बघता बघता तीन वर्षे निघून गेली. अभिने छान अभ्यास केल्याने तो चांगल्या मार्कांने पास झाला. सर्वांत आधी त्याने ही गोष्ट अंकुशला सांगितली कारण त्याच्यामुळेच त्याने हे शिक्षण पूर्ण केले होते. तोही खूप खुश होता त्याच्यासाठी. स्मितालाही खूप आनंद झाला होता. बस आता चांगल्या नोकरीची प्रतिक्षा होती. तीही लवकरच मिळेल अशी त्या दोघांनाही खात्री होती.
अभि शहरात नोकरीच्या शोधात होता आणि इकडे स्मिता कामावरून घरी जाऊन गावातील मंदिरात गेली. तिला कधीही अभिची खूप आठवण आली की ती मंदिरात जात असे. त्या दिवशीही ती मंदिरात गेली होती. मंदिराच्या पाठीमागे तळे होते. अभि जेव्हा पण तिथे यायचा तेव्हा तिला इथे घेऊन यायचा. दोघांच्या खूप साऱ्या आठवणी येथे होत्या. उशीर झाल्याने मंदिराचे दार बंद करून पुजारी निघून गेला होता.
स्मिता सभामंडपात एका खांबाला टेकून अभिच्या आठवणीत हरवून गेली. तसे त्यांच्या वाटेला फार कमी क्षण यायचे पण ते दोघे भरभरून जगायचे. त्या दिवशीही ती अशीच बसली होती. तेव्हा तिला मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने अचानक कशाचा तरी आवाज आला. ती दचकून अभिच्या आठवणींतून बाहेर आली. आवाजाच्या दिशेने तिने तिथे जाऊन पाहिले तर तिचे डोळेच मोठे झाले.
क्रमशः
काय पाहिले स्मिताने? अभिला नोकरी मिळेल का? काय होईल पुढे..
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
सदर कथेचे लिखाण सुरू आहे. पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे ते पेज फाॅलो करून ठेवा.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा