घर व्यवस्थापन आणि खोटे बोलणे.....

घर चालवत असतंना खोटे बोलावे लागतें

घर म्हंटले की स्वयंपाकघर आलेच... अन व्यक्ती तितक्या प्रकृती या प्रमाणे प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते... अन या सगळ्याचा मेळ घालून स्वयंपाक करणे हे एक प्रकारचे युद्ध पातळीवरचे काम असते.... त्यामुळे थोडे खोटे बोलून कोणालाही न दुखावता सुवर्ण मध्य काढून आपल्याला ही लढाई जिंकायला लागतें... आणि तुम्हाला तर माहिती आहेच, " प्रेमात अन युद्धात सारे काही माफ असतेच "


घर नावाची कंपनी चालवत असताना आपल्याला सुद्धा व्यवस्थापन,वेळेचे नियोजन, कोणत्याही गोष्टीचे प्लानिंग हे करायला लागतें अन अशा वेळेस एखादी वेळ मारून न्यायला खोटे बोलले तरी तें चांगले असते...

जसे की एखाद्या दिवशी आपल्याला नाश्ता बनवायचा नसेल किंवा नेहमीं करणारे पदार्थ जर आधीच्या एक-दोन दिवसात झाले असतील तर अशा वेळेस मुद्दामून रात्री जास्त भात करायचा आणि त्याला मस्त फोडणी देऊन कोथींबीर टाकून फोडणीचा भात बनवत बोलायचं काल रात्री चुकुन जास्त झाला म्हणून आज नाष्ट्याला फोडणीचा भात केला...

एखाद दिवशी नवऱ्याला मस्त कढी, मुगाची उसळ खायचा मूड येतो आणि जर आपण मुग भिजत घालायला विसरून गेलो तर.. आज ना अमुक तिथी आहे आज मुग खायचे नसतात... आता लगेच भिजवते उद्यासाठी... तुमचे एक खोटे वाद मिटवते....

एखादी भाजी सगळ्यांना आवडत असते तरी पण कोणाचा मूड असतो तर नसतो अशा वेळेस मला जर कॊणी विचारले आज काय भाजी आहे? तेव्हा माहीती असून सुद्धा मी सांगतें अजून ठरवलं नाही... या खोटे बोलण्याने काय होते तर जास्त चर्चा होत नाही... आणि आपण ठरवलेला मेनू वाद विवाद न होता पार पडतो...

घरात एखादी वस्तू संपत आली तरी सर्वच बायका ती संपली असेच जाहीर करतात... आपल्याला माहित असते की असे सांगितलं तरंच ती वस्तू तातडीने घरात येते हे त्यांना माहित असते त्यामुळे नक्कीच हे खोटे चांगले असते...



खरे तर जेवढी उदाहरण देऊ तेवढी कमी आहेत... पण ज्या खोटे बोलण्यामुळे कामे लवकर होतात किंवा वाद होऊ नये म्हणून खोटे बोलावे लागतें असे ठिकाण म्हणजे "घर" आणि ही संस्था म्हणा किंवा आपल्या संसाराचा गाडा नीट चालावा म्हणून त्या घरातील स्त्रीला असे खोटे बोलावे लागतेंच.....


तुम्हाला सुद्धा असा अनुभव आहे का?? नक्की सांगा अर्थात तुमच्या कंमेंट मधून....




© अनुजा शेठ


साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.