कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : वाचाल तर वाचाल
तीन हजार टाके : सुधा मूर्ती
मला वाचन म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा घटकच वाटतो. कितीही थकवणारा दिवस असो, निदान काही ओळी वाचल्याशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. सवयच म्हणा हवंतर! आजवर बरीच पुस्तके वाचून झाली आणि त्यात कितीतरी पुस्तकं अगदी आवडीची सुद्धा झाली. त्यामुळे यात कोणा एका पुस्तकाचं नाव आवडतं पुस्तक म्हणून घेणं अवघडच असेल. कलामांचं अग्निपंख असो किंवा मग गुरुजींचं श्यामची आई, खांडेकरांचं अमृतवेल असो किंवा मग पुलंचं बटाट्याची चाळ, ही अन् अशी बरीच पुस्तकं मनात घर करून राहिली आहेत. फकिरा, कोसला, राऊ, स्वामी, राधेय, संभाजी, चेटकीण, ती फुलराणी, पार्टनर, बनगरवाडी, आणि इतरही इतकी पुस्तकं मनात घर करून राहिली आहेत की यादी वाढतच जाणार हे तर निश्चितच आहे. या खूप साऱ्या भावलेल्या पुस्तकांमधीलच एक म्हणजे सुधा मूर्ती यांचं तीन हजार टाके हे पुस्तक.
पुस्तकाचे नाव : तीन हजार टाके
लेखिका : सुधा मूर्ती
अनुवाद : लीना सोहोनी
सुधा मूर्ती या एक प्रसिद्ध प्राध्यापिका, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका असून त्यांनी कॉम्प्युटर सायन्स विषयात एम. टेक पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
सुधा मूर्ती यांची पुस्तकं मला नेहमीच प्रेरणादायी वाटतात. साध्या सोप्या भाषेत लिहिलेली, उच्च विचारसरणी दाखवणारी त्यांची पुस्तकं कोणालाही आवडावी अशीच असतात. ताईंचा आत्मविश्वास, जिद्द, विचारांचा स्पष्टपणा आणि इतरही अनेक गोष्टी मनाला भावतात. खऱ्या आयुष्य, घटना, अनुभवांवर भाष्य करणारी, आणि इतरही बरंच काही सांगणारी ही पुस्तकं एकदा तरी नक्कीच वाचून पहा.
तीन हजार टाके हे पुस्तक वाचताना सुरुवातीलाच इन्फोसिस फाउंडेशन बद्दल माहिती मिळते. या फाउंडेशनचं उद्दीष्ट, कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मनाला स्पर्शून जाणारं एक महत्त्वाचं काम म्हणजे त्याकाळी प्रचलित असलेल्या देवदासी प्रथेसाठी केलेलं काम. पूर्वीच्या काळी देवदासीच्या असणाऱ्या उच्च स्थानाला कालांतराने वेगळं वळण लागलं. ईश्वराची सेवा करणारी ती, अचानकपणे शरीरविक्री करून उदरनिर्वाह करणारी म्हणून ओळखली जाऊ लागली. यांच्या मुलींना सुद्धा देवदासी म्हणून वावरावं लागायचं. कितीतरी वेळा पालक स्वतःचं स्वतःच्या मुलींना देवाला वाहायचे. इतकंच काय तर डोक्यात जट आली म्हणजे तिचा जन्मच देवदासी होण्यासाठी झाला आहे, असं म्हटलं जायचं. आणि या इन्फोसिस फाउंडेशनचा पहिलाच उपक्रम देवदासींच्या समस्या सोडविण्याचा होता. या सर्वांत प्रयत्न, जिद्द, दृष्टीकोन, सकारात्मकता, बदल, परिवर्तन सगळ्याच गोष्टींची एक वेगळी व्याख्या समजली. आता मी हे नाही करू शकत इथपासून ते या उपक्रमाला पूर्णत्वास नेण्यापर्यंतचा प्रवास अगदी सहजतेने मांडला आहे. यात आणखी एक भावलेली गोष्ट म्हणजे सुधाजींच्या वडिलांचा पाठिंबा आणि शब्द. जिथे आजही एड्स सारख्या विषयावर बोलण्यात हवी तितकी सहजता नाहीये, तिथे त्या वेळीही त्यांनी एड्सच्या जनजागृतीचे कार्य केले. सुमारे ३००० देवदासींना या शरीरविक्री व्यवसायातून मुक्त करणं साधं काम नक्कीच नाही. यात अंतिमतः सांगितलेली तीन हजार टाक्यांच्या गोधडीची कहाणी भावनिक आहे.
पुढची प्रेरणादायी वाटलेली गोष्ट म्हणजे पुरुषांनीच इंजिनिअरिंग करावं या समजात वावरणाऱ्या जगात इंजिनिअर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या आणि ते साकार करणाऱ्या सुधा मूर्ती. प्रवाहाविरुद्ध वाहणं प्रत्येकालाच जमत नाही, पण सुधा मूर्तींनी ते यशस्वीपणे पूर्ण करून दाखवलं. आजूबाजूच्या परिस्थितीने न खचता, न डगमगता केवळ स्वतःच्या ध्येयाला पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणं त्यांनी जमवून घेतलं. इथेही मैत्री, आत्मविश्वास, शिक्षण, इ. च्या निराळ्या व्याख्या अनुभवता येतात.
पुढील कथा तर काहीशी मजेशीर पण तरीही ज्ञानपूर्ण आहे. भाज्यांबद्दलचा आणि इतर खाद्यपदार्थांबद्दलचा एक वेगळा पैलू या निमित्तानी उलगडला. काही गोष्टी माहितीत होत्या, परंतु बऱ्याच गोष्टींचे संदर्भ नव्याने ज्ञात झाले.
पुढची कथा लेखिकेचं तिच्या आजीसोबतचं सुंदरसं नातं दाखवणारी आहे. या नात्याची वीण वाचताना नकळतपणे आपल्याला ते सारं काही स्वतःच्या आयुष्यासोबत जोडावं वाटू लागतं. कारण अश्या बऱ्याच गोष्टी आपणही कुठे ना कुठे अनुभवलेल्या असतात. सोबतच काशी, श्रद्धा, आणि संबंधित गोष्टींचं खूप छान ज्ञान देण्याचा आणि वर्णनाचा सुरेख प्रयत्न सुधाजींनी केला आहे.
यातील कॅटल क्लास ही कथा तर मला अगदी आजच्या घडीला जे सर्रास होत आहे अशीच भासली. बाह्यरूपावरून एखाद्याबद्दल नको ते निष्कर्ष काढणं बहुतांश लोकांना आवडतं. याच वृत्तीचं दर्शन इथे होतं. साधेपणाने राहणारी व्यक्ती 'हाय क्लास' कशी असू शकते, हा तुच्छ विचार करणारेही आसपास भेटतातच. सुधा मूर्तींनी मांडलेला अजून एक अतिशय सुंदर मुद्दा म्हणजे स्वभाषेचा अभिमान! भाषा, क्लास जपणं किंवा क्लासी असणं, पोशाख, समाजसेवा, या प्रत्येक गोष्टीची सुधाजींनी सांगितलेली व्याख्या मनापासून आवडली.
अलिखित आयुष्य या कथेतून तर मदत आणि कृतज्ञता या दोन्ही गोष्टींचा सुरेख अर्थ सांगितला आहे.
पुढील कथा कामाच्या आमिषाने फसवणूक करण्याबाबत आहे. हे भयाण वास्तव वाचताना अंगावर काटा उभा राहतो. फसवणूक आणि अत्याचार झालेल्या या स्त्रियांना मायदेशी परतण्यासाठी इन्फोसिस फाउंडेशननी केलेली मदत खरंच कौतुकास्पद आहे.
लेखिकेची चित्रपटाबद्दल असणारी आवड तर काही औरच. ३६५ दिवसांत ३६५ चित्रपट बघणं ते सुद्धा त्या काळी, अगदी थक्क करणारं होतं. सोबतच लेखिकेची भ्रमंतीची आवडही वाखाणण्याजोगी आहे. चित्रपट आणि भ्रमंतीचं त्यांचं नातं खूप छान शब्दांत व्यक्त केलं आहे.
गोपिका वस्त्रहरणाच्या हरिकथेचं लेखिकेने केलेलं वर्णन वाचताना आपण खरोखरच ती हरिकथा ऐकत आहोत असं वाटतं. कृष्णाच्या कथांना त्या वेळची विचारसरणी आणि आजची विचारसरणी यांनुसार कसं समजून घेतलं जातं हे सुद्धा थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे. सुधाजींच्या नातींनी सांगितलेली आधुनिक कृष्णाची आणि द्रौपदीची कथाही गमतीदार पण सुंदर आहे.
इन्फोसिस फाउंडेशनमध्ये सुधा मूर्तींचा एक दिवस कसा असतो हे वाचताना एवढं तर नक्कीच लक्षात आलं की समाजकार्य करणं म्हणजे केवळ दान करणं किंवा मदत करणं नाहीये. त्यासोबतच इतरही कितीतरी गोष्टी त्यांना पहाव्या लागतात. मानवी स्वभावाचेही खूप पैलू यात दिसून आले.
शेवटी सांगितलेली कथाही छानच आहे. व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्तीपर्यंतचा प्रवास करायला मदत करणारी 'ए ए' संस्था मनापासून आवडली. जयाच्या बोलण्यामुळे सुधाजींनी याबद्दल केलेला विचार कौतुकास्पद वाटला.
या पुस्तकातील शेवटची ओळ मनात राहिली आहे, ती म्हणजे 'आयुष्यात आशेला स्थान आहे'. या वाक्याला मला कितीतरी घटनांसोबत जोडावसं वाटतं. खरंतर सुधा मूर्तींचं प्रत्येक पुस्तक काही ना काही शिकवत असतं. या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा बरंच काही शिकता आलं. मानवी स्वभावाचे, आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांचे कित्येक पैलू लक्षात घेता आले. वास्तविक लेखणी नेहमीच प्रेरणादायी वाटत राहते. हा कथासंग्रह सुद्धा अगदी मनापासून आवडला. पुस्तक वाचून झालं की 'सामान्य व्यक्ती... असामान्य जीवन...' या शब्दांचा अर्थ नक्कीच कळतो.
सुधा मूर्ती आणि त्यांच्या पुस्तकांबद्दल जितकं बोलू तितकं कमीच! हे 'तीन हजार टाके' पुस्तकही आपल्या पुस्तक संग्रहात आवर्जून असावे, असंच आहे. एकदा तरी हा कथासंग्रह वाचण्याचा प्रयत्न अवश्य करा.
रसग्रहण : कामिनी खाने.
-©® कामिनी खाने.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा