Feb 28, 2024
रहस्य

ती कोण होती....?

Read Later
ती कोण होती....?

 

                           

                       


पात्र
 समीर          : मुंबईत राहणारा , L.I.C एजंट 

 ती              : दिसायला सुंदर , रेखीव चेहऱ्याची,  काळेभोर, वेधक डोळे 

कंडक्टर       : गावातील रहिवासी 

ड्रायव्हर       : गावातील रहिवासी

राघव           : समीरचा मित्र

 
(आजूबाजूला घनदाट जंगल असलेला एक जुना बस स्टॉप, त्यात एकच अंधुकसा बल्प, बाकी सर्वत्र काळोख आणि धूकं पसरलेल आहे. स्टॉप-च्या समोरच मेन रोड. स्टॉप-च्या डाव्या बाजूला खाली उतरता कच्चा मातीचा रस्ता. वेळ - रात्रीचे ११ वाजुन गेलेत.) 

(समीर आपल्या जवळच्या मित्राला त्याची आई वारल्याने हाक मारायला आलेला होता.आता तो परतीच्या प्रवासाला निघण्यासाठी स्टॉपवर थांबलेला आहे.)

समीर : (कंटाळून) काय बोचरी थंडी आहे ही ? (स्वतःशीच बोलतोय) स्वेटर आणायला हवं होतं. (अचानक त्याच्या मोबाईलची रिंग वाजते. तो मोबाईल खिशातुन काढतो आणि उचललून स्पिकरवर टाकतो. ) हॅलो…. बोल राघव. काय म्हणतोस? 

राघव : अरे पहिला तो मोबाईल स्पीकरवर टाक. मोठ्याने कोकलुन माझा घसा बाद होतो. पण तुझा तो  मोबाईल काय माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहचु देत नाही. (वैतागून)

समीर : अरे हो. ते काम आधीच केलयं मी. तु आता नॉर्मल बोलु शकतोस. (हसत) 

राघव : हे बर झालं. बरं अरे तु आहेस कुठे? सकाळपासून मोबाईल लागत नव्हता. घरी गेलो तुझ्या तर कळलं कि तु मित्राकडे हाक मारायला गेलास. कोणतं ते गाव? सा..ळ...

समीर : साळशी! अरे ती मित्राची आई वारली होती. जवळजवळ एक महिना झाला. जायला वेळच मिळत नव्हता. म्हटलं आज वेळ आहे जावुन येऊ. 

राघव : ओ.. अरे हो का… सॉरी काय झालं होत त्यांना? 

समीर : अरे त्या म्हाताऱ्या होत्या. खुप वर्ष आजाराने अंथरुणावर खिळून होत्या. सुटल्या हे बरं झालं. 

राघव : हो ते आहेच रे. पण एवढा उशीर कसा झाला तुला?  सकाळी ८-९ च्या दरम्यान बसने गेलेलास ना तु?

समीर : अरे तो मित्र गावात कुठेतरी प्रेत झालं होत तिथे गेला होता. तो आला. मग १-२ तास थांबलो. त्यात  त्याने परत रात्री जेवणाचा आग्रह केला. तसं जेवलो आणि लगेच निघालो.

राघव : होय काय. सांभाळून ये रे आज. काय आहे आज महितेय ना? (त्याला चिडवत बोलतो) 

समीर : हो हो मी काय लहान नाहियेय…….(त्याला रागे भरत….....विषय बदलत) बर तु काय म्हणतोस? काय काम काढलसं? 

राघव : अरे काही नाही माझ्या आते-भावाचा इन्शुरन्स काढायचा होता म्हणून…

समीर : अरे वा! काढुया कि (आनंदाने) 

राघव : दिली कि नाही तुला आनंदाची बातमी.. बर तिथे कोणाला नाही ना विचारलसं कि तुमचा इन्शुरन्स काढायचा आहे का? म्हणून (त्याला चिडवत विचारतो)

समीर : काय रे बाबा? चेष्टा करतोस काय माझी? हे काम करुन सात वर्ष झाली पण अजूनपर्यंत कधी माणुसकी सोडून वागलो नाही मी. ( समाधानाने थोडस हसत.)

राघव : अरे मित्रा मी मस्करी केली तुझी. (हसत) बरं आता कुठे आहेस ? 

समीर : अरे अजुन बस स्टॉपलाच आहे. ११ ची बस आहे. अजुन नाही आलीय. कंटाळा आलाय वाट बघुन आणि त्यात मी एकटा त्यामुळे अजुनच. (कंटाळून) 

राघव : (त्याला घाबरवत) बापरे ! रात्रीचे जवळजवळ १२ बारा वाजत येतील आता. आणि तु तिथे ऐकटाच ना रे! बघ बा एखादी कोणीतरी पांढरे कपडे घालून चेट्कीण येईल सुंदर रूप घेवून. ते रुप बघून तु तिच्या प्रेमात पडशील आणि मग ती तुला….....

समीर : खाईल. (खोडकरपणे बोलतो) हो ना ? मला हे तु लहानपणापासूनच चिडवत आलास. आता फरक फक्त ऐवढाच आहे कि मी तिच्या ‘प्रेमात पडण्याऐवजी’ ती मला ‘चॉकलेट देईल’ असं म्हणतं तु मला घाबरवायचसं. (दोघे पण मोठ्याने हसतात.) 

राघव : हो रे ! (हसत) अरे पण खरं सांगू का असतात हो गावात अशी भूतं. (गंभीरपणे बोलतो)

समीर : तु गपं रे ! आधीच मी इथे ऐकटा आहे त्यात तु मला घाबरूवु नकोस. (थोडासा घाबरून) चल ठेवतो मी फोन आणि तुला बघतो हा चांगलाच मी आल्यावर. (त्याला प्रेमाने ओरडत) 

राघव : हो बघ रे मी मुंबईतच आहे. (खोडकरपणे हसतो) ठेवतो मी (फोन ठेवतो) 

समीर : (स्वतःशीच बोलतो.) आला मोठा मला घाबरवणारा..(अचानक स्टॉपच्या बाजुला एका झाडाची फांदी तुटून पडते.) कोण आहे….? (खूप घाबरत) ही तर झाडाची फांदी आहे. (स्वतःलाच धीर देत बोलतो.) अरे देवा! ही बस कधी येणार? जावू दे मी हनुमान चालिसाच म्हणतो.(म्हणायला लागतो.) 

(आणि अचानक त्याला मोहीत करुन टाकणारा आवाज ऐकायला येतो. ‘अहो ! ऐकता का?’ तो हा आवाज ऐकून चांगलाच टरकतो. थोडा वेळ तसाच उभा राहतो आणि मग एखाद्या रोबोटसारखा हळूहळू मागे वळतो. मागे वळताच त्याला समोर एक सुंदर, वेधक काळ्याभोर डोळ्यांची, रेखीव चेहऱ्याची पांढरा ड्रेस घातलेली, मोहित करुन टाकणारी अशी मुलगी दिसते. तो तिच्याकडे एकटक बघतच बसतो. तेवढ्यात राघवने बोललेले शब्द त्याच्या मनात डोकावतात. ‘अगदी तशीच’ असते ‘ती’. आणि अचानक त्याच्या मनात भीती जागा घेते. त्याला दरदरुन घाम फुटतो. आणि तो पटकन बोलतो…) 

समीर : तु कोण आहेस…….?  तु इथे तु काय करतेस? (थरथरत्या आवाजात) 

ती :  (इतका वेळ तिच्या चेहऱ्यावर असलेलं स्मितहास्य निघून जातं. ती रागात बोलते) इथे कशी म्हणजे? मुलींना रात्रीचं बाहेर पडू नये असं कुठे लिहिलंय का ? आणि एवढे डोळे फाडून बघायला काय झालं ? 

(तिच्या डोळ्यांतला राग बघून तो अजूनच घाबरुन झटकन तिच्यापासून दोन हात लांब जातो.) 

समीर : नाही! म्हणजे मला असं नाही म्हणायचं होतं (गोंधळून म्हणाला)

ती : (त्याला गोंधळेला बघून) सॉरी! म्हणजे मला असं  म्हणायला नको हवं होतं. पण तुम्ही थोडं वेगळ्याच पध्दतीने बोललातं माझ्याशी. आणि माझा….....

समीर : (तीच वाक्य अर्ध्यातच थांबवत म्हणाला) अहो सॉरी नका म्हणू. माझचं चुकलं. मी पण ना कधी कधी काहीतरी विचित्रच बोलून जातो. (स्वतःला सावरत म्हणतो. आता ती माणुसच आहे याची खात्री त्याला पटते)

ती : बरं ठीक आहे. (ती थोड हसतं) मला सांगाल का ११ची बस अजून का नाही आलीय ? कारण ११ वाजून गेलेत आणि कधी सहसा असा वेळ नाही होत बसला यायला.  (विषय थांबवण्याच्या स्वरात घड्याळाकडे बघत बोलते) 

समीर : अहो मी पण तेच बघतोय. मित्र तरी असचं म्हणाला होता की बस बरोबर ११ ला येते. (तो रस्त्याच्या दिशेने बघत बोलतो)

ती : तुम्ही इकडचे नाही का? 

समीर : नाही मी मुंबईचा आहे. इथे मित्राकडे आलो होतो. 

ती : तुमच्या बोलण्यावरुन ते वाटलचं. (हसत बोलते) कोण मित्र? मला नाव सांगता का त्याच? 

समीर : दानिश मयेकर. इथे मागच्या वाडीत राहतो. त्याची आई महिन्याभरापूर्वी गेली म्हणून हाक मारायला आलो होतो.

ती : अरे हो ! ओळखते मी त्यांना. तसं मी इथे प्रत्येकालाच ओळखते कारण….....

समीर : (घाबरून) अं म्हणजे? (मनात बोलतो - ही माणूसच आहे ना? समीर काय तु? नको येवढा घाबरु!)

(अचानक एका गाण्याचा आवाज येतो -” नैना बरसे, रिमझिम रिमझिम, पिया तोरे आवनकी आस…......” सगळीकडे अचानक वारा सुटतो. सुकी झाडाची पानं वाऱ्याने खाली पडु लागतात. त्या वाऱ्यात तिचे केस हलके हलके वर उडत असतात. त्याला ती तिथे आणखीच सुंदर दिसते. तो तिच्याकडे एकटक बघत बसतो. पण तिच मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हत. ती आपल्या पर्समध्ये काहीतरी शोधत असते. अचानक ती पर्समधून फोन बाहेर काढून बोलायला सुरुवात करते. तो आवाज तिच्या पर्समधून येत असतो. तिचा फोन वाजत असतो. पण समीर मात्र तिच्याकडेच बघत राहतो) 

ती : हॅलो, हा बोला.....हो…….....हो….माझ्याकडून कधीच चूक होत नाही…….हो………नाही…आता परत असं काही मी होवूच देणार नाही. एक घाव आणि दोन तुकडे….....(थोड्या गंभीरपणे बोलते) चला ठेवते फोन. भेटलो कि बोलू. (ती फोन पर्समध्ये ठेवते आणि त्याच्याकडे बघते) सॉरी हा… तो कॉल आ….......

समीर : (तीच बोलणं अर्धवट थाबंवत) हे गाणं….....?

ती : हो हे गाणं मला खूपच आवडतं अगदी पूर्वीपासून.. तुम्हाला माहितेय हे खूप जुन गाणं आहे. पण मला खूपच आवडतं.

समीर : पूर्वीपासून…? (आश्यर्याने घाबरून)

ती : अहो म्हणजे जेव्हापासून ऐकलयं तेव्हापासून ( आणि त्याकडे दुर्लक्ष करत ती बोलते) अहो क्लाईंटचे  चे कॉल हे असेच असतात. काळ वेळ न-बघताच येतात.

समीर : (थोड खोट-खोट हसत) अरे हो का? पण तुमची भाषा बाकी धारधार आहे हो.. (मिस्किलपणे हसत तिचं उत्तर जाणून घेण्यास आतूर)

ती : (हसत) अहो माझ्याकडून कामात कधीच चूक होत नाही. माझ्या रेकॉर्डमध्ये चूक अशी कधी झालेली नाही आणि आता यापुढे होणारही नाही…

समीर : म्हणजे काय? कोणती चूक? तुम्ही नक्की काय काम करता? (घाबरतो पण दाखवत नाही..) 

ती : अहो या जगात चुकिच्या, पापी माणसांना त्यांच्या योग्य त्या जागी पोचवण्याच काम करते मी.. ( शांतपणे हसत बोलते.) 

(आता मात्र मित्राने संगितलेल्या त्या गोष्टी खरच आहेत कि कायं असं त्याला वाटायला लागलं 'म्हणजे ही चेटकीण आहे'…….) 

(ती त्याला गोंधळेलेल्या विचारात हरवलेल पाहून परत बोलते.) 

ती : सॉरी! म्हणजे कोड्यात बोलल्याबद्दल. मी एक वकील आहे. मला वाटल माझ्या पेहरावाने तरी तुम्हाला समजेल.

(हे ऐकून समीरला मोठा धीर येतो. त्याला खूप हायसं वाटतं. मित्राचे विचार परत त्याच्या डोक्यातुन निघून जातात..) 

समीर : ओ…...असं बोला ना. मला वाटलं तुम्ही…….  ( तो पटकन बोलायचा थांबतो..) 

ती : (ती लगेच बोलते) भूत आहे. खरच अस वाटलं कि काय तुम्हाला??? कारण मगासपासुन तुम्ही अधूनमधून माझ्याकडे ह्याच भावाने बघतायं. ( मोठ्याने हसते.) 

समीर : (खजिल होवून) अहो तसं नाही काही. (आपली चूक मान्य करत) खोट बोलत नाही पण खरचं वाटलं हो मला. गावच्या खूप गोष्टी ऐकून आहे ना म्हणून.

ती : भुतं काय सगळीकडे असतात. गावात काय आणि शहरात काय. अगदी सगळीकडे.. तुम्ही शहरी लोक बिचाऱ्या गावलाच दोष देता…( हसते) 

समीर : काय? (आश्यर्याने बघतो) 

ती : अहो घाबरु नका मी मस्करी करतेय. 

समीर : हो हो ते तसं कळलं मला. (स्वत:ला जणू काही कळलयं असं भासवतो.) किती बोचरी थंडी आहे हो इथे (हात हातावर चोळत विषय बदलतो.) 

ती : थंडी तुम्हा लोकांना लागते आमच्या सारख्यांना नाही (हसत बोलते.) 

समीर : आमच्या सारख्यांना म्हणजे???? (परत गोंधळून बघतो.) 

ती : अहो म्हणजे तुम्ही शहरी लोक तुम्हाला कुठे असेल एवढ्या थंडीची सवय…(त्याला समजवतं) बरं तुम्हाला जर खूप थंडी वाजत असेल तर आपण चहा प्यायला जावूया का? अहो इथे जवळच एक चहाची टपरी आहे. म्हणजे मी नेते तुम्हाला. थंडी कशी कायमची पळून जाईल तुमची (मस्करीत हसत बोलते.) 

समीर : नको नको राहू देत. एवढी पण काय मला थंडी नाही वाजत आहे. त्यात बस आली आणि आपण तिथेच असलो तर आपली  बस…….

ती : अहो नाही चुकणार बस. इथे पुढे जवळच आहे टपरी… 

समीर : नको अहो राहू दे. मला एवढी गरज नाही वाटत आहे. (विषय उडवण्याचा प्रयत्न करतो. कारण मध्ये मध्येच राघवच बोलणं त्याच्या डोक्यात पिंगा घालत होतं. तो मनात बोलतो 'समीर गप्प बस तुझ आता अती होतयं' )

ती : बरं ठीक आहे. (त्याचा नकार ऐकत बोलते) ती रस्त्याच्या दिशेने बघत बोलते) ती बघा बस आली. लांबून लाईट दिसतोय...

समीर : हो आली कि पण जवळजवळ पाऊण तास लेट आलीय. (थोडा रागात) 

ती : (रस्त्याच्या दिशेने बघतो) हो पण आली याला महत्व ! (दोघेही एकमेकांकडे बघून हसतात) 

(कंडक्टरचा  बसमधून आवाज येतो ‘’ चला बसा लवकर ‘’ ) 

ती : चला मी जाते… या लवकर.. 

समीर : (मनात म्हणतो) ही अशी का बोलतेय जशी काय पुढे भेटणारच नाहीयेय.

(रस्त्याच्या समोरून बस येताना दिसते. तसा स्टॉपच्या इथे मेन रस्ता संपलेला असल्याने बस वळूनच जाणार असते.) 

(खाली वाकुन बॅग व इतर हाताने उचलत असतो. तेवढ्यात त्याच्या मोठ्या बॅगचा पट्टा तुटतो. तो कसबसा बॅगला परत जोडण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात बसच्या मागच्या दारात उभा राहून कंडक्टर त्याला आवाज देतो.) 

कंडक्टर : अहो चला या कि लवकर अजून किती वेळ थांबायच आम्ही एका माणसासाठी… (कंटाळून बोलतो)

समीर : हो हो माफ करा येतो येतो. बॅग तुटलीय माझी..प्लीज जरा मदत करता का ? 

कंडक्टर : हो आलो… (कंटाळून) 

(कंडक्टर समीरला मदत करायला स्टॉपजवळ जातो. त्याच्या बॅगचा पट्टा परत जोडण्याचा प्रयत्न करत असतो.) 

कंडक्टर : ही घ्या जोडली मी तुमची बॅग. किती सामान आहे हो तुमच्याकडे..( कौतुकाने बोलतो) 

समीर : काही नाही हो. मित्राकडे आलो होतो. त्याने त्याच्या नातेवाईकांना  देण्यासाठी थोड्या वस्तु दिल्या आहेत.

कंडक्टर : बर चला.. 

(दोघे बसच्या दिशेने जातात. बसमध्ये शिरताच समीरला एकदम धक्काच बसतो. बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर शिवाय कोणीच नसत.)  

समीर : ती? ती कुठे गेली? आता तर माझ्याशी बोलत होती. कुठे गेली? (आणि तो धाड्कन बाजूच्या सीटवर बसतो.) 

कंडक्टर : अहो कोण ती? भूत-बित बघीतलं कि काय साहेब तुम्ही? (थोडा हसत बोलतो.) शांत्या चल रे गाडी काढ. (ड्रायव्हर ला) 

ड्रायव्हर : अरे पक्या गाडीची रोजच्यासारखी नाटकं परत सुरु झाली. आता थोडा वेळ थांबाव लागेल रे. (कंटाळून) 

कंडक्टर : हो चालेल. उद्या डेपोत दाखवून काय तो सोक्ष-मोक्ष लाव रे बाबा…

ड्रायव्हर : होय रे उद्या हेच काम..

(ड्रायव्हरचं बोलणं अर्ध्यावर थांबवून समीर परत बोलतो.) 

समीर : (पूर्ण घाबरून जातो) अहो ऐका खरचं आता माझ्याबरोबर बोलत होती ती. कुठे गेली गेली काय माहित? 

कंडक्टर : अहो साहेब भुतानं झपाटलं कि काय तुम्हाला? (घाबरुन बोलतो) बर एक सांगा ती कशी होती? पांढरे कपडे घातलेली होती का? सुंदर, गोरी होती का? (गंभीरपणे विचारतो.) 

समीर : अहो हो खरचं. (आता मात्र दोन दगडांवर पाय ठेवत विचार करणारा तो एका दगडावर स्थिर राहतो.”ती भुतच होती” ह्यावर. त्याला धडकी बसते आणि सगळा फ्लॅशबॅक त्याच्या डोळ्यासमोरुन जावु लागतो.) 

कंडक्टर : अहो हो पण आता तुम्ही घाबरु नका.आम्ही आहोत ना आता तुमच्याबरोबर. (त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर देत गंभीरपणे बोलतो.) 

(आणि अचानक समीरला एक गाणं ऐकायला येत. तेच ‘ नैना बरसे रिमझिम रिमझिम, पिया तोरे आवन कि आस……. आणि तेव्हाच ती त्याला बसच्या खिडकीतून पाठमोरी गावाच्या कच्च्या रस्त्याने जाताना दिसते. थोड्या वेळाने काळोखात नाहीशीही होते. ते गाणंही ही वाजायचं बंद होतं) 

समीर : (खुपच घाबरून) अरे देवा! हे कस शक्य आहे. आता तर माझं डोक फिरायची वेळ आलीय...अहो ती… ती… ती दिसली का आत्ता तुम्हाला ! त्या……. त्या….रस्त्याने जात होती आत्ता आणि गायबही झाली. आणि त्यात हे तिच गाणं…….तुम्हाला आलं का ऐकायला? 

कंडक्टर : कुठे हो मला तर कोणीच दिसलं नाही. आपल्या तिघांशिवाय इथे एक चिटपाखरुही नाहीयेयं. आणि कोणत्या गाण्याबद्दल बोलतायं साहेब तुम्ही? मला खरचं काही ऐकायला येत नाहीयेय हो… (आश्चर्याने म्हणतो) 

समीर : अरे देवा ती…….ती….काय आता माझा पाठलाग करतेय की काय? आता ही काय मला सोडायची नाही…….(त्याला दरदरुन घाम फुटतो. आणि तो थरथरायला लागतो.) 

(कंडक्टर त्याचा हा प्रकार बघून घाबरतो.) 

कंडक्टर : (खुपच खजिल होवून बोलतो) अहो साहेब काय होतयं तुम्हाला? अहो तुम्ही खूपच धास्ती घेतलीत हो. अहो मी मघापासून मस्करी करत होतो हो. ही सगळी मघापासून मी तुमची मस्करी केली हो. मला काय माहित हो मस्करी ची कुस्करी होवून बसेल ती…

समीर : काय? म्हणजे मला काहीच समजत नाहीयेय हो. (अजूनही तो भानावर आलेला नसतो.) 

कंडक्टर : अहो साहेब जी मगाशी तुम्हाला दिसली ती भूत नसून माणूसच होती. ती मलाही दिसत होती. आणि ते गाणं तेही मला ऐकायला येत होतं. (त्याला घाबरत बोलतो.) 

समीर : (भानावर येतो) काय म्हणजे मघासपासून तुम्ही माझ्याशी खोटं बोलत होतात? (खूप रागावून बोलतो.) 

कंडक्टर : साहेब खरच माफ करा हो. (त्याला हाथ जोडून बोलतो.) खरचं चुकलं माझ हो….

समीर : (आपला राग आवरत बोलतो.) ठिक आहे. ठिक आहे. परत असं कधी कोणाबरोबर वागु नका. (दरडावत बोलतो) मी होतो म्हणून… नाहीतर कधीतरी मार खाल कोणाचातरी…बरं ते गाणं तेही तुमच्या मस्करीच तर …......

कंडक्टर : अहो नाही नाही साहेब. (त्याच्या पुढच्या सीटवरचा मोबाईल उचलतं बोलतो.) हा आवाज ह्या मोबाईलमधून येत होता. ह्यावर मगाशी फोन आला होता. ते मला कळल पण त्यावरून पण मी तुम्हाला फसवायचं ठरवलं. (खजिलपणे हसत बोलतो.) (मोबाईल बघत) बहुतेक वकिलीनबाई आपला मोबाईल इथेच विसरून गेल्या वाटतं.

समीर : (मोबाईल बघत) हो हा फोन त्यांचाच वाटतोय.असं घडलं तर सगळं. ओके…. पण त्या मला बसमधून उतरताना कशा नाही दिसल्या ? (आश्यर्याने विचारतो.)

कंडक्टर : अहो त्याच काय झालं मी बघा बसच्या दारातून तुम्हाला हाक मारली बघा तेव्हा त्या वर चढल्या फोनवर बोलतं. आणि फोनवर ' येते.. येते…' असं बोलत होत्या. तेवढ्यात बघा तुम्ही मला हाक मारलीत. मग मी तुमच्या मदतीला आलो तेव्हा त्या बसमधून उतरल्या असतील आणि तुम्हाला म्हणजे मला पण खिडकितून जाताना दिसल्या...असं झाल सगळं.(सुस्कारा सोडतो.) 

समीर : अरे हो का…(हसतं बोलतो. त्याला खूप बर वाटतं. आपल्या बाबतीत काही विचित्र झालं नाही याचा वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो.) बर मला एक सांगाल का त्यांच नाव काय आहे ? 

कंडक्टर : अहो साहेब तुम्ही बोललात म्हणता ना त्यांच्याशी तुम्हाला नाव कसं माहीत नाही त्यांच? 

समीर : नाही… पण तुम्ही सांगितलत तर काय होतयं (थोडासा उर्मटपणे बोलतो) 

कंडक्टर : अहो हो हो सांगतो चिडताय कशाला….त्या आमच्या गावच्या पाटलांची थोरली कन्या कुसुमताई पाटील.. खूप धाडसी, कणखर ,बिनधास्त, धडाकेबाज असं व्यक्तिमत्त्व आहे त्यांच. वकील आहेत त्या. कोणाला घाबरतं नाहीत त्या…(अभिमानाने बोलतो) बरं तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे?

समीर : हो थोड पर्सनल आहे…(तो वेगळाच गालातल्या गालात हसत बोलतो) 

कंडक्टर : अरे हो का? (त्याला काही कळत नाही) बर मी पुढे जावून बस अजून कशी चालू झाली नाही ते बघतो...…(पुढे जातो) शांत्या अरे काय बस कशी अजून चालु नाय झाली. ह्यावेळी चालू व्हायाला जरा जास्तच वेळ लागतोय…आणि मी एवढी त्या साहेबांची मस्करी करत होतो तु काय बोलला नाय. नाहीतर दरवेळी मी नेहमी लोकांची मस्करी करत असतो तेव्हा तु नेहमी मला बडबडतोस…(आश्यर्याने विचारतो)

(काहीतरी विचारात असलेला ड्रायव्हर त्याच्या बोलण्याने भानावर येतो) 

ड्रायव्हर : अरे तो गाडीचा रोजचाच प्रॉब्लेम आहे. ते सोड तुझा पाटीलबाईच्या बाबतीत काहीतरी गैरसमज झालायं. तु त्या साहेबांना असं का सांगितलस कि त्यांच्याबरोबर स्टॉपवर बोलत होत्या त्या  पाटीलबाई होत्या..? आणि ती गाण्याची काय भानगड आहे..? 

कंडक्टर : अरे होच त्यांच्याबरोबर पाटीलबाईच बोलत असणार. दुसर कोण बोलणार? तिथे कोणीच तर दिसतं नव्हतं अरे आणि ते गाण्याचा आवाज त्यांच्याच फोनवरून येत होत होता. फोन आला होता कोणाचातरी त्यावर. (त्याला हातातला फोन दाखवत बोलतो.) हा काय. 

ड्रायव्हर : अरे असं कसं शक्य आहे. पाटीलबाई माझ्या समोर गावच्या रस्त्याने आल्या. त्यांना कोणीतरी गाडीवरुन सोडलं ते मी स्वत:हा बघितलं. आणि त्या जशा फोनवर बोलतं बसमध्ये चढल्या तशाच त्या फोनवर बोलत उतरल्या.. (त्याचा पटवुन देत सांगतो.) 

कंडक्टर : (तर्क लावत बोलतो) अरे बरोबर मी जेव्हा साहेबांना मदत करायला गेलो तेव्हा त्या गेल्या म्हणून कदाचित मला फोनच्या बाबतीतल काही कळलं नाही. आणि अरे त्या नेहमी रात्रीच्या बसच्या प्रवासात  तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी पुढच्याच सीटवर बसतात. म्हणून मला वाटल त्या चढल्या असतील पुढच्या दरवाज्याने…..त्यांना एका माणसाने सोडलं इथे??? मी कसं बघितलं नाय?? हा माझ स्टॉपवर लक्ष होत.(सहज बोलतो) 

ड्रायव्हर : अरे काही दिवस झालेत तुला या गावात येवून आणि ह्या नोकरीला लागून. तुला काय अंदाज येणार इथले….....

कंडक्टर : अरे हा मोबाईल पाटीलबाईंचा नाही मं कोणाचा आहे? (हातातला फोन ड्रायव्हरला दाखवतो.) 

ड्रायव्हर : अरे असेल कोणाचातरी उद्या जमा करु डेपोला. पण तुला मी काय सांगतोय ते समजतयं का???

कंडक्टर : जर त्या पाटीलबाई नव्हत्या. मं 'ती कोण होती??????' ( घाबरून त्याच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडतात) 

ड्रायव्हर : अरे तुला मागे एक गोष्ट सांगितली होती आठवतेय का? आणि आज अमावस्या आहे. (तो घाबरून बोलतो) 

कंडक्टर : अरे हो आता आठवलं. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. (खूप घाबरून बोलतो) तु गाडी चालू होतेय का बग. आपण आधी इकडनं जावू (गडबडीतने बोलतो) 

ड्रायव्हर : (तो गाडी चालू करण्याचा परत प्रयत्न करतो  नशीबाने गाडी चालू होते.) अरे गाडी चालू झाली चक्क. सगळी देवाची कृपा म्हणावी लागेल. (वर बघून हात जोडतो.) (त्याला दटावत बोलतो)  हे बघ ही गोष्ट तु त्या साहेबाना सांगू नको साहेब थोडे भित्रे दिसतात उगाच खर ऐकून त्याना काही व्हायला नको..समजलं 

कंडक्टर : हो (मुकाटपणे मान हलवतो) 

(पण ह्या सगळ्या गोष्टींपासून अपरिचित असलेला  समीर मात्र बसच्या खिडकितून बाहेर बघत असतो. तिच्याविषयी कंडक्टरकडून कळल्यापासून तिच्या विचारात अगदी तो गुंतून गेलेला होता. त्याच्या मनात ते गाणं वाजत असतं. 'नैना बरसे रिमझिम रिमझिम, पिया तोरे आवन कि आस……') 

 

                                 
 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//