शिक्षक दिन असाही

Teachers day celebration in a different way


सिद्धी भुरके ©®

"आई अगं कधी मी शाळा पुन्हा सुरु करणार?? 15 दिवस उलटून गेले.. माझ्या सगळ्या मित्रांनी ऑनलाईन शाळा सुरु केलीये... " रोहन आपल्या आईला म्हणजेच लताला म्हणत होता.
"हो बाळा.. जरा एक दोन दिवस थांब..  मी कामावर विचारून बघते..  तुझी शाळा सुरु केल्याबिगर मला बी चैन नाही पडायचं... करते काहीतरी.. "म्हणत लता कामासाठी घराबाहेर पडली.
   स्वयंपाक आणि पोळ्यांची कामं करणाऱ्या लताची घरची परिस्थिती बेताची होती. नवरा एका सोसायटीत वाट्चमन म्हणून कामाला होता. लॉक डाउन आणि कोरोनामुळे लताला सुद्धा आता कोणी स्वयंपाकासाठी बोलवत नव्हतं म्हणून तिने आता धुणं भांडी, केर फरशीची कामं सुरु केली होती. आपल्याला चांगलं शिक्षण घेता आलं नाही म्हणून मुलाने चांगलं शिकून मोठं व्हावं अशी दोघा नवराबायकोची इच्छा होती म्हणून त्यांनी मुलाला चांगल्या शाळेत घातलं होतं. पण कोरोनामुळे शाळा बंद होत्या म्हणून ऑनलाईन शाळा सुरु झाली होती आणि त्यासाठी लागणारा स्मार्ट फोन काही लताच्या घरी नव्हता आणि तो विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे पण नव्हते. काय करायचं आता या विचारात लता आपटे काकूंकडे कामाला गेली.
      
      लता जेव्हा त्यांच्या घरात गेली तेव्हा आपटे काकू आपल्या मुलाला रौनकला ओरडत होत्या.
"अरे काय हे रौनक.. दर सहा महिन्याला कसले फोन बदलतो... पगारातून जरा सेविंग कर.. नको त्या गोष्टीवर कसला तुझा हा खर्च??? "
पण रौनक थोडी ऐकणार होता.. नवीन ट्रेंड आणि नवीन टेकनॉलॉजिच्या नावाखाली काही महिन्यांनी फोन बदलणे हा त्याचा छंदच होता जणू..
"आता फक्त सहा महिने जुना असलेला फोन काय करायचा? "काकूंनी त्याला विचारले.
"आई असू दे.. ठेवून दे तो.. असं पण विकून त्याचे फार काही पैसे येणार नाहीत.. "रौनकचे उत्तर ऐकून काकू वैतागून किचनमधे गेल्या.
    तिथे काम करत असणाऱ्या लताने माय लेकांचे बोलणे ऐकले होते. तिला वाटले काकूंना विचारून बघावं फोन साठी... तेवढ्यात तिला काकूंनीच विचारले,

" लता तुझ्या मुलाची झाली का गं ऑनलाईन शाळा सुरु?? "
"झाली काकू..  तुम्हास्नी एक इचारायचं होतं.. ते आमच्याकडे तो महागडा फोन नाहीये.. तर तेवढं... "लता बिचकत बोलली..
तेवढ्यात आपटे काकूंचा फोन वाजला.. त्यांच्या मुलीचा फोन आला होता. काकू तिच्याशी बोलत बसल्या आणि लताचं बोलणं अर्धवट राहिलं. लता बिचारी काम करून काही न बोलता तशीच निघून गेली.
     
   इथे काकू आपल्या मुलीसोबत बोलत होत्या..
"अगं काय सांगतेस प्रिया.. तू पण नवीन फोन घेतलास.."
"हो आई.. अगं रुपेशची ऑनलाईन स्कूल सुरु झालीये.. मग त्याच्या वर्गातल्या सगळ्यांनी नवीन फोन घेतला म्हणून याने पण हट्ट केला.. शेवटी काल घेतलाच नवीन फोन.. "प्रिया म्हणाली.
"अगं ऑनलाईन शाळा सुरु झाली म्हणून नवीन फोन घेतला हे काही मला पटलं नाही.. नाही ते हट्ट कसे पुरवता गं तुम्ही?? तिथे शिकायचं आहे कि फोन मिरवायचा आहे.. ज्याला ज्ञान संपादन करायचं ना तो कसंही करतो... त्याला जरा एकलव्याची गोष्ट सांग.. "
म्हणून काकूंनी फोन ठेवला.

      फोन प्रकरणामुळे काकूंचं डोकं जाम दुखू लागलं होतं. "काय ही आजकालची पिढी.. आता नावं तरी कोणाला ठेवायची.. इथे आपला मुलगा.. आणि तिथे फोन साठी हट्ट करणारा आपलाच 10 वर्षांचा नातू.. ज्यांच्याकडे असा स्मार्ट फोन नसेल ती मुलं कशी शिकणार या वर्षी.. त्यांना खरं फोनची गरज.. "काकू असा विचार करत असताना त्यांना आठवलं लता आपल्याला आज काही विचारत होती पण आपलं मात्र लक्ष नव्हतं तिच्याकडे.. आणि काकूंच्या मनात विचार आला कि, "लताचा मुलगा  कसं शिकत असेल? तिच्याकडे तर साधाच फोन आहे."
आणि मनोमन काहीतरी विचार करून काकू तिथून उठल्या.

      इथे लता घरी येऊन विचार करत होती.. काय करावं तिला सुचत नव्हतं. तिने देवापुढे हात जोडले आणि म्हणाली, "देवा तूच आमचा माय बाप आहेस..  माझ्या लेकराची शाळेची काय बी करून सोय कर रे.. शाळा सुरु झाली कि फी भरायला लागणार.. नवीन पाटी पुस्तक घ्यावं लागणार.. आता त्याची सोय करू कि महागडा तो फोन शोधू.. काय बी कळत नाहीये मला..  मदत कर रे.. "
     दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे लता आपटे काकूंकडे  कामाला गेली. बघते तर काय.. काकूंनी गेल्या गेल्या तिच्या हातावर स्मार्ट फोन ठेवला. तिला काही समजेना..
"काकू.. हे काय?? "तिने विचारलं.
"तुझ्या मुलाची ऑनलाईन शाळा आहे ती..  त्यात मी इंटरनेट पॅक टाकून दिला आहे.. आता ते कसं काय चालू करायचं ते तुला रौनक शिकवेल.. "काकू म्हणाल्या.
"अहो पण.. एवढं सगळं कशासाठी काकू.. उगाच तुम्हास्नी त्रास.. "
"अगं त्रास काय वेडे.. हे बघ तुझ्या मुलासाठी नवीन पुस्तकं पण आणलीये . हा फोन असाच पडून राहणार घरात.. त्यापेक्षा तुझ्या मुलाचं शिक्षण सुरु होईल यावर..  ज्याला खरचं शिकायची हौस आहे ना त्याच्या कामी येऊ दे हा फोन.. आमच्याकडे काही किंमत नाहीये याची.. "काकू म्हणाल्या..

    लताने काकूंचे मनापासून आभार मानले.. रौनककडून कसा चालू करायचा फोन वगैरे सगळं तिने समजावून घेतले.. आणि आनंदाने घरी गेली.तिने मनोमन देवाचे आभार मानले.  फोन आणि नवीन पुस्तकं पाहून तिचा मुलगा पण खुश झाला आणि त्याची ऑनलाईन शाळा सुरु झाली.
      काही दिवसांनी सकाळी सकाळीच लता आपल्या मुलाला घेऊन काकूंच्या घरी गेली. आज हिचा मुलगा कसा काय आला हे काकूंना पण काही समजलं नाही.
"अगं आज रोहन कसा काय आला तुझ्यासोबत? शाळा नाहीये का आज त्याची? "काकूंनी विचारलं..

"काकू आहे माझी शाळा.. आज शिक्षक दिन आहे..  मॅडमने ज्यांच्यामुळे आपण शिकतोय त्यांचे आभार मानायला सांगितले.. म्हणून हा नारळ आणि फुल घेऊन आलोय मी.. "रोहन म्हणाला.

"पण मग तुझ्या मॅडमचे.. आई वडिलांचे आभार मान.. त्यांच्यामुळे तू शिक्षण घेत आहेस.  "काकू बोलल्या..
"ते आहेत माझ्या पाठीशी.. पण तुम्ही फोन आणि पुस्तकं दिली नसती तर माझी ऑनलाईन शाळा सुरु झाली नसती.. आमच्या मॅडमनी सांगितलं कि आपल्याला आसपासचे लोकं खूप काही शिकवून जातात.. प्रत्येक वेळी त्या शाळेतल्या मॅडम असाव्या असं गरजेचं नाही.. आणि त्यांचं वाक्य ऐकून तुम्हीच आठवल्या मला.. म्हणून हे घ्या काकू.. नारळ आणि फुल.. "रोहनने काकूंना नारळ, फुल देऊन त्यांच्या पाया पडला.

  काकूंना काही समजेना.. त्या म्हणाल्या,
"मी काही फार मोठं काम केलं नाहीये. . तू उगाच मोठेपणा दिलाय मला..  मला वाटलं या फोन मुळे तुझं शिक्षण कुठं अडून राहणार नाही.. बास.. "

"अहो काकू तुम्ही एवढी माणुसकी दाखवली लई झालं आम्हांला.. इथे लोकं आम्हा गरिबांचे पगार द्यायला पण रडतात.. जेव्हा कुणी मदत केली नाही तेव्हा तुम्ही देवासारख मदत केली.. माझं लेकरू तुमच्यामुळं शिकतंय.. तुम्ही त्याला माणुसकी शिकवली काकू.. मग आता झाला कि तुम्ही त्याच्या मॅडम.. झाला त्याचा शिक्षक दिन साजरा "लता म्हणाली.
     
माय लेकांचं प्रेम पाहून काकूंचं मन भरून आलं... नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.. आज त्यांनी आगळा वेगळा 'शिक्षक दिन' अनुभवला होता..  कोणाच्या तरी कामी आलो आपण याचं त्यांना समाधान वाटत होतं.. त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला रोहनला..
  
कथा कशी वाटली ते मला कमेंट  करून सांगा.. आवडली तर like करा.. नावासकट share करायला हरकत नाही..  धन्यवाद..
सिद्धी भुरके ©®