Jan 19, 2022
स्पर्धा

या च्याने तारलं मला!

Read Later
या च्याने तारलं मला!

या च्याने तारलं मला!

एका आळीतलं चहाचं दुकान..सदा गजबजलेलं. सखूमावशी दुकानाची सोल ओनर. नवरा दारु प्यायचा. पदरात दोन पोरं होती. 

सखूमावशीचा नवरा आधी खूप चांगला होता. वेठबिगारी करायचा. गवंडी कामात एकदम हुशार होता. लोकं बोलवून न्यायचे त्याला. कधी रजेवर राहिला तर बिल्डर स्वतः फोन लावून विचारपूस करायचे. मावशीचं घर होतं सासूच्या कारकिर्दीतलं. 

 संगत..लय बेकार. पिणाऱ्यांची संगत लागली त्याला नि बसला त्यांच्या पंगतीत जाऊन. मावशीनं खूप समजावलं त्याला,पण छे. बायकोपेक्षा दारु जवळची झाली त्याला. कधी त्या मदिरेत बुडून गेला त्याचं त्यालाच कळलं नाही. 

तो दारु पिऊन धिंगाणा घालायला लागला की सासू हिला नको नको त्या शिव्या घालायची. हिच्यामुळे माझ्या पोराचं वाटोळं झालं म्हणायची. दोन पिल्लांकडे बघून सखूमावशी तिच्या शिव्या सहन करायची. सकाळी उठून भाकरी बडवायची,कोरड्यास बनवून झाकून ठेवायची नि लोकांच्या कामाला जायची. 

चार घरची धुणीभांडी करायची. दुपारी कधी चारेक वाजता उन्हं पांगल्यावर घरी यायची. घरात हा गडी येऊन तराठ झोपलेला असायचा. त्याच्या अवतीभवती माशा घुमायच्या. नित्याच्या विधींचंही ध्यान नसायचं त्याला.

 पुढेपुढे तर त्याच्या या बेवडेपणामुळे त्याला कामं मिळेना झाली. मग काय घरातले डबे उसक. कुठे पैसे दिसले का ढोसून येणं. नाहीच मिळाले तर बायकोकडे मागणं..तिने दिले नाही तर तिच्या अंबाड्याला धरुन तिचा हात पिरगाळणं..लाथाखोटांनी मारणं. लोकजज्जेस्तव मावशी सगळं सहन करत होती. 

सखूमावशीची पोरं सोन्याच्या गुणांची. काय मिळेल ते खाऊन गुपचूप आपला अभ्यास करायची. आई घरात नसताना घर ,अंगण झाडून लख्ख करायची. बाप कुठे पडला तर त्याला खांद्याला धरुन घरी आणायची. भांड्यांवर हात मारायची. लोकं चिडवायची त्यांना बेवड्याची पोरं म्हणून. का रे बाप टुल का, विचारायची. बबन,रतन दोघांच्याही माना शरमेने खाली झुकायच्या. त्यांनी मनात ठरवलेलं,हे दिवस बदलायचेच. 

नवरा दारु पिऊन पोरांवर हात उचलायला लागला. एकदा तर त्याने मुलांच्या वह्यापुस्तकांसाठी जमवलेले पैसेही दारुवर उडवले. 

एका साहेबाच्या घरात मावशी कामाला जायची. त्याची बायको बाजारात गेली होती. मावशी घरात भांडी घासत होती. सायबाने तिला मागून धरली. मावशी दुड्या अंगाची होती. नवऱ्याचा मार खाल्ला पण दुसऱ्या माणसाचा स्पर्श,अंगाला लावून घेईल की काय! झटदिशी हिसका दिलान्. तो सायेब गांगरला. तरी अंगात रग भारी. परत जवळ येऊ लागला तसं मावशीनं एक सणकन लगावून दिली. धुणीभांडी करुन कडक झालेले हात ते. तो सायेब भेलकांडला. मावशीनं नजरेनेच त्याला उभा जाळला.

 पदर कमरेला खोचला न् दुसऱ्या घरच्या कामाला गेली. नेहमी खळखळणाऱ्या झऱ्यासारखी बोलणारी सखू का बरं बोलत नाही म्हणून गोडबोले आजीने तिला जवळ घेतलं. तिच्या अंगावर हात फिरवला व चौकशी केली.

 त्या मायेच्या स्पर्शाने सखूमावशीच्या अश्रूंचा बांध फुटला. ओक्साबोक्शी रडली ती त्या सुरकुतल्या हातांचा किती आधार वाटला तिला! आजीने तिला  चहा करुन दिला. आजोबांना म्हणाली,हिला आळीत एखादी जागा भाड्याने घेऊन द्या.   पैशाचं मी बघते. माझ्या पाटल्या ठेवा गहाण. नाहीतरी सोनं घालून का जाणार आहे स्वर्गात! मला ना पोर ना टोर. हिच्या पोटी सोन्यासारखी पोरं दिलेत देवाने तर नवरा असा. हिचंच नाणं खोटं म्हणून त्या हरामखोराची हिंमत झाली हिला हात लावण्याची. 

आजोबांना पटलं. एक छोटासा गाळा रिकामीच होता,आजोबांच्या मित्राचा. आजोबांनी त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. जुनी माणसं ती, माणुसकी शिल्लक होती. वर्षभरासाठी फुकट वापरायला दिलं दुकान. तुझं बस्तान बसलं की तुझ्या मनाने भाडं दे म्हणाले. 

आजीकडे जुना स्टोव्ह नि तिच्या सासूच्या कारकिर्दीतला पितळी टोप होता. सखूमावशीने दुकान सुरु केलं. आजोबांनी कपबशा आणून दिल्या. तिला म्हणाले,"घरच्यासारखा चहा करायचा. ती ग्लासं..वगैरै नको."

 चांगल्या गुणवत्तेची चहापत्ती आणून दिली. दुधाचा रतीब लावला नि सखूमावशीचं चहाचं दुकान सुरु झालं. बाजुलाच कंपन्या होत्या. तिथली माणसं आल्या,वेलचीच्या सुगंधाने आपसूक खेचली गेली.

 डोक्यावर पदर घेऊन सखूमावशी सकाळी सात वाजताच दुकान उघडायची. देवाच्या फोटोला अगरबत्ती दाखवून दिवस सुरु व्हायचा तिचा. दुधवाला आला की पातेल्यात दूध उकळत ठेवायची. आलं,वेलची कुटून घ्यायची. नि मग चहा मांडायची. कपात चहा ओतून त्यावर चमचाभर सायही घालायची. कंपनीतले साहेबलोकंही तिच्याकडून चहा ऑर्डर करायची.

 सखूमावशीचा नवराही दुकानावर यायचा, पैसे मागायला पण आजोबा गल्ल्यावर बसायचे. त्यांची नजर त्याची सगळी नशा उतरवायची. त्यांच्या हातातली छडी ते सापकन बाकड्यावर वाजवायचे. सखूमावशीचा नवरा पाठ चोळीत जायचा. सखूमावशी तोंडाला पदर लावून हसायची. बरणीत खाऊ भरुन ठेवू लागली चहासोबत द्यायला. गिर्हाईकांच्या मागणीनुसार कांदेपोहे सुरु केले. दुपारच्या जेवणासाठी डाळतांदूळ,भाज्या व काळा मसाला घातलेली चविष्ट खिचडीही सुरु केली. पुढे आजीआजोबा दोघेही गेले. सखूमावशीने त्यांचा फोटो लावला दुकानात. नवऱ्याला दारु गेली घेऊन.

आज सखूमावशीची मुलाखत होती. सखूमावशीची दोन्ही मुलं बबन नि रतन कोणताही क्लास न लावता एमपीएससी पास झाली होती. तेही पहिल्या फटक्यात. मावशीने सगळ्या पावण्यांना आधी चहा पाजला आणि डोक्यावरचा पदर सावरत म्हणाली,"या च्याने तारलं बघा मला!"

मावशीची मुलं मोठ्या पदांवर रुजू झाली पण मावशीने चहाची साथ सोडली नाही. हातपाय धड असेपर्यंत काम करणार म्हणते.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now