चहा आणि बरंच काही भाग ९

Story of friendship

      आपण मागील भागात बघितलं, मेघनाला आदित्यचा राग आलेला असतो. आदित्य विचारात असतो की मेघनाचा राग कसा दूर करावा? आता बघूया पुढे काय होतं

      मेघना कंपनीतून आपले काम आटोपून निघते, मोबाईल चेक करते पण त्यावर आदित्यचा एकही मॅसेज आलेला नसतो, ती याच विचारात असते की आदित्यने साधं सॉरी ही म्हणलं नाही. मेघना तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडताना शिवानीला दिसते,

शिवानी--- मेघना काय झालं? अशी तोंडातल्या तोंडात काय बोलत आहेस?

मेघना--- तो खडूस आदित्य बघ ना, सकाळपासून एक मॅसेज सुद्धा केला नाही, त्याला माहित होतं की मला त्याचा राग आला आहे तरी साधं सॉरी पण बोलला नाही.

शिवानी--- तुला आदित्य सरांचा राग का आला?

मेघना--- मी त्याला स्वतःहुन मॅसेज केला तर वर तोच मला सांगतोय, तु कंपनीत आहेस, आपल्या कंपनीत जास्त मोबाईल वापरण्यास मनाई आहे सो आत्ता आपण नको बोलूयात.

शिवानी--- अगं मग त्यांच बरोबरच आहे ना.

मेघना--- शिवानी पण मला त्यावेळी आदित्यची आठवण आलेली आणि मला त्याच्याशी बोलायच होतं.

शिवानी--- एक मिनिटं मेघना, मला कळत नाहीये की तु आदित्य सरांच्या बाबतीत एवढी पजेसीव का होत आहेस? एक तर तुम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहात असही काही नाही, तुम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात असही काही नाही मग तुझा त्यांच्याशी बोलण्याचा एवढा अट्टाहास का? मेघना या सगळ्याचा काय अर्थ होतोय?

मेघना--- शिवानी मी आदित्यच्या बाबतीत पजेसीव नाही होत आहे. मला फक्त त्याच्याशी बोलण्याची इच्छा होत आहे.

शिवानी--- मेघना तु जे सध्या काही आदित्य सरांच्या बाबतीत बोलत आहेस, वागत आहेस, त्याला पजेसीव होणंच म्हणतात. तुला जरी तुझं त्यांच्या प्रती वागणं नॉर्मल वाटत असेल तरी हे नॉर्मल नाहीये. समजा आदित्य सरांनी या सर्वाचा वेगळाच अर्थ लावला तर.

मेघना--- माझ्या वागण्याचा काय अर्थ लागू शकतो मला कळलं नाही.

शिवानी--- आदित्य सरांना अस वाटू शकतं की तु त्यांच्या प्रेमात पडली आहेस.

मेघना--- अरे हा तर मी विचारच केला नाही.

शिवानी--- मेघना हे बघ तु जरी आदित्य सरांच्या प्रेमात पडली असशील तर काहीच हरकत नाहीये पण आपण आता कॉलेज मध्ये नाहीये टाईमपास अफेअर झालं तरी काय फरक पडतो अस म्हणायला. तु आदित्य सरांना कधी पासून ओळखतेस? आत्ता कुठे तु त्यांना थोडी फार ओळखायला लागली आहेस, तुला त्यांच्या बद्दल प्रेम, आकर्षण वाटूच शकते, हे अगदीच नॉर्मल आहे पण लगेच निष्कर्षाला येऊन पोहचू नकोस. आधी सरांशी चांगली मैत्री होऊदेत मग हळूहळू पुढचा विचार कर. जास्त दिवस गेले तरच सरांचा मूळ स्वभाव तुला कळेल आणि तुझं खरंच आदित्य सरांवर प्रेम आहे की नाही याची clarity तुलाही येईल.

मेघना--- Thank you so much शिवानी, मी तर पुढचा काहीच विचार केला नाही शिवाय माझ्या वागण्याचा असाही अर्थ निघू शकेल असा मला वाटलंच नाही.

शिवानी--- हे बघ मेघना आदित्य सर मित्र म्हणून नक्कीच चांगले असतील, तु त्यांच्याशी बिनधास्त मैत्री कर पण पुढे जाण्याआधी जरा विचार कर आणि मगच पुढे पाऊल टाक, मला माहित आहे , तु मनाने खूप हळवी आहेस. तुझ्या भावनांशी, मनाशी कोणी खेळणार नाही याचा विचार करशील

मेघना--- शिवानी तु मला किती परफेक्ट ओळखतेस.

शिवानी--- मैत्री केली आहे निभवावी तर लागणारच ना.

          मेघनाचा आणि शिवानीचा बस स्टॉप येतो, त्या बस मधून खाली उतरतात व आपापल्या घराच्या दिशेने जातात. मेघना घरी जात असताना मेघनाला आदित्यचा फोन येतो,

आदित्य--- हॅलो मेघना, कुठे आहेस?

मेघना--- घरी चालले आहे.

आदित्य--- अजून पोहचली नाहीस ना?

मेघना--- नाही स्टॉप वरून घरी चालली आहे, पाच मिनिटांत पोहचेल.

आदित्य--- तोपर्यंत माझ्याशी बोलू शकते ना

मेघना--- हो बोल ना, काय म्हणतोस?

आदित्य--- तुला सकाळी माझा राग आला होता का?

मेघना--- सुरवातीला आला होता पण नंतर मलाच जाणवलं की मी जरा जास्तच रिऍक्ट केलं.

आदित्य--- मेघना तु कंपनीत नवीन आहेस, आपण ज्या गोष्टी करतो त्या सर्वांवर कंपनीतील मोठ्या सरांचे बारीक लक्ष असते, तुला कंपनीत टिकायचे असेल, पुढच्या हुद्द्यावर जायच असेल तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तु जर कंपनीत मोबाईलचा जास्त वापर करताना कोणाला आढळलीस तर त्याचा परिणाम तुझ्या वार्षिक रिपोर्ट वर होईल.

मेघना--- हो, आलं ते माझ्या लक्षात, तु माझ्या चांगल्या साठीच बोलला पण मीच त्यावेळी समजून घेतलं नाही.

आदित्य--- मला तर वाटलं होतं की तुला खूपच राग आला असेल.

मेघना--- (मनातल्या मनात, शिवानी सोबत बोलण झालं म्हणून नाहीतर मला खरच खूप राग आलेला) मला राग आला होता पण कामामध्ये मी विसरूनही गेले होते की मला तुझा राग आला होता.

आदित्य--- बर झालं, मी कंपनीला आणि कामाला खुप मिस करतोय ग.

मेघना--- आराम करून घे, नंतर इच्छा असली तरी सुट्टी भेटणार नाही. आदित्य मी घरी पोहोचलेय, आता फोन ठेवते, नंतर बोलू.

आदित्य--- चालेल, बाय

        मेघनाशी बोलल्यावर आदित्यला असे वाटते की, मेघना खूप तुटक तुटक बोलत होती, आधी खूपच मनमोकळेपणाने बोलायची मग अस अचानक काय झालं की ती एवढी तुटकपणे बोलतेय. मुलींना ओळखणं खरच खूप कठीण दिसतंय. जाऊदेत आपल्याला तरी काय करायचंय, आपणही जरा अंतर राखूनच बोलूया.

           त्या दिवसानंतर आदित्य आणि मेघना मध्ये फक्त मॅसेजेस द्वारे बोलण व्हायचे ते पण फॉर्मल. मेघना आदित्यशी तुटकपणे बोलायची. आदित्यला मेघनाच्या वर्तनातील अचानक झालेला बदल जाणवला होता पण आदित्य याबाबतीत मेघनाशी काहीच बोलत नाही. आदित्य ठरवतो की जेव्हा मेघनाशी प्रत्यक्ष भेट होईल तेव्हाच तिला तिच्या वागण्यातील बदलामागचे कारण विचारू.

           आदित्यच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने काही दिवसांनी आदित्यने कंपनी पुन्हा जॉईन केली. आदित्य कंपनीत यायला लागल्यापासून मेघनाला खूप आनंद झाला होता पण मेघना आदित्यला अस दाखवत होती की त्याच्या परत जॉईन करण्याने तिला काहीच फरक पडला नाहीये. आदित्य मेघनाच्या तुटक वागण्याकडे दुर्लक्ष करायचा पण आदित्यला मेघनाच्या तुटक वागण्यामागचे कारण जाणून घ्यायचे होते, म्हणून आदित्य मेघनाला मॅसेज करतो की मेघना कंपनी सुटल्यावर बाहेर भेटशील का?

मेघना आदित्यला भेटायला तयार होते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all